कुणासाठीच न थांबणारी मुंबई “भारत छोडो” नारा देणाऱ्या या क्रांतिकारकासाठी थांबली होती
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
काही शब्दांचं इतकं महत्व असतं की, त्या शब्दांशिवाय आपण त्या घटनेची कल्पनाच करू शकत नाही. खाजगी संस्था आपली वस्तू विकण्यासाठी शब्दांना एकत्र करून “हमारा बजाज” सारखी टॅगलाईन तयार करतात आणि वर्षोनुवर्षे त्यावर आपला व्यवसाय चालवतात.
भरत दाभोळकर यांनी लिहिलेलं “अब की बार… मोदी सरकार” ही सत्ता बदल घडवून आणणारी टॅगलाईनसुद्धा भारतीय निवडणुकांच्या इतिहासात अशीच अजरामर होणारी आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा या गोष्टींचं तितकंच महत्व होतं. “भारत छोडो” या दोन शब्दांमध्ये पूर्ण भारताला एकत्र करण्याची ताकत होती.
८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याची चळवळ मुंबईतील गोवलीया टॅंक मैदान येथे सुरू केली होती. पण, “भारत छोडो” हे शब्द त्यांनी लिहिलेले नव्हते. हे शब्द काँग्रेसच्या तत्कालीन नेता असलेल्या ‘युसूफ मेहेरली’ यांचे होते.
महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीला “करेंगे या मरेंगे” ही ओळ दिली होती आणि क्रांतिकारी लोकांमध्ये एक चैतन्य निर्माण झालं होतं. ही ओळ क्रांतिकारी लोकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की, पुढे जाऊन त्याची परिणीती असहकार आंदोलनमध्ये झाली होती.
“भारत छोडो” ही ओळ सुचवणारे युसूफ मेहेरली हे १९४२ मध्ये ३९ वर्षांचे होते. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग असलेले युसूफ मेहेरली यांना ८ वेळेस इंग्रजांनी अटक केली होती.
–
- विदेशी भूमीवर ‘पहिल्यांदाच भारतीय झेंडा फडकावणाऱ्या’ भिकाजी कामा यांच्याविषयी…
- जर या व्यक्तीची खेळी यशस्वी झाली असती तर भारत १९१५ सालीच स्वतंत्र झाला असता!
–
के. गोपालस्वामी यांनी लिहिलेल्या ‘गांधी अँड बॉम्बे’ या पुस्तकात भारत छोडो या ओळींचा कसा जन्म झाला? याबद्दल खालील माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे :
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक मुंबईत बोलावण्यात आली होती. प्रत्येक सदस्याला स्वातंत्र्य चळवळीला उभारी देईल असं वाक्य सुचवण्यास सांगण्यात आलं होतं. शांतिकुमार मोरारजी यांच्यावर या सर्व वाक्यांचं संकलन करण्याची आणि महात्मा गांधींना ते ऐकवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
स्वातंत्र्य सैनिकांनी सुचवलेल्या ओळींपैकी “गेट आऊट” असं एक वाक्य होतं. महात्मा गांधी यांनी हे वाक्य ‘उद्धट’ म्हणून त्याला नकार दिला होता. राजगोपालाचारी यांनी “रिट्रीट”, “विड्रॉ” हे दोन शब्द सुचवले होते. पण, हे शब्द सुद्धा महात्मा गांधी यांना आवडले नाहीत.
युसूफ मेहेरली यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी “भारत छोडो” हे शब्द सांगितले आणि ते ऐकताच महात्मा गांधी यांनी दुजोरा दिला होता.
मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळात रेल्वेमंत्री असलेल्या मधु दंडवते यांच्या आत्मचरित्रातसुद्धा या गोष्टीची नोंद आहे की, युसूफ मेहेरली यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर “भारत छोडो” नावाचं एक परिपत्रक सुद्धा प्रकाशित केलं होतं.
प्रकाशनाच्या काही दिवसात या परिपत्रकाची संपूर्ण विक्री झाली होती. युसूफ मेहेरली यांनीच त्या काळात “भारत छोडो” या शब्दांचा बिल्ला तयार करून ७ ऑगस्ट १९४२ रोजी जमा झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना हा बिल्ला लावण्यात आला होता.
युसूफ मेहेरली यांनी लिहिलेल्या इतर लिखाणापैकी “सायमन गो बॅक” ही सुद्धा ओळ खूप लोकप्रिय झाली होती. १९२८ मध्ये भारतावर लादण्यात आलेल्या सायमन कमिशनच्या विरोधात हा स्लोगन लिहिण्यात आला होता.
मुंबई पोर्टवर जेव्हा सायमन कमिशनचं जेव्हा आगमन झालं तेव्हा युसूफ मेहेरली आणि त्यांचे सहकारी हे हमालाच्या वेशात तिथे हजर होते आणि त्यांच्या शर्टवर “सायमन गो बॅक” हे वाक्य लिहिण्यात आलं होतं.
युसूफ मेहेरली यांचा जन्म ३ सप्टेंबर १९०३ रोजी मुंबईत एका प्रतिष्ठित कापड व्यवसायिकाच्या घरात झाला होता. लहानपणीच त्यांना विविध स्वातंत्र्य सैनिकांबद्दल वाचण्याची आवड होती. संवेदनशील मनाच्या युसूफ मेहेरली यांचा ‘कामगारांच्या व्यथा’ या विषयावर सुद्धा खूप अभ्यास झालेला होता.
घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. पदव्युत्तर कायदा शिक्षण घेत असतांना त्यांनी बॉम्बे युथ लीगची स्थापना केली होती.
युसूफ मेहेरली यांचं स्वातंत्र्य चळवळीतील काम हे फक्त स्लोगन लिहिण्यापुरतं मर्यादित नव्हतं. स्वातंत्र्य सैनिक राम मनोहर लोहिया, अरुणा असफ अली आणि अच्युत पटवर्धन यांना ‘भारत छोडो’ चळवळीचा प्रसार करण्यासाठी भारतभर भ्रमण करता यावं यासाठी युसूफ मेहेरली हे आहोरात्र मेहेनत करायचे.
भूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळीत आपला सक्रिय सहभाग नोंदवण्यात युसूफ मेहेरली यांचा हातखंडा होता.
१९३२ मध्ये युसूफ मेहेरली यांना सर्वात पहिल्यांदा अटक करून नाशिक कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्याच वेळी, युसूफ हे इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या संपर्कात आले.
१९३४ मध्ये नाशिक कारागृहातून सुटका झाल्यानंतर युसूफ मेहेरली यांनी जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, नरेंद्र देव यांच्यासोबत राहून स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली.
–
- केवळ देशासाठी १८ व्या वर्षी शहीद झालेल्या युवा क्रांतिकारकाची कहाणी!
- प्रत्येक भारतीयासाठी जीव की प्राण असलेल्या तिरंग्याच्या जन्माची “ही” कहाणी अवर्णनीय भाव उत्पन्न करते
–
१९३८ मध्ये युसूफ मेहेरली यांनी न्यूयॉर्क मध्ये झालेल्या जागतिक युवा कॉग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या अनुभवानंतर युसूफ मेहेरली यांनी ‘लिडर्स ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिलं होतं.
पुढे युसूफ मेहेरली यांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहात सामील होण्यास सुरुवात केली. मुंबईच्या महापौरपदी निवड होणारे ते पहिले सामाजिक कार्यकर्ते होते. महापौरपदी विराजमान झाल्यावर त्यांनी इंग्रजांना द्यावा लागणारा ‘एआरपी’ हा २४ लाख रुपये द्यावा लागणारा कर रद्द केला.
‘हवाई हल्ल्यापासून सुरक्षा’ या नावाखाली इंग्रजांनी हा कर सामान्य नागरिकांकडून वसूल करण्यास सुरुवात केली होती. युसूफ मेहेरली यांच्या विरोधानंतर मुंबई हे असं एकमेव शहर झालं होतं जे हवाई हल्ल्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यास समर्थ होतं.
ब्रिटिशांनी बर्मा सारख्या ठिकाणाहून ऐनवेळी सुरक्षा करण्यास दाखवलेली असमर्थता यामुळे युसूफ मेहेरली यांनी हा निर्णय घेतला होता.
६ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांच्यासोबत अटक झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये युसूफ मेहेरली यांचा सुद्धा समावेश होता. युसूफ मेहेरली यांची १९४६ मध्ये कारागृहातून मुक्तता करण्यात आली होती. स्वतंत्र भारताच्या पहिल्या खासदारांमध्ये युसूफ मेहेरली यांचं नाव घेण्यात येतं.
१९४३ पासून युसूफ मेहेरली यांना हृदयाचा आजार झाला होता. सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. १५ ऑगस्ट १९४७ हा त्यांच्या जीवनातील आनंदाचा दिवस म्हणून त्यांनी उल्लेख केला होता.
२ जुलै १९५० रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी युसूफ मेहेरली यांचं हृदयाच्या त्रासाने मुंबईत निधन झालं.
युसूफ मेहेरली यांच्या निधनाचं दुःख म्हणून ३ जुलै १९५० रोजी बस, ट्रेन यांना काही क्षणासाठी स्तब्ध करण्यात आलं होतं. सर्व शाळा, महाविद्यालय, दुकान, फॅक्टरी हे त्या दिवशी बंद ठेवण्यात आलं होतं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही मुंबईतील सर्वात मोठी आर्थिक व्यवहार संस्था त्या दिवशी ‘विना व्यापार’ सुरू ठेवण्यात आली होती.
कधीच, कोणासाठीच न थांबणारी मुंबई ही त्या दिवशी युसूफ मेहेरली यांच्या सन्मानार्थ एका दिवसासाठी थांबली होती.
युसूफ मेहेरली यांच्या पश्चात सी.जी. पारीख यांनी ‘युसूफ मेहेरली सेंटर’ या सामाजिक संस्थेची मुंबईत स्थापना केली. या संस्थेत युसूफ मेहेरली यांच्या कार्याची माहिती, कागदपत्र यांचं जतन करून ठेवण्यात आले आहेत.
उजळत्या समईसमोर पणत्यांचा उजेड दिसत नाही. युसूफ मेहेरली यांच्याबद्दल माहिती लिहिणं हा तश्याच एका पणतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.