आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक – ईशान पांडुरंग घमंडे
===
कधी काळी ‘झी’ मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिकेचं नुसतं शीर्षकच नाही, तर शीर्षक गीत सुद्धा अगदी तोंडपाठ असायचं. आता शीर्षक गीतं आणि नावं तर सोडा, ‘झी’वर किती मालिका सुरु आहेत? या प्रश्नाचंही योग्य उत्तर किती जणांना देता येईल याबाबत शंका वाटते.
प्रेक्षकांनी या मालिकांकडे साफ पाठ फिरवली आहे. ‘मग आता काय करणार?’ याचा उत्तम पर्याय ‘झी’ने शोधून काढलेला दिसतोय. रिऍलिटी शोजमध्ये सुद्धा परीक्षकांपासून स्पर्धकांपर्यंत सगळ्यांनाच ‘अभिनय करायला लावणं.’ झी मराठीवरील एकमेव कार्यक्रम मी अगदी आवडीने बघतो. त्यातही हा असा वेडेपणा सुरु आहे, म्हटल्यावर आणखीच वाईट वाटतंय.
स्वरा जोशी ही स्पर्धक खरंच उत्तम कलाकार आहे. इतक्या लहान वयात तिच्याकडे असणारा आत्मविश्वास, तिच्या अंगी असणाऱ्या विविध कला या गोष्टी नक्कीच प्रशंसनीय आहेत. ‘ओके’ या नावाने फेमस करण्यात आलेला ओंकार कानिटकर हा सुद्धा एक गुणी गायक आहे, हे कार्यक्रम पाहताना जाणवतं. पण या मुलांचं टॅलेंट प्रोजेक्ट करत असताना, चॅनेलवाले ‘हे’ जरा अतिच करतायत, अशी भावना मनात येऊ नये असं अगदी मनापासून वाटतं.
‘असे कार्यक्रम करत असताना सुद्धा, प्रेक्षकांचं मनोरंजन होणं गरजेचं आहे’ हा विचार मनात नक्कीच असायला हवा, पण त्या नादात, ‘रिऍलिटी शो’ला अभिनयाचा कारखाना करून टाकू नका ना राव…
कार्यक्रम सुरु झाला तेव्हापासूनच हे असंच वाटत होतं, पण सिद्धार्थ जाधव आणि अमितराज पाहुणे कलाकार म्हणून आलेले असताना २३ सप्टेंबरच्या एपिसोडनंतर हे फारच प्रकर्षाने जाणवलं. प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या नावाखाली, टीआरपीसाठी ‘वाट्टेल ते करायचं’ हे खरंच नको झालंय आता…
प्रोमोज वगैरे पर्यंत ठीक होतं, पण थेट कार्यक्रमात सुद्धा तुम्ही त्या लहानग्यांना, त्यांच्या पालकांना आणि परीक्षकांना सुद्धा अभिनय करायला लावणार आहात का? सूत्रसंचालिका मृण्मयी तर चांगली अभिनेत्री आहेच, त्यामुळे ती बाजू तर भक्कमच आहे…
मागच्या बुधवारच्या एपिसोडमधली काही उदाहरणं घेऊ, म्हणजे मला काय म्हणायचंय ते अगदी नीट मला तुमच्यापर्यंत पोचवता येईल. सिद्धार्थ जाधवच्या एंट्रीपासूनच ‘स्क्रिप्टेड’ उद्योग सुरु झाले ना राव… सगळे स्पर्धक बसले आहेत, तिथून मागच्या बाजूने त्याने घेतलेली एंट्री काय, त्याआधी रोहित राऊतने चेहऱ्यावर आणलेले प्रश्नार्थक भाव काय! सगळं फक्त आणि फक्त ठरवून केलेलं.
बरं हे एवढंच असेल, तरी ठीक… त्या भाबड्या मुलांना सुद्धा अभिनय करायला लावलाय या प्रसंगात! बघताना कळत होतं, की त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव नैसर्गिक नाहीत.
काहींनी समोर बघणं, नक्की कोण आणि कुठून येतंय हे कळलंच नाही असा अभिनय करण्याचा प्रयत्न हे सगळं बघताना चीड येत होती. लिटिल चॅम्प्सना तुम्ही गायक म्हणून घेतलंय ना, मग गायक म्हणून त्यांच्या टॅलेंटला हवा तेवढा वाव द्या. या नको त्या गोष्टी का करायला लावता त्यांना. केवळ आम्हा रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी? यातून ‘खरंच आमचं मनोरंजन होतंय का?’ याचा तरी विचार करा ना…
आवाज वाढव पण, अभिनय थांबव…
धीरजने ‘आवाज वाढव डीजे’ गाण्याने एपिसोडची सुरुवात (!) केली. आता हीच सुरुवात असेल, का हेदेखील प्रश्नचिन्ह आहेच, पण तेवढं एडिटिंग तर होतंच असतं राव; त्याविषयी फार काही तक्रार नाही. हे गाणं सादर करून झाल्यावर जे काही घडलं, ते मात्र मनाला पटलं नाही, बुद्धीला रुचलंही नाही.
धीरज गाणं सादर करत होता, त्यावेळी परीक्षक आणि इतरही मंडळी डुलत होती. ते अजिबातच नैसर्गिक वाटलं नाही.. पालकांपैकी सुद्धा काहीजण नाचत होते… ‘वन्स मोअर’नंतर सिद्धार्थने ड्रम वाजवणं काय, सगळ्यांनीच स्टेजवर येणं काय, ‘ओम बॉक्स स्वाहा’ या मंत्राचा जयघोष ‘सगळ्यांनीच’ करणं काय… यातलं काहीच, न ठरवता उत्स्फूर्तपणे घडलेलं वाटलं नाही.
गोल्डन तिकीट देताना ‘ओम बॉक्स स्वाहा’ हा मंत्र म्हणणं आणि मग तो खोका उघडणं याची सुरुवातीला काही दिवस मजा वाटली, पण आता कंटाळा यायला लागलाय… त्या ‘स्पर्धकांनाही अगदी हे असंच’ (!) वाटत असेल का?
टीआरपीसाठी काही पण…
सिद्धार्थ जाधव म्हणजे एकदम एनर्जेटिक माणूस… त्याच्या एनर्जीची नेहमीच प्रशंसा होते. पण, या एपिसोडमध्ये त्याचा एक व्हिडिओ दाखवला जाणं, ही लिटिल चॅम्प म्हणून एक नवी एंट्री आहे, असं म्हणून त्याला स्टेजवर येऊन ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ या गाण्याच्या दोन ओळी गाणं, हा मनोरंजनाचा भाग फारसा पटला नाही. सिद्धूने आल्या आल्या एक डायलॉग मारला होता. मी अजूनही लहान मुलगा आहे, हे माझी बायको सुद्धा सांगू शकेल असा, हा संवाद ‘पेरलेला’ संवाद वाटू लागला अचानक!
त्यानंतर त्याने स्पर्धकांमधून काही जणांना मंचावर बोलवून काही प्रश्न विचारले. ‘एक टीशर्ट एका तासात वाळतो, तर दहा टीशर्ट वाळायला किती वेळ लागेल?’ हा प्रश्न खरंच अगदीच गंमतीशीर आहे. पटकन कुणीही १० तास असंच उत्तर देईल. पण या प्रश्नावरून झालेली चर्चा खूपच जास्त वाटली. एखादं लहानगं पोर सुद्धा लगेच उत्तर देईल अशा या प्रश्नावर किती ती चर्चा…
थोडक्यात काय, तर मनोरंजनाच्या नावाखाली टीआरपीसाठी काही पण…
झी मराठी ही एक दर्जेदार वाहिनी होती. अगदी आवडीने वाहिनीवरील कार्यक्रम पाहिले जायचे. आता मात्र स्थिती तशीच राहिलेली नाही असं चित्र दिसतंय. मग एखाद्या चाहत्याने (हितचिंतक (!) म्हणा हवं तर) त्यावर टीका केली, तर तो CRITISISM सुद्धा हल्ली सहन होत नाही असं चित्र दिसतंय हल्ली… पण असो, एक हितचिंतक म्हणून अपेक्षा करणं आणि वेडेपणा लक्षात आणून देणं हे आपलं कामच आहे…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.