Site icon InMarathi

आधी RCB मग MI… गोलंदाजांना फोडून काढणारा व्यंकटेश अय्यर आहे तरी कोण?

vyankatesh iyer inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

चार दिवसांपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स आणि नाईट रायडर्सच्या सामन्यात शुभमन गिलच्या बरोबरीने एक नवा खेळाडू सलामीसाठी मैदानावर उतरला. व्यंकटेश अय्यर त्याचं नाव…! हे नाव तसं सर्वश्रुत नव्हतं. अगदीच क्रिकेटच्या निस्सिम भक्तांनी म्हणजेच डाय हार्ड फॅन्सनी ऐकलं असेलही कदाचित, पण सगळ्यांनाच हे नाव ठाऊक नव्हतं.

आज तेच नाव सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या चर्चेत अगदी आवर्जून ऐकायला मिळतंय. “तो अय्यर कसला खेळलाय राव!”, “पार हाणला ना मुंबईच्या बॉलर्सना…”, “RCB च्या अगेन्स्ट टार्गेट कमी होतं रे, नाहीतर होती तेव्हाही फिफ्टी.” असे संवाद एव्हाना तुमच्याही कानावर पडले असतील.

 

 

सलामीवीर म्हणून सुनील नरीन हा एक जबरदस्त पर्याय मध्यंतरी कलकत्ता नाईट रायडर्सना मिळाला होता. आता नरीन सलामीला येत नसला, तरी तसाच एक स्फोटक फलंदाज त्यांना मिळालाय असं म्हणायला हरकत नाही.

RCB च्या विरुद्ध तो आयपीएलची पहिलीच मॅच खेळत होता असं सांगितलं, तर त्याच्या फलंदाजीचे आकडे बघून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. पहिल्या सामन्यात २७ चेंडूत नाबाद ४१ आणि काल मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढताना ३० चेंडूत ५३ धावा त्याने फटकावल्या आहेत. कालच्या खेळीत ४ चौकारांसह ३ षटकारही त्याने ठोकले.

‘नाईट रायडर्सच्या संघाने हा हिरा, हे ट्रम्प कार्ड नेमकं कुठे लपवून ठेवलं होतं?’ असा प्रश्न आता जो-तो विचारू लागला आहे.

 

 

सगळ्या क्रिकेट चाहत्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनलेल्या व्यंकटेश अय्यरची कहाणी फारच रंजक आहे, हे मात्र खरं… आज त्याच्या आयुष्यातल्या काही अशाच अफलातून गोष्टी जाणून घेऊयात.

पालकांच्या हट्टासाठी…

भारतात ‘आधी अभ्यास मग खेळ’ हा फॉर्म्युला अगदी ठरलेला असतो. स्वतःच्या मुलाने सचिन तेंडुलकर व्हावं, असं वाटणारा काळ होता तेव्हापासून ते आजपर्यंत पालकांचा मुलाच्या ‘खेळण्याला विरोध’ ही तशी भारतीय घरांमधील सामान्य गोष्ट आहे. व्यंकटेशच्या घरची स्थिती मात्र काहीशी वेगळी होती.

आईचा आग्रह असायचा, की मुलाने केवळ पुस्तकी किडा होऊ नये तर मैदानावर आणि खेळांमध्येही पारंगत व्हावं. याउलट व्यंकटेशला मात्र अभ्यासाची खूपच आवड होती. त्याने त्याची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपड केली असती, तर आज कदाचित तो इथे दिसलाही नसता. होय, कारण बीकॉम ग्रॅज्युएट असणाऱ्या व्यंकटेशला सीए व्हायचं होतं.

 

navbharattimes.indiatimes.com

 

सीए व्हायचं होतं पण…

अर्थात, तो सीए झालेला नसला, तरी तो फार शिकलेला नाही असं अजिबात समजू नका. २०१६ साली सीए फायनल्स की क्रिकेट असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला. सीएची परीक्षा द्यायची ठरवली असती, तर क्रिकेट सोडून द्यायचं किंवा काही काळासाठी बाजूला ठेवायचं यातील एक पर्याय निवडावा लागला असता. पण तोपर्यंत त्याने मध्य प्रदेशकडून टी-२० आणि वनडे सामन्यांमध्ये पदार्पण केलेलं होतं.

एवढंच नाही, तर २३ वर्षांखालील मध्यप्रदेश संघाचा तो कर्णधार सुद्धा होता. पण हा कठीण निर्णय त्याने घेतला. सीएची पुस्तकं गुंडाळून ठेवली आणि बॅट हातात ठेवायचं ठरवलं.

सीए करायचं नाही असा निर्णय घेतला, पण शिक्षणाची आवड तर व्यंकटेशला लहानपणापासून होती. त्यामुळे शिक्षण सोडून देण्याचा निर्णय त्याने घेतला नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात ‘प्लॅन बी’ हा असतोच; तोच ‘प्लॅन बी’ म्हणून त्याने एमबीए करण्याचा निर्णय घेतला.

 

openbusinesscouncil.org

 

एमबीएच्या एंट्रन्सला चांगले गुण मिळवले, एमबीएला ऍडमिशन घेतली आणि एकीकडे क्रिकेट सुद्धा सुरूच राहिलं. एमबीएएच्या शिक्षकांनी परीक्षेच्या तारखा, उपस्थिती यात खूप मदत केल्यामुळे क्रिकेट खेळणं सुरु ठेवता आलं असं व्यंकटेश नेहमी सांगतो.

आणखी एक पेच प्रसंग…

सीए ना करण्याचा निर्णय घेणं सोपं होतं की काय, असा आणखी एक निर्णय घेण्याची वेळ त्याच्यावर २ वर्षांनी पुन्हा आली. जगातील एक अत्यंत नामांकित कंपनी असणाऱ्या Deloitte मध्ये नोकरी करण्याची संधी चालून आली. रग्गड पगाराची नोकरी स्वीकारायची, तर त्या नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांमध्ये सतत फिरावं लागलं असतं. थोडक्यात त्याच्या क्रिकेटची विकेट जाणं नक्की होतं.

त्याने ग्रॅज्युएट व्हावं, किमान डिग्री घ्यावी अशी त्याच्या पालकांची इच्छा होती, जी त्याने पूर्ण केली होती. आयुष्यातील ‘प्लॅन बी’ तयार असावा म्हणून एमबीएची डिग्री सुद्धा घेऊन ठेवली होती. म्हणजेच धाडसी निर्णय घेणं अशक्य नव्हतं. त्याने नोकरी नाकारली आणि क्रिकेटची निवड केली.

याचं फळ मिळायला फार उशीर झाला नाही. नोकरीवर पाणी सोडण्याचा पश्चात्ताप त्याला झाला नाही. त्याच वर्षी म्हणजे २०१८ साली त्याला रणजी संघात स्थान मिळालं.

 

 

२०१८ साली रणजी संघात पदार्पण केलेला व्यंकटेश खरंतर २०१५ पासूनच स्पर्धात्मक क्रिकेट खेळत होता. पण त्याला खऱ्या अर्थाने मोठं यश मिळाला ते मागच्या वर्षीच्या मुश्ताक अली स्पर्धेत. ५ डावात ७५ ची सरासरी आणि जवळपास १५० च्या स्ट्राईक रेटने त्याने २२७ धावा जमवल्या आणि तो मध्यप्रदेशच्या संघातील सर्वाधिक धावा जमवणारा फलंदाज ठरला.

विजय हजारे स्पर्धेतील पंजाब विरुद्धची खेळी त्याला सर्वाधिक फळली. १४६ चेंडूत १९८ धावांचा तडाखा देत त्याने स्वतःचं नाव अधोरेखित केलं. कलकत्ता नाईट रायडर्सने फेब्रुवारीमधील आयपीएल लिलावाची संधी दवडली नाही आणि त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. नाईट रायडर्सच्या नेट्समध्ये तडाखेबाज फलंदाजी करत त्याने संघात स्थान मिळवलं.

 

 

२० सप्टेंबरला त्याने कलकत्ता नाईट रायडर्सची टोपी डोक्यावर चढवली आणि त्यानंतर काय घडलं, ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. आयपीएलमधून आणखी एक हिरा गवसला आहे. त्याचा खेळ असाच बहरत जावो आणि त्याला भारताकडून खेळण्याची संधी लवकरच मिळो, यासाठी त्याला खूप शुभेच्छा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version