Site icon InMarathi

जीवघेणा हार्टअटॅक नेहमी रात्री किंवा पहाटेच का येतो?

heart-attack-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणत्याही व्यक्तीला होणाऱ्या शारीरिक व्याधींपैकी ‘हार्ट अॅटॅक’ हा सर्वाधिक तीव्र आणि गंभीर असतो. तो कालावधी काही क्षणांचाच असतो, पण अनेकदा धडधाकट असलेला मनुष्य सुद्धा क्षणात कोसळतो.

कधी हा वाईट क्षण इतरांना प्रत्यक्ष बघायला मिळतो, तर कित्येक वेळेस ‘हार्ट अॅटॅक’ हा झोपेत रात्री किंवा पहाटे येतो आणि झोपलेली व्यक्ती सकाळी उठतच नाही.

 

 

घरातील व्यक्तींसाठी हा प्रसंग सहन करणं, फार कठीण असणार यात शंकाच नाही. पण, असं होऊ नये म्हणून काय करतील हे बघणं, आमलात आणणं इतकंच आपल्या हातात आहे. हे टाळण्यासाठी काय करता येईल ? हे जाणून घेणं प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक आहे.

हृदयविकाराचा झटका पहाटे का येतो?

जसं आपल्या घरात भिंतीवर घड्याळ लावलेलं असतं, तसं आपल्या शरीरात सुद्धा एक घड्याळ म्हणजेच ‘सर्क्याडियन सिस्टीम’ किंवा ‘इंटर्नल क्लॉक’ असतं. झोपेतून उठण्याची वेळ, थकवा आल्याची भावना म्हणजेच झोपेची वेळ हे या घड्याळामुळे त्या वेळेस तयार होणाऱ्या काही केमिकल्स मुळे होत असतं.

 

masterfile.com

 

बोस्टन विद्यापीठात झालेल्या एका संशोधनात असं आढळून आलं आहे की, काही शरीरांमध्ये पहाटेच्या वेळी ‘पीएआय-१’ या केमिकलचं प्रमाण वाढतं. या केमिकलमुळे शरीरातील रक्त पातळ होण्याची गती सुद्धा मंदावते. त्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होतात. रक्ताच्या गाठी तयार झाल्या, की हृदयापर्यंत रक्त पुरवठा सुरळीत होत नाही आणि हृदयविकाराचा झटका येतो.

 

पहाटेच्या वेळी ‘सर्क्याडियन सिस्टीम’ सुद्धा अधिक तीव्रतेने काम करत असते.

अति रक्तदाब हा हृदयविकाराच्या झटक्याचं कारण असतं हे आधीच सिद्ध झालं आहे. पण, हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनात हे सुद्धा समोर आलं आहे की, कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींना सुद्धा हृदयविकाराचा त्रास होत असतो.

सकाळच्या वेळी कमी रक्तदाब असल्याने सुद्धा हृदयविकाराचा संभाव्य धोका उदभवू शकतो. कारण, त्यावेळी शरीरात मृतपेशींचं प्रमाण अधिक असतं. हृदयाला रक्त मिळवण्यासाठी त्या वेळी जास्त काम करावं लागतं.

हृदयविकाराचा झटका आलेल्या ८०० व्यक्तींचा अभ्यास केल्यानंतर असं समोर आलं आहे, की त्यातील २६९ लोकांना सकाळी ६ ते १० यावेळातच हा त्रास झाला आहे. मध्यरात्री १२ ते सकाळी ६ या वेळात येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांची संख्या १४१ इतकी होती आणि त्यांची तीव्रता कमी होती.

 

 

पहाटे आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याचा अजून एक धोका असतो, की काही हॉस्पिटलमध्ये त्यावेळी रक्त पातळ करण्याची, हृदयाच्या मांस पेशींवर त्वरित प्रक्रिया करता येईल अशी कृत्रिम यंत्रणा पहाटे उपलब्ध नसते. कित्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये आता हा बदल करण्यात आला आहे, की असलेल्या यंत्रणा, कर्मचारी या २४ तास उपलब्ध असतील.

काय काळजी घेतली पाहिजे

ह्रदयाचे ठोके हे नेहमीच्या गतीने सुरू आहेत, की आधीपेक्षा वाढले आहेत हे बघत राहण्याचा सल्ला डॉक्टर आपल्या रुग्णांना नेहमीच देत असतात. साधारणपणे प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके हे एक मिनिटात ६० ते १०० इतके असतात. तुमच्या हृदयाचे ठोके जर एका मिनिटाला ६० पेक्षा कमी किंवा १०० पेक्षा अधिक असतील तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे.

ह्रदयाचे ठोके हे नियमितपणे सुरळीत राहण्यासाठी खालील उपाय हे सर्व डॉक्टर नेहमीच सांगत असतात.

१. व्यायाम

चालणे, सायकल चालवणे किंवा योगा, ध्यान करणे या सवयींनी हृदयाच्या ठोक्याची संख्या आणि गती ही तुम्ही झोपेत असतांना सुद्धा नियंत्रित ठेवणं शक्य आहे.

 

 

२. धूम्रपान न करणे

सिगरेट प्यायल्याने शरीरातील रक्तवाहिन्या लहान होऊ शकतात. त्यामुळे हृदयावरील ताण वाढत जातो. आपण धूम्रपान टाळल्यास हृदयाचं काम सुरळीतपणे सुरू राहू शकतं.

 

 

३. निवांतपणा

गतीमान झालेल्या आपल्या लाईफस्टाईलमुळे आपल्या जगण्यातला निवांतपणा कमी होत चालला आहे. अगतिकतेमुळे अड्रेनलीन आणि कॉर्टिसोल हे केमिकल्स रक्ताद्वारे शरीरात तयार होत असतात.

जागेपणी अथवा झोपेत हृदय शांत न राहण्यासाठी ही दोन केमिकल्स कारणीभूत असतात. असं होऊ नये म्हणूनच शरीराला निवांतपणा मिळणं अवश्यक आहे.

 

 

४. सकस आहार

व्हिटॅमिन, मिनरल्सचा मुबलक पुरवठा करणारी फळं, भाज्या आणि मासे खाल्ल्याने सुद्धा हृदयाचे ठोके नियंत्रणात राहतात असं एका अभ्यासात समोर आलं आहे.

 

 

‘सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पासून लांब राहून एक तास स्वतःला देणं’ हा उपाय सुद्धा आपण हृदयाला, मनाला शांत ठेवण्यासाठी नक्कीच आमलात आणू शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version