बऱ्याच चित्रपट रसिकांना माहिती नसलेल्या “द कम्प्लिट अॅक्टर” बद्दल नक्की वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुम्ही जर गुगलवर “जगातले सर्वश्रेष्ठ अभिनेते” असा शोध घेतला, तर भरवश्याच्या समजल्या जाणाऱ्या आयएमडिबीवर चार्ली चॅप्लिन, मार्लन ब्रॅण्डो, मेरिल स्ट्रीप, जॅक निकोल्सन इ. च्या खालोखाल आणि हिथ लेजर, रॉबर्ट डी निरो, लिओनार्दो डी कॅप्रिओ, जॉनी डेप यांच्याआधी एक भारतीय नाव आढळते,
“मोहनलाल विश्वनाथन नायर”!
अर्थातच, चाहत्यांचा लाडका “लालेट्टां” मोहनलाल!! नाही, मला यांच्यापैकी कुणाचीही कुणाशीही तुलना करायची नाहीये. मला फक्त आणि फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष वेधायचेय.
आपल्या देशात गोऱ्या चमडीची मानसिक गुलामगिरी अव्याहत सुरू असल्याची अनेक उदाहरणं दिसतात. “त्यांचे ते सगळे चांगले आणि आपले ते सगळे टाकाऊ”, हा तर्कशून्य पुरोगामी प्रकार सगळ्याच क्षेत्रांप्रमाणे सिनेमाच्या क्षेत्रातही ठळकपणे आढळतो.
आता हेच पाहा ना, उपरोक्त हॉलिवूडच्या अभिनेत्यांचे अनेक चित्रपट आपण सर्वांनीच पाहिले असतील. त्यांच्यापैकी अनेकांचे तुम्ही फॅनदेखील असाल. अवश्य असा, त्यात काहीच वावगे नाही.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
—
पण माझा प्रश्न असा आहे की, त्यांच्याच पंगतीत असलेल्या मोहनलालचे किती सिनेमे आपण आवर्जून पाहिलेयत? उत्तर फारच असमाधानकारक असणार, मला ठाऊक आहे.
नाही, मल्याळम समजत नाही वगैरे बहाणे करण्यात काहीच अर्थ नाही. कारण, हल्ली जवळजवळ प्रत्येक सिनेमा इंटरनेटवर सबटायटल्ससह उपलब्ध असतो. आणि त्याही पुढे जाऊन मी एक वैयक्तिक उदाहरण सांगतो.
गेल्यावर्षी मी प्रियदर्शनचा “ओप्पम” (२०१६) पाहिला. डिप्रेशनमुळे प्रियदर्शनने चित्रपट बनवणे जवळजवळ थांबवलेच होते. त्याला दोस्तीखात्यात जबरदस्ती करुन मोहनलालने हा चित्रपट बनवायला लावला.
एकप्रकारे प्रियदर्शनचं तर हे कमबॅक होतंच, पण प्रियन-मोहन या ऑलटाईम हिट जोडीचंही हे कमबॅक.
मुंबईच्या उपनगरातल्या एका मॉलमधील मल्टिप्लेक्स, पहिला आठवडा संपत आला तरी पॅक होतं. मी जाऊन बसलो तेव्हा सगळीकडे मल्याळम पब्लिक. चित्रपट सुरु झाला. नेहमीप्रमाणे मी सबटायटल्सची वाट पाहातोय, तर कुठे काय? सबटायटल्स नाहीतच! आता मरा!!
तमिळ तरी थोडंफार समजतं, पण अजिबातच न समजणाऱ्या मल्याळम भाषेतला अगम्य चित्रपट अडिच तास सहन करावा लागणार होता. मी नुसत्या विचारानेच अस्वस्थ झालो.
अशीच दोन-एक मिनिटं गेली असतील नसतील, आसपासची सगळी जनता चित्रपट मनापासून एन्जॉय करत होती. एवढं काय पाहातायत म्हणून मी लक्ष देऊन पाहू लागलो, तर दिसला मोहनलाल नावाचा चमत्कार.
मी डोळे फाडफाडून पाहात होतो की, हा खरोखर आंधळा झालाय का या रोलसाठी? तो नुसता अभिनय करतोय हे पडद्यावर प्रत्यक्ष पाहात असूनही माझा विश्वास बसत नव्हता, इतका तो त्या आंधळ्या लिफ्टमनच्या भूमिकेत शिरला होता.
बघता बघता माझी तंद्री लागली आणि चित्रपट पाहायला भाषेची गरज नसते हे नुसतंच ठाऊक असलेलं तत्त्व मी याचि देही याचि डोळा अनुभवलं! मोहनलाल हा असा अनुभवण्याचा विषय आहे!!
मोहनलालने अमुक चित्रपट केले आणि तमुक चित्रपटापासून त्याने सुरुवात केली वगैरे लिहित बसलो तर पानेच्या पाने पुरायची नाहीत.
विविध भाषांमध्ये मिळून त्याच्या चित्रपटांची एकूण संख्याच मुळात ३०० पेक्षाही अधिक आहे. मोहनलालने रंगभूमीवर पदार्पण केले तेच मुळी ९० वर्षांच्या म्हाताऱ्याच्या भूमिकेत. तुम्ही म्हणाल, यात विशेष काय आहे? तर विशेष हे आहे की, त्यावेळी त्याचे वय फक्त ६ वर्षांचे होते!!
मलयाळम, तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड या आणि अश्या अनेक भाषांमध्ये अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवत असतानाच, त्याने रंगभूमीशी नातं कायम राखलंय.
२००१ साली त्याने चक्क संस्कृत नाटकात भूमिका केली होती. नाटक होते भासाचे “कर्णभारम” आणि त्याचा दिल्लीच्या एनएसडीमध्ये प्रयोग झाला होता.
यातील कर्णाच्या भूमिकेसाठी मोहनलालने एक पैसाही मानधन घेतले नव्हते. त्याच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर “संस्कृत आणि संस्कृतीवर असलेल्या प्रेमापोटी मी हे केले एवढेच”!
संस्कृतवरील त्याचे प्रेमच असे आहे की, जेव्हा एका वाहिनीने संस्कृतमधून वार्तापत्र सुरू केले तेव्हा त्याच्या उद्घाटनात ग्लॅमर आणण्यासाठी मोहनलाल आपला सुपरस्टार मित्र मामुटीला आवर्जून घेऊन आला होता.
मामुटीनेही त्यावेळी जबरदस्त भाषण केले होते. लोक भाषेला धर्माची लेबलं लावतात म्हणून सांगतो की, मामुटी हा मुसलमान आहे! याच वार्तापत्रासाठी मोहनलालने आपलं सारं स्टारडम गुंडाळून ठेवून बातम्यादेखील वाचल्या आहेत बरं का!
संस्कृत बातम्या वाचण्यासाठी शब्दोच्चारांवर पकड आणि भाषेचं ज्ञान किती आवश्यक आहे, हे वेगळे सांगणे न लगे.
संस्कृत शिकणे आणि शिकविण्याचा सातत्याने प्रसार करणाऱ्या मोहनलालला कालडीच्या श्रीशंकराचार्य संस्कृत विद्यापीठाने २०१० साली मानद डॉक्टरेटदेखील दिली आहे.
२००३ साली मोहनलालने रंगभूमीवर अजूनच अनोखा प्रयोग केला. १०० वर्षांच्या कालखंडात मलयाळम साहित्यातील १० निवडक दिग्गजांच्या कादंबऱ्यांमधली पात्रं त्याने सलगपणे सादर केली. या प्रयोगाला “कधायट्टम” नाव देण्यात आले.
त्याने २००८ साली केलेल्या “छायामुखी” नाट्यप्रयोगाचे वर्णन “द हिंदू”ने “अलिकडच्या काळातील मलयाळम रंगभूमीवर झालेला सर्वश्रेष्ठ प्रयोग” असे केले होते. त्यात मोहनलालने भीमाची भूमिका केली होती.
आगामी “रण्डाऽमूळम”मध्येही तो भीमाचीच भूमिका करतोय, हे विशेष.
२००८ सालीच मोहनलालने युद्धपट बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मेजर रवीच्या “कुरूक्षेत्र”मध्ये भूमिका केली होती. या भूमिकेचा प्रभाव म्हणा किंवा काय, पण यानंतर मोहनलालने सैन्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
त्याचे वय त्यावेळी पन्नाशीला येऊन ठेपले होते. प्रादेशिक सैन्यात (टेरिटोरीअल आर्मी) भरती होण्याच्या दृष्टीने हे वय अंमळ जास्तच होते. पण मोहनलालची दृढनिष्ठा व निश्चय पाहून त्याच्यासाठी नियम शिथिल करण्यात आला.
कडक प्रशिक्षणानंतर त्याला मानद लेफ्टनंट कर्नल करण्यात आले. हा बहुमान मिळवणारा तो पहिलाच अभिनेता ठरला. आणि सांगतो, मोहनलाल हा १९७७-७८ सालचा कुस्तीमधील राज्यस्तरीय विजेतादेखील आहे बरं!!
गेल्या दहा वर्षांपासून मोहनलाल हा गुरू गोपीनाथ मुत्तुक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली जादू शिकतोय. २००८ सालीच एका कार्यक्रमात तो “बर्निंग इल्युजन” अर्थात ज्वलनाभास करुन दाखवणार होता.
यात त्याला साखळ्यांनी बांधून एका बंदिस्त पेटीत टाकण्यात येणार होते व ती पेटी नंतर आगीत झोकून देण्यात येणार होती आणि मोहनलाल तिथून सुटून दाखवणार होता.
पण ही बातमी जशी बाहेर आली, तसे त्याला या जोखमीच्या खेळापासून रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहिम राबवली गेली व कार्यक्रम रद्द करायला लावला. मोहनलालला विचारलं असता तो म्हणाला,
“जोखीम तर सगळीकडेच असते, पण चाहत्यांच्या शुभेच्छांच्या जोरावर मी सुटू शकलो असतो त्यातून”.
त्यानंतरही त्याने जादूचा अभ्यास सोडला नाही. २०१४ साली अकॅडमी ऑफ मॅजिकल सायन्सेस अंतर्गत मॅजिक प्लॅनेटच्या उद्घाटनावेळी त्याने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत एका मुलीला अधांतरी तरंगत ठेवण्याचा प्रयोग करुन दाखवला होता.
मोहनलालला अभिनयासाठी अनेक राष्ट्रपती पारितोषिकांसह शेकडो इतर पारितोषिकं आहेत. मागच्या वर्षी आलेला त्याचा “पुलीमुरुगन” (२०१६) हा १०० कोटींहूनही अधिक कमाई करणारा पहिलाच मलयाळम सिनेमा ठरलाय.
थोडक्यात क्लास आणि मास अश्या दोन्हीही पातळ्यांवर तो सर्वश्रेष्ठ तर आहेच, शिवाय अभिनयाखेरीज त्याच्या व्यक्तीमत्त्वाला उपरोक्त इतरही अनेक पैलू आहेत.
आता परत सगळ्यात पहिल्या परिच्छेदात मांडलेल्या मुद्याकडे येऊयात. आपल्यापैकी किती जणांना मोहनलालच्या या अद्वितीय बाजू ठाऊक होत्या, एकवार स्वत:लाच विचारुन पाहा. मी असं नाही म्हणत की, आपले ते सगळेच चांगले. नाही, तो दुसऱ्या टोकाचा अतिरेकीपणा होईल.
पण वर सांगितलेल्या तुमच्या आवडत्या हॉलिवूड आणि इतरही काही हिंदी अभिनेत्यांची वाहवा करताना त्यांच्याच तोडीच्या व अनेक बाबतीत त्यांच्यापेक्षाही वरचढ प्रादेशिक कलाकार आपल्याला धड ठाऊकही नसणे, याला काय अर्थ आहे?
मुद्दामच मराठीचे नाव घेत नाहीये मी कारण त्याबद्दल हल्ली आपल्याला थोडीफार का होईना पण माहिती असते. परंतु कमल हासन तमिळमध्ये काय जादू विखुरतोय हे आपण आवर्जून शोधून पाहायला पाहिजे की नको?
विक्रम, धनुष, सूर्या वगैरे मंडळींचे केवळ मसाला चित्रपटच आपल्यापर्यंत पोहोचतात. पण त्यापलिकडे जाऊन ती मंडळी आपापल्या कामातून नटराजाची जी पूजा मांडतात, तो जाऊन अनुभवण्याचाच विषय आहे.
नित्या मेनन या अभिनेत्रीचे काम तर दृष्ट लागेल इतके सुरेख असते. तशीच मलयाळम चित्रपटांमधली पार्वती ही अभिनेत्री. किंबहूना मलयाळममधील पृथ्वीराज, निविन, दुल्केर वगैरे ताज्या दमाची मंडळी जगातल्या कोणत्याही चित्रपटसृष्टीसमोर ताठ मानेने उभी राहू शकतील इतक्या अत्युच्च दर्जाचं काम करतात, एकवार पाहा तरी!
कन्नडमध्ये उपेंद्र गेली अनेक वर्षे करत असलेले प्रयोगसुद्धा मुद्दामहून पाहाण्याचा विषय आहे. तेलुगूने तर “बाहूबली” (२०१५/१७) शृंखलेद्वारे सबंध देशाला वेड लावून सोडलेले आपण पाहातोच आहोत.
भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजे फक्त हिंदी नाही आणि प्रादेशिक चित्रपटसृष्टी जगातल्या कोणत्याही इंडस्ट्रीपेक्षा किंचितही कमी नाही.
आपल्या या विस्तीर्ण पसरलेल्या महासागरात शेकडो मोती आहेत, आपणच बुडी मारायचं टाळतो. असाच एक मोती असलेल्या मोहनलालची थोडक्यात ओळख करुन देण्याचा हा लहानसा प्रयत्न!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.