ना दंड भरणं, ना चिरीमिरी – तरीही बिनधास्त ‘विना हेल्मेट’ फिरणाऱ्याची धमाल गोष्ट…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
हेल्मेट सक्ती ही आपल्यासाठी नवीन राहिलेली नाहीये. महाराष्ट्रातील जवळपासच सर्वच शहरांनी हेल्मेट सक्तीचं नेहमीच स्वागत केलं आहे. हेल्मेट सक्तीमुळे कित्येक नवीन कंपनी हेल्मेट तयार करण्याच्या व्यवसायात उतरल्या आणि सध्या भारतात मागच्या दहा वर्षांपेक्षा अधिक हेल्मेट तयार होत असतात. सरकारने सक्तीची घोषणा केली की हेल्मेटचे विक्रेते, आपल्याला अगदी रस्त्याच्या कडेलाही बसलेले दिसतात.
हेल्मेट ही खरं तर सक्ती करण्याची वस्तूच नसावी. कारण, ‘आपल्या डोक्याचं रक्षण ही आपली जबाबदारी आहे.’ पण, काहींना ते मान्य नसतं.
असेही काही लोक आहेत, ज्यांना हेल्मेटचं महत्त्व मान्य असूनही ते वापरता येत नाही. याचं कारण, त्यांना त्यांच्या मापाचं हेल्मेट मिळतच नाही. वाचायला विचित्र वाटत असलं तरी ही गुजरातच्या ‘झाकीर मेमन’बद्दल घडलेली सत्यघटना आहे. काय होती ही भानगड ? जाणून घेऊयात.
झाकीरची कहाणी
झाकीर मेमन हा गुजरातच्या छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडिली गावातला एक फळ विक्रेता आहे. २०१९ मध्ये जेव्हा गुजरातमध्ये हेल्मेट सक्तीची घोषणा करण्यात आली, तेव्हासुद्धा झाकीर मेमन हा लोकांना सिग्नलवर नेहमीच विना हेल्मेट दिसायचा. त्याला बघून त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहन चालकांना खूप आश्चर्य वाटायचं.
प्रत्येकवेळी झाकीर मेमनला ट्रॅफिक पोलीस बाजूला बोलवायचे. तो त्याच्या डोक्याचा आकार पोलिसांना दाखवायचा. पोलीस त्याच्या डोक्यावर हेल्मेट लावून बघायचे आणि कोणतंच हेल्मेट झाकीर मेमनच्या डोक्यात बसायचं नाही हे बघायचे आणि सोडून द्यायचे.
–
- वयाची तिशी गाठण्यापुर्वी काहीही करा, पण “हा” अनुभव घ्याच!
- ट्रॅफिक रूल तोडूनही शिक्षा झाली नाही, का? डोळे पाणवणारी घटना…
–
या गोष्टीचा कंटाळा आला…
झाकीर मेमनला या गोष्टीचा फार कंटाळा आला होता. त्याला घाईच्या वेळेस पोलिसांना काही न बोलता दंड द्यायची इच्छा व्हायची. पण, झाकीरकडे गाडीचे कागदपत्र उपलब्ध असायचे आणि हेल्मेट न घालण्याचं त्याचं कारण योग्य असल्याने पोलीस झाकीर कडून दंड घेत नसत.
झाकीर मेमनने पोलिसांना सांगितलं होतं, की तो गुजरातमधील सगळ्या हेल्मेटच्या दुकानात जाऊन आलेला आहे. कोणत्याही दुकानात त्याच्या डोक्याच्या मापाचं हेल्मेट नाहीये. पोलिसांना सुद्धा हे कारण ऐकून खूप आश्चर्य वाटायचं.
झाकीर मेमनने पोलिसांना हे सुद्धा सांगितलं होतं, की तो एक कायद्याचा सन्मान करणारा व्यक्ती आहे. हेल्मेटचं महत्त्व त्याला मान्य आहे. हेल्मेट कुठून घ्यावं हे मात्र पोलिसांनीच त्याला सांगावं. म्हणजे तो तिथे जाऊन हेल्मेट घेऊ शकेल.
२०१९ मध्ये पोलिसांकडे झाकीर मेमनच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आजही नाहीये. कारण, हेल्मेट तयार करणारी प्रत्येक कंपनी डोक्याचा ठराविक आकार डोळ्यासमोर ठेवून हेल्मेट तयार करत असते. झाकीर मेमनचं डोकं हे डोक्याच्या सर्वसाधारण आकारापेक्षा दुप्पट आहे. आपल्या स्टँडर्ड आकाराच्या ‘मोल्ड’ला बाजूला ठेवून कोणतीच कंपनी झाकीर मेमन साठी हेल्मेट तयार करण्याचं काम करण्यास तयार होत नव्हती.
झाकीर मेमन आणि त्याचे कुटुंबीय हेल्मेट सक्तीची घोषणा झाल्यावर काळजीत पडले. कारण त्यांना प्रत्येकवेळी एकच गोष्ट शहरातील आणि हायवेवरील पोलिसांना परत परत सांगावी लागायची. हेल्मेट सक्तीच्या काळात झाकीरचे कुटुंबीय त्याला बाईक न वापरण्याचा सल्ला देऊ लागले.
बोडेली शहराच्या ट्रॅफिक शाखेचे असिस्टंट सब-इन्स्पेक्टर वसंत राथवा यांना याबाबतीत जेव्हा प्रश्न विचारण्यात आले होते, तेव्हा त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती, की झाकीर मेमन बाबतीत सर्व ट्रॅफिक पोलिसांना सूचना दिल्या आहेत. त्याच्या मोठ्या डोक्यामुळे झाकीर मेमनला कधीच दंड भरावा लागणार नाही.
–
- हवालदाराला बघून यू टर्न घेण्यापेक्षा ट्रॅफिकचे ‘खरे’ नियम वाचा आणि दंड भरणं टाळा!
- ‘चप्पल’ घालून (!) बाईक चालवणं गुन्हा – तुम्ही किती ‘नियम मोडताय’ हे माहिती आहे का?
–
२०१९ पासून भारत सरकारने मोटर वेहीकल्स अमेंडमेंट अॅक्ट अमलात आणला आहे. काही राज्यांनी तो लगेच अमलात आणला आणि ट्रॅफिकचे नियम पाळणाऱ्या लोकांना नव्या कायद्यानुसार दंड आकारण्यास सुरुवात केली.
सर्व नियम पाळूनही झाकीर मेमनसारख्या लोकांचं गाडी चालवतांना ‘भय इथले संपत नाही’ हेच खरं, असं म्हणावं लागेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.