Site icon InMarathi

५० लाखांहून अधिक लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ऑटोरिक्षाचा इतिहास!

auto rickshaw f inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या वाहतुकीचे साधन म्हणून ऑटोरिक्षाकडे बघितले जाते. प्रत्येक माणसाकडे स्वतःचे वाहन असतेच असे नाही. अशा वेळेला पायी जाण्यासारखे अंतर नसल्यास आणि बसच्या गर्दीत जाणे शक्य नसल्यास आपण रिक्षाकडेच एक उत्तम पर्याय म्हणून बघतो.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत रिक्षा हीच स्वस्त आणि मस्त वाहतुकीचे साधन म्हणून ओळखली जाते. ट्राम, लोकल, बस, नंतर टॅक्सी, एसी प्रायव्हेट टॅक्सी असे वाहतुकीचे पर्याय उपलब्ध झाले तरीही सर्वसामान्य माणसाला रिक्षाच जवळची वाटते.

 

 

पटकन बाजारातून भाजी आणायची आहे, कुणाला स्टेशनपर्यंत सोडायचे आहे, बरं वाटत नाहीये आणि स्वतः गाडी चालवत डॉक्टरकडे जाणे शक्य नाही किंवा लहान मूल किंवा घरातील वृद्धांना डॉक्टरकडे न्यायचे आहे आणि दुचाकीवर बसणे त्यांना शक्य नाही अश्या वेळेला आपल्याला रिक्षेने जाणे सोपे पडते.

मोठमोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत अगदी खेड्यातसुद्धा रिक्षा उपलब्ध असते आणि त्यामुळे वाहतुकीचे कितीही पर्याय उपलब्ध झाले असले तरी भारतीयांसाठी रिक्षा ही लाइफलाइन आहे.

भारतीय लोकांचे रिक्षा प्रेम बघून ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांनी ओला ऑटो आणि उबर ऑटोचा पर्याय भारतीयांना उपलब्ध करून दिला.

 

सर्वसामान्य लोकांसाठी दळणवळण सुलभ करणारी छोटीशी रिक्षा म्हणजे सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. भारतात अत्यंत श्रीमंत व्यक्ती सोडल्यास कधीच रिक्षात बसले नाही असे फार कमी लोक सापडतील. तर अश्या ह्या ऑटोरिक्षाचा इतिहास देखील रंजक आहे.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले. पण ह्या स्वातंत्र्याच्या आनंदाला दुःखाची एक किनार होती. भारताची फाळणी झाली होती. ह्या फाळणीमुळे भारतीयांचे शारीरिक मानसिक आणि प्रचंड आर्थिक नुकसान देखील झाले होते. अश्या वेळेला भारतीय नेत्यांपुढे भारताचा व भारतीयांचा सगळ्याच बाजूंनी विकास करण्याचे मोठे आव्हान होते.

स्वातंत्र्यानंतर थोडे स्थिरस्थावर झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाजवादी प्रभावाखाली भारताची प्रथम पंचवार्षिक योजना १९५१ साली आखली गेली. ही योजना भारतासाठी अत्यंत महत्वाची होती.

 

 

भारताच्या विकासाच्या प्रारंभासाठी ही योजना अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार होती. या योजनेच्या अंतर्गत प्राथमिक क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार होते.

यात कृषी व समुदाय विकास, सिंचन व ऊर्जा, सामाजिक सेवा, भूमिहीन शेतकऱ्यांचे पुनर्वसन , इतर क्षेत्र व सेवा, वाहतूक आणि दळणवळण ह्या क्षेत्रांना प्राधान्य देऊन त्यांचा विकास करण्यासाठी आर्थिक नियोजन करण्यात आले. भारतीयांचे राहणीमान उंचावणे हा उद्देश देखील या पंचवार्षिक योजनेमागे होता.

१९४७ साली फेब्रुवारीमध्ये तेव्हाच्या बॉम्बे अधिवेशनात एका सदस्याने रिक्षा ओढणाऱ्या किंवा सायकलरिक्षा चालवणाऱ्यांच्या समस्या उजेडात आणल्या. एखाद्या माणसावर केवळ पोट भरण्यासाठी उर फुटेस्तोवर वजन वाहून नेण्याची वेळ यावी हा अन्याय आहे.

 

 

मानवी शक्तीवर चालणारी ढकलगाडी /सायकलरिक्षा ही अमानुष आहे हा मुद्दा त्यावेळी मांडण्यात आला. या चर्चेमुळे वाहतुकीचा मुद्दा चर्चेत आला. मुंबई प्रांताचे त्यावेळचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी लगेच या ढकलगाड्या तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले.

परंतु भारतीयांना वाहतुकीसाठी काहीतरी साधन अत्यावश्यक होते, भारतीय शहरांना आणि खेड्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या दुव्याची गरज होती. कमी खर्चात, सर्वसामान्य भारतीयाला परवडेल असा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणे हे आव्हान तेव्हा सरकारसमोर उभे राहिले.

त्यामुळे असा कुठला पर्याय लवकरात लवकर मिळू शकेल यावर विचार सुरु झाला. तेव्हा स्वातंत्र्यसेनानी नवलमल फिरोदिया यांनी तीनचाकी “गुड्स कॅरियर” या मालवाहतूक गाडीबद्दल एका ठिकाणी वाचले आणि त्यांना कमी खर्चात होऊ शकणारी वाहतूक म्हणून एक पर्याय समोर दिसला.

त्यांनी मोरारजी देसाईंपुढे ही कल्पना सादर केली आणि एक योजना त्यांना सांगितली. ते म्हणाले की जर तांत्रिकदृष्ट्या ही कल्पना यशस्वी झाली तर सार्वजनिक स्वरूपात हा पर्याय आणण्यासाठी परवानगीची गरज भासेल.

ही योजना पुढे नेण्यासाठी फिरोदिया यांनी त्यांच्या जय हिंद इंडस्ट्रीज आणि बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन (नंतरचे बजाज ऑटो प्रायव्हेट लिमिटेड) यांच्यासह एकत्र येऊन त्यांच्या कल्पनेतील वाहन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनी ज्या तीनचाकी वाहनाबद्दल आधी वाचले होते ते वाहन इटालियन कंपनी पियाजिओचे होते.

त्या वाहनाचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी फिरोदिया यांनी एक स्कुटर आणि दोन तीनचाकी मालवाहतुकीच्या गाड्या त्या इटालियन कंपनीकडून विकत घेतल्या. त्यांनी त्या मॉडेल्सचा अभ्यास केला आणि त्यात अनेक आवश्यक ते बदल करून त्यांच्या कल्पनेतील वाहन सत्यात साकारले.

 

 

या वाहनाचे प्रात्यक्षिक १९४८ सालच्या अधिवेशनात पंतप्रधान नेहरूंपुढे दाखवण्यात आले. हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे असलेले ते वाहन म्हणजे सायकलरिक्षा व ऑटोमॅटिक दुचाकी ह्यांचे मिश्रण होते. असे ते वाहन पुढे जाऊन भारतीयांसाठी रोजची अत्यावश्यक गरज होणार होते.

या वाहनाने भारतातील गावं, शहरांतून कमी खर्चात जास्तीत जास्त फेऱ्या मारता येतील ह्यासाठी फिरोदियांनी प्रयत्न सुरु केले. या वाहनाला मुंबई प्रांतात वाहतुकीची परवानगी मिळाली आणि त्याचीलोकप्रियता वाढण्यासाठी व सर्वांनाच या वाहनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुण्यात देखील ह्या रिक्षा उपलब्ध करून दिल्या.

त्यावेळेस पुण्यात सायकलरिक्षांवर बंदी घालण्यात आली. याच दरम्यान बंगलोर संस्थानचे दिवाण एन केशव अय्यंगार यांनीही म्हैसूर प्रांतात दहा ऑटोरिक्षा चालवण्याची परवानगी दिली. त्यांनीच बंगलोरमधील पहिल्या ऑटोरिक्षाचे उदघाटन केले.

लोकांना हा वाहतुकीचा स्वस्त आणि मस्त पर्याय खूप आवडला पण यामुळे बंगलोर व पुण्यामधील ढकलगाडीवाले आणि सायकलरिक्षा चालवणाऱ्यांच्या रोजगारावर गदा आल्याने साहजिकच ते यावर नाराज होते.

बजाज ऑटोचे संस्थापक कमलनयन बजाज यांनी सांगितले की सुरुवातीला त्यांना १०० स्कुटर आणि ऑटोरिक्षांचे उत्पादन करण्याची परवानगी मिळाली होती. नंतर स्कुटर, ऑटोरिक्षाची लोकप्रियता वाढल्यानंतर आणि लोकांना हे पर्याय आवडू लागल्यानंतर स्कुटर व ऑटोरिक्षांची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली.

 

 

बजाज कंपनीकडे ऑटोरिक्षा निर्मितीचे अधिकार आल्यानंतर फिरोदिया आणि बजाज यांचे मार्ग वेगळे झाले. त्याच काळात बंगलोरमधील ऑटोरिक्षांची संख्या दहावरून चाळीसवर गेली होती.

सर्वसामान्य भारतीयांना स्वतःचे वाहन घेणे व त्याचा मेंटेनन्स बघणे त्याकाळी परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळेच कमी खर्चात प्रवास करण्यासाठी त्यांना ऑटोरिक्षा हा पर्याय खूप सोपा वाटत होता.

फक्त भारतातच नव्हे तर इतर काही देशांत देखील हीच परिस्थिती होती. १९७३ पर्यंत ऑटोरिक्षा भारताबाहेर देखील प्रसिद्ध झाली होती आणि बजाज ऑटो ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग,येमेन, बांगलादेश, सुदान, नायजेरिया ह्या देशांत ऑटोरिक्षांची निर्यात करू लागले होते.

ऑटोरिक्षांची वाढती गरज आणि लोकप्रियता लक्षात घेऊन बजाज ऑटोने रिअर इंजिन असणाऱ्या रिक्षा बनवण्यास सुरुवात केली. हे मॉडेल इतके लोकप्रिय झाले की १९७७ साली तब्बल एक लाख ऑटोरिक्षांची विक्री झाली.

१९८० पर्यंत ऑटोरिक्षात केवळ दोन लोकांना प्रवास करण्याची परवानगी होती. पण नंतर मावतील तितकी माणसे रिक्षात ये-जा करू लागली. आता मात्र एकवेळेला केवळ तीन प्रवाश्यांना रिक्षात प्रवास करण्याची परवानगी आहे.

 

 

तर अश्या ह्या ऑटोरिक्षाने ५० लाखांहून अधिक व्यक्तींना रोजगाराचे साधन मिळवून दिले आहे. रिक्षा चालक संघटना ही भारतातील संघटित कामगारांची एक मोठी संघटना आहे.

आपल्याला हवे तेव्हा रिक्षाचालक येत नाहीत, सरळ नाही सांगतात, अवाजवी दर आकारतात, वाटेल तेवढे प्रवासी बसवून नेतात, कशीही गाडी चालवतात , त्यांना वाहतुकीच्या नियमांशी काहीही देणे-घेणे नसते , त्यांना प्रवाश्यांच्या जीवाची जराही पर्वा नाही असे अनेक आरोप रिक्षाचालकांवर केले जातात.

तरीही गरज पडली की सामान्य माणूस रिक्षाचाच आसरा घेतो. १९४९ पासून सुरु झालेली ही रिक्षा आजही प्रवाश्यांना घेऊन रस्त्यांवर अखंड धावते आहे आणि भारतीय लोकांच्या मनात तिचे स्थान अबाधित आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version