हे ५ बॅट्समन ‘ओपनर’ म्हणून खेळले नसते, तर एवढे ‘लोकप्रिय झाले’च नसते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
क्रिकेटमध्ये ओपनिंग बॅट्समन होण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. वन-डे, ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये ओपनिंगला येणाऱ्या फलंदाजांकडून आक्रमकपणा जास्त अपेक्षित असतो.
टेस्ट क्रिकेटमध्ये ही गरज बदलते. तिथे खेळाडूला संयम राखून डावाची सुरुवात करायची असते, पिचचा अंदाज घ्यायचा असतो. एकाच खेळाडूकडून खेळाच्या प्रकारानुसार आपल्या शैलीत बदल करण्याची ही अपेक्षा करतांना खेळाडू कसलेला फलंदाज असावा लागतो हे निवड समिती, कर्णधार नेहमीच बघत असतात.
ओपनिंग बॅट्समन होण्यासाठी फलंदाजाला केवळ वेगवान गोलंदाजच नाही तर स्पिनर्सची बॉलिंग खेळण्याची सवय असावी लागते आणि ही परीक्षा कोणालाच चुकलेली नाहीये, सचिन तेंडुलकरला सुद्धा नाही.
१९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनला १९९४ मध्ये ओपनिंग बॅटिंग करण्याची संधी मिळाली आणि त्याने त्याचं सोनं केलं. ते सुद्धा या कारणामुळे की, न्यूझीलंडमध्ये खेळतांना नवज्योत सिंग सिद्धूची मान आखडली होती, तेव्हा आपल्या ७० व्या सामन्यात कर्णधार अझर, मॅनेजर अजित वाडेकर यांना विनंती करून त्याने ही संधी मिळवली होती.
एक काळ होता जेव्हा, वनडे मॅच आहे आणि सचिन ओपनिंगला बॅटिंग करत नाहीये, हे आपण मान्यच करू शकत नव्हतो. ओपनिंगला आल्यापासून बॅट्समनचं करिअर घडण्यास सुरुवात होते असं आपण काही इतर उदाहरणातून सुद्धा म्हणू शकतो. कोण आहेत असे इतर फलंदाज जे ओपनिंगला आले नसते तर त्यांचं करिअर इतकी उंची गाठू शकलं नसतं? जाणून घेऊयात.
१. वीरेंद्र सेहवाग
‘मुल्तान का सुल्तान’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या सेहवागला आधी वनडे मॅचमध्ये तिसऱ्या आणि आठव्या क्रमांकावर खेळावं लागलं होतं. या ३३ सामन्यात सेहवागने केवळ ३ वेळेस ५० रन्सपेक्षा अधिक खेळी केली होती.
जेव्हा आपल्या लाडक्या विरुला ओपनिंगला बॅटिंग करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने २१२ मॅचमध्ये ७५०० रन्स करून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हैराण करून सोडलं होतं. ओपनिंगला बॅटिंग करून २०० रन्स करण्याचा विक्रम सुद्धा वीरेंद्र सेहवागने केलेला आहे.
२. रोहित शर्मा
उत्कृष्ट फलंदाज असूनही रोहित शर्माला पहिल्या मॅचपासून ओपनिंगची संधी मिळाली नव्हती. २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रोहित शर्मा हा चांगला ओपनिंग बॅट्समन होऊ शकतो २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी कर्णधार धोनीच्या लक्षात आलं आणि तिथून रोहित शर्माच्या करिअरला नव्याने सुरुवात झाली.
शिखर धवन सोबत त्याने केलेली डावाची सुरुवात ही खूप आश्वासक होती. ओपनिंगला आल्यानंतर कित्येक विक्रम रोहित शर्माने आपल्या नावावर केले ज्यामध्ये वनडे मधील द्विशतक, ट्वेंटी ट्वेंटीमधील सर्वाधिक शतकांचा समावेश आहे.
३. सनथ जयसूर्या
गोलंदाजांचा कर्दनकाळ मानला जाणाऱ्या सनथ जयसूर्याने वनडेमधील ५० इनिंगमध्ये तिसऱ्या ते आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
एका सामन्यात सनथ जयसूर्याने ६५ धावा केल्या आणि तेव्हा कर्णधार अर्जुना रणतुंगाला वाटलं. की सनथ जयसूर्या ओपनिंग फलंदाजी करू शकतो. त्यानंतर सनथ जयसूर्याने ३८३ सामन्यात १२,५०० धावा केल्या आणि तेही ९२.४८ इतक्या आक्रमक स्ट्राईक रेटने…
४. ब्रॅण्डन मॅकलम
न्यूझीलंडचा हा ओपनिंग बॅट्समन सुरुवातीच्या काळात मधल्या फळीत फलंदाजी करायचा. दोन वेळेस त्याने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करत असतांना ५० पेक्षा अधिक धावा केल्या आणि परीक्षकांना त्याची फलंदाजी आवडली. मॅकलमला ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
१०७ वेळेस न्यूझीलंडची इनिंग सुरू करतांना त्याने १०२.७५ च्या स्ट्राईक रेट ने ३,३६३ धावा केल्या आणि ओपनिंगच्या जागेसाठी आपली योग्यता त्याने सिद्ध केली.
५. सौरव गांगुली
वेस्ट इंडिज सोबत १९९२ मध्ये सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करून आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात करणाऱ्या ‘दादा’ला ओपनिंगला येण्यासाठी ऑक्टोबर १९९६ पर्यंत वाट बघावी लागली होती.
सचिन तेंडुलकर त्यावेळी कर्णधार होता आणि त्यानेच दादाला आपल्या सोबत ओपनिंग बॅटिंग करण्याची सूचना केली आणि ही जोडी आजही वनडे मधील सर्वश्रेष्ठ जोडी म्हणून मानली जाते. सौरव गांगुलीच्या करिअरमधील ११,३६३ रन्सपैकी ९,१४६ रन्स ओपनिंगला आल्यावरच झाले होते.
क्रिकेट असो वा इतर कोणतंही क्षेत्र, चांगल्या कामाचं कौतुक करणं, नवीन संधी उपलब्ध करून देणं ही नेहमीच एका चांगल्या नेतृत्वाची जबाबदारी असते. ती जबाबदारी जर व्यवस्थित पार पाडता आली तर सचिन सारखे इतरही हिरे आपल्याला सापडतील हे नक्की.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.