आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
२००६ मध्ये मे महिन्यातील १८ तारखेला पाकिस्तानच्या तत्कालिन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी बॉलिवूडमधील लोकप्रिय नायक फिरोज खान यांना पाकिस्तानात प्रवेशासाठी बंदी घातली होती.
हा प्रसंग घडला त्याला कारण होते फिरोज खान यांचे बंधू आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक निर्माते अकबर खान यांच्या ताजमहाल या चित्रपटाच्या प्रिमिअर दरम्यान फिरोजखान यांनी झाडलेले ताशेरे आणि त्यांना भारतीय व पाकिस्तानी माध्यमांनी दिलेली भरघोस प्रसिद्धी!
याप्रसंगी झालेल्या जाहीर कार्यक्रमात फिरोज खान म्हणाले की पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील मुसलमान अधिक समाधानी आहेत.
इतकेच बोलून न थांबता फटकळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले फिरोज खान पुढे म्हणाले, ‘‘मी एक भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. तेथील मुसलमान खूप प्रगती करत आहेत. आमचे राष्ट्रपती मुस्लिम आहेत, पंतप्रधान एक शीख आहेत. इस्लामच्या नावावर पाकिस्तान बनला होता पण मुस्लिम कसे एकमेकांना मारत आहेत ते पहा!’’
त्यांच्या या उद्गारांनंतर कार्यक्रमाचे पाकिस्तानी सूत्रसंचालक फखेर-ए-आलम यांच्यात आणि फिरोजखान यांच्यात जाहीर वादही झाला आणि हे प्रकरण गाजू लागलं.
फखेर-ए-आलम हे एक पाकिस्तानी पॉप गायक असून त्यांनी विविध पाकीस्तानी चॅनल्सच्या माध्यमांतून फिरोज खान यांच्यावर दारूच्या नशेत पाकिस्तानचा अपमान केल्याचा आरोप केला.
फिरोजखान यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता फिरोज खान यांना देशात येण्यास बंदी घातली.
–
- एका पाकिस्तानी व्यक्तीने भारताचे केलेले कौतुक वाचून तुम्हाला नक्की अभिमान वाटेल
- केवळ मनोरंजनासाठी नाही तर “या” समाजोपयोगी कारणासाठी बॉलिवूड म्हणतंय “IforIndia”
–
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या तस्नीम अस्लम यांनी म्हटले, ” फिरोज खान यांनी गैरवर्तन केले, आमच्या पाहुणचाराचा गैरवापर केला जे स्वीकार्ह नव्हते, म्हणून त्यांना पाकिस्तानात प्रवेश करण्यास मनाई आहे.”
“भारतीय आणि पाकिस्तानी माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर कव्हर केलेल्या त्यांच्या वक्तव्याची प्रेसिडेंट हाऊसने गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आणि त्यांच्या पाकिस्तानात प्रवेशावर बंदी घालण्याचे निर्देश दिले,” असे खासगी एआरवाय वाहिनीने प्रेसिडेन्सीमधील सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा निर्णय नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्ताला कळवण्यात आला.
फिरोजखान यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानी माध्यमे आणि पाकिस्तानी कलाकार यांनी गदारोळ करणे स्वाभाविकच होते.
खानच्या प्रवेशावर बंदी घालणारे मुशर्रफ यांचे आदेश प्रसारित केल्यावर लगेचच, स्थानिक जिओ टीव्हीने ‘फिरोज खान, फखर-ए-हिंदुस्तान’ नावाचा व्यंगचित्र व्हिडिओ प्रसारित केला ज्यामध्ये त्याला दारूच्या नशेत दाखवण्यात आले होते.
अनेक पाकिस्तानी चित्रपट तारे आणि निर्मात्यांनी फिरोजखान यांच्यावर त्याच्या भावाच्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या व्यासपीठाचा वापर करून “विवादास्पद शेरेबाजी” करण्यासाठी आक्षेप घेतला.
पण या वेळी फिरोजखान यांचे बंधू आणि चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक निर्माते असलेल्या अकबर खान यांनी आणि उपस्थित इतर भारतीय कलाकारांनी घेतलेली बोटचेपी भूमिका आश्चर्यकारक आणि चीड आणणारी होती.
फिरोज खान यांच्या वक्तव्यावर मत देतांना त्यांचे भाऊ अकबर खान म्हणाले होते की माझ्या भावाला तसे म्हणायचे नव्हते. भाजप उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलेल्या टिप्पणीवर आम्ही खूप नाराज आहोत ज्यात त्यांनी माझ्या भावाला ‘खरा राष्ट्रवादी’ म्हटले आहे. त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे
–
- ‘कायदे आजम’ जिन्ना यांची मुलगी भारतातील घराच्या बाल्कनीत लावते २ झेंडे
- “हमे माधुरी दे दो”, पाकड्या सैनिकांच्या गलिच्छ मागणीला मेजर विक्रमचं सडेतोड उत्तर
–
‘ताजमहाल’च्या प्रीमिअरला खानसोबत आलेले इतर भारतीय चित्रपट कलाकार आणि प्रतिनिधींनी या घटनेबद्दल माफी मागितली होती.
त्यावेळी पाकिस्तान सरकारने ‘ताजमहाल’ आणि ‘मुघल-ए-आझम’च्या नव्या प्रिंटचे प्रदर्शन करण्याची परवानगी दिल्यानंतर, इस्लामाबाद भारतीय चित्रपटांवर असलेली चार दशकांपासूनची बंदी उठवेल अशी अपेक्षा होती. या प्रकरणानंतर त्याविषयी शंका निर्माण झाली होती.
भारतीय चित्रपट हे पाकिस्तानमध्ये कायमच लोकप्रिय होते आणि आहेत. त्यांच्यावर बंदी घातली तरी अवैध मार्गांनी त्यांचा आस्वाद पाकिस्तानातील चाहते घेतच असतात.
कधी काही घटना होते आणि भारतातील राजकारणी पाकिस्तानी कलाकारांवर बंदीची मागणी करतात तर प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदीची मागणी होते. पण बॉलिवूडच्या गारूडामुळे ही बंदी पूर्ण यशस्वी होऊ शकत नाही.
फिरोज खान यांच्या वक्तव्यानंतर उठलेल्या वादळानंतरही असेच झाले. पाकिस्तानी चाहत्यांच्या बॉलिवूड प्रेमावर ‘फिल्मिस्तान’ हा एक छान चित्रपटही बॉलिवूडमध्ये येऊन गेला.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.