भजन-कीर्तनाच्या ७० वर्षीय साधक – जयश्री कुलकर्णी
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
ह्या वर्षी डोंबिवलीत पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या स्वागत यात्रेचा प्रसंग. कित्येक किलोमीटर लांब असलेल्या ह्या महा यात्रेत, अनेक दिंड्या सामील झाल्या होत्या. शाळकरी मुलांच्या, बुलेटवर स्वार झालेल्या भगिनींच्या मागे जाणाऱ्या…अश्या विविध दिंड्यांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्या सर्वांत होती एक विशेष निमंत्रित दिंडी – शबरी भक्तीगीत मंडळाची दिंडी.
विविध वयोगटातील महिला, मोठ्या उत्साहाने ह्या दिंडीत सहभागी झाल्या होत्या. डोंबिवलीतील सुप्रसिद्ध भजनी मंडळांपैकी एक असलेल्या शबरी भजनी मंडळाने साहित्य संमेलनाच्या स्वागत यात्रेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
यात्रेतील ह्या सहभागासाठी मंडळाला सन्मानपत्र देखील देण्यात आले आहेत.
आयोजकांनी विशेष निमंत्रित केलेली ही दिंडी, एका ११ वर्षांच्या तपस्येची फलश्रुती होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही तपस्या केली आहे – श्रीमती जयश्री कुलकर्णी ह्यांनी.
७० वर्ष वय असणाऱ्या जयश्री कुलकर्णी तब्ब्ल ११ वर्षांपासून भक्तिगीते सादर करत आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून, विविध अडचणींचा सामना करत त्यांनी आपली साधना अव्याहत सुरू ठेवली आहे.
जयश्री कुलकर्णी ह्यांनी रेडिओ वरील वनिता मंडळ कार्यक्रमात देखील आपली भक्तीगीतं सादर केली आहेत. एवढंच नाही, साईश्रद्धा भजनी मंडळ ह्या मंडळातर्फे त्यांचा दूरदर्शनवर देखील कार्यक्रम झाला आहे. त्या म्हणतात, त्यांना आणखीदेखील अनेक संधी मिळत होत्या – परंतु त्या मिळवण्यासाठी त्यांना काही अर्थपूर्ण देवाणघेवाण कराव्या लागल्या असत्या. भ्रष्टाचाराच्या तिटकाऱ्यामुळे त्यांनी तो मार्ग सोडला – तो कायमचाच.
वयाच्या सत्तराव्या वर्षीदेखील श्रीमती कुलकर्णी खणखणीत कीर्तन सादर करतात, गणपती उत्सव-नवरात्रीत तर प्रत्येक दिवशी त्यांना विविध ठिकाणी निमंत्रणं असतात. त्यांच्या निस्सीम सेवाभावाची पावती म्हणूनच की काय – त्यांच्यावर स्वामी समर्थ मठाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
टीम मराठीपिझ्झा तर्फे जयश्री कुलकर्णी ह्यांना सलाम आणि शबरी भजनी मंडळास मनःपूर्वक शुभेच्छा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.