आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
उपवास म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येते ती वाफाळती साबुदण्याची खिचडी, खमंग काकडीची कोशिंबीर, सोबतीला गारेगार ताक आणि बरंच काही…
उपवास ही आपल्याकडे प्राचीन काळापासून चालत आलेली पद्धत आहे. काहींच्या मते उपवास हा कधीकाळी अन्नाच्या कमतरतेमधून आला, तर काहींच्या मते अवर्षण काळात अन्नधान्य वाचवण्याचा तो एक उपाय म्हणून वापरला गेला.
यापैकी खरे-खोटे काही असो पण सर्वानुमते आणि पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार उपवास म्हणलं की त्यामागचा धार्मिक आधार समोर येतो. जवळपास सर्व धर्मामध्ये उपवासाचे महत्व अधोरेखित केलं गेलं आहे.. हिंदू तसेच जैन धर्मात वर्षभरात विविध कारणाने तसेच मुस्लिम धर्मात रमजानच्या महिन्यात उपवासाला अनन्यसाधारण महत्व आहे.
पण उपवास म्हटलं की अनेक खव्वैये नाराज होतात, फास्टफुडसारख्या पदार्थांपासून दिवसभर लांब रहायचं, मनात येईल तोपदार्थ चाखायचा नाही, जीभेवर ताबा ठेवून ठराविक पदार्थ खायचे… तुम्हालाही नेमकं हेच वाटत ?
हे ही वाचा –
===
मग तर तुम्ही हा लेख वाचलाच पाहिजे.
कारण धार्मिक कारणासोबतंच, संशोधनांती उपवासाला वैज्ञानिक महत्व ही प्राप्त झालेले आहे. सध्याचा फास्टफूडचा जमाना असला तरी उपवास आणि त्याचे परिणाम मात्र आपल्याला पाहायला हवेत जेणेकरून, आपल्या शरिरासाठी उपवास कसा आणि किती महत्वाचा आहे याचा अंदाज येईल.
1. उपवासाचे प्रकार
आठवड्यातून एक दिवस उपवास हा कधीही चांगला व अधिक परिणामकारक ठरू शकतो.
उपवास विविध प्रकारे करता येतो. निर्जळी उपवास करणा-यांचे प्रमाण कमी असले तरी हा प्रकार ऋषीमुनींपासून चालत असल्याने याला आद्यप्रकार मानलं जातं.
याशिवाय दिवसभर निव्वळ पाणी पिऊन, किंवा फलाहार घेऊन उपवास केला जातो. ठराविक वेळेतंच उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करणा-यांची संख्या मोठी आहे. किंबहुना हा प्रकार घराघरात पाळला जातो.
एक वेळ किंवा दोन वेळा हलका आहार घेऊन उपवास केला जातो, डाएट करणा-यांकडून या प्रकाराला प्राधान्य दिलं जातं.
2. वजन नियंत्रण
उपवास काळात शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी, प्रोटिन्स, शर्करा यांचा वापर होऊन आपल्या शरीराची ऊर्जेची गरज भागवली जाते.
निव्वळ उपाशी राहून वजन कमी करण्याचा उपाय घातक ठरू शकतो. त्याऐवजी फळे, प्रमाणात कमी उष्मांक असलेले पदार्थ, मुबलक प्रमाणात पाणी याच्या योग्य नियोजनातून वजन नियंत्रित करण्यास मदत होऊ शकतं.
3. विकार दूर होणे
आजारपणामध्ये डॉक्टर नेहमी हलका आहार घ्यायचा सल्ला देतात.
त्यामुळे होतं असं कि चयापचय या शरीरात निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेला आराम मिळून शरीरास पर्यायाने रुग्णास लवकर बरे होण्यात मदत होते.
4. मानसिक स्वास्थ्य
कधी कधी प्रमाणाबाहेर खाल्ल्याने अपचन होण्याचा त्रास होतो. त्यामुळे प्रसन्न न वाटणं, चिडचिड होणंं, तणावग्रस्त वाटणं यांसारखे प्रकार होतात.
अशाने एकंदर वैयक्तिक कामकाजावर परिणाम होऊन मानसिक स्वास्थ्य पण बिघडू शकते. अशा वेळी एखाद दिवसाचा पूर्णवेळ उपवास किंवा ठराविक काळासाठी उपवास करून केलेले आहार नियोजन कामी येते.
दीर्घकालीन उपवास मात्र मनाची परीक्षा घेणारे ठरू शकतात.
5. शरीराला करा रिफ्रेश
शरीरात जीर्णोधार असंही म्हणता येतं. जीर्णोद्धार शब्द इथे अतिशयोक्ती वाटू शकतो,
पण ज्याप्रमाणे संगणकामध्ये काही अडचण आली तर आपण कधी कधी तो रिस्टार्ट करून चालू करतो, अगदी त्याचप्रमाणे नियंत्रित उपवासामुळे शरीरात साठलेले दूषित पदार्थ शरीराबाहेर टाकले जाण्याची प्रक्रिया होऊन आरोग्य चांगलं राहतं.
6. दीर्घायुषी मंत्र
१९४५ मध्ये शिकागो विद्यापीठाच्या संशोधकांनी प्रयोगशाळेत खार आणि उंदीर यांच्यावर नियंत्रित आहाराचा प्रयोग केला होता.
प्रयोगात असं आढळून आले कि ज्या खार आणि उंदरांना एक दिवसाआड अन्न देण्यात आले ते नियमित आहार घेणाऱ्यांपेक्षा दीर्घायुषी ठरले तसेच कॅन्सर सारख्या दुर्धर आजारचे प्रमाण ही कमी होते.
===
शास्त्रीय आधार
डाएट केल्याने जो फायदा मिळतो तोच फायदा आठवडय़ातून एक किंवा दोन वेळा उपवास केल्याने मिळतो असे बऱ्याच अभ्यासात पुढे आले आहे. असे असले तरी अती कमी कॅलरीचे सेवन करणे सर्वानाच दीर्घायुषी होण्यासाठी उपयोगी पडेल असे नाही.
पण उपलब्ध माहितीच्या आधारे आपण असे नक्कीच म्हणू शकतो की गरजेइतकेच अन्नाचे सेवन केल्यास म्हातारपणी आजारांना बळी पडण्याचे प्रमाण बरेच कमी होते. त्यामुळे आरोग्य चांगले राहून आयुर्मान वाढते.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठ येथील प्राध्यापक तसेच न्यूरो सायंटिस्ट डॉ. मार्क मॅटसन आणि त्यांच्या चमूने आठवडय़ाला एक दिवस उपवास केल्याने मेंदूचे विकार होण्याची शक्यता कमी होते हे दाखवून दिले.
ताणतणावामुळे न्यूरॉन खराब होऊ शकतात. त्यांना संरक्षित करण्याचे काम या उपवासाने होते. परिणामी न्यूरॉन्सचा ऱ्हास होण्याचे प्रमाण कमी होते.
हे निष्कर्ष उंदीर आणि खारी यांच्याबाबतीत लागू होत असल्याचे दिसले. अलीकडे त्यांच्या संशोधनातून उंदरांना एकाआड एक दिवस अन्न दिले तर त्यांचा मेंदू विषारी द्रव्यांना प्रतिकार करतो असे आढळले.
२००३ मध्ये उंदरांवरच आणखी एक प्रयोग करण्यात आला होता. त्यात उंदराला सातत्याने उपाशी ठेवण्यात आले. त्यामुळे सुरूवातीला त्याचे आरोग्य चांगले राहिले. पण नंतर त्याच्या रक्तातील इन्शुलिन आणि ग्लुकोजचे प्रमाण कमी झाले.
उपवासाचा परिणाम इन्शुलिन स्त्रवण्यावर होत असतो. इन्शुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. इन्शुलिन स्त्रवण्याचा परिणाम लठ्ठपणावर होतो. मधुमेह आणि हृदयरोगाला इन्शुलिनच्या स्त्रवणातील बदल कारणीभूत ठरू शकतो.
एकंदर धार्मिक अधिष्ठान असलेल्या उपवासाचे शरीरासाठी व मनासाठीचे महत्व विज्ञानामुळे अधोरेखित होते. असे असले तरी दीर्घकाळासाठी उपवास करणाऱ्यांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उपवास एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नसावी.
रक्तदाब, मधुमेह इ. आजारांमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते. तेलकट पदार्थ टाळून, उन्हाळ्यात असेल तर पाण्याचे प्रमाण पाळून केलेला उपवास हा जीवदान आहे. नाहीतर आपल्या मराठीमध्ये असलेल्या म्हणीसारखे “एकादशी आणि दुप्पट खाशी असे व्हायला नको.!!”
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.