Site icon InMarathi

‘पॉपकॉर्नवर बंदी’ ते ‘पॉपकॉर्न तर हवेतच’ – थिएटरपर्यंतचा हा प्रवास ‘चविष्ट’ आहे…

popcorn at movies inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सिनेमा थिएटरच्या वातावरणाचा एक अविभाज्य भाग म्हणजे पॉपकॉर्नचा दरवळ! थिएटरमध्ये प्रवेश केल्याक्षणी सगळ्यात आधी भेटतो तो हा लोण्यात भाजलेल्या पॉपकॉर्नचा दरवळ… पॉपकॉर्नशिवाय सिनेमा हे समीकरणच आज पचनी पडत नाही. मात्र सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात सिनेमा बघताना या सिनेमाचा भिडू असणारं पॉपकॉर्न खाण्यावर चक्क बंदी होती.

 

 

रोमॅण्टिक असो की हॉरर, अॅक्शन असो की फॅमिली ड्रामा, थिएटरमधे समोर घडणार्‍या नाट्यासोबत सिनेमाहॉलमधे बसलेल्यांच्या हातात पॉप कॉर्न टब नसेल तर चित्र अपूर्ण वाटतं.

कोणत्याही प्रकारचा सिनेमा बघताना त्याची मजा वाढविणारे पॉपकॉर्न केवळ थिएटरमधेच नाही, तर घरीही चित्रपट बघताना साथ देतात.

आज सिनेमा आणि पॉपकॉर्न हे अतूट समीकरण बनलं असलं, तरीही सिनेमाच्या प्रारंभीच्या काळात मात्र चक्क पॉपकॉर्न खाण्यावर बंदी होती.

नेमकं काय होतं रहस्य?

सिनेमा जेव्हा त्याच्या किशोरावस्थेत “टॉकी” म्हणून ओळखला जायचा त्या काळातली ही गोष्ट आहे. १९२० च्या दशकात प्रथमच चित्रपट दाखविण्यासाठी खास इमारतींची बांधणी केली गेली. यांना सिनेमा पॅलेस असं संबोधलं जाऊ लागलं.

ज्याप्रमाणे नाटकांसाठी नाट्यगृहं होती तशीच चित्रपटांसाठीही खास चित्रपटगृहं बांधली गेली. त्या काळात नाटक-चित्रपट बघणं हा एक सोहळा असे. लोक यासाठी खास नटून थटून , जामानिमा करून येत असत.

 

 

पॉपकॉर्न साधारणपणे जत्रांमधून, मेळ्यांमधून रमत-गमत फिरताना खाण्याचा पदार्थ मानला जात असे. रस्त्यावर मिळणारं स्वस्त स्नॅक्स अशी त्याची थट्टा केली जात असे. अशा या पॉपकॉर्नला जर थिएटरमधे प्रवेश दिला तर इथलं उच्च अभिरूचीचं वातावरण बिघडेल, सिनेमा बघताना पॉपकॉर्नच्या वासानं आणि तो खाताना होणार्‍या आवाजानं रसभंग होईल असं थिएटर मालकांचं मत होतं.

थिएटरमधे पॉपकॉर्न बनवण्यावर असणारी बंदी बघून विक्रेत्यांनी थिएटर बाहेर आपले गाडे उभे करण्यास सुरवात केली. पॉपकॉर्न बनविण्यासाठी फारसं साहित्य लागत नसे. तसंच जे साहित्य आणि सामान लागत असे ते अत्यंत स्वस्त असल्यानं पॉपकॉर्न बनवून विकणं फायद्याचं होतं.

 

 

दुसर्‍या बाजूला प्रेक्षकांना चार पाच सेंटमधे भरपूर पॉपकॉर्न मिळत असल्यानं त्यांच्यासाठी स्वस्तात मस्त असा हा पर्याय होता. लोक सिनेमा बघायला येतानाच बाहेरून पॉपकॉर्न घेऊन येऊ लागले. हे बघून थिएटर मालक संतापले आणि त्यांनी थिएटरमधे पॉपकॉर्न बनवायला तसेच खायला, दोन्हीवरही बंदी घातली. या प्रकारानं पॉपकॉर्न विक्रेतेही संतापले.

लवकरच थिएटर मालकांच्या लक्षात आलं, की प्रेक्षकांकडून पॉपकॉर्नला भलतीच मागणी आहे. मागणी इतकी होती, की पॉपकॉर्न नसतील तर प्रेक्षकवर्ग चित्रपटगृहाकडे फिरकत नव्हता.

याचं कारण म्हणजे त्याच्यासाठी चित्रपट बघणे हा विरंगुळ्याचा प्रकार होता. अर्थातच त्याला सिनेमा बघताना पॉपकॉर्न खाणं आवडत होतं. आता मायबाप प्रेक्षकाचीच ही आवड आहे म्हणल्यावर थिएटर मालकांनी नवीन युक्ती आणि नवा धंदा सुरू केला. त्यांनी चक्क स्वत:चीच पॉपकॉर्न मशिन्स थिएटरमधे बसविली.

 

 

चार पैसे जास्त मोजून, पण थेट थिएटरच्या आतच पॉपकॉर्न मिळण्याची सोय प्रेक्षकांना झाली. काही थिएटर मालकांनी मात्र अट्टाहासानं पॉपकॉर्न विकले नाहीत. त्यांच्या थिएटरकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

परिणाम असा झाला की थिएटर म्हणजे पॉपकॉर्न हे समीकरण पक्कं झालं आणि सिनेमाला पॉपकॉर्न नावाचा कायमचा भिडू मिळाला.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version