कारण इंजिनियर्स काहीही करू शकतात; वाचा या तरुणाचा भारी प्रयोग…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
तसं पाणी आणि वीज या गोष्टींशिवाय राहणे अशक्य आहे. तरीही कित्येक लोकांना पिण्याचे पाणी आणि वीज मिळत नाही. भारतातल्या अनेक दुर्गम भागातील हीच परिस्थिती आहे. तिथपर्यंत वीज पोहोचू शकत नाही.
त्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे देखील दुरापास्तच. मुळातच काही ठिकाणे अशी आहेत की तिथे रोजची आंघोळ, हात पाय धुणे, कपडे धुणे तर सोडाच पण प्यायला पाणी मिळाले तरी खूप आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार जगभरातील एक कोटी लोक असे आहेत की, ज्यांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि वीज मिळत नाही.
तसं भारतामध्ये अलीकडे दुर्गम भागापर्यंत वीज पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाणीही बऱ्यापैकी पोहोचवले जात आहे. कधीकधी टॅंकरद्वारे ही पाणीपुरवठा होतो. परंतु पाण्याची उपलब्धता असली तरी ते पाणी पिण्यालायक असतंच असं नाही.
आज-काल पाण्याचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. नद्यांमध्ये कारखान्याचे पाणी, सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जाते.
तसेच शेतामध्ये देखील अनेक रासायनिक खते आणि फवारणी होत असल्यामुळे पाण्याचे स्त्रोत प्रदूषित झाले आहेत. त्यामुळेच ते पाणी पिण्यायोग्य नसते.
गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. आंध्र प्रदेशातील एक तरुण असाच लहानपणापासूनच पाणी आणि विजेपासून वंचित होता.
लहानपणापासूनच या परिस्थितीचा सामना केल्यामुळे कदाचित त्याने यावरतीच काम करायचे ठरवले असावे. मधु वज्रकरुर असं या तरुणाचं नाव असून तो व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे.
मधु वज्रकरुर यांनी एका नवीन संकल्पनेतून शुद्ध पाणी आणि विजेची निर्मिती केली आहे. त्याची ही संकल्पना काय आहे? तर एक पवनचक्की.
आता सगळ्यांना माहीत आहे की पवनचक्की पासून वीज निर्माण होईल पण पाणी कसं तयार होईल? आणि तेही पिण्यायोग्य!
तर मधुनी केलेल्या पवनचक्कीची हीच खासियत आहे की ही पवनचक्की हवेतील ओलावा शोषून घेते आणि पिण्यायोग्य पाणी तयार करते.
त्याच्या या टू-इन-वन पवनचक्कीमध्ये दिवसाला सरासरी ३० KW पॉवरची वीज तयार होते. तर ८० ते १०० लिटर शुद्ध पाणी तयार होत आहे. त्याच्या या विजेमुळे आसपासच्या २५ घरातील विजेची मागणी पूर्ण होत आहे.
जवळजवळ गेली सोळा वर्ष मधु, या पवनचक्की पासून वीज आणि पाणी निर्मिती या प्रोजेक्टवर काम करत आहे.
याविषयी बोलताना मधु म्हणतो की -” लहानपणापासूनच मला स्वच्छ पाणी आणि विजेची कमतरता भासली आहे. या गोष्टी मिळणे कठीण होतं. त्यावेळेस मी हे स्वप्न बघत होतो की, असं एखादं मशीन बनवावं ज्यातून पाणी आणि वीज दोन्ही निर्माण होईल.
–
हे ही वाचा – पोळी-भाजीचा डबा विकून महिला कमावतेय लाखो रुपये!! वाचा ही अनोखी कल्पना…
–
मग त्यादृष्टीने मी प्रयत्न चालू केले. घरातली आर्थिक परिस्थिती अर्थातच समाधानकारक नव्हती म्हणून मग छोट्या छोट्या गोष्टीतून बचत चालू केली. त्यातूनच आजचा हा प्रोजेक्ट आकाराला आला आहे.”
पवन चक्कीतून पाणी कसे तयार होते?
या पवनचक्कीतून ३० – किलोवॅटची ऊर्जा तर तयार होतेच. ज्यामुळे काही घरे आणि संपूर्ण सिस्टमला शक्ती मिळते. पण हवेतून पाणी तयार करणं हे खरोखरच जिकिरीचं काम आहे.
अर्थात मधुने आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा फायदा करून घेतला. आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीजवळ त्याचे गाव असल्याने तिथली हवा ही आर्द्र असते.
त्याच आर्द्रतेचा वापर त्याने पाणी तयार करण्यासाठी केला आहे. पवनचक्कीशी जोडलेल्या पंखाच्या मध्यभागी एक फट ठेवली आहे, ज्याद्वारे हवा आत घेतली जाते. त्यानंतर कूलिंग कॉम्प्रेसरच्या मदतीने हवा थंड केली जाते.
अशाप्रकारे, ओलसर हवेतील बाष्पाचे पाण्यात रूपांतर होते, जी तांब्याच्या पाईप्सद्वारे फिल्टरेशन आणि शुध्दीकरणासाठी स्टोरेज टाक्यांकडे पाठविली जाते.
त्याच्या या प्रोजेक्टचा फायदा त्याच्या आसपासच्या घरांना होत आहे. वीज बिलाचा कोणताही शॉक न लागता त्यांना माफक वीज बिल येत आहे. तसेच अत्यंत कमी किमतीत शुद्ध पाणीदेखील मिळत आहे.
दुर्गम भागातली पाणीटंचाई अशा प्रोजेक्टमुळे नक्कीच दूर होईल. तिथल्या स्थानिक प्रशासनाने त्याच्या कामाची नोंद घेतली आहे आणि त्याचं कौतुकही केलं आहे.
स्थानिक प्रशासनाने त्याचं काम जिल्ह्याच्या कलेक्टर पर्यंत पोहोचवलं आहे. आता त्यांच्याकडून कशा प्रकारचा रिस्पॉन्स येतोय याची वाट मधु पहात आहे. त्याला खात्री आहे की त्याच्या या कामाचे राष्ट्रीय स्तरावर हे स्वागत केलं जाईल.
आणि खरोखरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एका भाषणात मधूच्या या प्रोजेक्टच कौतुक केलं आणि त्याची माहिती लोकांनाही दिली.
मधूनी स्वतःच्या कल्पनेतच असं एक मशीन तयार केलं होतं की ज्यातून वीज आणि पाणी निर्माण होईल. आणि इंजिनियर झाल्यानंतर त्याने आपल्या त्या कल्पनेतल्या मशीनवर कामही चालू केलं आणि ते मशीन प्रत्यक्षात आणलंही.
अशाच अनेक कल्पना भारतातल्या कितीतरी लोकांच्या मनात असतील पण कधी परिस्थितीमुळे, कधी इतर जबाबदाऱ्यांमुळे किंवा आळसामुळे देखील त्या प्रत्यक्षात येत नसतील.
अशा सगळ्यांनीच मधुचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा. हे करताना त्याने फक्त स्वतःचा फायदा पाहिला नाही, तर त्याच्या जवळपासच्या लोकांनाही याचा कसा उपयोग होईल असा विचार केला.
पण हे करता करताच आता संपूर्ण देशासमोरच आदर्श ठेवला आहे. प्रत्येक गोष्ट सरकारकडून न मागता किंवा सरकारी मदतीची अपेक्षा न करता मधूने आपला प्रोजेक्ट अस्तित्वात आणला.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.