Site icon InMarathi

मायावती ते सुशीलकुमार शिंदे! हे आहेत आजवर भारतात झालेले ‘दलित मुख्यमंत्री’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वादंगाचा नवा अध्याय सुरु झाला. माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू विरुद्ध कॅप्टन अमरिंदर असा हा अध्याय आणखी किती काळ चालेल याची सुद्धा चर्चा सुरु झाली. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरु झाली.

 

 

सुखविंदर रंधावा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार इथपर्यंत चर्चा पोचली आणि अचानक एक वेगळंच नाव मुख्यमंत्री पदासाठी निवडण्यात आलं. चरणजीत सिंग चन्नी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आणि पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री मिळणार हे निश्चित झालं.

पंजाब राज्याला पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री मिळणार असला, तरी या मानाच्या पदावर बसण्याचा मान दलित व्यक्तीला इतर राज्यात याआधी सुद्धा मिळालेला आहे. अशाच काही मुख्यमंत्र्यांबद्दल आज जाणून घेऊया.

१. दामोदरम संजीवय्या, आंध्र प्रदेश

संजीवय्या हे भारतातील पहिले दलित मुख्यमंत्री ठरतात. ११ जानेवारी १९६० ते १२ मार्च १९६२ या काळात त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. तत्कालीन आंध्रप्रदेश म्हणजेच अखंड आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री होण्याचा त्यांना मान मिळाला होता.

 

 

त्यानंतरच्या काळात, आंध्रप्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं. आंध्रप्रदेशातील ही जबाबदारी सांभाळणारे ते पहिले दलित नेते ठरले.

२. राम सुंदर दास, बिहार

बिहार राज्यातील सोनपूर जवळील गंगाजल इथे, ९ जानेवारी १९२१ रोजी राम सुंदर दास यांचा जन्म झाला. १९४२ सालच्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

 

 

१९७७ साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दलाने सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसचा पराभव केला. राम सुंदर दास या निवडणुकीत सोनपूरमधून आमदार म्हणून निवडून गेले. मुख्यमंत्री पदावरून झालेले वाद जनता दलाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरले. कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.

ठाकूर यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरल्याने त्यांच्याऐवजी दास यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिलं जावं असा निर्णय घेण्यात आला आणि १९७९ मधील एप्रिल महिन्यात त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. फेब्रुवारी १९८० पर्यंत ते या पदावर विराजमान होते.

 

 

३. भोला पासवान शास्त्री, बिहार

स्वातंत्र्यपूर्व काळात १९१४ साली भारतात जन्माला आलेले भोला पासवान शास्त्री हे स्वातंत्र्यसेनानी म्हणून कार्यरत होते. उच्चशिक्षित असणाऱ्या भोला पासवान यांनी त्यांच्या उच्चशिक्षणासाठी शास्त्री ही पदवी देण्यात आली होती.

 

 

१९६८ साली पहिल्यांदाच त्यांच्या गळ्यात बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ पडली. बिहारचे ते पहिले दलित मुख्यमंत्री ठरले. मात्र हा कार्यकाल अवघ्या तीन महिन्यांचा ठरला.

त्यानंतर १९६९ साली १३ दिवसांसाठी ते या पदावर विराजमान होते. तर त्यांची मुख्यमंत्री पदाचा सर्वाधिक काळ ठरला ७ महिन्यांचा! १९७१ मध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ७ महिने त्यांनी हे पद भूषवलं.

४. जतिन राम मांझी, बिहार

सध्या बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असणारे नितीश कुमार यांचे निकटचे सहकारी, अशी जतिन राम मांझी यांची एकेकाळी ओळख होती. २०१४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये जनता दल युनायटेड या पक्षाला मोठा फटका बसला. याची नैतिक जबाबदारी स्विकारुन नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री न होण्याचा निर्णय घेतला. यामुळेच मांझी यांची या पदावर वर्णी लागली.

 

 

जतिन राम मांझी यांच्या रूपाने आणखी एक दलित मुख्यमंत्री तर बिहारला मिळाला, मात्र त्यांची कारकीर्द फारच वादग्रस्त ठरली. प्रसारमाध्यमांनी त्यांना टार्गेट केलं. नितीश कुमार यांचं कळसूत्री बाहुलं असा त्यांचा उल्लेख सातत्याने करण्यात आला.

जेडीयुने NDA शी घेतलेली फारकत आणि आमदारांची नाराजी यामुळे मांझी यांचं सरकार अल्पमतात जाण्याची भीती निर्माण झाली होती. लालू प्रसाद यादव यांचा आरजेडी पक्ष आणि काँग्रेसने मांझी यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं सरकार अल्पमतात गेलं नाही.

 

 

त्यापुढील १० महिन्यांनी त्यांना पक्षाकडून मुख्यमंत्रीपद सोडण्याचे आदेश आले. ते मान्य न केल्याने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर झालेल्या राजकीय उलाढालीत अखेर मांझी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

५. मायावती, उत्तर प्रदेश

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी उत्तरप्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा एकदा-दोनदा नव्हे तर चारवेळा वाहिली आहे. १९९५ साली त्या पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री ठरल्या.

१९९७ ते २००२ या काळात भाजपने बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी संपूर्ण ५ वर्षं सरकार चालवलं. मायावती या दलित समाजातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.

 

 

पुढे २००२ साली त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या, मात्र वर्षभरातच भाजपने पाठिंबा काढून घेतल्या आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं.

२००७ सालच्या निवडणुकीत, ‘हाथी नहीं गणेश हैं, ब्रम्हा, विष्णू, महेश हैं’ असा नारा देत हत्ती या निशाणीवर बहुजन समाज पार्टीने उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला आणि संपूर्ण बहुमतासह मायावती यांनी ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला.

६. सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र

महाराष्ट्राचे पहिले दलित मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला तो काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांना!

 

 

सोलापुरात १९४१ च्या जानेवारी महिन्यात सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म झाला. कायद्याचं शिक्षण घेतलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी १९५७ ते १९६५ साली सोलापूरच्या सेशन कोर्टात त्यांनी काम पाहिलं, ६ वर्षं महाराष्ट्र्र सीआयडीसाठी सबन्स्पेक्टर म्हणून सुद्धा ते कार्यरत होते.

त्यानंतर १९७१ साली काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला. १९७४ साली पहिल्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले. पुढे २००३ ते २००४ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला.

त्यानंतर, २००४ साली त्यांच्या खांद्यावर आंध्रप्रदेश राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी टाकण्यात आली.

दलित मुख्यमंत्री म्हणून काम पाहणारे हे नेते आज पुन्हा नव्याने चर्चेत आले आहेत. यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून अवश्य कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version