आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपण सगळेच हॉलिवूडचे कॉमिक बुक्स किंव कॉमिक कार्टून बघतो, आणि त्यांना प्रचंड फॉलो सुद्धा करतो! सगळ्यांनाच ही कॉमिक्स खूप आवडतात, त्यातले कॅरॅक्टर्स सुपरहिरो, व्हिलन प्रत्येकाला एक स्वतंत्र असं स्थान असतं!
उदाहरण द्यायच झालंच तर डिसी कॉमिक्स, मारव्हल कॉमिक्स, डिझनी ची कॉमिक्स अशी कित्येक कॉमिक्स आज जगप्रसिद्ध आहेत! शिवाय त्यावर हॉलीवूड मध्ये दर्जेदार आणि बिग बजेट सिनेमे सुद्धा निघतात!
बॅटमॅन, स्पायडर मॅन, अँटमॅन किंवा अगदी नुकताच येऊ घातलेला एवेंजर्स एंडगेम सुद्धा, ही सगळे सिनेमे या कॉमिक्स च्या आधारेच केले गेले आणि मग त्यात फेरफार केली गेली!
पण भारतात अशी कॉमिक चित्रमालिका कुणी तयार केलीये आठवतय का?? चला तर तो अवलिया कोण त्याविषयी जाणून घेऊया!
अमर चित्र कथा ही जगप्रसिद्ध पहिली भारतीय कॉमिक चित्रमालिका होय आणि तुम्हाला माहित आहे का ही निर्माण केली होती एका मराठी माणसाने! त्या मराठी माणसाचे नाव- अनंत पै, पण त्यांना कॉमिक विश्व अंकल पै म्हणूनच ओळखतं.
अमर चित्रकथाकार अंकल पै यांचा जन्म १७ सप्टेंबर १९२९ रोजी कर्नाटकातील करकाला गावी झाला. वयाच्या बाराव्या वर्षी ते मुंबईत आले.
व्यंकटराय आणि सुशीला पै हे त्यांचे आई-वडील! अतिशय लहान असताना म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्याचे आई वडिल वारले. त्यानंतर त्यांनी मुंबईचा रस्ता धरला.
मुंबईत आल्यावर त्यांनी माहिमच्या ओरिएन्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. पुढे त्यांनी बीएस्सी करताना रसायनशास्त्र, फिजिक्स आणि केमिकल टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला. मुंबई विद्यापीठाचे ते द्वीपदवीधर होते.
आपल्यातल्या चित्रकाराची हौस भागवण्यासाठी त्यांनी १९५४ मध्ये मानव या नावाने एक मुलांसाठीचं चित्र मासिक सुरू केलं.
ते टाईम्स ऑफ इंडिया वृत्तसमूहात ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करत होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली टाईम्स ग्रुपने इंद्रजाल या कॉमिक्स बुकची निर्मिती केली.
अमर चित्र कथा या प्रचंड लोकप्रिय आणि गाजलेल्या कॉमिक मालिकेची सुरूवात त्यांनी १९६७ मध्ये केली. त्यावेळी दूरदर्शनच्या एका लोकप्रिय क्वीज कार्यक्रमात ग्रीक पुराणांवर आधारित प्रश्न विचारले जात.
मात्र भारतीय पुराणांचा या प्रश्नावलीत समावेशच केला जायचा नाही, कारण त्याविषयी कुणाला माहितीच नसायची. त्यांना या घटनेनं अस्वस्थ केलं आणि मग जन्म झाला अमर चित्र कथेचा.
जी.आर. मीरचंदानी यांच्या इंडिया बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या मदतीने त्यांनी अमर चित्र कथा सुरू केली.
अमर चित्र कथेच्या इंग्रजीत ८६ मिलीयन म्हणजे आठ कोटी साठ लाख प्रती विकल्या केल्या. हा एक जागतिक विक्रम समजला जातो.
१९८० मध्ये त्यांनी रंग रेखा फीचर्सच्या माध्यमातून टिंकल या कार्टूनची सुरूवात केली. लहान मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या ट्विंकल आणि अमर चित्र कथा तसेच अन्य मालिकेमुळे त्यांना अंकल पै हे नाव मिळालं.
१९८० पासून ते अंकल पै या नावानेच ओळखले जाऊ लागले.
अमर चित्र कथेची सुरूवात १९६७ मध्ये झाली असं मानलं जात असलं, तरी कन्नडमध्ये अमर चित्र कथा या नावानेच जी के अनंतरामनावाच्या गृहस्थांनी १९६५ मध्ये कॉमिक मालिकेची निर्मिती केल्याचाही एक दावा केला जातो.
मात्र अनंतराम यांनीही अंकल पै यांनी अमर चित्र कथेला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवलं, त्याबद्धल कृतज्ञताच व्यक्त केलीय.
अंकल पै यांनी अमर चित्र कथेबरोबरच रामू आणि श्यामू, लीटल राजी आणि रेखा या कार्टून्सचीही निर्मितीही केली.
गूगलने देखील या महान भारतीय चित्रकथाकाराला आपल्या होम पेजवर गूगल डूडलच्या रुपात स्थान देऊन त्यांचा गौरव केला होता.
२४ फेब्रुवारी २०११ रोजी त्यांनी या जगातून कायमचा निरोप घेतला आणि कॉमिक विश्वात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.
गूगलने देखील २०११ रोजी आपल्या डूडलच्या माध्यमातून अंकल पै यांच्या स्टोरी टेलिंगला सार्थ अभिवादन केलं होतं.
दोन पॅनलमध्ये साकार झालेल्या या डूडलमध्ये अनंत पै स्वतः आपल्या ऑफिसमधल्या एका डेस्कवर बसलेले आहेत तर दुसऱ्या पॅनलमध्ये अंकल पै आपल्या कॉमिक्स बुक्सच्या सेल्फमध्ये उभे असल्याचं दाखवण्यात आलंय. तर दोन्ही पॅनलच्या बॅकग्राऊंडवर गूगल अशी अक्षरे उमटवण्यात आलीत.
या बुक सेल्फमध्ये त्यांची दोन प्रमुख कॉमिक्स पॉत्रे सेल्फमधील पुस्तकांत स्पष्ट दिसतात. एक सुप्पंडी आणि दुसरं आहे टिंकल!
चित्रांच्या माध्यमातून आपली कला जगासमोर सादर करत कॉमिक विश्वात मराठी झेंडा रोवणाऱ्या या मराठी कलावंताला मानाचा मुजरा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.