' अमरत्वाचं वरदान, संगीताची आवड… तुम्हाला ठाऊक नसेल, पण ‘असाही’ होता रावण! – InMarathi

अमरत्वाचं वरदान, संगीताची आवड… तुम्हाला ठाऊक नसेल, पण ‘असाही’ होता रावण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

रावणाचे नाव रावण पडण्यामागे देखील एक रंजक कथा दडली आहे. रावण हा भगवान शिवाचा भक्त होता. असे म्हटले जाते, की एकदा स्वप्नात शंकरांनी रावणाला दर्शन दिले आणि कैलासावर बोलावले, तेव्हा रावण कैलासावर जाऊन शिवाला म्हणाला, की “तुम्ही लंकेत येऊन माझ्यासोबत रहावे. मी तुम्हाला सोन्याने मढवतो.”

त्यावर भगवान शिव म्हणाले, की “तू मला नेणार असशील तर कैलासासोबत ने! रावणाने रौद्ररूप धारण करून कैलासासहीत शिवाला उचलले, परंतु शिवाने आपल्या पायाचा अंगठा जमिनीवर टेकवला त्याक्षणी रावणाची दाही बोटे कैलासाखाली अडकून राहिली, अडकलेला हात बाहेर काढल्यानंतर त्याठिकाणी दहा गुहा तयार झाल्या (सर्व गुहांमध्ये ५ किमीचे अंतर आहे.)

 

shiv bhagvan inmarathi

 

बोटे अडकल्याने रावण वेदनेने जोरात ओरडला म्हणून त्याला ‘रावण’ म्हणजे किंचाळणारा असे नाव मिळाले. अशा वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांनी समृद्ध अशा रावणाबद्दलच्या काही अपरिचित गोष्टी तुम्हाला जर कळल्या तर? रावणाबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल, नक्की कसा असेल रावण? त्याची जीवनशैली कशी असेल? चला तर मग जाणून घेऊ या राक्षसांच्या राजाबद्दलच्या काही भन्नाट गोष्टी!

१) रावणाचे व्यक्तिमत्त्व

तो एक ब्राह्मण राजा होता. त्याचे वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले तर त्याची आई केकसी ही दैत्य कुळामधली. रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषी हे अत्यंत थोर व्यक्ती होते.

 

ravana inmarathi

 

ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. रावणाचे एक आजोबा (आईचे वडील) राजा सुमाली यानी त्याला दैत्य संकल्पनेत शिक्षण दिले होते. जैन शास्त्रांमध्ये रावणाला प्रति-नारायण मानले गेले आहे. रावणाची गणना जैन धर्मातील ६४ पुरुषांमध्ये केली जाते.

२) दशानन नावामागील इतिहास

रावणाला दशानन अथवा दशग्रीव्हा (दशमुखी) हे नाव पडले होते. याच्या अर्थ ज्याला दहा तोंडे मिळाली आहेत असा. दहा तोंडे याचा सांकेतिक अर्थ त्याला महानतेकडे घेऊन जातो. रावण अतिशय विद्वान पंडित होता. त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल आणि संपूर्ण ज्ञान होते.

 

ravan temples india inmarathi3

 

प्रत्येक विषयामधील एकेका विद्वानाची (Total Ten Scholars) बौद्धिक योग्यता केवळ एकट्या रावणामध्ये एकवटली होती. हीच १० पंडितांची विद्वत्ता एकाच व्यक्तीमध्ये असल्यामुळे, त्याला १० तोंडांचा असे म्हटले जाते.

अविचारी लोक १० तोंडाची संकल्पना त्याच्या असुर असण्यावर लावतात, टीका करतात. त्याच्या पांडित्याची जाण रामाला देखील होती. राम त्याला आदराने महाब्राह्मण संबोधित असे. म्हणूनच जेव्हा रावण मृत्युशय्येवर पडला, तेव्हा रामाने त्याला अभिवादन केले.

३) जन्मस्थान आणि पूर्वायुष्य

उत्तर प्रदेशातील बिसरख गाव रावणाचे जन्मस्थान मानले जाते. या गावात रावणाचे मंदिर आहे. या मंदिरात ४२ फूट उंच शिवलिंग आहे. तसेच ५.५ फूट उंच रावणाची मूर्ती आहे.

या गावातील लोक रावणाला महाब्रह्म म्हणतात. या गावात दसऱ्याची दिवशी रावणाचे दहन केले जात नाही, उलट रावण दहनाचा शोक व्यक्त केला जातो.

 

bisrakh village ravana inmarathi

 

आचार्य चतुरसेन यांच्या सुप्रसिद्ध कादंबरी ‘वयम रक्षम’ आणि पंडित मदन मोहन शर्मा शाही यांच्या तीन खंडांमध्ये रचलेल्या ‘लंकेश्वर’ कादंबरीनुसार, रावण शिव, यम आणि सूर्य यांचा परम भक्त होता.

आर्यांनी स्थापन केलेल्या आरक्षणाच्या ‘यक्ष’ संस्कृती व्यतिरिक्त प्रत्येकाचे संरक्षण करण्यासाठी रावणाने ‘रक्षा’ संस्कृतीची स्थापना केली होती. जी ‘राक्षस संस्कृती’ म्हणून ओळखली जाते.

४) तपश्चर्या आणि अमरत्व

तप करत असताना रावणाने आपली एक एक करून नऊ शिरे ब्रहमदेवाला अर्पण केली. त्याच्या तपावर प्रसन्न होऊन ब्रम्हाने त्याला वरदान मागण्यास सांगितले. रावणाने तेव्हा अमरत्वाचे वरदान मागितले.

ब्रह्मदेवाने त्याला एका अटीवर अमरत्व दिले होते. त्याला एक अमृताची कुपी दिली गेली. ती त्याच्या नाभीच्या खाली ठेवली गेली. ब्रह्मदेव रावणाला म्हणाले, “फक्त या कुपीचे रक्षण कर. तुझ्याजवळ मृत्यू येणार नाही. ही जर फुटली तरच मृत्यू ओढवेल.”

 

ravana vadh inmarathi

 

रावणाचा स्वत:च्या आत्मशक्तीवर पूर्ण विश्वास होता. कुणीही त्याला हानी पोहचवणार नाही याची त्याला खात्री होती. या वरदानाला त्याने गुपित ठेवले. कारण ते त्याच्या मृत्यूशी संबंधित होते. फक्त एक चूक रावणाकडून झाली. तो आपला धाकटा भाऊ बिभीषण याच्यावर फार प्रेम करीत असे. त्याच विश्वासाने ब्रह्मदेवाचे वरदान रावणाने त्याला सांगितले.

बिभीषण त्याच्या विरोधात रामाला जाऊन मिळाला. रावणाच्या मृत्यूचे गुपित त्यानेच रामास सांगितले. रावणाचा त्यामुळेच अंत होऊ शकला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होवून भगवान शंकरानी आपले ‘चंद्रहास’ नावाचे खड्ग त्याला दिले होते.

५) राज्य आणि सत्ता विस्तार

कुबेर हा रावणाचा थोरला भाऊ म्हणजे विश्रवा ऋषींचा पहिला मुलगा होता. कुबेर लंकाधिपती होता. परंतु रावणाने लंकेचे राज्य मागितले. ऋषी विश्रवा याना रावणाचे शक्तिसामर्थ आणि महान बुद्धिमत्ता यावर विश्वास होता. त्यांनी कुबेराची समजूत घातली आणि राज्य रावणास देऊ केले.

एक मात्र सत्य होते, की रावणाने लंकेचे राज्य अत्यंत यशस्वीपणे चालवले. सर्व गरीब जनता, सामान्यजण, धार्मिक ऋषीमुनी त्याच्यावर खूश होते. तो सर्वांवर प्रेम करी. त्या काळी त्याच्या राज्यातील प्रत्येकाकडे सोन्याची भांडी होती. म्हणूनच लंकेला सोन्याची लंका म्हणले जाई.

रामायणानुसार रावणाने सीतेचे अपहरण केले आणि पुष्पक विमानाने तिला श्रीलंकेला नेले. रामायणात असा उल्लेख आहे की युद्धानंतर राम, सीता, लक्ष्मण आणि इतरांसह पुष्पक विमानाने दक्षिणेकडील लंकेमधून अयोध्येला आले. पुष्पक विमान रावणाने त्याचा भाऊ धनपती कुबेर कडून जबरदस्तीने मिळवले होते.

 

pushpak viman inmarathi

 

श्रीलंकेच्या श्री रामायण संशोधन समितीच्या मते, रावणाने चार विमानतळे तयार केली होती. – उसांगोडा, गुरुलोपोथा, तोतुपोलाकांडा आणि वारीपोला. या चार पैकी उसनगोडा विमानतळ उद्ध्वस्त झाले.

समितीच्या मते, हनुमान जेव्हा सीतेच्या शोधात लंकेला पोहोचले, तेव्हा रावणाचे उसनगोडा विमानतळ लंकेच्या दहनाने नष्ट झाले. रावणाने सुंबा आणि बल्लीद्वीप जिंकून आपले राज्य वाढवले आणि अंगद्वीप, मलयद्वीप, वराहद्वीप, शंखद्वीप, कुशाद्वीप, यवद्वीप आणि आंध्रलय जिंकले.

६) शत्रू आणि पराभव

रामाशिवाय रावणाचे दोन मोठे शत्रू होते. मर्कटराज बाली आणि महिष्मतीचा राजा कार्तवीर्य अर्जुन. या तीनही शत्रूंकडून रावणाला युद्धात पराभव स्वीकारावा लागला. यांपैकी बाली याच्याशी रावणाची नंतर चांगली मैत्री झाली. तर कार्तवीर्य अर्जुन हा ‘सहस्त्रबाहू’ म्हणून ओळखला जाई ज्याचा वध परशुरामाने केला.

 

parshuram inmarathi

 

७) प्राप्त कला आणि विद्या

रावण ‘अंगपोरा’ या मार्शल आर्टचा तज्ञ होता. त्याकळातील या युद्धकलेचा तो महान योद्धा होता. त्याबरोबरच तो आयुर्वेद जाणत होता. त्याला राज्यशास्त्राचे ज्ञान होते. हिंदू फल ज्योतिषशास्त्र या विषयांत तो तज्ज्ञ होता. ‘रावणसंहिता’ हे हिंदू ज्योतिषावरचे अतिशय उच्च दर्जाचे पुस्तक आहे.

रावणाला संगीताची आवड होती. तो चांगला वीणावादक होता. संगीतातील अनेक रागांची त्याने निर्मिती केली होती.

 

ravana and veena inmarathi
artofkarthik.com

 

रुद्रवीणेवर त्याने रचलेले ‘शिवतांडव’ स्तोत्र खूप प्रसिद्ध आहे. रावण हा एक कुशल राजकारणी आणि वास्तुशास्त्राचा मास्टर होता, त्याला जादू, तंत्र, संमोहन आणि विविध प्रकारचे मायाजाल माहित होते.

८) रावण रचित ग्रंथ

शिव तांडव स्तोत्र, अरुण संहिता, रावण संहिता हे ग्रंथ रावणाने लिहिले आहेत.

मित्रांनो रावणासंबंधित या ८ गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला जरूर कळवा. तुमच्याप्रमाणेच इतरांनाही यातलं बरंच काही माहित नसेल. त्यामुळे हा लेख शेअर करायलाही विसरू नका.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?