Site icon InMarathi

१९९ धावांवर असूनही त्यादिवशी सेहवागने चक्क ‘सिंगल’ नाकारली होती…!! 

viru 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

वीरेंद्र सेहवाग म्हणजे क्रिकेट विश्वातील एक असं नाव, एक असा फलंदाज की जो आजही मैदानावर उतरला तर भल्याभल्या गोलंदाजांना धडकी भरेल. होय, त्याचं वय झालं असलं तरीही! कारण, त्याच्या फलंदाजीच्या शैलीचा त्याच्या वयाशी फारसा संबंध नव्हताच असं म्हणायला हवं.

धावून रन्स काढणं वगैरे क्षुल्लक प्रकार वीरू फारसे करायचाच नाही. त्याच्या बॅटला चेंडू लागला, म्हणजे तो थेट सीमापरच जाणार…

 

 

दोन-दोन त्रिशतकं झळकवणारे जे अवघे ४ फलंदाज आहेत, त्यांच्यापैकीच हासुद्धा एक. हाच पठ्ठ्या षटकार मारून त्रिशतक पूर्ण करणारा जगातला पहिला फलंदाज आहे.

सचिनचा सल्ला नाकारून, वर त्यालाच ‘मुश्ताक आया तो मैं छक्का मारुगा’ असं सांगून, ते खरं करून दाखवणारा हा माणूस! मग आता त्याने १९९ धावांवर असताना सिंगल नाकारली, तर त्यात नवल ते काय, असंच कुणीही म्हणेल. पण, वीरूने ‘ती’ सिंगल नाकारली त्याचं कारण निराळंच होतं.

 

वीरूला डबल सेंच्युरी पूर्ण तर करायची होतीच, ती चेंडू सीमापार धाडूनच पूर्ण करायची होती असंही काही नव्हतं. पण त्याला भरपूर धावा करायच्या होत्या.

समोरच्या फलंदाजाला ‘फार खेळू न देता’ त्याला स्वतःच अधिकाधिक काळ फलंदाजी करायची होती. नाही, स्वार्थी हेतूने नाही, तर संघाच्या भल्यासाठी! होय, संघाच्या भल्यासाठीच…

त्याला भरपूर धावा करायच्या होत्या, यात त्याचा स्वार्थ कसा नाही, असा प्रश्न पडला असेलच तुम्हाला… यात स्वार्थ नव्हता असं नाही, पण आधी होती ती संघभावना!

कारण असं होतं की…

तो मुरलीधरनच्या ओव्हरचा तिसरा चेंडू होता. पॉईंटच्या दिशेला सेहवागने चेंडू खेळला होता. एक धाव घेणं सहज शक्य होतं. २०० धावांचा टप्पा नजरेसमोर होता, पण सेहवागने ती धाव घेतली नाही.

 

 

त्याने धाव घेतली असती, तर उरलेले ३ चेंडू इशांत शर्माला खेळावे लागले असते. त्यात समोर जगातील सर्वात भेदक गोलंदाजांपैकी एक, मुथैया मुरलीधरन! ११ व्या क्रमांकावरील खेळाडूला हे असं तोफेच्या तोंडी देणं सेहवागला पटलं नसतं.

शिवाय जेवढा अधिकाधिक काळ तो खेळत राहील, तेवढा काळ तो त्याच्यासाठी आणि पर्यायाने संघासाठी एकेक धाव जोडू शकणार होता. पण सेहवागची ओळख म्हणजे अगदी बेधडक आणि काहीसा निष्काळजी फलंदाज अशीच होती. तिथून पुढच्या दुसऱ्याच चेंडूवर, आत लपून बसलेला बेधडक वीरू बाहेर आला. रिव्हर्स स्वीप मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. सुदैवाने तो बाद झालं नाही, आणि अखेरच्या चेंडूवर सिंगल घेत त्याने द्विशतक झळकावलं.

त्याचं द्विशतक तर झालं, पण त्याची योजना यशस्वी झाली नाही. इशांतवर मेंडिसच्या षटकातील २ चेंडू खेळायची वेळ आली. एक चेंडू तर त्याने कसाबसा खेळला, पण शेवटच्या चेंडूवर ‘शर्माजी बेटा’ फेल झाला. भारतीय संघ सर्वबाद झाला. सेहवागने मनसुबे उधळले.

 

 

वीरूने दाखवलेल्या संघभावनेचं मात्र फार कौतुक झालं. वीरूच्या आणि भारतीय संघाच्या दुर्दैवाने योजना यशस्वी झाली नाही, पण त्यामुळे सेहवागच्या निस्वार्थी भावनेचं महत्त्व नक्कीच कमी होत नाही.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version