Site icon InMarathi

तुमच्या डोळ्यांच्या आकारानुसार ठरते तुमचे व्यक्तिमत्व!! वाचा

eye final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपले डोळे म्हणजे मनाचा आरसा होय. मनात दुःख असताना चेहेऱ्यावर कितीही खोटे हसू आणले तरी पाणावलेले डोळे खरं बोलून जातात. आपल्या डोळ्यांतूनच आपण किती भावना नकळत व्यक्त करत असतो.

आनंदाने लकाकलेले डोळे, दुःखाने पाणावलेले डोळे, भीतीने विस्फारलेले डोळे,नजरेतूनच आग ओकणारे डोळे, धाक दाखवणारे डोळे, एका नजरेतूनच प्रेम व्यक्त करणारे डोळे, बाळाचे आरश्यासारखे नाजूक , निरागस भाव असलेले डोळे, इकडेतिकडे रंगेबेरंगी जग बघणारे लहान मुलांचे कुतूहलाने विस्फारलेले डोळे असे असंख्य भाव आपण एकमेकांच्या डोळ्यांत बघू शकतो.

एखादी व्यक्ती खरी बोलतेय कि खोटे हे आपण त्या व्यक्तीच्या डोळ्यांत बघून सांगू शकतो. जगातील सगळ्या भावनांच्या छटा माणसाच्या डोळ्यांत दिसतात.

 

 

बरं हे डोळे सुद्धा किती प्रकारचे असतात. गूढ दिसणारे काळे डोळे, आकर्षक दिसणारे तपकिरी डोळे, मिश्किल भाव असलेले तांबूस पिंगट डोळे, करडे डोळे, अगदी दुर्मिळ दिसणारे हिरवे डोळे, निळ्याशार सागरासारखे सुंदर निळे डोळे असे सगळ्याच रंगाचे डोळे जर तेजस्वी आणि प्रेमळ असतील तर सुंदरच दिसतात.

 

 

असे म्हणतात की तुमच्या डोळ्यांच्या रंगावरून तुमच्या स्वभावाचा अंदाज घेता येऊ शकतो. तसेच तुमच्या डोळ्यांच्या आकारावरून देखील तुमचे व्यक्तिमत्व एकूण कसे आहे हे सांगता येते. डोळ्यांचे आकार देखील विविध प्रकारचे असतात. गोल, माशाप्रमाणे लांब, गायीसारखे . हरिणासारखे किंवा कमळासारखे असे अनेक आकारांचे डोळे असतात. चला तर मग जाणून घेऊया तुमचे डोळे तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगतात!

मोठे डोळे :

जर एखाद्या व्यक्तीचे डोळे मोठे असतील तर ती व्यक्ती संवेदनशील स्वभावाची असते आणि क्रिएटिव्ह असते. त्या व्यक्तीचा स्वभाव शांतताप्रिय असतो. अश्या व्यक्तींना सहसा भांडणे, वादविवाद आवडत नाहीत आणि ते ह्यापासून चार हात लांब राहणे पसंत करतात.

मोठ्या डोळ्यांची व्यक्ती ही खुल्या आणि मोठ्या मनाची असते. त्यांना समोरच्याच्या भावना पटकन समजतात. तसेच विविध प्रकारची माहिती पटकन आत्मसात करण्यात ह्यांची हातोटी असते. अश्या प्रकारची व्यक्ती एक उत्तम मित्र आणि श्रोता असते.

 

 

लहान डोळे :

लहान डोळे असलेल्या व्यक्ती सहसा दृढनिश्चयी असतात. त्यांचे आयुष्यात लक्ष्य ठरलेले असते आणि त्या लक्ष्यावर त्यांचे संपूर्ण आयुष्य केंद्रित असते आणि त्यासाठी ते प्रयत्नशील असतात.

या प्रकारच्या व्यक्ती बुद्धिमान असतात आणि त्यांच्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासून बघण्याची सवय असते आणि त्यामुळेच ते ज्या विषयाचा अभ्यास करायला घेतात त्यात लवकरच कौशल्य मिळवतात. अशा व्यक्ती विचारवंत असतात आणि फारश्या बोलघेवड्या नसतात. असे लोक अंतर्मुख स्वभावाचे असतात आणि त्यांना एकांतात राहून आपले काम करत राहणे जास्त आवडते. त्यामुळेच अनोळखी लोकांना अश्या व्यक्ती शिष्ट वाटू शकतात.

 

 

 

बदामाच्या आकाराचे डोळे :

बदामाच्या आकाराचे डोळे म्हणजे कार्टूनमध्ये काढतात तसे हार्ट शेपचे नसून खायचा बदाम ज्या आकाराचा असतो त्या आकाराचे डोळे होय! अश्या आकाराचे डोळे अत्यंत आकर्षक दिसतात. ह्या आकाराचे डोळे असलेली व्यक्ती सतत आजूबाजूच्या जगाचे निरीक्षण करत असते. त्यांची निरीक्षणशक्ती तीव्र असते.

आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा, जगाचा तसेच घटनांचा तपशील हे लोक अगदी बारकाईने घेतात. अगदी तणावपूर्ण वातावरणात देखील अशा व्यक्ती शांतपणे थंड डोक्याने विचार करून योग्य निर्णय घेतात. सगळ्या गोष्टींत समतोल साधण्याची अश्या लोकांकडे हातोटी असते. काही लोकांना अश्या व्यक्तीचा धाक वाटून ते त्यांच्यापासून लांब राहतात पण आपल्या जवळच्या लोकांसाठी या व्यक्ती खूप प्रेमळ आणि गोड स्वभावाच्या असतात.

 

filmibeat.com

 

गोल आकाराचे डोळे :

गोल आकाराचे डोळे असलेल्या व्यक्ती खूप संवेदनशील असतात. ते त्यांच्या भावना कुठल्याही आडपडद्याशिवाय व्यक्त करू शकतात. अश्या व्यक्ती खूप सर्जनशील आणि भावनाप्रधान असतात. त्यांना मनात एक आणि तोंडावर दुसरे असे वागता येत नाही.

 

 

जे चांगले-वाईट मनात आहे तेच सरळ तोंडावर बोलून मोकळ्या होतात. अश्या व्यक्तींची कल्पनाशक्ती अद्भुत असते आणि हे लोक आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर ठरवले तर काहीही शक्य करून दाखवू शकतात. असेच तुमच्या दोन डोळ्यांतील अंतर देखील कमी जास्त असेल तर त्यावरून देखील तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधता येतो.

दोन डोळ्यांत कमी अंतर असणे :

जर एखाद्या व्यक्तीच्या दोन डोळ्यांत कमी अंतर असेल तर अश्या व्यक्तींना आपल्या प्रथा व परंपरांविषयी नितांत आदर असतो आणि ह्या रूढी परंपरा शक्य होईल तितक्या पाळण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. बदल सहसा अश्या व्यक्तींना आवडत नाही.

जे परंपरागत सुरु आहे तेच सुरु ठेवण्याचा त्यांचा आग्रह असतो. अश्या व्यक्ती वचन मोडत नाहीत आणि दिलेला शब्द पाळतात. ठरवले आहे ते मिळवण्याचा त्यांचा आग्रह असतो आणि त्यासाठी ते कठीण परिश्रम करण्यास मागेपुढे बघत नाहीत.

 

 

दोन डोळ्यांत जास्त अंतर असणे :

ज्या व्यक्तींच्या दोन डोळ्यांत जास्त अंतर असते अश्या व्यक्ती अचानक आलेल्या संकटांना घाबरत नाहीत. कुठल्याही संकटाला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची त्यांची तयारी असते. अश्या व्यक्ती बिनधास्त स्वभावाच्या असतात आणि त्यांना साहसी गोष्टींची आवड असते.

 

 

अनेक नवनव्या गोष्टी करून बघण्याची त्यांना इच्छा असते. बदल करणे त्यांना जड जात नाही. असे लोक खुल्या दिल्याचे आणि स्वभावाचे असतात.आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यांचा आकार बघून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा असा अंदाज तुम्ही बांधू शकता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version