' जॅकीच्या बायकोशी संबंध ते मराठी मॉडेल्सचा छळ, साहिल खानची चीड आणणारी कृत्य – InMarathi

जॅकीच्या बायकोशी संबंध ते मराठी मॉडेल्सचा छळ, साहिल खानची चीड आणणारी कृत्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पिळदार शरीरयष्टी आणि अपार मेहनत यासाठी ओळखला जाणारा, मिस्टर इंडिया हा किताब पटकवणारा मराठमोळा बॉडीबिल्डर मनोज पाटील यानी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी व्हायरल झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

सुसाईड नोटमध्ये मॉडेल, अभिनेता साहिल खान याच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करणारा मनोज पाटील सुदैवाने वाचला मात्र आता मराठी तरुणांच्या मागे हात धुवून लागलेल्या साहिलच्या व्यक्तीमत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं.

 

sahil khan inmarathii

 

मराठमोळ्या मनोजच्या कुटुंबियाने या प्रकरणाची दाद मागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं दार ठोठावल्याने आता मनोजच्या मागे मराठी माणूस खंबीरपणे उभा असल्याचे सांगत या प्रकरणाला जातीय रंग चढला आहे.

काय आहे प्रकरण?

मिस्टर इंडिया हा किताब पटकवणारा मनोज पाटील हा बॉडी बिल्डींग क्षेत्रात कार्यरत आहेत. पिळदार शरीरयष्टीसाठी मेहनत घेणाऱ्या मनोजची सोशल मिडीयावरही चांगलीच हवा आहे. मनोज हा मिस्टर ऑलिम्पिया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत असतानाच साहिललाही या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्याने इथूनच वादाची ठिणगी पडली.

 

sahil khan 1 inmarathii

 

आपण स्पर्धेत सहभागी होवू नये यासाठी साहिल खान आपला मानसिक छळ करत असल्याचा आरोप मनोजने केला आहे. त्यासह सोशल मिडीयावरही आपली बदनामी करणाऱ्या साहिलच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याची कबुली मनोजने दिली आहे.

कोण आहे साहिल खान?

आपल्या ‘स्टाइल’च्या नादात साहिल बॉलिवूडमध्ये घुसला आणि  ‘excuse me’ म्हणत तो या इंडस्ट्रीत आपली जागा शोधू लागला. पहिल्याच प्रयत्नात शर्मन जोशी सारख्या कलाकारांची साथ मिळाल्याने स्टायलिश साहिल बॉलिवूडमध्ये चमकणार यावर अनेकांचे एकमत होते.

 

sahil inmarathi

 

मात्र प्रत्यक्षात बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी कष्ट करायचे सोडून वादग्रस्त वक्तव्य, बड्या कलाकारांशी घेतलेला पंगा यांमुळे भरकटलेल्या साहिलची अवघ्या काही वर्षात बॉलिवूडमधून हकालपट्टी झाली.

बॉडी बिल्डर मनोज पाटील आत्महत्या प्रकरणात पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या साहीलचं हे काही पहिलंच प्रकरण नव्हे.

खाजगी आयुष्य असो वा करिअर, सगळ्याच पातळ्यांवर आपल्या कृत्यांमुळे अपयशी ठरलेल्या साहिल खानच्या काही वादग्रस्त प्रकरणांविषयी जाणून घेऊ.

१. फसलेलं लग्न

स्टाइल, एक्सक्युज मी यांसारख्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या साहिलने २००४ साली मॉडेल निगार खानशी लग्न केलं. यापुर्वी काही महिने हे दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या.

 

sahil nigar inmarathi

 

लग्नापुर्वी एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या या लव्हबर्ड्सने लग्नानंतर अवघ्या एक वर्षात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यालाही कारणीभूत साहिल असल्याचा आरोप पत्नीने केला होता.

विवाहित असूनही इंडस्ट्रीतील तसेच परदेशातील अनेकांशी त्याचे  विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगत पत्नीने घटस्फोट घेतला होता.

 

model sahil inmarathi

 

२. आएशा श्रॉफ प्रकरण

प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आएशा श्रॉफ आणि साहिल यांच्या नात्यावर चर्चा सुरु झाली आणि तिथेच साहिलच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं. आएशा आणि साहील यांच्यातील मैत्रीची सीमा ओलांडून हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचीही अफवा उठल्या होत्या.

सुरुवातीला केवळ मैत्रीतून त्यांनी २००९ साली त्यांनी भागीदारी प्रॉडक्शन कंपनी सुरु केली, तोपर्यंत सारं काही अलबेल होतं, मात्र त्यानंतर वारंवार हे दोघे एकत्र दिसल्याने अफवांना खतपाणी मिळालं. १७ वर्षांनी लहान असलेल्या साहीलचं आएशा यांच्यासोबत जोडलं जाणारं नाव जॅकी श्रॉफला खटकल्याने इंडस्ट्रीतील अनेक बड्या कलाकारांनी जॅकीला पाठिंबा दिला.

 

ayesha inmarathi

 

२०१४ साली आएशा यांनी साहिलविरोधात फसवणूकीचा आरोप केल्याने त्यांच्या नात्यात फूट पडली. साहिलने आपल्याला ८ करोड रुपयांना चुना लावल्याचे सांगत आएशाने त्याच्याविरोधात तक्रार केली. त्याचवेळी जॅकीनेही साहिल आणि त्याच्या बहिणीविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला.

३. गे असल्याचा आरोप

आएशा श्रॉफ यांनी कोर्टाची पायरी चढल्यानंतर वादाचा भडका उडाला. साहिलनेही श्रॉफ कुटुंबावर तोंडसुख घेतलं तर दुसरीकडे भर कोर्टात आएशा यांनी साहिल गे असल्याचा आरोप केला.

 

sahil 1 inmarathi

 

याचा परिणाम म्हणजे त्यानंतर साहिलच्या बॉलिवूड करिअरला घरघर लागली. आएशा यांनी साहिलबरोबर असलेल्या अफेअरच्या चर्चेला पुर्णविराम देत साहिलवर अनेक आरोप केले. यावेळी त्याच्याविरोधात कॉल रेकॉर्डिंग्स सादर झाल्याने हे प्रकरण चांगलेच पेटले होते.

४. सल्लुभाईशी पंगा

‘बॉलिवूडच्या भाईशी ज्याने पंगा घेतला, तो संपला’ याची अनेेकांना प्रचिती आली आहे. साहिल खान हे त्यातील एक नाव, मात्र यावेळी सलमानने नव्हे तर खुद्द साहिलनेच या प्रकरणाची सुरुवात केली होती.

 

salman khan inmarathi 1

 

“सलमान खान हा माझ्यावर जळतो, माझी स्टाइल, बॉडी याची तो स्वतःशी तुलना करतो, किंबहूना यासाठीच तो मला इंडस्ट्रीत काम मिळू देत नाही” असा विनाकारण आरोप करत साहिलने प्रसिद्धीच्या झोतात यायचा प्रयत्न केला, मात्र सापाच्या शेपटीवर पाय दिल्यानंतर काय होतं, याचा अनुभव घेतल्याने नंतर साहिलनेच बॉलिवूडला रामराम ठोकला.

५. स्पेनमध्ये दुसरं लग्न

१०१४ साली आएशा श्रॉफ प्रकरणानंतर कंटाळलेल्या साहिलने भारत सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एप्रिल २०१५ मध्ये स्पेन गाठल्यानंतर त्याने स्पेनमधील महिलेशी लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

काही महिन्यांच्या मुक्कामानंतर आएशा श्रॉफ प्रकरणाच्या सुनावणीसाठी तो मायदेशी परतला. त्यानंतर आजपर्यंत त्याने दुस-या लग्नाबद्दल मौन सोडलेलं नाही.

६. संग्राम चौगुलेशी वैर

बॉडी बिल्डर संग्राम चौगुले आणि अभिनेता साहिल खान यांच्यातील वैर २ वर्षांपुर्वी  चांगलंच पेटलं होतं. झालं असं की, संग्राम चौगुले आणि त्याच्या सहका-यांनी साहिलबाबत सोशल मिडीयावर पोस्ट केली होती. मात्र त्याचा चुकीचा अर्थ घेत साहिलने आपला व्हिडिओ प्रकाशित केला. या व्हिडिओत साहिलने संग्रामला आव्हान दिलं. शिवाय नवशिख्यांनी माझ्यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्याशी स्वतःची तुलना करू नये असा सल्लाही दिला.

या प्रकरणात संग्राम आणि साहिलमधील वाद वाढतच गेला. संग्रामच्या धमकीनंतर साहिलने पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून ”आपण पठाण असून पठाणांशी वैर घेणं महागात पडेल” असं सांगत या प्रकरणाला जातीय रंग दिला. यामुळे हा वाद संग्राम विरुद्ध साहिल असा उरला नसून मुस्लिम विरुद्ध मराठा अशी तेढ निर्माण झाली होती.

 

sahil and sangram inmarathi

 

या प्रकरणानंतर साहिल खान चर्चेत असला तरी संग्रामच्या करिअरला चांगलाच खीळ बसल्याने साहिलमुळे त्याचं नुकसान झालं असा आरोप आजही केला जातो.

याचीच पुनारावृत्ती म्हणजे मराठमोळ्या मनोजशी साहिलने घेतलेला पंगा. याप्रकरणात मनोज बनावट स्टिरॉइड्स विकत असल्याचा दावा साहिलने केला आहे. या प्रकरणातील उकल पोलिस करत असले तरी कोणत्याही गुन्ह्यासाठी कायद्याचा आधार न घेता सोशल मिडीयावर अशा पद्धतीने बदनामी करणं कितपत योग्य आहे? वैयक्तिक वैर किंवा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रतिस्पर्ध्याचा मानसिक छळ करणं, त्याच्या कुटुंबियांना त्रास देणे यांसारख्या अपराधांना कोणती शिक्षा होणार हे येणारा काळच ठरवेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?