Site icon InMarathi

हाती लखलखणाऱ्या बांगड्या, पण त्यासाठी दररोज आगीशी खेळणारं एक शहर

bangdya inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बांगडी म्हणजे स्त्रियांच्या शृंगार एक अविभाज्य भाग! बांगड्यांशिवाय शृंगार पूर्ण होत नाही. कुठलाही मंगल प्रसंग असला की स्त्रियांचा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो. लग्न, मुंज यांसारख्या मोठ्या प्रसंगांत तर घरातील, नात्यातील, शेजारपाजारच्या सर्व स्त्रियांना अगदी लहान मुलींना देखील आवर्जून बांगड्या भरण्यासाठी आमंत्रण केले जाते आणि यजमान स्त्रीकडून त्या सर्वांना नव्या बांगड्या भेट केल्या जातात अशी आपल्याकडे पद्धत आहे.

 

 

अगदी स्त्रियांची ओटी भरताना, आहेर करताना साडीचोळीबरोबर बांगड्यांचा देखील आहेर केला जातो. हिंदू संस्कृतीत तर सौभाग्य अलंकार म्हणून नववधू चुडा भरतात. आपल्याकडे महाराष्ट्रात नववधूचे नाजूक हात गर्भरेशमी हिरवा चुडा घालून सजतात तर पंजाबी वधू लाल आणि पांढऱ्या रंगाचा चुडा भरतात. बंगाली आणि उडिया नववधू शंखा पोला घालतात. पांढरी बांगडी ही शंखा तर लाल बांगडीला पोला म्हणतात. राजस्थान आणि गुजरातमधील वधू ५२ बांगड्या भरतात. त्यांच्या चुड्याला “हस्तिदंती चुडा” म्हणतात.

 

भारतीय हिंदू नववधूचे नाजूक मनगट असे मेंदी आणि विविधरंगी चुड्याने सजते. फक्त नववधूच नव्हे तर सर्वच भारतीय स्त्रियांना बांगड्या मनापासून आवडतात. काचेच्या, लाखेच्या, सोन्यारूप्याच्या बांगड्यांचे अनेक प्रकार आहेत. पाटल्या, तोडे, गोठ, पिछोडी, कडे असे बांगड्यांचे असंख्य प्रकार आहेत.

जगभरात मनगटाची शोभा वाढवण्यासाठी बांगड्यांचे विविध प्रकार घातले जातात. अतिप्राचीन काळापासून इराण, इजिप्त, ग्रीस, जर्मनी, रोम आणि मध्यपूर्व भागातील स्त्रिया बांगड्यांचे विविध प्रकार वापरत असत. तर पुरुष हे शौर्याचे प्रतीक म्हणून कडे वापरत असत. आजही जगभरात सगळीकडेच पुरुष कडे वापरताना दिसतात.

कडे किंवा बांगडी घालण्याला धार्मिक कारणे असली तरी ते आरोग्याच्या दृष्टीने देखील फायद्याचे आहे.

 

 

भारतात वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या मिळतात, पण उत्तर भारतातील फिरोझाबाद हे शहर बांगड्याचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. फिरोझाबादमधूनच काचेच्या बांगड्या भारतात सगळीकडे जातात.

बांगड्यांची नगरी

राजधानी नवी दिल्लीपासून २०० किमीवर असलेले फिरोजाबाद हे शहर बांगड्यांबरोबरच काच उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या शहरात अजूनही पारंपरिक पद्धत वापरूनच काचेची निर्मिती केली जाते. आणि रंगेबेरंगी काचेच्या बांगड्या बनवणे हा इथल्या हजारो कुटुंबांचा व्यवसाय आहे.

पारंपरिक पद्धतीने काचेच्या बांगड्या तयार करणे हा इथला पिढीजात व्यवसाय आहे. गेल्या २०० वर्षांपासून फिरोजाबादमध्ये काचेच्या बांगड्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. जगात सर्वात जास्त प्रमाणात काचेचे उत्पादन फिरोजाबादमध्ये होते.

 

 

फिरोजाबादमधील गली बोहरान येथे काचेच्या बांगड्यांचे सर्वात मोठे मार्केट आहे. या बाजारात हाताने बनवलेल्या काचेच्या सुंदर रंगेबेरंगी बांगड्यांची मोठी दुकाने आहेत. बांगड्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्यामुळे या शहराला “सुहाग नगरी” असेही म्हणतात.

ऐतिहासिक महत्त्व

आग्र्यापासून ४७ किमीवर असलेल्या या शहराला खूप जुना इतिहास आहे. पूर्वी हे शहर चौहान राजांच्या अधिपत्याखाली होते.

या शहरात जैन लोक प्रामुख्याने वास्तव्यास होते आणि म्हणूनच या शहरात अनेक प्राचीन जैन मंदिरे बघायला मिळतात. नंतर मुघल आक्रमणानंतर फिरोझ शाह तुघलकच्या नावावरून या शहराचे नामकरण फिरोजाबाद असे झाले.

प्राचीन काळी बाहेरच्या देशांतील लोकांनी जेव्हा भारतात काचेच्या वस्तू आणल्या तेव्हापासून फिरोजाबादमध्ये काचेचे, काचेच्या वस्तूंचे उत्पादन व्हायला सुरुवात झाली असे सांगितले जाते.

 

 

प्राचीन काळी बाहेरच्या देशातील लोकांनी ज्या काचेच्या वस्तू आणल्या होत्या त्या एकत्र करून भट्टीत वितळवल्या आणि त्यापासून काचेच्या बांगडया सुरुवातीला बनवल्या गेल्या असे म्हणतात.

काळी बाजू

या रंगेबेरंगी सुंदर मार्केटला मात्र एक काळी बाजू देखील आहे. बांगड्या तयार करण्यासाठी, काम करण्यासाठी अनेक हात लागतात आणि दुर्दैवाने हे हात असंख्य बालकामगारांचे असतात.

 

 

फिरोजाबादच्या काचेच्या बांगड्यांच्या मार्केटला बालकामगारांचे आणि कामगारांचे आर्थिक शोषण ही बाजू देखील आहे. याचे कारण असे, की बांगड्यांचे कारखाने हे एखाद्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबांच्या मालकीचे असतात. ते कमी किंमतीत बालकामगारांकडून आणि इतर कारागिरांकडून काम करून घेतात.

बांगड्या तयार करताना अर्धे काम हे कारखान्यांत होते पण इतर काम हे घरोघरी केले पूर्ण केले जाते. अनेक घरांत लहानमोठे सगळेच लोक बांगड्या तयार करण्याचे काम करतात.

या शहरातील गरीब कुटुंबांतील फक्त ४० टक्के मुले शाळेत जातात. इतर दुर्भागी मुलांना शिक्षण मिळत नाही तर घरच्या परिस्थितीमुळे लहान वयापासूनच आईवडिलांना बांगड्या बनवण्याच्या कामात मदत करावी लागते.

शहरातील ९० टक्के जनता ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बांगड्यांच्या व्यवसायात आहे. फिरोजाबादमध्ये १९१ पेक्षाही जास्त काचेच्या बांगड्यांचे कारखाने आहेत. आणि एका कारखान्यात कमीत कमी २०० लोक काम करतात.

 

 

आपल्यापर्यंत काचेची बांगडी पोहोचेपर्यंत ती बनवताना कमीत कमी ८० लोकांच्या हातातून गेलेली असते. पहाटे ४ ते संध्याकाळी ७ पर्यंत हे लोक पोटासाठी मेहनत करतात. आणि या मेहनतीचे केवळ त्यांना दिवसाचे ८० ते ९० रुपये मिळतात. बालकामगारांना तर यापेक्षा कमी किंमतीत काम करावे लागते.

हे करताना त्यांना आरोग्याची किंमत देखील चुकवावी लागते. सतत वाळू, रसायने आणि उष्णतेशी संपर्क आल्याने कारखान्यात काम करणाऱ्यांना आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागते. या सगळ्याचा श्वसनावर सगळ्यात जास्त परिणाम होतो. आणि अनेकांना त्वचेच्या तक्रारी तसेच दृष्टीवर देखील परिणाम होतो.

 

 

त्यामुळे जगभरात जाणाऱ्या फिरोजाबादच्या सुंदर बांगड्या ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असली तरी त्या एका बांगडीमागे किती लोकांची मेहनत आणि कष्ट आहेत हे आपण विसरून चालणार नाही.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version