' पांढऱ्या-पिवळ्याच नाही, तर ‘या’ ४ रंगांच्याही असतात गाड्यांच्या नंबर प्लेट्स! – InMarathi

पांढऱ्या-पिवळ्याच नाही, तर ‘या’ ४ रंगांच्याही असतात गाड्यांच्या नंबर प्लेट्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कुठलीही नवी गाडी घेताना आपल्याला आरटीओमध्ये नोंदणी करावी लागते आणि मग आपल्या गाडीला एक नंबर मिळतो आणि आपण तो नंबर गाडीच्या नंबर प्लेटवर रंगवून तो गाडीला पुढे आणि मागे लावतो. गाडीची नंबर-प्लेट ही गाडीची ओळख असते.

आपली गाडी जर खाजगी वापरासाठी असेल, तर गाडीला पांढऱ्या रंगाची नंबर-प्लेट आणि त्यावर काळ्या रंगाची अक्षरे असतात. व्यावसायिक वापरासाठीच्या गाड्यांची नंबर प्लेट पिवळ्या रंगांची असते, हेदेखील तुम्हाला माहित असेल.

हल्लीच्या काही गाड्यांची नंबर प्लेट हिरव्या रंगाचीही दिसते. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा हिरव्या नंबर प्लेटच्या गाड्या वाढत असल्याचंही तुमच्या लक्षात आलं असेल.

 

green number plate inmarathi
indiatimes.com

 

याशिवाय काही वेगळ्या रंगांच्या नंबर प्लेट्स असतात. त्या रंगांचा अर्थ काय याची बऱ्याच लोकांना माहिती नसते. तर आज जाणून घेऊया विविध रंगांच्या नंबर प्लेट्स कोणत्या असतात आणि त्या नंबर प्लेट्स कुठल्या गाड्यांना वापरल्या जातात याविषयी…

ती गाडी रस्त्यावर कुठल्या कारणासाठी धावणार आहे यावरून गाडीची नंबर-प्लेट कुठल्या रंगांची असेल हे ठरते.

पांढरी नंबर प्लेट

पांढरी नंबर प्लेट सगळ्यात कॉमन आहे. ही नंबर प्लेट आणि त्यावर काळ्या रंगाने लिहिलेला गाडीचा क्रमांक असलेली गाडी फक्त खाजगी वापरासाठी असते.

या नंबर प्लेटच्या गाडीने सार्वजनिक वाहतूक करण्याची परवानगी नाही. तसेच कमर्शियल तत्वावर सामानाची ने-आण करण्याची देखील परवानगी नाही.

 

white number plate inmarathi
indiamart.com

 

हिरवी नंबर प्लेट

जर गाडीची नंबर प्लेट हिरव्या रंगाची असेल तर त्या गाडीत पेट्रोल किंवा डिझेल इंधन म्हणून वापरले जात नाही. हल्लीच नवीन आलेल्या इलेक्ट्रिक गाड्यांना हिरव्या रंगाची नंबर प्लेट असते आणि त्यावर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाने गाडीचा नंबर लिहिलेला असतो.

 

green number plate private car inmarathi
jagran.com

 

जर इलेक्ट्रिक गाडी खाजगी वापरासाठी असेल तर हिरव्या नंबर प्लेट वर पांढऱ्या रंगात नंबर लिहिलेला असतो आणि जर गाडी सार्वजनिक वाहतुकीसाठी असेल तर हिरव्या नंबर-प्लेटवर पिवळ्या रंगाने नंबर लिहिलेला असतो.

पिवळी नंबर प्लेट

सार्वजनिक किंवा व्यावसायिक वाहतुकीसाठी गाडी वापरात असेल, तर त्या गाडीला पिवळ्या रंगाची नंबर प्लेट आणि त्यावर काळ्या रंगाने गाडीचा नंबर लिहिलेला असतो. या नंबर प्लेटची गाडी चालवण्यासाठी चालकाकडे कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

 

yellow number plate inmarathi

 

कधी कधी अशाही नव्या गाड्या दिसतात ज्यांची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची असते आणि त्यावर लाल रंगाने गाडीचा नंबर लिहिलेला दिसतो.

लाल रंगाने लिहिलेला नंबर हा गाडीला मिळालेला तात्पुरता रजिस्ट्रेशन नंबर असतो. म्हणजेच ती गाडी टेम्पररी रजिस्ट्रेशन झालेली आहे हे आपल्याला समजते. अर्थात हे तात्पुरते रजिस्ट्रेशन फक्त एका महिन्यासाठीच वैध असते त्यानंतर गाडीमालकाला आरटीओ मध्ये रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असते.

लाल नंबर प्लेट

एखाद्या गाडीला जर लाल नंबर प्लेट असेल आणि त्यावर पांढऱ्या रंगाने नंबर लिहिलेला असेल, तर त्या गाडीची विक्री झालेली नसते. ही नंबर प्लेट आरटीओने गाडीच्या डिलर्सना दिलेली असते. डिलर्सना ही नंबर प्लेट विक्रीच्या आधी गाडीला लावणे बंधनकारक असते.

लाल रंगाची नंबर प्लेट आणि त्यावर भारताची राजमुद्रा असेल तर ती गाडी विविध राज्यांच्या राज्यपालांची असते. कधी कधी अशी नंबर प्लेट असलेली गाडी भारताचे राष्ट्रपती देखील वापरतात.

 

vip car red number plate inmarathi

 

निळ्या रंगाची नंबर प्लेट

निळ्या रंगाची नंबर प्लेट आणि त्यावर पांढऱ्या रंगाने नंबर लिहिलेला असेल, तर ती गाडी परराष्ट्रदूत वापरतात. युनायटेड नेशन्स किंवा डिप्लोमॅटिक कॉर्प्स किंवा कॉन्स्युलर कॉर्प्स यातील अधिकारी निळ्या रंगाच्या नंबर प्लेट असलेल्या गाडीतून प्रवास करतात.

 

blue number plate inmarathi

 

या नंबर प्लेटवर राज्याचा कोड लिहिलेला नसतो, तर त्या त्या परराष्ट्रदूताच्या देशाचा कोड लिहिलेला असतो. उदाहरणार्थ ११ हा ग्रेट ब्रिटनचा कोड आहे तर १७ हा चीनचा आणि ७७ हा अमेरिकेचा कोड आहे.

काळ्या रंगाची नंबर प्लेट

ज्या गाड्या भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिल्या जातात त्यांना काळ्या रंगाची नंबर प्लेट लावलेली असते आणि त्यावर पिवळ्या रंगाने गाडीचा नंबर लिहिलेला असतो. काही मोठमोठी हॉटेल्स या नंबर प्लेटच्या गाड्या त्यांच्या पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी वापरतात.

या नंबर प्लेटच्या गाड्या चालवण्यासाठी चालकाला कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स असण्याची गरज नसते. या गाड्या कमर्शियल वाहतुकीसाठी देखील वापरता येतात.

 

black number plates inmarathi

 

बाणाचे चिन्ह असलेल्या नंबर-प्लेट्स

काळ्या रंगाची नंबर प्लेट आणि त्यावर पांढऱ्या रंगाने लिहिलेला गाडीचा क्रमांक आणि त्याबरोबरच वरच्या दिशेला असलेले बाणाचे चिन्ह अशी नंबर प्लेट ही सैन्याच्या गाड्यांना असते.

या गाडीची नोंदणी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, नवी दिल्ली येथे होते. वरच्या दिशेने असणाऱ्या बाणाच्या चिन्हाला ब्रॉड ऍरो म्हणतात. हा ब्रॉड ऍरो नंबरच्या सुरुवातीला असतो आणि त्यानंतर जे दोन आकडे असतात ते ज्या वर्षी गाडीची नोंदणी झाली ते साल असते आणि त्यानंतर बेस कोड लिहिलेला असतो आणि मग गाडीचा सिरीयल नंबर लिहिलेला असतो.

नंबरच्या शेवटी एक इंग्रजी अक्षर असते. ज्या क्लासची गाडी त्याप्रमाणे ते अक्षर असते. अशाप्रकारे सैन्याच्या गाडीचा नंबर हा असा मोठा लांबलचक असतो. म्हणूनच सैन्याची गाडी आपल्याला लगेच ओळखता येते.

 

military vehicles inmarathi

तर अशा या वेगवेगळ्या नंबर प्लेट्स भारतात बघायला मिळतात. पुढच्या वेळेला यापैकी कुठलीही नंबर प्लेट तुम्हाला दिसली, तर ती गाडी कशासाठी वापरली जाते हे तुम्हाला लगेच ओळखता येईल, बरोबर ना?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?