आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
एखाद्या वस्तूची जेव्हा आपण जाहिरात करतो तेव्हा आपण त्या वस्तूचं समर्थनसुद्धा करत असतो. जसं की, कोणताही सेल्स, मार्केटिंगचा व्यक्ती हा त्याला व्यक्तिशः आवडलेली वस्तूच आत्मविश्वासाने विकू शकतो. सेलिब्रिटी लोकांनासुद्धा हे लागू पडतं.
जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी असता, तेव्हा लोक तुम्हाला फॉलो करत असतात, तुमच्या सवयी जाणून घेत असतात. मध्यंतरी, मॅगीवर जेव्हा काही काळासाठी बंदी आली होती तेव्हा त्याची जाहिरात करणाऱ्या अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांना पण नोटीस बजावण्यात आली होती.
भारत सरकारने, मध्यंतरी अजय देवगण, शाहरुख खान यांना ‘सुपारी’ची जाहिरात करू नका असं आवाहन केलं होतं. का ?
१. भारतीय कायदा सिगरेट आणि तंबाखु प्रॉडक्ट्स वरील २००३ मध्ये पास झालेला कायदा तुम्हाला या वस्तूंची मुक्तपणे जाहिरात करण्याची परवानगी देत नाही.
२. सेलिब्रिटीसारखं आपणही रहावं, वागावं, खावं प्यावं असा विचार करणारा एक मोठा वर्ग आजही भारतात राहतो, जो की सिगरेट, दारूच्या अतिसेवनाने स्वतःचं आणि पर्यायाने कुटुंबाचं आरोग्य धोक्यात घालू शकतो.
हॉलीवूडचा लोकप्रिय कलाकार ‘पिअर्स ब्रॉस्नन’ म्हणजेच सर्वांना आवडलेला ‘जेम्स बॉण्ड’ यांच्याकडून जेव्हा माऊथ फ्रेशनर म्हणून सांगितलेल्या ‘पान बहार’ या सुपारीची जाहिरात निर्मात्यांनी करून घेतली होती, तेव्हा त्यांना या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलं होतं.
–
- ९० च्या दशकातल्या ‘या’ जाहिराती लागल्या की पालक लगेच टीव्हीचा रिमोट शोधायचे!
- तनिष्कच्या जाहिरातीवर उठलेलं वादळ आणि राज्यपालांचा “सेक्युलर” टोमणा अनेक महत्वाचे प्रश्न उभे करतात
–
याचं कारण हे होतं की, त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलीला ‘कॅन्सर’मुळे हे जग सोडून जातांना स्वतःच्या डोळ्याने बघितलं होतं.
कायदेशीर कारवाईपेक्षा ही गोष्ट त्यांच्या मनाला गोष्ट जास्त लागली होती की, “आपल्याकडून अशी चूक कशी काय घडू शकते? आपण केलेल्या जाहिरातीमुळे काही लोक, काही वर्षांनी आपला जीव गमावू शकतात.” हे लक्षात घेऊन त्यांनी २०१६ मध्ये ‘पान बहार’ ला कायदेशीर नोटीस पाठवली होती.
काय होतं हे पूर्ण प्रकरण ? जाणून घेऊयात.
पान बहारच्या निर्मात्यांनी पिअर्स ब्रॉस्ननला असं सांगितलं होतं की, “पान बहार हे एक श्वासातील दुर्गंध काढून टाकणारं आणि लाळ लाल न होऊ देणारं एक ‘टूथ व्हाईटनर’ आहे.” या बोलण्यावर, लिखित करारावर ६३ वर्षीय पिअर्स ब्रॉस्नन जाहिरातीत काम करण्यायास तयार झाले होते.
जाहिरातीचं शुटिंग झालं. पिअर्स ब्रॉस्नन यांचे पान बहारचा डब्बा हातात घेतलेले होर्डिंग्ज भारतभर झळकले.
पिअर्स आपल्या मायदेशी परतले, आणि तिथे त्यांचं भारतीय दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्या नोटीसने स्वागत झालं. ज्यामध्ये त्यांना ‘आरोग्यास हानिकारक’ सुपारीची जाहिरात करण्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं.
ट्विटरवर या बातमीमुळे विविध हॅशटॅगला ऊत आला होता. तत्कालीन भारतीय सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष पहेलाज नेहलानी यांनीसुद्धा या घटनेचा निषेध नोंदवला होता.
भारतीय कलाकारांनी केलेल्या जाहिरातींबद्दल त्यांना कधीच अशी नोटीस न पाठवलेल्या न्यायालयाने हॉलीवूड कलाकाराने केलेल्या जाहिरातीची इतकी दखल घेतली याचं भारतीय प्रेक्षकांनासुद्धा खूप आश्चर्य वाटलं होतं.
भारतीय प्रेक्षकांनी पिअर्स ब्रॉस्नन यांच्या निरागस उत्तरांना मान्य केलं नव्हतं. “जेम्स बॉण्डचं काम करणारी व्यक्ती इतकी बेजबाबदार कशी असू शकते?” असे प्रश्न विचारून पिअर्सला टॅग केलं होतं.
‘पान बहार’ ने या प्रकरणात स्पष्टीकरण देतांना सांगितलं होतं की, “ज्या पान मसाल्याची ‘पिअर्स ब्रॉस्नन’ हे जाहिरात करत आहेत त्यामध्ये तंबाखू किंवा निकोटिन नाहीये.”
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, “पान मसालामध्ये कॅन्सर होऊ शकणारे काही घटक असतात. त्याचं सेवन करणाऱ्या व्यक्तीला कॅन्सर होऊ शकतो. पान मसाला तयार करणाऱ्या कंपनीने अशी सूचना आपल्या पाकिटांवर लिहिणं हे कायद्यानुसार सुद्धा बंधनकारक आहे.”
२०१८ पर्यंत ही केस दिल्ली न्यायालयात सुरू होती. पिअर्स ब्रॉस्ननने नोटिसच्या उत्तरात हे लिहिलं होतं की, ” माझी फसवणूक झाली आहे. पान बहारच्या निर्मात्यांनी मला त्यांच्या पान मसाला मधील ‘आरोग्यास हानिकारक’ गोष्टींबद्दल काहीच माहिती दिली नाही आणि मी पण तो अभ्यास केला नाही.”
सोशल मीडियावरसुद्धा पिअर्स ब्रॉस्नन यांनी आपला माफीनामा जाहीर करून आपल्या चाहत्यांची माफी मागितली होती.
पान बहारला दोषी ठरवत ‘पिअर्स ब्रॉस्नन’ यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की, “कॅन्सरमुळे मी माझ्या जवळच्या माणसांना, मित्रांना मुकलो आहे. मी पूर्ण माहिती घेतली असती तर ही जाहिरात कधीच केली नसती, मला माफ करा.”
मायबाप प्रेक्षकांनी मोठ्या मनाने काही दिवसात हे प्रकरण विसरून पुन्हा पिअर्स ब्रॉस्ननच्या पुढील सिनेमाचं स्वागत केलं होतं.
पिअर्स ब्रॉस्ननने पान बहार सोबत असलेला करार मोडला होता आणि त्यांना जाहिरातींमधून आपला फोटो काढून टाकण्याची सूचना केली होती.
भारतीय कलाकारांपैकी दिवंगत विनोद खन्ना हे असे अभिनेते होते ज्यांनी ‘बाबा जर्दा’ या तंबाखूची जाहिरात केली होती. तरुणांना तंबाखूकडे आकर्षित करणाऱ्या या जाहिरातीवर नंतर बंदी घालण्यात आली होती. पण, विनोद खन्ना यांना त्याबद्दल कोणताही जाब विचारण्यात आला नव्हता.
पान बहारच्या आधी पिअर्स ब्रॉस्ननने ‘रीड अँड टेलर’ या सुटिंग, शर्टिंगच्या भारतीय कंपनीची जाहिरात केली होती. या जाहिरातीमुळे रीड अँड टेलरच्या नितीन कासलीवाल यांच्या ‘एस. कुमार’ कंपनीला जागतिक पातळीवर खूप फायदा झाला होता.
वादग्रस्त ठरलेल्या जाहिरातींमध्ये फेअर अँड लव्हलीचा सुद्धा क्रमांक लागतो जे तरुण मुला मुलींना गोरेपण म्हणजेच आकर्षक अशी जाहिरात करतात. ‘फेअर अँड हॅन्डसम’ची जाहिरात शाहरुख खान, जॉन अब्राहम, शाहिद कपूर सारख्या अभिनेत्यांनी करून रंगाने सावळ्या असलेल्या लोकांमध्ये एक न्यूनगंड तयार केला होता.
–
- जाहिरातींमधल्या महागड्या वस्तूंपेक्षा या सवयी तुम्हाला सर्वार्थाने “चार्मिंग” बनवतील
- जाहिरातींमध्ये दिसणाऱ्या “या” गोष्टी सत्यात उतरणं निव्वळ अशक्य आहे!!
–
जाहिरातींच्या विश्वात रोज नवनवीन ट्रेंड येत असतात. जाहिरात करणाऱ्या व्यक्तीने आणि जाहिरात बघून वस्तू विकत घेणाऱ्या लोकांनीसुद्धा तितकंच सतर्क असणं गरजेचं आहे हे वरील उदाहरणातून आपण लक्षात घेतलं पाहिजे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.