आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कॅन्सर… नुसतं नाव ऐकलं तरी कोणत्याही माणसाच्या हृदयाची धडधड वाढू शकते. विज्ञान, संशोधन, वैद्यकशास्त्राने प्रचंड प्रगती करूनही या आजारावर १००% मात करणे आपल्याला जमलेले नाही. पण कॅन्सरग्रस्तांचा त्रास कमी करणारे संशोधन व औषधनिर्मिती एका भारतीय संशोधकाने पाऊल शतकाआधीच केली आहे. मात्र त्याच्याविषयी आज फारच थोड्या लोकांना माहिती आहे.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
डॉ. येल्लप्रगडा सुब्बाराव यांचा जन्म १ जुलै १८९६ रोजी आताच्या आंध्रप्रदेशमधील भीमावरम या छोट्याशा गावात झाला. त्यांचे कुटुंब अतिशय गरीब होते. त्यांच्या वडीलांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरकारी करखात्यातील नोकरी सोडावी लागली होती.
सात भावंडांतील चौथे असलेल्या सुब्बाराव यांना परिस्थितीमुळे शिक्षणापेक्षा दोन घास पोटात घालण्यासाठी मेहनत करावी लागत असे. बनारसला जाऊन फळविक्रेता व्हायचे आणि कुटुंबासाठी पैसे मिळवायचे या विचाराने, एकदा ते त्यांच्या चुलतभावाबरोबर पळूनही गेले होते. पोटाची भूक भागवण्यासाठीच्या धडपडीत शाळा व अभ्यासाकडे दुर्लक्ष होणे सहाजिकच होते. त्याचे पर्यावसन मॅट्रिक परिक्षेत दोनदा गटांगळ्या खाण्यात झाले.
सुब्बाराव १८ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आपल्या या धडपड्या मुलामध्ये असलेली बुद्धिमत्तेची चमक माहीत असलेल्या त्यांच्या आईने स्वतःचे दागिने विकून त्यांना मद्रास येथे हिंदू हाय स्कूलमध्ये पाठवले. या काळात ते रामकृष्ण मिशन या सेवाभावी धार्मिक संघटनेच्या कामाने प्रभावित झाले होते.
- ४० हून अधिक vaccine चा जनक; वाचवतोय दरवर्षी ८० लाख लोकांचा जीव
- शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शास्त्रज्ञामुळे आज सगळ्या जगाला मिळतेय कोरोनाची लस…!
–
पुढे मॅट्रिक झाल्यावर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश केला. योग्य वातावरणात त्यांच्या बुद्धीला कस लागून तिचे तेज दिसू लागले. त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. पण गरीबीने त्यांची पाठ सोडली नव्हती. वैद्यकीय शिक्षणासाठीचे शुल्क भरणेही त्यांना जमत नसे. अशावेळी त्यांना काही मित्रांनी आणि कनवाळू नागरिकांनी मदत केली.
यामध्ये एक व्यापारी सुर्यप्रकाशरावही होते. पुढे यांच्याच शेषगिरी या नातीशी सुब्बाराव यांचा विवाह झाला. या काळात भारतात स्वातंत्र्यलढा जोरात होता पण परिस्थितीमुळे सुब्बाराव यांना त्यात सक्रिय सहभागी होता आले नाही. असे असले तरी त्यांनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार आणि स्वदेशीचा वापर करण्यास सुरुवात केली.
महाविद्यालयाचा गणवेश असलेला परदेशी सर्जिकल गाऊन घालण्यास नकार देऊन त्यांनी खादीचेच कपडे घातले. यामुळे त्यांचे ब्रिटिश शिक्षक नाराज झाले. या नाराजीचे पर्यावसन त्यांच्या सर्जरी विषयाच्या परिक्षेत उत्तम कामगिरी करूनही वर्णद्वेषी प्राध्यापकाने त्यांना किरकोळ गूण दिले. यामुळे त्यांना एम.बी.बी.एस ही पदवी मिळू शकली नाही.
एल.एम.एस. या दुय्यम प्रमाणपत्रावर त्यांची बोळवण करण्यात आली. डॉक्टर झाल्यावर त्यांनी मद्रासच्या लक्ष्मीपती आयुर्वेदिक कॉलेजमध्ये व्याख्याते म्हणून कामाला सुरुवात केली. आयुर्वेदातील औषधींच्या उपयुक्ततेमुळे प्रभावित होऊन त्यांनी जागतिक स्तरावर या औषधांचे महत्त्व पोहचविण्यासाठी त्यावर संशोधनास सुरुवात केली. पण त्याचवेळी त्यांच्या नशीबाने वेगळी कलाटणी घेतली. त्यांची ओळख भारतात अभ्यास दौऱ्यावर आलेल्या एका अमेरिकन डॉक्टरशी झाली.
सुब्बाराव यांच्या बुद्धिमत्तेमुळे प्रभावित होऊन त्या डॉक्टरने त्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील हॉर्वर्ड महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आग्रह केला. कल्पना तर उत्तम होती पण मधल्या काळात सुब्बाराव यांचा विवाह झाल्याने त्यांच्यावरील जबाबदारी वाढली होती. आर्थिक चणचणही कायम होती. यावेळी पुन्हा त्यांच्या सासऱ्यांनी कस्तूरी सूर्यनारण मूर्ती यांनी त्यांना काही मदत केली. इतरही धर्मादाय संस्थांकडून थोडी तजवीज करून त्यांच्या प्रवासखर्चाची सोय झाली आणि १९२३मध्ये सुब्बाराव बोस्टन येथे पोहोचले.
त्यांनी महाविद्यालयात प्रवेश तर मिळवला पण शिक्षणाव्यतिरिक्त अंगमेहनतीची अनेक लहानसहान कामे करून त्यांना पोटापाण्याची व्यवस्था करावी लागली. स्थानिक रुग्णालयात रुग्णांची शारीरिक स्वच्छता करणे, संडास साफ करणे यापासून ते द्वाररक्षकापर्यंत कोणतेही काम करण्यात त्यांनी कमीपणा मानला नाही.
खिसा रिकामा असला तरी गोड बोलणे, कोणासही मदतीस तत्पर असणे अशा लाघवी स्वभावाने त्यांनी सहाध्यायांची व शिक्षकांची मने जिंकून घेतली. हार्वर्डमध्ये बायोकेमिस्ट्री विषयात पी.एच.डी. मिळवून तेथेच शिकवण्याची व संशोधनाची संधी मिळालेले ते पहिले भारतीय विद्यार्थी होते.
हार्वर्डमधील शिक्षण उत्तम रितीने पूर्ण केल्यावर त्यांनी तेथेच जैवरसायन विभागात नोकरी पत्करली. येथे संशोधन करताना सुब्बाराव यांनी सजीवांतील पेशी व उतींच्या अंतर्गत रचना व कार्याविषयी अनेक शोध लावले. सजीवांच्या शरीरातील महत्त्वाच्या फॉस्फरस या मूलद्रव्याची अचूक मोजणी करण्याची पद्धत हा त्यांचा विशेष महत्त्वाचा शोध.
आजही या शोधनिबंधाची गणती संदर्भ म्हणून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या शोधनिबंधात केली जाते. परंतु या संशोधनामध्ये त्यांना त्यांचे विभागप्रमुख असलेल्या सायरस फिस्के यांचा वाटा असल्याचे घोषित करावे लागले. अतिशय सहृदयी अशा सुब्बारावांनी संशोधनात सिंहाचा वाटा असूनही स्वतःचे नाव फिस्के यांच्या नावानंतर घातले. यामुळे आजही ही पद्धत ‘फिस्के-सुब्बाराव पद्धत’ म्हणून ओळखली जाते.
फिस्के यांना यामुळे महाविद्यालयात बढती मिळणे शक्य झाले पण सुब्बाराव यांच्या बाबतीत मात्र सर्वच ठिकाणी दुजाभाव दाखविण्यात आला. सुब्बाराव यांच्या शोधाच्या आधारे अनेकांनी पुढे संशोधन केले व त्यांना सर्वाधिक प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कारही मिळाला पण सुब्बाराव यांची दखल घेतली गेली नाही.
व्यक्तिगत जीवनातही याच काळात मोठा आघात झाला. भारतात त्यांच्या एक वर्षाच्या मुलाचा अचानक मृत्यू झाला. सुब्बाराव परिस्थितीमुळे पत्नीच्या सांत्वनासाठीही जाऊ शकले नाहीत. परिस्थितीमुळे त्यांना शनिवाररविवारीही काम करावे लागत असे. या सर्वाच्या जोडीला महाविद्यालयात मिळणाऱ्या दुय्यम वागणूकीला कंटाळून त्यांनी १९४०मध्ये लेडरले लॉबोरेटरीज्मध्ये रिसर्च डायरेक्टर म्हणून कामाला सुरुवात केली. या ठिकाणी त्यांच्यातील संशोधकाला योग्य वातावरण व प्रोत्साहन मिळाले.
रोगांच्या उपचारांमध्ये प्रतिजैविकांचे महत्त्व पेनिसिलीनच्या शोधानंतर प्रचंड वाढले होते. पेनिसिलियम आणि स्ट्रेप्टोमायसीन ही प्रतिजैविके मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. डॉ. सुब्बाराव यांनी टेट्रासायकलिन गटातील प्रतिजैवकांमध्ये सखोल संशोधन केले आणि त्यातील ऑरोमायसीन या घटकाचा शोध त्यांनी लावला. यापासून तयार केली जाणारी औषधे अनेक प्राणघातक रोगांवर रामबाण उपाय म्हणून वापरली जाऊ लागली.
प्लेग नियंत्रणासाठी वापरले जाणारे डॉक्सिसायक्लिन हे औषध त्यांनीच तयार केले. तसेच त्यांनी लावलेल्या व्हिटॅमिन बी – ९ या फॉलिक ॲसिडच्या शोधामुळे लाखो नवजात अर्भकांचे पाठीच्या मणक्यातील व्यंगापासून रक्षण झाले. गर्भवती मातांना दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये या अन्नद्रव्याचा वापर केला जातो. उष्णकटिबंधीय भागातील लोकांना होणाऱ्या ‘स्प्रू’ या जीवघेण्या आजारावरही रामबाण औषध त्यांनी शोधले. त्यांनी लावलेला हा शोध जणू नियतीला दिलेली चपराकच होती.
लहानपणी स्वतः सुब्बाराव आणि त्यांच्या दोन भावांना या रोगाने ग्रासले होते. सुब्बाराव जरी वाचले तरी त्यांचे दोन भाऊ या रोगाला बळी पडले होते. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या फायलॅरिॲसिस या आजारावर औषध तयार करून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी, हजारो सैनिकांचा दुवा घेतला.नंतर त्यांनी आपल्या संशोधनाची दिशा कॅन्सरकडे वळवली.
कॅन्सरमध्ये होणाऱ्या अनियंत्रित पेशीविभाजनाच्या समस्येवर तोडगा म्हणून त्यांनी अमिनोपट्रिन प्रकारची औषधे शोधली. लहान मुलांना होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगावर त्यांनी डॉ. सिडने फारबर या सहकाऱ्याच्या मदतीने संशोधन केले. या संशोधनातून त्यांनी तयार केलेले मेथोट्रेक्झेट हे औषध आजही वापरले जाते.
- नोबेल पासून वंचित ठेवली गेलेली पहिली भारतीय शास्त्रज्ञ आजही मायदेशात दुर्लक्षितच आहे…
- देशाचा अपमान करणाऱ्यांना भारतीय शास्त्रज्ञांनी ‘परम’ चमत्कार घडवून आपली ताकद दाखवली होती!
–
या बहुगुणी औषधाचा कमी मात्रेत केलेला उपयोग रुमॅटाईड आथ्रायटीस, सोऱ्हायसिस, लूपस तसेच अस्थमासारख्या आजारांमध्येही गुणकारी ठरतो. त्यांनी हत्तीरोगावर गुणकारी ठरणाऱ्या डाय ईथिल कार्बमॅजीन या औषधाचाही शोध लावला. हेट्रेझेन या नावाने प्रसिद्ध असलेल्या या औषधाच्या फायद्यांचा लाभ आतापर्यंत ५० कोटींहून अधिक लोकांनी घेतला आहे.
इतके महत्त्वाचे संशोधन करूनही डॉ. सुब्बाराव हे प्रसिद्धीपराङ्मुखच राहिले. लावलेल्या प्रत्येक शोधाचे पेटंट घेऊन संपत्तीच्या राशी मिळवणारे सभोवती असूनही त्यांनी तो मार्ग चोखाळला नाही. कोणत्याही शोधाचे पेटंट घेतले नाही.
‘शास्त्रीय संशोधनातील विजय हे फार क्वचित एकहाती मिळवलेले असतात. कोणत्याही एका व्यक्तीला त्याचे श्रेय मिळणे योग्य नाही’ हे त्यांचे उद्गार त्यांची विनम्रता दाखवितात. बेंजामिन डुगार, सिडने फायबर, कॉय वॉलर इ. अनेक विद्यार्थी व सहकाऱ्यांनी त्यांच्याबरोबर काम करून यश प्राप्त केले. प्रसिद्धी व मानसन्मान मिळवले. पण डॉ. सुब्बाराव यापासून कायम वंचित राहिले.
अखेरपर्यंत संशोधनात मग्न असलेला हा महान संशोधक वयाच्या केवळ त्रेपन्नाव्या वर्षी ९ ऑगस्ट १९४८रोजी प्रसिद्धीच्या झोताआड निधन पावला. आयुष्यभर त्यांच्या कार्याला प्रसिद्धी मिळाली नसली तरी मृत्यूनंतर अनेकांनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. न्युयॉर्क टाईम्स, सायन्स, अमेरिकन प्रेस, हेराल्ड ट्रिब्यून अशा प्रकाशनांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
लेडरले लॅब्जने आपल्या काही प्रतिजैवकांना त्यांचे नाव देऊन तसेच अमेरिकन सायनामाईडने नवीन शोधलेल्या बुरशीच्या जातीला त्यांचे नाव देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला आहे.
ज्या नोबेल पुरस्कार समितीने त्यांच्या संशोधनाची दखल घेतली नाही त्याच नोबेल समितीच्या स्टॉकहोम येथील मुख्यालयात डॉ. सुब्बाराव यांचे छायाचित्र गौरवाने लावण्यात आले आहे. भारत सरकारनेही आपल्या या पुत्राच्या गौरवार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन केले आहे.
अर्गोसी या प्रकाशनातील एका लेखामध्ये डोरॉन अन्ट्रिम यांनी डॉ. सुब्बाराव यांच्याबद्दल लिहिले, ‘‘तुम्ही बहुधा डॉ. येल्लप्रगडा सुब्बाराव यांच्याबद्दल कधीच ऐकले नसेल. असे असले तरी त्यांच्यामुळेच तुम्ही सर्वजण जिवंत आणि धडधाकट आहात. ते होते म्हणून तुम्ही यापुढेही दीर्घकाळ जगणार आहात!’’
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.