' ‘चार में चार’ दो बार… ‘यॉर्कर किंग’ निवृत्त झालाय, पण हे पराक्रम विसरता येणार नाहीत – InMarathi

‘चार में चार’ दो बार… ‘यॉर्कर किंग’ निवृत्त झालाय, पण हे पराक्रम विसरता येणार नाहीत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे 

===

क्रिकेटचा सुवर्णकाळ म्हटलं, की आमच्या पिढीला मुरलीधरन, वॉर्न, पॉन्टिंग, संगकारा, जयसूर्या, लारा, शेन बॉण्ड, आफ्रिदी, शोएब मलिक, गांगुली, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण, कॅलिस, पोलॉक, फ्लिंटॉफ, युवराज वगैरे वगैरे अनेक रथी-महारथी आठवतात. यादीच करत बसलो तर ती फार मोठी होत जाईल, म्हणून थांबलो.

या यादीत आणखी एक नाव अगदी आवर्जून घ्यावंसं वाटतं, ते म्हणजे स्लिंगा मलिंगाचं!! आडव्या हाताने गोलंदाजी करणारा आणि चित्रविचित्र सोनेरी केसांचा लसिथ मलिंगा, अनेकवेळा शांतपणे सुपरहिरोचं काम करून गेलेला आपण पाहिलाय.

 

malinga celebration inmarathi

 

याच अफलातून गोलंदाजाने काल निवृत्ती घोषित केली. तो निवृत्त झाला असला, तरी त्याची चर्चा मात्र कायमच होत राहणार…

आजच त्याच्याच काही पराक्रमांविषयी बोलावंसं वाटतंय. चला तर मग बोलूयात…

मलिंगा हैं, तो मुमकिन हैं…

M for Malinga and M for Miracle… हा फंडा अनेकदा पाहायला मिळाला आहे. एखादा सामना संपूर्ण एकतर्फी करून टाकणं, किंवा हातातोंडाशी आलेला घास निसटू लागल्यावर, अचूक टप्पा साधणं, ही त्याची खासियत होती.

ज्या विक्रमांचा विचार स्वप्नातदेखील अशक्य आहे, अशा गोष्टी सत्यात उतरवण्याची क्षमता असणारे सचिन, लक्ष्मण, द्रविड, गांगुली, गेल, एबीडी, युवराज, लारा वगैरे फलंदाज आपण पाहिले आहेत. गोलंदाजीत मलिंगाची ती क्षमता होती. भल्याभल्यांच्या दांड्या गुल करण्यात त्याचा अव्वल नंबर लागेल.

 

malinga style inmarathi

 

कित्येक गोलंदाजांची पळता भुई थोडी करणाऱ्या, युवराजसारख्या दर्जेदार फलंदाजाला मलिंगासमोर हात टेकतांना पाहिलंय. मलिंगा ही एक जादू होती, आणि म्हणूनच अविश्वसनीय, अकल्पनीय अशा अनेक गोष्टी त्याने प्रत्यक्षात आणून दाखवल्या आहेत.

अनेक चढउतार पाहिलेल्या या गोलंदाजाने, त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चक्क दोनवेळा ‘सलग चार चेंडूत चार गडी’ गारद केले आहेत. मलिंगा सोडून इतर कुणाला ही गोष्ट सहजसाध्य ठरेल, असं वाटत नाही.

हॅट्ट्रिकमधील तिसरा चेंडू टाकताना मनावर असणारा तणाव अनेक मोठमोठ्या गोलंदाजांच्या चेहऱ्यावर साफ दिसतो. या पठ्ठ्याने चौथ्या चेंडूवर सुद्धा विकेट घेतली आहे; तीदेखील एकदा नाही, तर दोनदा… क्यु कीं, मलिंगा हैं, तो मुमकिन हैं; चार मे चार… दो बार…

मलिंगाने हादरा दिला पण…

२००७ च्या क्रिकेट विश्वचषकातील एक रोमांचक सामना… दोन्ही संघांनी जेमतेम २००चा टप्पा पार केला आणि तरीही तो सामना अविस्मरणीय ठरला. मलिंगाने दक्षिण आफ्रिकेला दिलेला हादरा त्यांचा संघ विसरलेला नसेल. शेवटी सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला असला, तरी सुद्धा ‘होत्याचं नव्हतं होणं’ म्हणजे काय, याचा अनुभव त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने घेतला आहे.

२१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना, ५ बाद २०६ असा दमदार धावफलक पाहायला मिळत होता. खेळपट्टीवर बस्तान बसवलेला कॅलिस, भक्कम स्तंभाप्रमाणे उभा ठाकला होता. त्याचवेळी मलिंगाचा एक अप्रतिम यॉर्कर थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. शॉन पोलॉकच्या यष्ट्या उध्वस्त करून मलिंगाने पहिला घाव घातला.

 

shaun pollock inmarathi

 

पुढे काय घडणार आहे, हे तेव्हा कुणालाच ठाऊक नव्हतं. अष्टपैलू हॉल मैदानावर आला आणि त्याने गार्ड घेतला. ४५ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मलिंगाने त्यालाही माघारी धाडलं आणि दक्षिण आफ्रिका संघाच्या मनात पहिली धाकधूक झाली. ५ बाद २०६ वरून ७ बाद २०६ अशी स्थिती त्यांनी पाहिली.

इथेच थांबला असता तर तो मलिंगा झाला नसता. ४७व्या षटकात त्याने पुन्हा धक्के दिला. सामन्यात सर्वोत्तम ठरलेला कॅलिस स्ट्राईकवर होता. मलिंगाचा एक झकास स्विंग झालेला चेंडू, कॅलिसच्या बॅटला प्रेमळ स्पर्श करून संगकाराच्या ग्लोजमध्ये जाऊन विसावला. धावफलकावर ८ बाद २०७ असे आकडे दिसू लागले. विश्वचषकात हॅट्ट्रिक मिळवणारा पाचवा गोलंदाज म्हणून मलिंगाचं नाव इतिहासात लिहिलं गेलं.

 

malinga kallis inmarathi

 

एवढं असून सुद्धा जादू अजून थांबली नव्हती. पोलॉक, हॉल आणि कॅलिसचा सुद्धा जिथे टिकाव लागला नाही, तिथे बिचारा एंटीनी काय करू शकणार, अशी स्थिती नंतर पाहायला मिळाली. आणिक एक जबरदस्त यॉर्कर आणि आणखी एकदा यष्ट्या उद्धवस्त!!!

दक्षिण आफ्रिकेचा संघ हादरला. कधीकाळी ५ बाद २०६ या थाटात मिरवणारा संघ ९ बाद २०७ या स्थितीत पराभवाच्या छायेत येऊन ठेपला. ३ धावा आणि दक्षिण आफ्रिकेचा विजय, १ विकेट आणि लंकेचा विजय, २ धावांसह १ विकेट आणि सामना बरोबरीत!! आहाहाहा…

‘दक्षिण आफ्रिका जिंकणार हे स्पष्ट आहे रे’ पासून ‘आता काय होणार?’ पर्यंत सामना घेऊन येणारा वीर; त्याचं नाव होतं, लसिथ मलिंगा!!

अर्थात, मलिंगाच्या अनोख्या चौकारानंतर, रॉबिन पीटरसनने त्यालाच एक चौकार हाणून, विजयश्री आफ्रिकेच्या पारड्यात टाकली. सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला इतिहास छोट्याशा काळ्या डागामुळे कायमचा मलीन झाला.

या विकेट्स कशा गेल्या ते खालच्या व्हिडिओमध्ये पाहता येईल.

 

क्या से क्या हो गया

दुसऱ्यांदा मलिंगाने हा पराक्रम केला, तो न्यूझीलंड संघाविरुद्ध, २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात! हा सुद्धा छोट्या धावसंख्येचा सामना होता. २० षटकात अवघ्या १२५ धावा लंकेच्या संघाने केल्या होत्या. मलिंगा कर्णधार असलेल्या संघाने मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावले होते. हा सामना जिंकण्याची इच्छा मनात असली, तरीही ती प्रत्यक्षात उतरवणं शक्य वाटलं असेल का, हा प्रश्नच आहे.

तिसऱ्या षटकात बिनबाद १५ अशी चांगली सुरुवात न्यूझीलंडच्या संघाने केली होती. स्फोटक फलंदाज कॉलिन मनरो, १२ चेंडूत १२ धावा करून खेळपट्टीवर उभा होता. मलिंगाची खासियत असलेल्या यॉर्कर चेंडूने त्याच्या यष्ट्या उधळल्या. न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. फार मोठं आव्हान नसल्यामुळे संघाची स्थिती अद्याप ठीक होती.

 

colin munro inmarathi

 

मलिंगाच्या पुढच्या चेंडूवर रुदरफोर्डला पंचांनी नाबाद ठरवलं. स्वतःच कप्तान असलेल्या मलिंगाने वेळ वाया न दवडता डीआरएसची मागणी केली. पंचांना निर्णय बदलावा लागला आणि न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला.

तिसऱ्या चेंडूवर आणखी एक यॉर्कर आणि ग्रँडहोमचा त्रिफळा… एका वाक्यात संपवता येईल असं हे वर्णन, खरंतर सर्वाधिक नाट्यमय ठरलं. मलिंगाने टाकलेला हा चेंडू ‘नो-बॉल’ आहे की नाही याची तपासणी करण्याची जबाबदारी थेट तिसऱ्या पंचांना देण्यात आली.

शेवटच्या वर्षाला असलेला विद्यार्थी काठावर पास व्हावा, अशी काहीशी मलिंगाच्या पायाची स्थिती या पंचांनी पाहिली आणि पाय पूर्णपणे रेषेच्या पलीकडे नाही असा निर्णय दिला. मलिंगाची हॅट्ट्रिक झाली.

 

malinga against new zealand inmarathi

न्यूझीलंडचा सर्वाधिक अनुभवी शिलेदार रॉस टेलर मैदानावर उतरला. यावेळी खरंतर त्याने डाव सावरण्याची गरज होती. नियतीने मात्र मलिंगाच्या हातून डाव उधळणं लिहिलं होतं. तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मलिंगाने त्याला तंबूत परतवलं. पुन्हा एकदा सलग चार चेंडूत चार गडी बाद करण्याची किमया मलिंगाने करून दाखवली.

यावेळी लंकेने सामना जिंकला खरा; पण मलिंगा कप्तान असलेल्या या संघाने मालिका मात्र आधीच गमावलेली होती. त्यामुळे पुन्हा एकदा एक अफलातून करिष्मा करून दाखवणाऱ्या मलिंगाच्या या ऐतिहासिक स्पेलला एक छोटीशी दुःखाची किनार मात्र होतीच…

ही हॅट्ट्रिक बघायची असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा…

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?