Site icon InMarathi

बलुचिस्तानमध्ये आजही ‘मराठा’ ताठ मानेनं वावरतो आहे, थक्क करणारं सत्य!

tiger of balochistan feature InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण हे तर जाणतोच की पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, तेव्हा काही मराठे हे त्याच पानिपतच्या भूमीवर स्थायिक झाले आज त्यांना हरयाणामधील रोड मराठा समाज म्हणून ओळखले जाते.

त्यांच्याबद्दल आपण एका लेखाद्वारे विशेष माहिती घेतली होती. ( तो लेख इथे क्लिक करून वाचू शकता – मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज! )

 

 

आज आपण अजून एका मराठी पूर्वजांबद्दल जाणून घेणार आहोत, जे देखील पानिपतच्या युद्धामधील पराभवानंतर आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला परागंदा झाले. पण त्यांनी पानिपतच्या मातीमध्ये स्थिरस्थावर न होता थेट बलुचिस्तान गाठले आणि आज ३०० वर्षांनंतरही तेथे हा आपला मराठी बांधव अगदी गुण्यागोविंदाने नांदत आहे.

हे बलुचिस्तान आहे आपल्या शेजारील पाकिस्तानमध्ये.

चला तर मग जाणून घेऊया या पाकिस्तानमधील मराठा समाजाबद्दल!!

 

 

१७६१ साली रणकंदन माजले पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे आणि या वेळेस आमने सामने होते मराठे आणि अफगाण! मराठ्यांचे वर्चस्व मुघलांना सोसवत नव्हते, म्हणून त्यांच्या कायमचा बंदोबस्त करावा या उद्देशाने दिल्लीच्या सम्राटाने अफगाणी शासक अहमदशाह अब्दालीची मदत मागितली होती.

मराठ्यांनी देखील या संघर्षाचा कायमचा निकाल लावावा आणि मुघल सत्ता उलथवून संपूर्ण हिंदुस्तान काबीज करावा या उद्देशाने नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या भूमीपासून अगणित अंतरावर असलेल्या उत्तर भारताच्या दिशेने कूच केले.

अफगाणांना वेळीच रोखावे म्हणून मराठे बलाढ्य अफगाण सेनेला थेट सामोरे गेले आणि पानिपत येथे मराठे व अफगाण यांची गाठ पडली.

 

हे ही वाचा – मराठा आरमार उभारणारा, इंग्रजांकडून खंडणी वसूल करणारा मराठा शूर-वीर

पण जणू या वेळी नशिबाने साथ दिली नाही आणि मराठ्यांना त्याच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. पण हरता हरता मराठ्यांनी अफगाणी सेनेची जी काही हानी केली, त्याचा धसका घेऊन पुन्हा कधीही अब्दालीने भारतात पाय ठेवला नाही.

(हे देखील वाचा : मराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले!)

इतिहासकार सियार उल मुत्ताखिरीन हे म्हणतात की,

पानिपतच्या युद्धानंतर मराठी युद्धकैद्यांच्या लांबचलांब रांगा केल्या गेल्या आणि त्यांना अफगाणी सैन्यासोबत दिल्ली, मथुरा या शहरांमध्ये पाठवण्यात आलं. युद्धानंतर जे मराठे वाचले, त्यातल्या पुरुष, महिला आणि मुलांना गुलाम बनवण्यात आलं.

 

 

पानिपतच्या युद्धातल्या विजयानंतर अहमदशाह अब्दालीनं २ महिन्यांनंतर तब्बल २२ हजार मराठा युद्ध कैद्यांना घेऊन अफगाणिस्तानच्या दिशेने कूच केली. पण अब्दालीचा ताफा जेव्हा पंजाबमध्ये पोहोचला, तेव्हा शीख लढवय्यांनी युद्धकैदेत असलेल्या अनेक महिलांची सुटका केली.

भारताची सीमा पार केल्यावर आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांत संपल्यावर बलुचिस्तानातलं डेरा बुगती हे क्षेत्र सुरु होतं. याच ठिकाणी अहमदशाह अब्दाली युद्धकैद्यांसोबत पोहोचला.

 

 

पानिपतच्या युद्धामध्ये बलुची शासकाचे काही सैनिक अब्दालीच्या बाजूनं लढले होते. त्यामुळे अब्दालीला त्या मदतीचचा मोबदला द्यायचा होता.

अब्दालीनं सारे मराठी युद्धकैदी बलुचिस्तानच्या शासकाला भेट स्वरुपात दिले. जे अखेरपर्यंत तिथेच राहिले. मराठा युद्धकैद्यांना बलुचिस्तानमध्येच सोडण्याचं आणखी एक कारण होतं. ते म्हणजे,

मोठ्या प्रवासामुळे मराठा युद्धकैदी अशक्त झाले होते, त्यामुळे अशा युद्धकैद्यांचं काय करायचं? असा प्रश्न अब्दालीला पडला होता आणि म्हणूनच पिच्छा सोडवण्यासाठी अब्दालीनं युद्धकैद्यांना बलुचिस्तानातच सोडलं.

मीर नासीर खान नूरीने तब्बल २२ हजार मराठा युद्ध कैद्यांची वर्गवारी केली. त्याने सैनिकांची वेगवेगळ्या जमातींमध्ये विभागणी केली. त्यात बुगती, मर्री, गुरचानी, मझारी आणि रायसानी कबिल्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे वेगवेगळ्या बलुची जमातींमध्ये आजही मराठा उपजमात कायम आहे.

 

 

तेव्हापासून युद्धकैदी म्हणून येथे वावरलेल्या मराठी पूर्वजांनी पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या प्रांतांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बलुचिस्तानच्या मातीला कवटाळीत नव्या जीवनाचा आरंभ केला. पण या मातीत आपल्या मराठी संस्कृतीची पाळेमुळे रुजवायला मात्र ते विसरले नाहीत.

या लढवय्या मराठ्यांचा सुरुवातीचा काळ कठीण होता. जिथं त्यांना सोडण्यात आलं, त्या भागात ना शेती होती, ना पाणी…! अखेर पाण्याची जागा शोधून मराठ्यांनी शेती करणं सुरु केलं आणि त्यानंतर कुठे खऱ्या अर्थाने आयुष्याला सुरुवात झाली.

 

 

मराठी युद्धकैद्यांचे वंशज आज मुस्लिम झाले आहेत, पण आजही त्यांच्या राहाणीमानामध्ये मराठी संस्कृतीची छाप दिसते. बलुचिस्तानमधल्या मराठी अंशाचे पुरावे त्यांच्या जातीतल्या उपनामावरूनही दिसून येतात.

इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू यांचं नाव बुगती मराठ्यांच्या उपजातीला देण्यात आलं, इतकंच नाही, तर पेशव्यांशी जवळीक साधणारं पेशवानी हे नावही बलुची मराठ्यांमध्ये प्रचलित आहे.

शाहू मराठ्यांनी भलेही इस्लामचा स्वीकार केला असला, तरी त्यांच्या लग्नांमध्ये मराठी संस्कृतीची झलक दिसून येते. आपल्याकडे जशी लग्नापूर्वी हळद लागते, हळदीनंतर स्नान होतं, माप ओलांडणे आणि गाठ बांधणे, या साऱ्या प्रथा बुगती मराठ्यांच्या लग्नांमध्ये होतात.

केवळ संस्कृती आणि चालीरीतीच नाही, तर बलुचींची भाषाही मराठी भाषेशी नातं सांगते. शाहू मराठा जमातीमध्ये मातेसाठी मराठमोळा आई हाच शब्द वापरला जातो. या शब्दाला मूळ बुगती समाजानंही स्वीकारलंय. इथल्या महिलांची कमोल, गोदी अशी मराठी नावंही आहेत.

सर्वाधिक मराठा वंशज हे बुगती जमातीमध्ये आहेत. १९६० च्या दशकात ब्रिटिश लेखिका सिल्विया मॅथेसन यांनी लिहिलेल्या टायगर्स ऑफ बलुचिस्तान या पुस्तकात बुगती मराठा समाजाचा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे.

 

 

९० च्या दशकामध्ये प्रदर्शित झालेली तिरंगा ही फिल्म बलुचिस्तानात खूप गाजली होती, या फिल्ममध्ये नाना पाटेकरनं पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यात –

मै मराठा हूँ…. और मराठा मरता नहीं….मराठा मारता है!

असा डायलॉग नाना पाटेकरांनी उच्चारताच थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्यांचा पाऊस पडायचा.

एवढंच नाही, तर बलुचिस्तानमधला बुगती मराठा आजही द ग्रेट मराठा ही हिंदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून आपल्या नव्या पिढीला त्यांचा पूर्व इतिहास सांगतो.

असा हा आपला मराठी बांधव आजही हजारो किमी दूर राहून परमुलुखात मराठी संस्कृती रुजवून ताठ मानेने जगतो आहे. त्यांच्या या मराठी बाण्यास मानाचा मुजरा!

===

हे ही वाचा – भारतावर २०० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्भुत कथा

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version