आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
श्रीकृष्ण स्तुतीमधील एक श्लोक आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल –
“मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम्।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम्॥”
म्हणजेच ज्याच्या कृपेने मूक व्यक्ती बोलू लागते आणि दिव्यांग व्यक्ती पर्वत चढते त्या परम आनंद स्वरूप माधवाला मी प्रणाम करतो.
इथे प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असली तरीही एक गोष्ट मात्र कुणीच नाकारू शकत नाही. ती गोष्ट म्हणजे मनात तीव्र इच्छाशक्ती असली आणि तिच्या जोडीला अथक प्रयत्नांची जोड आणि प्रचंड धैर्य व चिकाटी असली की अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते.
भलेही मग परिस्थिती कितीही कठीण असो, तुमच्या बरोबर कुणी असो वा नसो, तुमच्या जिद्दीने आणि प्रयत्नांनी तुम्ही काहीही शक्य करून दाखवू शकता. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे भारतीय ब्लेड रनर, छत्तीसगडचा चित्रसेन साहू होय.
चित्रसेन साहू ज्याला “हाफ ह्युमन रोबो” असे देखील म्हटले जाते त्याने त्याच्या कृत्रिम पायांच्या साहाय्याने युरोपचे सर्वात उंच शिखर सर करून तिथे अभिमानाने तिरंगा फडकावून एक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.
२३ ऑगस्ट २०२१ रोजी चित्रसेनने ही अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे. चित्रसेनने सर केलेले हे युरोप खंडातील सर्वात उंच शिखर म्हणजे रशियातील माउंट एलब्रुस होय. या शिखराची उंची ५६४२ मीटर म्हणजेच १८५१० फूट आहे.
या शिखरावर पोहोचणे म्हणजे खायचे काम नाही. उणे २५ ते उणे १५ डिग्री तापमान, ७० किमीच्या वेगाने वाहणारे वारे, सतत पडणारा बर्फ अशा कठीण परिस्थितीत चित्रसेनने ही कामगिरी करून दाखवली आहे. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी दोन हात करत तो मजल दरमजल करत शिखरापर्यंत पोहोचलाच आणि तिथे त्याने आनंद साजरा करीत अभिमानाने आपला तिरंगा फडकावला.
त्याने या प्रवासाची सुरुवात १९ ऑगस्ट रोजी केली. आणि २३ ऑगस्ट रोजी तो भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून २४ मिनिटांनी शिखरावर पोहोचला.
हे मिशन पूर्ण करण्यासाठी त्याला अमेरिकेच्या नॉर्थ अमेरिका छत्तीसगड असोसिएशनने साहाय्य केले आणि इतर ठिकाणांहून सुद्धा त्याला काही प्रमाणात आर्थिक पाठबळ लाभले. उरलेला सगळा खर्च त्याने स्वतः केला. छत्तीसगड गृहनिर्माण मंडळात २९ वर्षीय चित्रसेन सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करतो आणि पर्वतारोहण हे त्याचे पॅशन आहे.
–
- जिला चालताही येणार नाही, असं म्हटलं गेलं तिने ऑलिम्पिक पदकांपर्यंत घेतली ‘धाव’!
- पायातले बूट चोरीला गेले तरीही गोल्ड मेडल मिळवणाऱ्या जिद्दी पठ्ठ्याची कथा
–
जिद्द होती म्हणून…
१२ ऑक्टोबर १९९२ रोजी छत्तीसगडच्या बालोड येथे चित्रसेनचा जन्म झाला. गावातल्याच सरकारी शाळेत त्याचे शिक्षण झाले. आणि नंतर बिलासपूर येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्याला एअर फोर्समध्ये प्रवेश मिळाला होता आणि तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता परंतु एक दिवस त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.
४ जून २०१४ रोजी तो अमरकंटक एक्सप्रेसने प्रवास करत होता आणि भाटापारा स्टेशनवर तो पाणी घेण्यासाठी उतरला आणि तो परत येईपर्यंत गाडी हळूहळू सुटली होती. तो पळत पळत गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याने हॅन्डल धरण्याचा प्रयत्न केला पण ते हॅन्डल गुळगुळीत झाले होते आणि त्यामुळे दुर्दैवाने त्याचा हात निसटला. त्याचा तोल गेला आणि तो चालत्या गाडीतून पडला.
यात त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्याचा एक पाय कापून टाकावा लागला. चोवीस दिवसांनी वैद्यकीय हलगर्जीमुळे त्याचा दुसरा पाय देखील कापावा लागला.
आयुष्यात इतका भयंकर प्रसंग येऊन सुद्धा त्याने हार मानली नाही. नैराश्याला आयुष्यात स्थान न देता त्याने त्याचे आयुष्य परत नव्या जोमाने सुरु केले. आयुष्यात तुम्हाला एकच गोष्ट विकलांग करू शकते, ती गोष्ट म्हणजे नैराश्य होय. बाकी काहीही तुम्हाला तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यात थांबवू शकत नाही. हे चित्रसेनने सिद्ध करून दाखवले.
त्याच्या अपघातानंतर त्याला भेटायला येणारे लोक त्याच्याकडे दयेने बघत होते, तेव्हाच त्याने ठरवले की त्याला आधी स्वतःचा आत्मविश्वास परत जागा करावा लागेल.
चित्रसेन म्हणतो की “जर तुम्ही तुमच्या मनावर, नकारात्मक विचारांवर विजय मिळवला, तर तुम्ही जग जिंकलेच म्हणून समजा. आयुष्यात चढउतार तर येणारच. पण आपण पुढे जात राहिले पाहिजे. स्वतःवर भरवसा ठेवला पाहिजे.”
कृत्रिम पायांच्या मदतीने हळूहळू चालायला लागल्यानंतर चित्रसेनने खेळणे सुरु केले. सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला. परंतु काही दिव्यांग मित्रांच्या बरोबर त्याने राजनांदगाव ट्रेनिंग कॅम्पमधून व्हीलचेअर बास्केटबॉल खेळण्यास सुरुवात केली.
२०१७ मध्ये त्यांची टीम तयार झाली आणि त्या संघाचे प्रतिनिधित्व चित्रसेनने केले. त्यानंतर त्याने तिथेच न थांबता महिलांची देखील टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण दिले. त्याने बास्केटबॉल खेळण्याबरोबरच ५ किमी मॅरेथॉनमध्ये देखील भाग घेऊन ती न थांबता पूर्ण केली.
–
- अपघातामुळे आलेले नैराश्य ते ऐतिहासिक सुवर्णवेध, वाचा, जिद्द म्हणजे काय ते समजेल!
- कोरोनाशी सुरु असलेली झुंज ‘त्याने’ थेट एव्हरेस्टच्या शिखरावर संपवली
–
चित्रसेन इथेच थांबला नाही. तो देशातील एकमेव असा युवक आहे जो डबल लेग अँप्युटी आहे आणि त्याने यापूर्वी देखील कठीण शिखरे सर केली आहेत. हिमाचलचे एक १४ हजार फुटांचे शिखर त्याने काबीज केले आहे. तसेच आफ्रिकेतील टांझानियामधील ५६८५ मीटर उंच माउंट किलिमांजारोचे कठीण शिखर त्याने सर केले आहे.
चित्रसेनचे “सेवन सम्मिट” पूर्ण करण्याचे ध्येय आहे. म्हणजेच जगातील सगळ्यात उंच सात शिखरे चढण्याची त्याची मनीषा आहे. याच बरोबर देशातील दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या पायावर भक्कमपणे उभे करण्याची देखील त्याची इच्छा आहे. चित्रसेन हे नक्कीच करू शकतो कारण त्याची जिद्द आणि त्याचे प्रयत्न ह्यांच्या जोरावर त्याने आजवर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. सगळ्यांनाच प्रेरणदायी अश्या चित्रसेन साहूला एक कडक सॅल्यूट!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.