आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक – ईशान पांडुरंग घमंडे
===
विराट कोहलीच्या संघाने ५० वर्षांनंतर ओव्हलच्या मैदानावर कसोटी विजय मिळवला आणि या विजयाची झिंग क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अजूनही कायम होती, तेवढ्यातच आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. आता यावरूनच उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. ही संघनिवड खरंच अनपेक्षित आहे, असंच मलाही वाटतंय. आज जरा याबद्दलच बोलूया.
ही संघनिवड फारच अनपेक्षित असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, रविचंद्रन अश्विन याचं संघात झालेलं पुनरागमन! वॉशिंग्टन सुंदर जायबंदी झाल्यामुळे जर अश्विनला परत बोलावण्याची वेळ निवडसमितीवर येत असेल, तर परिस्थिती कठीण आहे.
भारतीय संघाला स्पिनरची, विशेषतः ऑफस्पिनरची कमतरता भासत असेल, तर याला भारतीय क्रिकेटचं दारिद्र्य म्हणायला हवं!
अश्विन चांगला खेळाडू नाही, अशातला भाग नाही. मात्र चार वर्ष ज्याला संघात स्थान मिळालं नाही, तो तुमचा मुख्य स्पिनर म्हणून पुनरागमन करतोय, हे बघवत नाही.
या खेळाडूंचं काय?
आता थोडं वरूण चक्रवर्तीबद्दल बोलूया. याला संघात स्थान मिळणं फारसं काही रुचलं नाही. त्याला घेतलं म्हणून नव्हे, तर वरुण आणि राहुल चहरला संघात घेताना युजवेंद्र चहलकडे साफ दुर्लक्ष केलं गेलं म्हणून… राहुल चहर हा चांगला खेळाडू आहे, वरुणही तसा गुणीच आहे, पण अनुभव पाहता, या दोघांपैकी एकाचा विचार न होता युजवेंद्रला संघात घ्यायला हवं होतं.
–
- पुरुष संघ तुपाशी… महिला संघ उपाशी… हे दुटप्पी धोरण कधीपर्यंत सुरु राहणार?
- क्रिकेटची अशीही कथा : १ नव्हे २ क्रिकेट मॅच, जेव्हा सर्व ११ खेळाडूंना, “मॅन ऑफ द मॅच” पुरस्कार मिळाला…
–
तिसरं प्रश्नचिन्ह आहे, ते अक्षर पटेलवर… कुलदीप यादव सध्या अपेक्षित कामगिरी करत नाहीये हे अगदीच खरंय. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळणं अनेकांना कठीण वाटत होतंच. पण जडेजा असताना अक्षर पटेलला मिळालेली संधी काही मनाला अजिबातच पटली नाही. यामागे काय कारण असावं, ते निवडसमितीच जाणे.
त्याच्याऐवजी अन्य एखाद्या खेळाडूला संधी द्यायला काही हरकत नव्हती.
आता मला बोलायचंय शार्दूल ठाकूर आणि दीपक चहरविषयी. राहुलला अंतिम १५ जणांमध्ये स्थान मिळालं, आणि मोठा भाऊ दीपक मात्र राखीव खेळाडूंमध्येच राहिला. तीच गत सध्या ‘लॉर्ड शार्दूल’ नावाने फेमस झालेल्या ठाकूरची! शमी, बुमराह, भुवी ही वेगवान गोलंदाजांची फळी बघता, शार्दूल किंवा दीपकपैकी एकजण १५ जणांमध्ये हवा होता.
खरंतर, ठाकूर साहेबांचीच वर्णी लागायला हवी होती. ‘लॉर्ड शार्दूल’ सध्या आयुष्यातील सगळ्यात झकास फॉर्मात आहे असं म्हटलं, तरी त्यात चूक काहीच नाही.
ईशानची निवड योग्य पण…
ईशान किशनला संघात स्थान देणं हा उत्तम निर्णय म्हणायला हवा. त्याचं संघात असणं तीन महत्त्वपूर्ण बाबी पूर्ण करणारं ठरणार आहे. त्यातील दोन म्हणजे तो बॅकअप ओपनर आणि विकेटकिपर आहे.
दुसरं म्हणजे रिषभच्या वागण्यावर थोडा अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय दमदार ठरतोय. पंत साहेब आगाऊपणा थोडा कमी करतील आणि मनावर संयम ठेवतील अशी अपेक्षा आहे.
हे करत असताना, ईशान सोडून इतर कुठल्याही बॅकअप ओपनरचा विचार मात्र करण्यात आलेला नाही. रोहित आणि राहुल वगळता हाडाचा सलामीवीर कुणी असेल, तर तो ईशानच! विराट हा ‘गरज पडल्यावर’ सलामीवीर होऊ शकतो ही गोष्ट निराळी…
फलंदाजीची बेंच स्ट्रेंग्थ (?!) म्हणावी का?
सारासार विचार केला तर, ईशान किशन, अक्षर पटेल ही मंडळी काही गोलंदाज आणि अष्टपैलूंसह बेंच गरम करतील. बेंच गरम करणाऱ्या खेळाडूंमध्ये हेच त्यातल्या त्यात बरे फलंदाज दिसतात. म्हणजेच काय, तर फलंदाजीची बेंच स्ट्रेंग्थ अत्यंत वाईट आहे असंच म्हणायला हवं.
पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पड्डीकल किंवा तत्सम काही नव्या खेळाडूंपैकी एखादा फलंदाज राखीव आणि श्रेयसला १५ जणांमध्ये स्थान हा पर्याय सुद्धा काही वाईट नव्हता. पण शिखर धवनला कायमचा डच्चू देण्याच्या नादात, इतरही काही फलंदाजांकडे निवडसमितीचं दुर्लक्ष झालेलं दिसतंय.
धोनीचं संघासोबत असणं उत्तम…
मेंटॉर या नव्या भूमिकेत महेंद्रसिंग धोनी दिसणार आहे. त्याची खेळाचं आकलन करण्याची क्षमता, नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची आणि त्यांचा योग्यप्रकारे वापर करण्याची पद्धत याचा संघाला फायदा होणार हे नक्की!
याशिवाय थोडंसं ‘सुपरस्टीशियस’ व्हायचं झालं, तर माहीचा मिडास टच विराटसेनेसोबत असेल. नशिबाच्या बाबतीत माही नियतीचा खास बनून आलाय, असं अनेकदा बघायला मिळालं आहे. तेच नशीब थोडं विराटच्या सोबतीला असावं, अशी इच्छा एक क्रिकेट चाहता म्हणून नक्कीच आहे.
एकूणच काल घोषित झालेला भारतीय संघ बघता, विराट कोहली, रवी शास्त्री, धोनी आणि मंडळींना वर्ल्डकप स्पर्धेचा पेपर तसा कठीणच जाणार आहे, असं दिसतंय. आपण, मात्र आपल्या शुभेच्छांचा वर्षाव करूया आणि भारतीय संघांच्या विजयासाठी प्रार्थना करूया. बाकी मैदानावर जे करायला हवं, ते ‘विराट सेना’ करेलच…!!!
===
- १९८३ वर्ल्डकप – फारुख इंजिनियरची “ती” भविष्यवाणी खरी ठरली!
- …म्हणून मग लिटल मास्टर गावसकरांनी डावखुरी फलंदाजी केली होती!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.