Site icon InMarathi

‘आशाताईंचा कमबॅक’ समजला जाणारा ‘रंगीला’सुद्धा आज २६ वर्षांचा झाला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

९० च्या दशकाचे तुम्ही फॅन असाल तर ‘रंगीला’ हा सिनेमा तुम्ही कधीच विसरू शकणार नाही, त्या काळातल्या प्रत्येक तरुणाला आपल्या मादक अदांनी घायाळ करणारी उर्मिला मातोंडकर ही कित्येकांची ड्रीम गर्ल झाली होती.

‘तनहा तनहा’ आणि ‘हाय रामा’ या २ गाण्यातल्या तिच्या मोहक अदा, तिचा नितांत सुंदर अभिनय, आमीर खानचा एक वेगळाच अंदाज, नेहमीच डॅशिंग अंदाजात वावरणाऱ्या जग्गू दादा उर्फ जॅकी श्रॉफ यांची वेगळीच भूमिका, रेहमानचं अप्रतिम संगीत, राम गोपाल वर्मासारख्या दिग्दर्शकाचा एक वेगळाच टच, सगळीच भट्टी जमून आली होती!

 

 

८ सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाला २६ वर्षं पूर्ण झाली आहेत, हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड मानला जाणाऱ्या या सिनेमाला तेव्हा लोकांनी मिश्र प्रतिसाद दिला.

कारण त्यानंतरच रिलीज झालेल्या यश चोप्रा बॅनरच्या ‘DDLJ’ या सिनेमाने संपूर्ण मार्केट खाल्लं, आणि शाहरुख नावाच्या वादळात रंगीलासारखा क्लास सिनेमा लोकांच्या विस्मरणात गेला.

राम गोपाल वर्मा या दिग्दर्शकाचं करियर सेट करणाऱ्या रंगीलानंतर त्यांनी कधीच लव्ह स्टोरीला हात घातला नाही, नंतर रामु आणि गँगस्टर, हॉरर हे समीकरण जुळलं ते कायमचं!

firstpost

 

आजकाल रामूचं नाव हे फक्त वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतं, पण एकेकाळी इंडस्ट्रीला एक वेगळी दिशा देणाऱ्या रामूच्या रंगीलाला आज २६ वर्षं पूर्ण झाली आहेत आणि आजही या सिनेमाची जादू प्रेक्षकांवर कायम आहे हीच तर खरी मेख आहे!

उर्मिला, आमीर, रेहमानपासून ते अगदी आशाताईंच्या करियरला एक वेगळंच वळण देणाऱ्या रामूच्या या रंगीलाविषयी काही खास गोष्टी या लेखात जाणून घेऊयात!

१. ओपनिंग क्रेडिट्सची कमाल :

 

 

रंगीला हा सिनेमा २ वेगळ्या दुनियेशी ओळख करून देतो, एक म्हणजे सिनेसृष्टीतल्या झगमगाटाची दुनिया आणि दुसरी म्हणजे सामान्य आयुष्य जगणाऱ्या लोकांचे वास्तव. आणि याच दोन गोष्टी सिनेमाची टायटल्स सुरू होताना प्रकर्षाने जाणवतात.

नावाप्रमाणेच वेगवेगळ्या रंगांनी नटलेल्या या सिनेमाच्या सुरुवातीला एकीकडे आपल्याला टायटल्स दिसतात आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जुन्या हीरो हिरॉईन्सचे फोटोज दिसतात, आणि यामागे तुम्हाला कोणतंही म्युझिक ऐकू येणार नाही.

ही टायटल सुरू असताना तुम्हाला फक्त मागे मुंबईच्या गर्दीचा ट्रॅफिकचा, लोकांचा आवाज, किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज् ऐकू येतो. इथे रामू हा का एवढा ग्रेट आहे याची जाणीव होते!

२. बॉलीवूडला रेहमानसारखा संगीत दिग्दर्शक मिळाला :

 

 

रंगीला जेव्हा आला तेव्हा रेहमान आधीच स्टार झाला होता, साऊथच्या सिनेमांमधून त्याने स्वतःच्या वेगळेपणाची पावती दिली होती. १९९३ सालच्या बॉम्बे या सिनेमाच्या गाण्यांनी तर रेहमानला साऊथचा स्टार बनवला होता.

त्यांनंतरचा रंगीला हा रेहमानचा पहिला आरिजिनल हिंदी साऊंड ट्रॅक ठरला आणि अक्षरशः लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. एकाचवेळी मिलिसारख्या पात्रासाठी ‘तनहा तनहा’ सारखं गाणं देणाऱ्या रेहमानने मुन्नाला सूट होणाऱ्या स्टाईलमध्ये ‘यारों सूनलो जरा’ हे गाणं देऊन रेहमानने बॉलीवूडवर त्यांची छाप सोडली ती कायमची!

याबरोबरच उत्कृष्ट संगीतासाठी रेहमानला त्यावेळचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला आणि नंतर रेहमान नावाचं वावटळ बॉलीवूडमध्ये शिरलं आणि भल्याभल्या संगीतकारांचं थाटलेलं दुकान बंद झालं.

३. आशा भोसले यांच्या करियरला किकस्टार्ट मिळाला :

 

 

एक पिढी आपल्या गायकीने समृद्ध करणाऱ्या आशा भोसले यांच्यासाठी रंगीला हा सिनेमा खूप महत्वाचा ठरला. बऱ्याच वर्षांनी या सिनेमातून आशाताईंनी संगीतात कमबॅक करत पुन्हा सिद्ध केलं की या क्षेत्रात आजही त्याच अव्वल आहेत!

त्यांच्या वाढदिवशी रिलीज झालेल्या या सिनेमाने आशाताईंच्या करियरला पुन्हा वर आणलं. रेहमानने संगीतबद्ध केलेल्या ‘रंगीला रे’ आणि ‘तनहा तनहा’ या गाण्यासाठी रामूने आशाजी यांची निवड केली.

खरंतर तेव्हा ६५ व्या वर्षी एका २१ वर्षाच्या तरुणीला आवाज देणं हे तसं धाडसी पाऊल होतं, पण आशा भोसले यांनी ते शिवधनुष्य पेललं आणि ती दोन्ही गाणी सुपरहीट झाली.

गाण्याच्या आधी अभिनेत्रीचं नाव विचारून तिच्या व्यक्तिमत्वाला साजेसा असा आवाज देणाऱ्या आशाताईंच्या करियरचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे रंगीला, जिथे जुन्या गायिकांनी करियर थांबवून रॉयल्टीवर आयुष्य घालवायचं ठरवलं तिथे “६५ वर्षाच्या तरुण” आशाताईंनी आपलं करियर पुन्हा ट्रॅकवर आणून स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं!

४. आमीरची इमेज चेंज करणारा सिनेमा :

 

 

या सिनेमातल्या अॅक्टरचं कास्टिंग बघाल तर ते अगदी उलट होतं, जिथे जॅकी श्रॉफ त्यांच्या टपोरी भिडू स्टाइलसाठी फेमस होता तिथे त्याला एक पॉलिश्ड घरंदाज हीरो म्हणून दाखवलं, आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन स्टारकीड म्हणून करियर सुरू करणाऱ्या आमीरला एका टपोरीच्या भूमिकेत दाखवलं गेलं!

आमीरची चॉकलेट बॉयची इमेज ब्रेक करून त्याच्यातला अभिनेता बाहेर काढण्यात रामूच्या रंगीलाचा सिंहाचा वाटा आहे, खरंतर आमीरच्या परफेक्शनची सुरुवात रंगीलापासूनच झाली असं म्हंटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही.

राखसारखा एक वेगळा सिनेमा वगळता आमीरने असा रोल पाहिल्यांदाच केला, लोकांनी त्याने साकारलेला मुन्ना डोक्यावर घेतला. टिपिकल बंबईया भाषेचा टोन त्याने अगदी परफेक्ट पकडला होता, त्यानंतर आमीरने तो प्रयत्न गुलामसारख्या सिनेमातसुद्धा केला पण रंगीलाच्या मुन्नाची सर त्याला आली नाही!

५. बॉलिवूडला टॉपचा कॉस्च्युम डिझायनर मिळाला :

 

 

हैद्राबादमध्ये शूट सुरू असताना कॉस्च्युम डिझायनर नीता लूल्ला काही कारणास्तव शूटिंगसाथी येऊ न शकल्याने त्यांनी आपल्या असिस्टंटला सेटवर पाठवलं आणि रामूने त्या असिस्टंटलाच कॉस्च्युम डिझायनर म्हणून कामावर ठेवलं, तो असिस्टंट म्हणजे मनीष मल्होत्रा!

आज बॉलीवूडच्या अर्ध्याहून अधिक फिल्म्सच्या वेशभुषेवर काम करणाऱ्या, स्वतःचा ब्रॅंड निर्माण करणाऱ्या मनीष मल्होत्राने रंगीलासाठी कॉस्च्युम डिझाईन केले होते हे आज कोणाला सांगितलं तर आश्चर्यच वाटेल.

६. एकही व्हिलन नसलेला बहुतेक पहिलाच सिनेमा :

 

 

रंगीलाला म्हणावं तसं यश न मिळण्यामागचं कारण आमीरनेच रामूला दाखवून दिलं होतं. सिनेमातली तिन्ही पात्र ही चांगली आहेत. मुन्ना, मिलि आणि कमल ही तिन्ही पात्र पॉझिटिव्ह असल्याने या सिनेमात व्हिलन खरंतर कुणीच नाही.

हा सिनेमा बहुतेक पहिला वहिला सिनेमा असेल ज्यात सगळेच हीरो आहेत आणि एकही व्हिलन नाही!

७. मुंबईचा फिल्मीपणा दाखवणारा सिनेमा :

 

 

आमीरच्या “दस का बीस” असं म्हणत थिएटरबाहेर ब्लॅक करण्याच्या सीनपासून उर्मिलाच्या वडिलांच्या फिल्मी गाण्यांच्या प्रेमापर्यंत हा सिनेमा फक्त एकाच गोष्टीभोवती फिरतो ती म्हणजे फिल्मी दुनियेत वेडं झालेलं मुंबई शहर!

आणि हीच या सिनेमाची युएसपी होती. कित्येकांच्या स्वप्नातली मुंबईची फिल्मी दुनिया आणि खरं आयुष्य यातला फरक प्रभावीपणे मांडणाऱ्या काही मोजक्या सिनेमांपैकी एक म्हणजे रंगीला!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version