Site icon InMarathi

जिला चालताही येणार नाही, असं म्हटलं गेलं तिने ऑलिम्पिक पदकांपर्यंत घेतली ‘धाव’!

wilma rudolf inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आयुष्य प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने आव्हान देत असतं. कुणी थकून भागून मध्येच हार मानतात तर कुणी त्या लढाईत त्या आव्हानांना पार करत दुःखाला आपल्या टाचेखाली ठेवून जेते बनतात. अशाच एका जेत्या मुलीची ही प्रेरणादायी कहाणी!

तिचं नांव विल्मा रुडाॅल्फ. पोलिओग्रस्त असलेल्या या मुलीने ऑलिंपिकमध्ये धावण्याच्या स्पर्धेत मेडल्स मिळवली आहेत. ऑलिंपिक म्हणजे जगातील उत्तमातील उत्तम खेळाडू आणि त्यांच्यात असणारी स्पर्धा.

ही स्पर्धा जिंकणारा खेळाडू अर्थातच सर्वोत्तमच मानला जातो. अशा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक धावपटू विल्मा रुडाॅल्फ!

 

 

जन्माला आलेल्या क्षणापासून विल्माच्या नशिबात फक्त संघर्षच लिहीला होता. २३ जून १९४० रोजी विल्माचा जन्म टेनेसी इथे एका अतिशय गरीब कुटुंबात झाला. ही वेळेआधी जन्मलेली मुलगी, प्रीमॅच्युअर बेबी!

जन्मावेळी तिचं वजन होतं केवळ साडेचार पौंड. सहा सात पौंड वजनाचं बाळ हातात घेतानाही आपल्याला भीती वाटते बाळ हातून पडेल का? ही तर त्याहूनही छोटी होती. वर्णभेदाचा प्रचंड पगडा असलेला तो काळ.

कृष्णवर्णीय असल्याने विल्माला तिच्या आईला दवाखान्यात प्राथमिक उपचार सोयीही मिळाल्या नव्हत्या. लहानपणी विल्माला गोवर, गालगुंड आणि कांजिण्या झाल्या. हे कमी होतं म्हणून न्युमोनिया झाला तोही दोनदा! त्यावेळी आई जे काही घरगुती उपाय करायची त्यावरच विल्मा जगली.

===

===

अखेरीस एकदा तिच्या डाव्या पायाला थोडा बधीरपणा जाणवू लागला तसं तिला दवाखान्यात नेलं. तिथं डाॅक्टरांनी तिला तपासून सांगितलं, हिला पोलिओ झाला आहे आणि ही मुलगी आयुष्यात कधीही चालू शकणार नाही.

 

 

विल्माची आई अतिशय जिद्दीची होती. तिने आपली मुलगी कधीही चालणार नाही हे अजिबात मान्य केलं नाही. आपल्या मुलीच्या उपचारासाठी तिनं खूप ठिकाणी चौकशी केली.

त्यात नॅशव्हिले इथे असलेलं कृष्णवर्णीय लोकांचं मेडिकल कॉलेज तिला माहित झालं. हे काॅलेज त्यांच्या क्लार्कव्हिले गावापासून ५० मैल अंतरावर होतं. आठवड्यातून दोन वेळा ती विल्माला घेऊन तिथं जायची.

अखेरीस दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर विल्मा मेटल ब्रेसच्या आधाराने चालू लागली. केवळ आईच नव्हे तर अख्खं रुडाॅल्फ कुटुंब विल्माच्या पाठीशी उभं होतं.

घरातले लोकच विल्माला पायाला फिजिओथेरपी देत. असं आजारी मूल सांभाळणं ही सहनशक्तीची परीक्षा असते. आणि रुडाॅल्फ कुटुंबानं ती परीक्षा पार पाडली होती.

वयाच्या बाराव्या वर्षी विल्मा कसल्याही आधाराशिवाय चालू लागली. आता विल्माला अॅथलेटीक्सचे वेध लागले. तिला बास्केटबॉल खेळायचा होता. मोठ्या मुश्किलीने तिनं त्यात भाग घेतला आणि एका सामन्यावेळी स्टेट कोच असलेल्या टेंपलनी तिला पाहीले. आणि तीच वेळ तिचं नशीब बदलून टाकणारी ठरली.

त्यांनी तिला उन्हाळी शिबीरामध्ये यायला सांगितलं. इथंच तिला धावण्याची आवड निर्माण झाली. तिच्या पायाला आधारासाठी बांधलेली धातूची पट्टी काढून टाकल्यानंतर दोनच वर्षांनी विल्मा धावली ती १९५६ साली झालेल्या ऑलिंपिकमध्ये!

 

 

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी विल्माने चारशे मीटर रिलेमध्ये ब्राँझपदक जिंकलं. चार वर्षांनंतर रोममध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये तिनं भाग घेतला आणि १०० मीटर, २०० मीटर आणि चारशे मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. अमेरिकेतील तीन सुवर्ण पदके जिंकणारी ती पहिली महिला ठरली.

त्यावेळी तिचं प्रचंड कौतुक झालं. फ्रेंच पत्रकारांनी तिचं वर्णन कृष्णवर्णीय मोती असं केलं. तर इटालियन पत्रकारांनी तिला कृष्णवर्णीय हरीण संबोधलं. अमेरिकेत विल्मा रुडाॅल्फ तुफान होतं!

===

===

घरी परत आल्यानंतर तिच्या कौतुकासाठी एका मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय लोक प्रथमच एकत्र आले.

नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाॅन एफ. केनेडी यांनी तिला व्हाईट हाऊसमध्ये मेजवानीला बोलावलं. अर्धा तास ते तिच्याशी गप्पा मारत होते. ऑलिंपिक चँपियन काही सतत व्हाईट हाऊसमध्ये येत नसतात. असं म्हणून त्यांनी विल्माचा सन्मान केला.

 

 

वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी विल्माने खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिच्या नावावर ऑलिंपिकमध्ये तीनदा सुवर्ण पदक मिळवण्याचा विक्रम नोंदवलेला होता.

१०० मीटर अंतर ११.२ सेकंदात, २०० मीटर अंतर २२.९ सेकंदात, चारशे मीटर रिलेमध्ये ४४.३ सेकंदात पार केलेलं तिचं रेकाॅर्ड होतं.

१९७७ मध्ये विल्मा रुडाॅल्फवर विल्मा हा सिनेमाही आला. इतकंच नव्हे तर पोस्टाने विल्माचं छायाचित्र असलेलं पोस्टाचं तिकीटही जारी केलं. २३ जून हा दिवस विल्मा दिवस म्हणून साजरा केला जातो.

 

 

असं हे विल्मा रुडाॅल्फ नांवाचं तुफान वयाच्या ५२ व्या वर्षी कॅन्सरच्या रोगानं शांत केलं. काही माणसं आपलं आयुष्य असं जगतात की वर्षानुवर्षे त्यांचं नांव जगात कोरलं जातं!

विल्मा अशाच लोकांपैकी एक. आयुष्याला भिडून प्रतिहल्ला करुन जिंकणारी…जगाला प्रेरणा देणारी…गुरु ठाकूरच्या ओळींसारखी.

रडलो नाही.. लढलो भिडलो आयुष्याला… राखेतूनही उठलो अन् यल्गार म्हणालो!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version