' प्रोफेसरचं नेमकं काय होणार? सिरीज आवर्जून पहावी की नुसतीच “हवा”? जरूर वाचा – InMarathi

प्रोफेसरचं नेमकं काय होणार? सिरीज आवर्जून पहावी की नुसतीच “हवा”? जरूर वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

जेव्हापासून ओटीटी प्लॅटफॉर्मचा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आपल्या देशात तयार झाला तेव्हापासून दोन वेबसिरीजची नावं आपण हमखास प्रत्येकाच्या तोंडी ऐकली असतील, एक म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स आणि दुसरी म्हणजे मनी हाईस्ट!

दोन्ही वेबसिरीजच्या बाबतीत तुम्हाला पार टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला, तसेच बघायला मिळतील. काही लोकं या सिरिज म्हणजे जगातल्या सर्वोत्कृष्ट वेबसिरीज असंच मानतात, तर काही लोकं या दोन्ही सिरिजना Overrated म्हणून हिणवतात!

 

money heist inmarathi

 

माझ्यामते कोणतीही कलाकृती भाषेचे बंधन तोडून सगळ्यांना आवडते ती उत्कृष्ट ठरते, आणि याच कॅटेगरीमध्ये मनी हाईस्टसारखी सिरिज अगदी परफेक्ट फिट बसते. मूळ भाषा स्पॅनिश असूनही पहिले इंग्रजी आणि नंतर खास हिंदीत या सिरीजचे डबिंग करण्यात आले.

या सिरिजची भारतातली क्रेज बघता, हिची लोकप्रियता सलमान किंवा तत्सम सुपरस्टारला टक्कर देणारीच आहे. अर्थात या दोघांमध्ये फारसा फरक नाही. मनी हाईस्ट आणि बॉलीवूडचा कोणताही मसाला चित्रपट यांच्यात तसा फारसा फरक नाही.

फक्त पात्रांची योग्य जाण, बारकाईने डिझाईन केलेले अॅक्शन सिक्वेन्स, कुठेही जांभई न येऊ देणारी पटकथा, आणि प्रत्येक सीझनच्या शेवटचे डोकं चक्रावून टाकणारे ट्विस्ट यामुळेच मनी हाईस्ट जरा वेगळी वाटते.

यातही तुम्हाला भरमसाठ मारधाड, इमोशन, ड्रामा, कॉमेडी, सस्पेन्स सगळं अनुभवायला मिळतं जे एकदा हिंदी मसालापटात बघायला मिळतं, फरक फक्त इतकाच असतो की आपल्याइथल्या लोकांना ती गोष्ट तेवढ्या convincingly सादर करता येत नाही!

असो! गेल्या महिन्याभरापासून सगळीकडे एकच गोष्ट ऐकायला मिळत होती, कधी येणार मनी हाईस्ट? अखेर तो क्षण आलाय, मनी हाईस्ट या बहुचर्चित वेबसिरीजचा पाचवा आणि शेवटचा पार्ट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून हा सीझन फिनाले २ भागात विभागला गेला आहे.

 

money heist 2 inmarathi

 

एक भाग आपल्याला आत्ता बघायला मिळणार असून पुढचा भाग ३ डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिरिजची एवढी हाईप का आहे? लोकं या सिरिजची एवढी आतुरतेने का वाट बघत होते? याचं उत्तर देणं खरंतर कठीण आहे कारण ही सिरिज आणि तिला मिळालेली लोकप्रियता ही कल्पनेच्या पलिकडची आहे.

हा सिरिजची गोष्ट बघायला गेलं तर अगदी साधी हाईस्टची गोष्ट आहे पण ही गोष्ट ज्या ग्रँड लेवलवर आपल्यासमोर सादर केली आहे त्यामुळेच कदाचित या सिरिजला एवढं लोकांनी डोक्यावर घेतलं आहे.

स्वतःला क्रांतिकारी म्हणवणारे काही दरोडेखोर पहिले रॉयल मिंटवर धाड टाकून अरबो रुपये लुटून सहीसलामात बाहेर पडतात, ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा स्पेनच्या लोकांच्या नजरेत ते हीरो बनतात.

याच लोकांच्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा फायदा घेऊन आता तीच टोळी बँक ऑफ स्पेन मध्ये शिरते आणि स्पेनच्या अस्तित्वाला धक्का लावायचा प्रयत्न करते, या सगळ्यात त्यांचा म्होरक्या प्रोफेसर एका वेगळ्याच अडचणीत सापडतो आणि तिथेच या सिरिजचा ४ था सीजन संपतो.

 

season 4 inmarathi

 

आता पुढे नेमके काय होणार? प्रोफेसर पोलिसांच्या तावडीत सापडणार का? वेगवेगळ्या शहरांची नावं घेऊन बँकमध्ये शिरलेले त्याचे सोबती ही सगळी परिस्थिति कशी हाताळणार? बँकमधलं सोनं वितळवून ही लोकं ते बाहेर घेऊन जाऊ शकतील का? अशा काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सीझनच्या पहिल्या भागात मिळतील, तर काही प्रश्नांच्या उत्तरांसाठी डिसेंबरपर्यंत थांबायलाच लागेल.

खरंतर ही सिरिज आणि या सिरिजची आयडियोलॉजी ही डाव्या विचारांची आहे. यातली पात्रं, त्यांना दिलेली क्रांतिकारी ही उपाधी, त्यांच्या जंपसूटचा लाल रंग, साल्वाडोर दाली या पेंटरचं मास्क, बेला चाओ या गाण्याचा केलेला वापर आणि एकंदरच स्पेनमधली सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी आणि इतिहास, सिस्टिमविरोधातला लोकांमधला असंतोष आणि त्याचा केला जाणारा दुरुपयोग हे सगळं बघताना आपल्याला याची जाणीव होते.

या सगळ्या गोष्टी आपण काही वेळासाठी बाजूला ठेवल्या तरी आपल्याला त्यातल्या प्रत्येक पात्राविषयी सहानुभूती निर्माण होते, आणि याच पात्रांशी कनेक्ट झाल्यामुळेच आपण या सिरिजशी सुरुवातीपासून बांधले जातो.

डेनवर, टोकियो, रियो, हेलसिंकी, लिस्बन, ही सगळी पात्रं ज्याप्रकारे आपल्यासमोर मांडली जातात ते बघताना आपण त्यांच्या भूतकाळाशी कनेक्ट होतो, त्यांचा उद्देश किंवा त्यांनी निवडलेला मार्ग चुकीचा जरी असला तरी यातल्या प्रत्येक पात्राच्या बाबत मनात एक विशिष्ट भावना निर्माण होते.

जसं रियो आणि टोकियो यांच्या लव्हस्टोरीकडे बघताना आपण त्यात हरवून जातो, ज्याप्रमाणे डेनवर आणि स्टॉकहोमचं वेगळंच नातं आपण स्क्रीनवर उलगाडताना बघतो, अगदी तसाच पराकोटीचा राग आर्तरो या पात्राविषयी निर्माण होतो.

 

arturo inmarathi

 

यातली सगळीच पात्रं आपल्याला श्वास घेऊ देत नाही, आणि या सगळ्यावर कळस म्हणजे प्रोफेसरचं पात्र. प्रत्येक अडचणीतून सुटका करणारा, कायम प्लॅन बी आपल्या गुलदस्त्यात ठेवून खेळी आखणाऱ्या या प्रोफेसरला पाचव्या सीझनमध्ये हतबल झालेला बघताना खरंच वाईट वाटतं.

खरं बघायला गेलं तर वर उल्लेख केलेली प्रत्येक पात्रं ही नकारात्मक आहेत, पण या सगळ्याच पात्रांना हीरोच्या रूपात सादर करून त्यांना आपल्या मनात घर निर्माण करू देण्यात या सिरिजचे निर्माते यशस्वी झाले आहेत.

इतर ४ सीझनप्रमाणे या पाचव्या सीझनमध्येसुद्धा तुम्हाला श्वास घ्यायला किंवा उठून एक ग्लास पाणी प्यायला उसंत मिळणार नाही कारण, सतत धावणारी पटकथा, एकापाठोपाठ समोर येणारे वेगवेगळे ट्विस्ट आणि डोळ्याचे पारणं फिटेल असे वॉर सिक्वेन्स बघताना आपण खरंच ५ तास स्वतःचं आयुष्य विसरून जातो!

 

money heist season 5 inmarathi

 

गेम ऑफ थ्रोन्ससारख्या एवढ्या बिग बजेट सिरिजलासुद्धा लोकांच्या अपेक्षेप्रमाणे शेवट करता आला नाही, पण मनी हाईस्ट लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होईल हे पहिला पार्ट बघूनतरी स्पष्ट होतंय!

प्रॉपर कमर्शियल मसाला सिरिज असल्याने यातही ओवर द टॉप असे काही सीन्स आपल्याला बघायला मिळतात पण वेगवान पटकथा आणि प्रसंगाला आणखीन गडद करणाऱ्या बॅकग्राऊंड म्युझिकमुळे त्याची आठवण आपल्याला रहात नाही.

प्रोफेसरच्या तोडीस तोड अलिसिया या पोलिस ऑफिसरचं काम लक्षात राहण्यासारखं आहे, पोलिस डिपार्टमेंटने जिला देशद्रोही म्हणून घोषित केलंय तीच अलिसिया आपल्या पोटात वाढणाऱ्या मुलाला घेऊन कशाप्रकारे प्रोफेसरला जेरीस आणते ते बघताना एक गोष्ट जाणवली की अशी महिला पात्रं आपल्याइथल्या सिनेमात का लिहिली जात नाहीत?

 

alicia and tokyo inmarathi

 

एकंदरच मनी हाईस्टच्या या पाचव्या सीझनमधली महिला पात्रं खूप स्ट्रॉंग दाखवली आहेत याची प्रकर्षाने जाणीव होते. जितकं वाईट आपल्याला नैरोबी गेल्यानंतर वाटतं त्याहून दसपट वाईट टोकियोचा शेवट बघताना वाटतं!

बर्लिन हे पात्र जरी अस्तित्वात नसलं तरी त्याचे फ्लॅशबॅक्स खूप सुखावह असतात, मुळात सिरिजच्या सुरुवातीपासून बर्लिन या पात्रावर लोकांनी भरभरून प्रेम केलं त्यामुळे त्याचा शेवट केल्यानंतरही त्याचे काही फ्लॅशबॅक सिक्वेन्स टाकायचा मोह मेकर्सनासुद्धा आवरता आला नाही!

 

berlin inmarathi

 

मनी हाईस्टचं संगीत एक वेगळाच अनुभव देणारं असतं. हळू हळू आवाजात सुरू झालेला म्युझिक ट्रॅक एका पॉइंटला एवढा होतो की त्या प्रसंगातला ड्रामा आणि ते म्युझिक एकाच लेवलवर येतं, हे संगीत सीन्स प्रभावी करतंच शिवाय प्रेक्षकांच्या मनात कायमची छाप सोडतं, जसं पहिल्या सीझनच्या शेवटी बेला चाओ हे गाणं आणि म्युझिक आपल्या कानातून थेट हृदयात उतरतं!

पाचव्या सीझनमध्येसुद्धा तुम्हाला असंच संगीत काही ठिकाणी अनुभवयाला मिळतं, आणि खासकरून क्लायमॅक्सला वाजणारा ट्रॅक आणि त्यांनंतर प्रोफेसरचे हावभाव पाहून आपण स्तब्ध होतो!

सध्या सोशलमीडियावर मनी हाईस्टची एवढी चर्चा का? असं नेमकं काय आहे यात? अशी चर्चा सुरू आहे किंवा आपल्या ओळखीतही बऱ्याच लोकांनी Overrated म्हणून ही सिरिज बघितली नसेल, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे तो!

मनी हाईस्टसारखी कॉमन (बाहेरील कथानकांच्या दृष्टीने कॉमन) कथानक असलेली ही सीरिज एवढी लोकप्रिय होऊ शकते यातच या सिरिजचं आणि त्यातल्या कलाकारांचं यश सामावलं आहे.

money heist inmarathi 2 inmarathi

 

बरीच लोकं आवडीने, काही लोकं पिअर प्रेशरखाली येऊन ही सिरिज बघणार आहेतच यात काही वाद नाही, पण एका कॉमन हाईस्टस्टोरीला एवढ्या ग्रँड लेवलवर सादर करणाऱ्या मनी हाईस्टच्या चाहत्यांच्या संख्येत तसूभरही फरक पडणार नाही!

असो ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी आवर्जून बघा, आणि ज्यांना Overrated म्हणून हिणवायचं आहे त्यांनी खुशाल तसं करा, फक्त आपल्याकडे एक म्हण आहे ती लक्षात ठेवा, “हाथी चले बाजार….” (पुढचं तर तुम्हाला ठाऊक आहेच) धन्यवाद!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?