Site icon InMarathi

दगडूशेठ गणपतीचं हे शब्दचित्र, भक्तिरसपूर्ण अप्रतिम अविष्कार!

dagadusheth ganpati inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान, तेथील सकाळचे मंगल वातावरण प्रत्येक भाविकाने एकदा तरी अनुभवावे असेच असते. त्याच भक्तीमय वातावरणाचे आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अतिशय ओघवत्या भाषेत वर्णन केले आहे श्री. मंगेश उदगीरकर यांनी! त्यांची तीच पोस्ट लेखाच्या रुपात प्रसिद्ध करत आहोत…!

===

लेखक – मंगेश उदगीरकर

===

हिला दगडूशेठ गणपतीचे प्रचंड आकर्षण! अर्थात श्रद्धाही. पुण्यात आल्यापासून सारखी भुणभुण चालली होती. म्हटलं चला जाऊन येऊ. पहाटे सहा वाजता निघालो. फारशी रहदारी नसल्यामुळे अर्ध्या पाऊण तासात पोचलो. मंदिरात गेलो तेव्हा गणपतीला अलंकाराचा साज चढवणे चालू होते.

भव्य मखरात पिवळ्या धमक उजेडात तेजोमय गणेश साजून दिसत होता. त्या देखण्या मूर्तीच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीचे मखर झळाळून निघाले होते. आम्ही हात जोडून समोरच्या आवारात बसलो.

जसजसे गणपतीला सजवले जात होते, तसतसे त्याचे तेज वाढत होते. मी अनिमिष नजरेने न्याहाळत होतो. बाप्पा शांतपणे सगळ्यांकडे पाहत होते. सोनेरी मुकुट, डोक्यापासून भुवयांच्या मधून अर्ध्या सोंडेपर्यन्त आलेला सुवर्णपट्टा, अंगात पीतांबर, हात आशीर्वाद देण्यासाठी उलगडलेले, ती अलंकृत पूजा आणि गणेशाची मूर्ती मला मोहवून गेली.

 

 

मलाच काय आपणा सर्वांना या आराध्या विषयी प्रचंड आपुलकी, श्रद्धा असते. तेहतीस कोट देवांमध्ये ‘ मैत्र’ जागवणारे दोनच देव ! एक गणपति आणि दूसरा श्रीकृष्ण ! बाकी देव मंडळी थोडा वचक ठेऊन असतात.

पण हे दोघे जवळच्या आप्तासारखे भासतात. माझ्या घराला नाव देताना मी गणपती सहस्त्रनाम उघडून बसलो होतो. तेव्हा एक नाव मला विलक्षण आवडले, ‘निरामय’ ! गणपती, मी आणि आमच्या अघळपघळ वृत्तीशी साधर्म्य साधणारे हे नाव आम्हा कुटुंबीयांशी नाते जोडून गेले.

एव्हाना अलंकार चढवून झाले होते. सोनेरी भवतालात गणपति तेजोमय होऊन गेला होता. तेवढ्यात चौघडेवाले अवतीर्ण झाले. मी मागे वळून पहिले. एक रोडेला फाटका माणूस त्या चौघड्याला नमस्कार करताना दिसला. आता याची कडकड सुरू होणार!

 

हे ही वाचा 

===

 

मी थोडा वैतागलो. मी गणेशाला हात जोडून मन एकाग्र करण्याच्या प्रयत्नाला लागलो. तोच चौघड्याचा कडकडाट चालू झाला! गप्प बसण्याशिवाय माझ्या हातात काहीच नव्हते. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की, माझे डोळे गणपतीकडे आणि कान चौघड्याकडे ओढ घेत आहेत. आता चौघड्याने लय पकडली होती. आणि सोबत टाळाची!

 

 

छिन्नुक छिन्नुक अशा टाळाच्या साथीने चौघडा बेभान वाजत होता. मी त्या नादामध्ये तल्लीन होऊन गेलो . प्रत्येक तुकड्याला ‘ कया बात है ‘ ची दाद नकळत देऊन जात होतो. त्या लयीमध्ये मोरयाचा गजर ! टाळ, चौघडा आणि मोरया यांची अशी कांही सरमिसळ होत गेली की, बसल्या जागी माझे पाय चुळबुळ करायला लागले !

माझ्या अवजड शरीराने एखादा पदन्यास टाकावा असा मोह अनावर झाला, इतकी ती लय माझ्या मध्ये भिनली होती. आता ती धुंद लय क्षणात आकाशाला स्पर्श करीत होती तर क्षणात धरतीवर येत होती. तर कधी मध्येच तरंगत होती.

सुर समेवर येतात तसा तो नाद समेवर आला की, आनंद आनंद म्हणतात तो दाटून येई. डोळे बंद करून मी त्या लयी बरोबर एकरूप होऊन गेलो होतो. ती ही लडिवाळपणे माझ्या गळ्यात हात टाकून माझ्याशी गुज करत होती. हा भक्तिरस होता की तालरस होता ते बाप्पा जाणे. पहिल्या पावसाच्या मृदगंधाने जसे वेडेपिसे व्हायला होते तसे काहीसे !

जवळपास पाऊण तासाने हा सोहळा संपला- नव्हे, संपन्न झाला! लोक उठून उभे राहिले. मी हळूच मागे सरकलो. चौघडेवालेही निघण्याच्या तयारीत होते.

आपलं नाव ?………..

जी, जयवंत !

किती सुंदर वाजवता हो !

जी, त्याची कृपा !

त्यांनी बाप्पाकडे पाहून हात जोडले. त्यांच्या जागी दुसरं कुणी असतं, तर काहीतरी बक्षिसी देण्याची जग-रहाटी मी पाळली असती. पण त्याच्या सात्विक चेहर्‍याकडे पाहिल्यावर मला तसे करावेसे वाटले नाही. शेवटी नेमके काय करावे हे न सुचून मी त्याचे पाय शिवले ! माझा हा नमस्कार गणपतीपर्यन्त नक्की पोचला असावा.

 

 

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version