आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
‘‘आपल्या देशात ना, हंटर मारणारा हुकूमशहाच हवा!’’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकत असतो. गर्दी, महागाई, भ्रष्टाचार अशा नाना प्रश्नांनी त्रस्त सामान्य जनतेमधून अशा अर्थाचे उद्गार लोकल ट्रेनच्या गर्दीपासून ते ऑफिस-घरातील गप्पांमध्ये उच्चारले जातात. पण हुकूमशाहीच्या प्रचारी गारुडाला अनेकदा विचारवंतही काही काळ बळी पडलेले दिसून येतात.
सुप्रसिद्ध साहित्यिक, कलाकार आणि विचारवंत रवींद्रनाथ टागोर आणि सुप्रसिद्ध फ्रेंच विचारवंत लेखक रोमाँ रोलाँ यांच्यातील १९१९ ते १९४० अशा एकवीस वर्षांच्या पत्रव्यवहारावर चिन्मय गुहा यांनी लिहिलेल्या आणि ऑक्सफर्ड प्रेसद्वारा प्रकाशित ‘ब्रिजिंग ईस्ट ॲन्ड वेस्ट’ या पुस्तकातून वरील बाबीला अनुमोदन मिळते.
गीतांजली या काव्यसंग्रहासाठी रविंद्रनाथांना १९१३ साली साहित्य विषयक नोबेल पारितोषिक मिळाले. हा सन्मान मिळालेले ते पहिले भारतीय आहेत.
भारताच्या ‘जन गण मन’ प्रमाणेच बांगलादेशचे ‘आमार शोनार बंगला’ हे राष्ट्रगीत रवींद्रनाथांनी लिहिले असल्यामुळे दोन देशांचे राष्ट्रगीत लिहिणारा कवी अशीही त्यांची आगळी ओळख आहे. श्रीलंकेचे राष्ट्रगीत ‘श्रीलंका माथा (माता)’ हे सुद्धा रवींद्रनाथांच्याच गीतावरून प्रेरणा घेऊन त्यांचे शिष्य आनंदा समराकून यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे.
===
हे ही वाचा – टागोरांच्या प्रेरणेने राष्ट्रगीत लिहिणाऱ्याचा सरकारने घेतला बळी! एक अस्वस्थ करणारी कथा
===
शांतिनिकेतन येथे विश्वभारती या विद्यापीठाची स्थापना करणारे रवींद्रनाथ टागोर अतिशय संवेदनशील मनाचे कलाकार आणि विचारवंत होते. कविता, नाटक, वैचारिक लेखन, चित्रकला, नृत्य, अभिनय, संगीत अशा नाना कलांमध्ये त्यांना उत्तम गती होती.
नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांची ख्याती जगभरात पसरली आणि अनेक जणांनी त्यांच्याशी संपर्क वाढवला. फ्रेंच विचारवंत लेखक रोमाँ रेलाँ हे त्यापैकीच एक. ते रवींद्रनाथांच्या साहित्य आणि विचारांमुळे प्रभावित होते. त्यांनी रवींद्रनाथांच्या १९१६ साली दिलेल्या राष्ट्रीयत्त्वावरील व्याख्यानांचे कौतुक ‘जागतिक इतिहासातील महत्त्वाचे वळण’ असे केले होते. त्यांनी रवींद्रनाथांबरोबर पत्रव्यवहार सुरू केला.
त्या दोघांमध्ये दृढ असा स्नेहबंध निर्माण झाला. २०२१ मध्ये रवींद्रनाथांनी फ्रान्समध्ये रोलाँ यांची भेट घेतली. ‘रेलाँ यांच्या विषयी माझ्या हृदयात विशेष जवळीक आहे आणि माझ्या आत्म्याला त्यांच्यात सारखेपणाची जाणीव होते!’ असे उद्गार रवींद्रनाथांनी त्यांच्याविषयी बोलताना काढले.
टागोर आणि मुसोलिनी…
रवींद्रनाथांची कीर्ती इटली देशातील फॅसिस्ट हुकूमशहा बेनेटो मुसोलिनीपर्यंत पोहोचली. मुसोलिनी हा मुळातील एक पत्रकार होता. त्याला प्रचार आणि प्रतिमानिर्मितीचे महत्त्व चांगल्या प्रकारे माहीत होते. रवींद्रनाथांच्या लोकप्रियतेचा आणि प्रतिमेचा लाभ उठविण्याच्या छुप्या उद्देशाने त्याने कार्लो फॉर्मीची आणि जिसेप्पे तुस्सी या दोन पौर्वात्य अभ्यासकांना रवींद्रनाथांच्या विश्वभारती विद्यापीठाच्या भेटीसाठी पाठवले.
त्यांनी येताना विश्वभारतीसाठी मौल्यवान असे अनेक ग्रंथ भेट म्हणून आणले होते. मुसोलिनीने रवींद्रनाथांविषयी आदर व्यक्त करणारे आणि त्यांना इटलीला भेट देण्याचे आमंत्रणही पाठविले होते. या काळामध्ये मुसोलिनीविषयी जगभरामध्ये काहीशी औस्तुक्याची आणि सकारात्मक भावना होती.
मुसोलिनीच्या या साखरपेरणीमुळे आणि त्याच्या प्रत्यक्ष भेटीच्या कुतूहलाने रवींद्रनाथांनी हे आमंत्रण स्वीकारले. १५ मे १९२६ रोजी इटलीकडे प्रस्थान करताना त्यांनी मुसोलिनीविषयी ‘थोर’ आणि ‘इतिहासात नोंद होईल अशा चळवळीचा प्रणेता’ असे उद्गार काढले.
रवींद्रनाथांच्या या संकल्पित भेटीविषयी रोलाँ यांना कळल्यावर त्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी रवींद्रनाथांच्या आणि त्यांच्या समान मित्रांकडून त्यांना सावधतेचा इशारा दिला होता. पण तरीही रवींद्रनाथांनी इटली भेट घेतलीच.
इटलीमध्ये रवींद्रनाथांचे जंगी स्वागत करण्यात आले. रोम येथे त्यांना विशेष ट्रेनमधून नेण्यात आले. ‘कलेचा अर्थ’ या विषयीचे त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. इटालिअन विचारवंत आणि राजकारणी बेनेडेट्टो क्रोसे, इटलीचे राजे व्हिक्टर इमॅन्युअल दुसरे अशा मान्यवरांशी त्यांच्या भेटी आयोजित करण्यात आल्या. स्वतः मुसोलिनीने त्यांची स्वतंत्र भेट घेतली.
मुसोलिनीच्या उमद्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जाऊन रविंद्रनाथांनी ‘हिज एक्सलन्सि मुसोलिनी यांचे शरीर आणि आत्मा मायकेल अँजेलोने कोरून काढल्याप्रमाणे आहेत!’ असे उद्गार काढले.
इटली भेटीनंतर रवींद्रनाथ स्विझर्लंडमध्ये जिनिव्हा येथे गेले. तिथे त्यांचे स्नेही फ्रेंच विचारवंत लेखक रोमाँ रेलाँ त्यांना भेटले. रेलाँ यांनी रवींद्रनाथांना त्यांच्या इटली भेटीचा आणि वक्तव्यांचा फॅसिस्ट राजवटीने कसा गैरफायदा उठवला हे समजावून सांगितले. रवींद्रनाथांना हे समजल्यावर धक्काच बसला. त्यांच्या भोळेपणाने त्यांना अडचणीत आणले होते. पण स्वतःची चूक मान्य करण्याची आणि आपल्या विचारांमध्ये बदल करण्याची थोरवी त्यांच्याजवळ होती.
त्यांनी आपल्या परिवारातील एका सदस्याकडे पुढील शब्दांत आपला संताप व्यक्त केला. ‘‘स्वतःचे कोणतेही ठोस व्यक्तिमत्त्व नसलेल्या आणि बहुधा लबाड असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणे हा माझ्या दुदैवाचा एक भाग असावा. मी ज्या गोष्टी टाळायला हव्यात त्यांच्यात गुंतण्याची एक विचित्र खोड मला आहे. मी इटलीला भेट दिली याचा मला पश्चात्ताप होतोय.’’
पुढे भारतमित्र दीनबंधू सी.एफ.ॲन्ड्र्युज यांना लिहिलेल्या पत्रात रविंद्रनाथांनी फॅसिझमवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारी, व्यक्तिगत विचारक्षमता असणाऱ्यांविरुद्ध दडपशाही करणारी, रक्तरंजित मार्गावरून जाणारी आणि छुप्या गुन्हेगारी प्रवृत्तीची विचारसरणी अशी घणाघाती टीका केली. हे पत्र मँचेस्टर गार्डिअन या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले.
गांधी आणि मुसोलिनी यांची भेट
पुढे काही काळानंतर रवींद्रनाथांप्रमाणेच महात्मा गांधींनाही मुसोलिनीच्या भेटीचा मोह टाळता आला नाही. १९३१ साली लंडन येथे झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर भारतात परतण्या आधी महात्मा गांधी जिनिव्हा येथे एक आठवडा गेले होते.
त्यांनी रोमाँ रेलाँ यांच्याबरोबर अनेक तास चर्चा केली. त्यावेळी गांधीजींनी रेलाँ यांना सांगितले की ते रोम येथे जाऊन मुसोलिनीची भेट घेणार आहेत. रेलाँ यांनी गांधीजींना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. रवींद्रनाथांच्या भेटीची आठवणही त्यांनी करून दिली. पण गांधीजींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
मिलान येथे प्रचंड मोठ्या जनसमुहाकडून गांधीजींचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनाही विशेष ट्रेनमधून रोम येथे नेण्यात आले. मुसोलिनीने आदराने आणि अगत्यपूर्वक त्यांची भेट घेतली. त्यांना भारताविषयी प्रश्न विचारले. त्यानंतर गांधीजींनी व्हॅटिकनच्या ग्रंथालयात दोन तास घालवले. जगप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ मॅडम माँटेसरी यांच्या दोन शाळांना भेटी दिल्या.
गांधीजींच्या या भेटीचा इटलीतील सरकारधार्जिण्या वृत्तपत्रांनी खोट्या प्रचारासाठी वापर केला. त्यांच्या वक्तव्यांना फॅसिस्ट अनुकूल पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले. पण असे असूनही गांधीजींनी २० डिसेंबर १९३१ रोजी रोलाँ यांना लिहिलेल्या पत्रात मुसोलिनीविषयी प्रशंसनीय लेखन केले.
===
हे ही वाचा – गांधीजींनी एक वृत्तपत्र सुरू केलं आणि हा देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला!
===
गांधीजी लिहितात, ‘‘माझ्यासाठी मुसोलिनी हे एक कोडेच आहे. त्याने केलेल्या सुधारणांमुळे माझे लक्ष त्याच्याकडे आकर्षित होते. त्याने कष्टकरी वर्गासाठी बरेच काही केले आहे असे वाटते. त्याच्या निर्दयतेच्या मागे असलेला लोकांची सेवा करण्याचा हेतू मला लक्षणीय वाटतो. त्याच्या स्फोटक भाषणांनासुद्धा त्याच्या जनतेविषयीच्या प्रेमाची आणि प्रामाणिकपणाची किनार असते. मला असेही वाटते की मोठ्या संख्येने इटलीतील नागरिक मुसोलिनीच्या पोलादी राजवटीच्या प्रेमात आहेत.’’
यावरून गांधीजींच्या भोळेपणाची आणि मुसोलिनीच्या लबाड प्रचारयंत्रणेच्या परिणामकारकतेची आपल्याला जाणीव होते. असाच प्रयत्न मुसोलिनीने पंडित नेहरूंबाबतही करून पाहिला होता. पण त्यांची भेट होऊ शकली नाही.
मुसोलिनीच्या या भुलवणीला त्या वेळी काही काळ चर्चिल, जॉर्ज बर्नाड शॉ सारखे इंग्लंडमधील धुरंधरही बळी पडले होते. सुभाषचंद्र बोस यांनीही मुसोलिनीशी सलोख्याचे आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित केले होते. परंतु त्यामागे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही नीती असावी. कारण याच विचारांनी त्यांनी वैचारिक विरोधाभास असूनही हिटलर आणि जपानसारख्या युद्धखोरांकडून भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी मदत घेतली होती.
सुरुवातीला स्वतःच्या देशातील बहुसंख्य आणि जगभरातीलही अनेकांकडून प्रशंसा मिळवणारे सर्वच हुकूमशहा पुढे दडपशाही, अत्याचार आणि हिंसेचा आधार घेतात हे अनेक उदाहरणांमधून दिसून आले आहे.
यातील मुसोलिनी, हिटलर यांच्यासारख्या काहींचा त्यांच्या हयातीतच पराभव होतो. स्टॅलीनसारख्यांना मृत्यूनंतर स्वदेशातच नाकारले जाते. माओसारख्यांना पुसून टाकणारे त्यांच्याहून धूर्त वारसदार मिळतात. फिडेल कॅस्ट्रो हा या नियमाला अजूनतरी अपवाद ठरलेला हुकूमशहा होता. हयातीत आणि मृत्यूनंतरही त्याच्या देशातील आणि जगातील पाठीराख्यांच्या मनात त्याच्याविषयी आदर व कौतुकाची भावना आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.