“डोळे” येणे म्हणजे नेमकं काय? दुसऱ्याच्या डोळ्यात बघितल्यावरच का येतात डोळे?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पावसाळा म्हणजे आल्हाददायक ऋतू! आपण सगळेच कडाक्याच्या उन्हाळ्यापासून सुटका मिळावी यासाठी पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत असतो.
पावसाळा आपल्याबरोबर घेऊन येतो थंड वातावरण, पावसाचं पाणी पिऊन तजेलदार झालेली झाडं, जागोजागी दिसणारी हिरवळ आणि त्याबरोबरच येणारे विविध आजार आणि पसरणाऱ्या साथी!
आपल्याकडे काही सतत संततधार पाऊस पडत नाही. त्यामुळे जेव्हा पाऊस नसतो तेव्हा तापमानात वाढ होऊन दमट वातावरण तयार होते आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. हे वातावरण अनेक प्रकारच्या जंतूंच्या वाढीसाठी पोषक असते त्यामुळेच या वातावरणात अनेक रोगांच्या साथी पसरतात.
पावसाळ्यात संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढलेले दिसून येते. म्हणूनच पावसाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. सर्दी-खोकला, ताप, पोटाचे आजार याबरोबरच या काळात डोळे येण्याची साथ देखील पसरते.
घरात एकाला डोळे आले तर संपूर्ण घराला हे इन्फेक्शन होण्यास वेळ लागत नाही. एकाचा दुसऱ्याला लगेच संसर्ग होतो. डोळे येण्याच्या बाबतीत तर डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात फक्त बघितल्याने आपलेही डोळे येऊ शकतात असा समज आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
डोळे येणे म्हणजेच कंजंक्टीव्हायटिस या आजारात सुरुवातीला एका डोळ्याला संसर्ग होतो. आपल्या डोळ्यातील पांढरा भाग आणि आतल्या बाजूच्या पापणीला/पडद्याला कंजंक्टिव्हा असे म्हणतात.
जेव्हा या पडद्याची आग होऊ लागते किंवा जळजळ होऊ लागते आणि त्याठिकाणी सूज येऊन डोळे लाल होतात तेव्हा त्या त्रासाला कंजंक्टिव्हायटिस किंवा पिंक आय असे म्हणतात. आपलेच हात दुसऱ्या डोळ्याला नकळत लागल्याने नंतर दुसऱ्याही डोळ्याला संसर्ग होतोच. डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, ड्रॉप्स वापरल्याने निरोगी व्यक्तीलाही संसर्ग होतो.
एकदा डोळे येऊन गेल्यास परत येणार नाही असे नाही. एकदा इन्फेक्शन होऊन गेल्यास आपल्या शरीरात त्याविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती तयार होते हे जरी खरे असले तरी परत संसर्ग होणारच नाही अशी खात्री देता येत नाही.
डोळे येण्याचे देखील दोन प्रकार आहेत. एक म्हणजे इन्फेक्शन होणे आणि दुसरे म्हणजे कुठल्यातरी गोष्टीमुळे डोळ्यांना ऍलर्जीचा त्रास होणे. तसेच सर्दी झाल्यास देखील डोळे येऊ शकतात किंवा काही घातक केमिकल्स, विषारी पदार्थ, वायू, अल्ट्राव्हायोलेट किरणे यांच्या संपर्कात आल्याने देखील डोळे आल्याप्रमाणे त्रास होऊ शकतो. किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा चुकीच्या पद्धतीत वापर केल्यास किंवा एखाद्या सौंदर्यप्रसाधनाच्या ऍलर्जीमुळे सुद्धा हा त्रास होतो.
–
- तुमच्या डोळ्यांच्या आकारानुसार ठरते तुमचे व्यक्तिमत्व!! वाचा
- गॉगलचा वापर कशासाठी करावा? कोणता वापरावा? वाचा गॉगलबद्दल बरचं काही…
–
इन्फेक्शनमुळे डोळे येण्याचे प्रमाण जास्त आहे. डोळ्यात व्हायरस किंवा बॅक्टरीयामुळे इन्फेक्शन होते. हे बॅक्टरीया किंवा व्हायरस एकाच्या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरात एकमेकांशी संपर्क आल्यामुळे पसरतात. म्हणूनच डोळे आलेल्या व्यक्तीपासून लांब राहावे.
त्यांनी वापरलेल्या वस्तू हाताळू नये आणि हाताळल्यास ते हात चेहऱ्याजवळ नेऊ नयेत आणि आधी साबणाने स्वच्छ धुवावेत. डोळे आलेल्या व्यक्तीने गॉगल घालावा आणि इन्फेक्शन बरे होत नाही तोवर लोकांमध्ये मिसळणे टाळावे.
डोळ्याला इन्फेक्शन झाले, की एका किंवा दोन्ही डोळ्यात काहीतरी कचरा गेल्याप्रमाणे टोचल्यासारखे-खुपल्यासारखे वाटते. डोळे लालसर- गुलाबी होतात. डोळ्यांना खाज येते तसेच जळजळ होण्यास सुरुवात होते. डोळ्यांतून सतत पाणी वाहते आणि नंतर पसप्रमाणे चिकट घाण येते. सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटून बसतात.
डोळ्यांना सूज येते. काहींना इन्फेक्शनमुळे ताप चढू शकतो. डोळे सेन्सिटिव्ह झाल्याने डोळ्यांना उजेड सहन होत नाही. काहींना कानाच्या समोरच्या भागातील ग्रंथींना सूज येते. जर विशिष्ट प्रकारच्या विषाणूमुळे हे इन्फेक्शन झाले असेल तर डोळ्यांच्या त्रासाबरोबरच घसा दुखणे, सर्दी, ताप ही लक्षणे देखील दिसतात.
विषाणूजन्य इन्फेक्शन असेल तर डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही. तात्पुरते अंधुक दिसू लागते. डोळे सुजतात व पापण्यांची उघडझाप करताना त्रास होतो . ही सगळी लक्षणे डोळे येण्याची आहेत.
स्टॅफिलोकोकस, गॉनोकोकस किंवा क्लॅमिडीया या बॅक्टरीया आणि व्हायरसमुळे हा आजार होतो. काही लोकांना विशिष्ट परागकण, धूळ, प्राण्यांचे पंख किंवा केस यांची ऍलर्जी असते त्यामुळे या वस्तूंशी संपर्क आल्यास डोळे आल्यासारखा त्रास होऊ शकतो.
जर हे इन्फेक्शन झाले तर थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांत ड्रॉप्स वेळोवेळी घालावे. या इन्फेक्शनमुळे डोळ्यांत सतत पाणी आणि घाण येते. डोळ्यांत टोचल्याची भावना होते आणि खाज येते पण तरीही डोळे चोळू नयेत. डोळे हातांनी न पुसता स्वच्छ रुमालाने टिपून घ्यावे.
डोळ्यांना सतत हात लावू नये कारण हेच हात आपण नकळत इतर ठिकाणी लावतो आणि त्यामुळे इन्फेक्शन सगळीकडे पसरून इतरांना देखील संसर्ग होऊ शकतो. डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात नुसते बघितल्याने डोळे येत नाहीत तर त्यांनी हात लावलेल्या वस्तू आपण हाताळल्यामुळे इन्फेक्शन पसरते आणि एकाचा दुसऱ्याला संसर्ग होतो.
तुम्ही जर चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर इन्फेक्शन झाले असताना लेन्सचा वापर करू नये. डोळ्यांना आराम द्यावा.
डोळे आल्यावर उत्तम प्रतीचा गॉगल वापरावा. यामुळे डोळ्यांत धूळ, हवा आणि कचरा जात नाही तसेच तीव्र उजेडापासून देखील डोळ्यांना संरक्षण मिळते. तुम्हाला एखाद्या वस्तूची ऍलर्जी असल्यास आणि त्यामुळे डोळे आले असल्यास केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.
स्वतःच्या मनाने डोळ्यांवर औषधाचे प्रयोग करू नयेत. डोळ्यांच्या तसेच स्वतःच्या शारीरिक स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. चष्मा/गॉगल सुद्धा वारंवार स्वच्छ करावा. हस्तांदोलन करू नये. सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये.
–
- लॅपटॉपवर डोळे रोखण्याचे परिणाम टाळा! आजपासूनच हे घरगुती उपाय कटाक्षाने पाळा!
- हे आहे डोळ्यांची उघडझाप होण्यामागील शास्त्रीय कारण
–
जर चुकून डोळे आले तरी घाबरून जाऊ नये कारण हा त्रास दोन ते तीन दिवसांत बरा होतो आणि तसेच इन्फेक्शन कमी होण्यासाठी डॉक्टर अँटिबायोटिक ड्रॉप्स देतात तसेच डोळ्यांची आग आणि जळजळ थांबण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी काही औषधे देतात. घरगुती उपाय म्हणून काही लोक पापण्यांना एरंडेल तेल लावतात परंतु हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बॅक्टेरियामुळे डोळे आल्यास डॉक्टर औषधे तसेच ड्रॉप्स देतात. व्हायरल इन्फेक्शन असल्यास ते आपोआप बरे होते. त्यासाठी डोळ्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून डोळ्यांवर थंड पट्ट्या ठेवणे, डोळ्यात ओलावा कायम राहावा म्हणून ड्रॉप्स घालणे असे उपाय करायला डॉक्टर सांगतात. ऍलर्जीमुळे डोळे आल्यास डॉक्टर अँटीहिस्टामाइन आणि आय ड्रॉप्स देतात.
ज्या व्यक्तींचे काचबिंदूचे ऑपरेशन झाले आहे किंवा चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी शस्त्रक्रिया झाली असल्यास आणि वरीलपैकी कुठलीही लक्षणे जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार सुरु करावेत. कारण या इन्फेक्शनचा दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
डोळे आल्यास धूर, धूप मध लावणे, कांद्याचा रस, गोमूत्र लावणे आणि व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीवरील कुठलेही उपाय करणे किंवा आपल्याच मनाने ड्रॉप्स घालणे असे उपाय केल्यास दृष्टी कायमची अधू होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलेही औषध डोळ्यांत घालू नये आणि कुठलेही अशास्त्रीय उपाय करू नयेत.
डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात बघितल्याने आपलेही डोळे येतात ही निव्वळ अफवा आहे, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या वस्तू हाताळल्याने किंवा त्यांच्याशी संपर्क आल्याने आपल्याला संसर्ग होऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी आणि घाबरून न जाता योग्य ते उपचार करावे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.