उद्धव ठाकरेंनी काढली शंभर अपराध भरलेल्या शिशुपालाची वरात…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक : अनुपम कांबळी
===
महाभारतातील शिशुपालाला वरदान होते की त्याला शंभर अपराध माफ आहेत. जोपर्यंत त्याचे शंभर अपराध भरत नाहीत तोपर्यंत कुणीही त्याचा वध करू शकणार नाही. या वरदानामुळे तो इतका माजला होता की त्याने थेट भगवान श्रीकृष्णासोबतच वैर घेतले. अहंकाराच्या मस्तीत श्रीकृष्णाचा दररोज अपमान करण्यात त्याला धन्यता वाटु लागली. श्रीकृष्णाच्या प्रत्येक अपमानागणिक शिशुपालाचा एक एक अपराध वाढत गेला.
भगवान श्रीकृष्ण त्याला त्याची जाणीव सुद्धा करून देत होते परंतु अहंकाराची परिसीमाच एवढी होती की नव्याण्णव अपराध पुर्ण होईपर्यंत शिशुपालाला आपण मरणाच्या दारात येऊन पोहोचलोय याची किंचीतशीही कल्पना नव्हती.
शेवटी एका राजसभेत श्रीकृष्णाचा अपमान करून त्याने शंभरावा अपराध केला आणि त्याक्षणी भगवंतांनी सुदर्शन चक्र काढुन त्याचे शिर धडावेगळे केले.
महाभारत हे पिढ्यानपिढ्या सुरूच राहते. फक्त त्यातील पात्रे तेवढी बदलतात. पण संदर्भ काळानुरूप तसेच राहतात.
काल महाराष्ट्रातील शिशुपालाचे शंभर अपराध भरले आणि त्यानंतर पोलीसांनी त्यांना भरल्या ताटावरून फरफटत ओढुन नेत अटक केली.
भारतीय जनता पक्षाने प्रवेश दिल्यानंतर आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनल्यानंतर राणे पितापुत्रांचा पोटशूळ इतका वाढला की त्यांनी ऊठसूट उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मातोश्री, शिवसेना भवन आणि एकंदरीतच शिवसेना पक्षावर बेछूट टिका सुरू केली. निलेश राणेंनी आनंद दिघेंच्या मृत्यूला बाळासाहेब ठाकरे जबाबदार आहेत असा आरोप केला. मातोश्रीच्या पहिल्या मजल्यावर काय चालते असा प्रश्न विचारला.
त्यानंतर नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंचा डीएनए तपासावा लागेल, असे वक्तव्य केले. नितेश राणेंनी तर ठाकरे कुटुंबीयांचे नातेवाईक असलेल्या वरुण सरदेसाई यांना सुद्धा सोडले नाही. वांद्र्याच्या ऑफिसमध्ये वरुण सरदेसाई हप्ते गोळा करतात असा आरोप त्यांनी थेट विधानसभेत केला. दिशा सालीयन म्रुत्यु प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव जोडले. सुशांत सिंग रजपूतच्या आत्महत्येमध्ये आदित्य ठाकरेंचा हात आहे आणि आपल्याकडे त्याचे सबळ पुरावे आहेत, असे सांगून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या सर्व प्रकरणात ठाकरे कुटुंबीय अतिशय संयमी व शांत होते. महाभारतातील श्रीकृष्णाचे दुसरे नाव उद्धव असेच आहे आणि महाराष्ट्रातील या महाभारतात उद्धव ठाकरे हे श्रीकृष्णाच्याच भुमिकेत होते.
ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने कसल्याही प्रकारचा आकांडतांडव न करता होणाऱ्या प्रत्येक अपमानानंतर शिशुपालाचे फक्त अपराध मोजले. अगदी त्याच पद्धतीने कोणत्याही आरोपानंतर अजिबात विचलित न होता उद्धव ठाकरे राणे कुटुंबियांचे अपराध शांतपणे मोजत होते.
शिवसेना व ठाकरे कुटुंबीयांवर टिका केल्याची बक्षीसी म्हणुन भाजपने नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिले. त्यानंतर त्यांनी ठाकरे कुटुंबीयांविरोधात आणखीनच गरळ ओकण्यास सुरुवात केली. नितेश राणेंच्या उपस्थितीत शिवसेना भवन फोडुन टाकण्याचे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले पण त्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी बऱ्यापैकी संयम दाखवला.
हा राणे कुटुंबीयांनी केलेला अठ्ठ्याण्णववा अपराध होता.
त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जनआशीर्वाद यात्रेची घोषणा केली. यामध्ये जनतेचे आशीर्वाद घेण्यापेक्षा ठाकरे कुटुंबीयांना शिव्याशाप देण्यासाठीच ही यात्रा काढण्यात आली होती. त्यात पुन्हा आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर माथा टेकवून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार, असे राणेंनी जाहीर केले.
केंद्रीय मंत्र्याची सुरक्षा सोबत असल्याने शिवसैनिकांनी आपल्याला बाळासाहेबांच्या स्मारकाकडे जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केल्यास पोलीसी बळ वापरून मोठा रक्तपात करता येणार, याची राणेंना पुर्ण कल्पना होती.
किंबहुना शिवसैनिक आणि भाजप मध्ये अशा प्रकारचा राडा झाला तरच त्यांची जनआशीर्वाद यात्रा खऱ्या अर्थाने यशस्वी होणार होती व भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ मिळणार होते. म्हणुनच आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन बाळासाहेबांच्या स्मारकाकडे जाण्याच्या निमित्ताने ते शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिवचत होते. त्यावेळी सुद्धा कमालीचा संयम पदाखवत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचा नव्याण्णववा अपराध मोजला.
मुख्यमंत्र्यांनी राणेंनी टाकलेली गुगली अतिशय उत्क्रुष्टरित्या टोलवली. त्यामुळे नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी असा गोड गैरसमज करून घेतला की उद्धव ठाकरे आपल्याला घाबरले आहेत.
शेवटी शंभराव्या अपराधाचा दिवस उजाडला.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी रायगडात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याचे वक्तव्य केले. त्यांना वाटले नेहमीप्रमाणेच उद्धव ठाकरे संयम दाखवुन शांत बसतील. माणुस गप्प आहे म्हणजे तो शांत असेलच असे नाही, याचा राणेंना विसर पडला होता. एरव्ही एखाद्या हिमनगाप्रमाणे शांत असणारे उद्धव ठाकरे राणेंच्या त्या वक्तव्यानंतर एखाद्या तप्त ज्वालामुखी प्रमाणे उसळले.
नारायण राणे व त्यांच्या मुलांनी आजपर्यंत केलेली सर्व टिका ही ठाकरे कुटुंबावर व शिवसेनेसंबंधी होती. मात्र त्यादिवशी नारायण राणेंनी आपल्या वक्तव्यातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाला नख लावण्याचा प्रयत्न केला. आपण ज्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहोत त्या खुर्चीला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासारख्या अनेक महान नेत्यांची परंपरा आहे, याची उद्धव ठाकरेंना पुरेपुर जाणीव होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली आवाज काढण्याची जर कुणी महाराष्ट्रात येऊन भाषा करणार असेल तर मग तो केंद्रीय मंत्री जरी असला तरी त्याचे थोबाड त्याच ठिकाणी फोडुन ठेवले पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांनी मनाशी ठरवले.
शिवसेनेचा जन्मच मुळी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झाला आहे आणि आता प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रतिष्ठेचा होता. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कुणी लाथ मारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या तंगड्या तोडून गळ्यात बांधण्यासाठी शिवसेना नेहमीच सज्ज असते.
शेवटी एका रात्रीत सगळी सूत्रे हलली आणि केंद्रीय मंत्र्याना अटक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुर्ण तयारी केली. केंद्रीय मंत्रीपदाचा प्रचंड माज असलेले नारायण राणे पोलीसांकरवी अटक करून घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत होते. त्यांचा अहंकार त्यांना अटक करून घेऊ देत नव्हता. सगळ्या प्रकारे समजुत काढुन झाल्यानंतर पोलीसांनी वेळकाढुपणा करणाऱ्या राणेंना भरल्या ताटावरून फरफटत बाहेर आणले आणि अटक करून गाडीत बसवले.
अहंकारी माणसाचा शेवट हा अशाच प्रकारे अपमानास्पदरित्या होतो.
काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते म्हणाले की, “आम्ही तुमचे वासरू मारले तर तुम्ही आमची गाय मारणार आहात का…?” उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर गेली दोन वर्षे सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेले भाजपचे नेते कधी पत्रकार परिषदा घेऊन तर कधी अर्णब गोस्वामी, कंगना रणावत अशी भाडोत्री फौज घेऊन शिवसेनेवर हवेतले आरोप करून शिवसेनेची वासरे मारतच आहेत.
मग शिवसैनिकांनी वासरू मारणाऱ्यांची आरती ओवाळायची का…?
कुत्रे भुंकत असताना हत्तीने दुर्लक्ष करायच असतं हे आम्हाला माहिती आहे. मात्र हत्ती कायमच दुर्लक्ष करू लागला तर कुत्रे चेकाळतात आणि हत्ती आपल्या भुंकण्याला घाबरला असा गोड गैरसमज करून घेत आणखीनच जोरजोराने भुंकू लागतात. त्यासाठीच हत्तीला सुद्धा एखादा दिवस त्यातील एका कुत्र्याच्या पेकाटात लाथ घालुन त्यांना जाणीव करून द्यावी लागते की कितीही झालं तरी तुम्ही कुत्रे आहात आणि मी हत्ती आहे. मनात आणलं तर एकाच फटक्यात सगळ्यांचा बंदोबस्त करू शकतो.
काल उद्धव ठाकरेंनी मोकाट कुत्र्यांना जंगलातील हत्ती नव्हे तर वाघ कसा पंजा मारतो हेदाखवलं. अलीकडच्या काळात वाघ संयमी झाल्यामुळे जंगलाचा राजा वाघच असतो याचा काही कुत्र्यांना विसर पडला होता.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकदा आपल्या भाषणात म्हणाले होते की,
“कारण नसताना तुम्ही कानफटात मारल्यानंतर, तुम्ही म्हणाल वा छान मस्त बसली…! आणखीन जोरात मारायला पाहिजे होती. इतका बुळचटपणा बरा नाही. त्याचा फटकन आवाज आल्यानंतर आपला काडकन आवाज आला पाहिजे. तो खरा शिवसैनिक…! नुसत्या टाळ्या मारण्यासाठी हात नको आहेत. कानफाटात मारण्यासाठी ते तयार ठेवा!”
काल मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची नुसती भाषा केल्यानंतर महाराष्ट्राच्या रस्त्यारस्त्यावर जो पोस्टर्स फाडताना आणि भाजपची कार्यालये फोडताना दिसला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेला कडवट शिवसैनिक आहे. शिवसेनेची सत्ता ही कधीही मंत्रालयात नसते. शिवसेनेची सत्ता ही रस्त्यावरच दिसते. मध्यंतरीच्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या जबाबदारीमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या संयमी व काहीशा मवाळ भूमिकेमुळे सत्तेत असुनही अनेक शिवसैनिकांची काहीशी घुसमट होत होती.
काल राज्यभरातील शिवसैनिकांनी कितीतरी दिवसांनी मोकळा श्वास घेतला.
शिवसैनिक हे असं रसायन आहे त्यांच्यासमोर जेवढे खडतर आव्हान असेल तेवढे ते अधिक त्वेषाने पेटुन उठतात. त्यांच्यासमोर आव्हान नसेल तेव्हा ते एकदम थंड पडतात. अगदी सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांना अटक करणारे छगन भुजबळ, त्यानंतरच्या काळात पक्षाशी गद्दारी करणारे नारायण राणे, मग शिवसेनेपासुन वेगळी चूल थाटून नवीन संसार मांडणारे राज ठाकरे अशी अनेक आव्हाने शिवसैनिकांनी संघर्ष करून यशस्वीरीत्या पेलवुन दाखवली.
२०१४ साली शिवसेना भाजप सोबत सत्तेत आली आणि त्याचबरोबर छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे या तिघांचेही आव्हान एकाएकी संपुष्टात आल्यामुळे नेमका संघर्ष कुणासोबत करायचा, हा प्रश्न तळागाळातील शिवसैनिकांना पडला. त्यांना कुणीतरी तगडे आव्हान पाहिजेच होते. त्यात भाजपने नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपद देऊन त्यांच्या संपलेल्या आव्हानात पुन्हा एकदा हवा भरण्याचा प्रयत्न केला आणि कालच्या प्रकरणावरून हा प्रयत्न आता भाजपच्याच अंगलट येताना दिसतोय. शिवसैनिकांना पुन्हा एकदा मोठे आव्हान मिळाले आहे आणि आता या आव्हानाचा सामना करण्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या तळागाळातील शिवसैनिक आपापसातले अंतर्गत हेवेदावे विसरून रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी एकत्र झाले आहेत.
विरोधक व राजकीय समीक्षक सुद्धा पूर्वीची शिवसेना राहिली नाही असे म्हणुन नाक मुरडायचे. त्यांना कालच्या प्रकरणात ‘टायगर अभी जिंदा हैं’ चा प्रत्यय आला.
शिवसेना आणि इतर पक्ष यांच्यात हाच मुलभूत फरक आहे.
महाराष्ट्रातल्या अन्य पक्षातले कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायची वेळ आली की मागे फिरतात. मात्र शिवसैनिक रस्त्यावर उतरण्यासाठीच उतावीळ झालेले असतात. शिवसैनिकांसाठी रस्त्यावरचा संघर्ष हेच टॉनिक आहे. तो संघर्ष होणार नसेल तर शिवसैनिक अस्वस्थ होतात. महिनाभरापूर्वी शिवसेना भवन जवळ जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी पळवून पळवून मारले होते. त्यामुळे मुंबईतील शिवसेना चार्ज झाली होती. नारायण राणेंच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटले. एका घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्रातील शिवसेनेत चैतन्य संचारले. शिवसेनेला पुर्वीचे गतवैभव प्राप्त झाले.
नारायण राणे हे पुर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. ते शिवसैनिकांची नस पुरती ओळखून आहेत. शिवसैनिक हे मधमाशांच्या पोळ्यासारखे आहेत. ते एरव्ही शांत असतात पण त्यांच्या पोळ्याच्या दिशेने कुणी दगड भिरकावला की कोणताही मागचा पुढचा विचार न करता ते संबंधितांना सुजवून टाकतात. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करून शिवसैनिकांच्या पोळ्यावर विनाकारण दगड भिरकावला आणि त्याची झळ संपुर्ण राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांना सोसावी लागली.
शेटजी-भटजींचा पक्ष म्हणुन सर्वदूर प्रसिद्ध असणाऱ्या भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावरच्या लढाईत शिवसैनिकांसमोर टिकाव धरू शकणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील भाजपच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी नारायण राणेंनी जनआशीर्वाद यात्रा काढली होती. मात्र त्यांच्या यात्रेमुळे फक्त मुंबईतीलच नव्हे तर संपुर्ण राज्यभरातील शिवसैनिक चार्ज झाले. भाजपने शिवसेनेवर वार करण्यासाठी दिल्लीतून पाठवलेले नारायणास्त्र तुर्तास तरी त्यांच्यावरच बुमरँग होताना दिसत आहे. विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. काल ज्या पद्धतीने राज्यभरातील शिवसैनिक चार्ज होऊन पेटुन उठलेत त्याचे दूरगामी परिणाम आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह राज्यातील इतर ठिकाणी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील, यात कसलीच शंका नाही.
देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रकार परिषदेत असेही म्हणाले की, शिवसेनेकडून महाराष्ट्रात पोलीसांचा गैरवापर सुरू आहे. मुळात हे बोलतंय कोण…? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ज्या देवेंद्र फडणवीसांनी पोलीसांना महत्वाच्या विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स रेकॉर्ड करण्याची जबाबदारी सोपवली होती, त्यांना पोलीसांच्या गैरवापरावर बोलण्याचा मुळी नैतिक अधिकारच नाही. केंद्र सरकारने ईडी, सीबीआय, एनआयए सारख्या राष्ट्रीय स्वायत्त संस्थांना भारतीय जनता पक्षाची रखैल बनवुन ठेवले आहे. त्यांचा सर्रासपणे राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापर होताना दिसतोय. त्यावर फडणवीस कधी भाष्य करताना दिसत नाहीत. शेवटी केंद्र जे पेरणार आहे, तेच राज्यात उगवणार…!
देवेंद्र फडणवीसांना यानिमित्ताने मी त्यांच्याच भाषेत सांगतो – जो खुद कांच कें घरो में रहते हैं, वो दुसरो पर पत्थर नहीं फेका करते…!
महाभारत व रामायणात सर्वशक्तिमान राजा अश्वमेध यज्ञ करायचा आणि एका घोड्यावर राजाचा संदेश लिहुन तो अश्वमेधाचा घोडा सगळीकडे पाठवायचा. अश्वमेधाचा घोडा जो कुणी अडवण्याचे धाडस दाखवेल त्याच्यासोबत सर्वशक्तिमान राजाचा संघर्ष ठरलेला असायचा. जनआशीर्वाद यात्रा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला एक प्रकारचा अश्वमेध यज्ञच होता. देशातल्या राज्याराज्यात जनआशीर्वाद यात्रा काढण्यासाठी नरेंद्र मोदी या सर्वशक्तिमान राजाचे मंत्रीरुपी अश्वमेध पाठवण्यात आले होते. कोणत्याही राज्याने जनआशीर्वाद यात्रेला अटकाव करण्याचे धारिष्ट दाखवले नाही.
शेवटी महाराष्ट्रात ठाकरे सरकारने मोदींचा अश्वमेध अडवला.
उद्धव ठाकरेंनी मोदींनी पाठवलेल्या अश्वमेधाची गचांडी धरून केंद्राला एकच संदेश दिला की महाराष्ट्राची माती संघर्षासाठी नेहमीच तयार आहे. अंगावर येण्याचा प्रयत्न केलात तर शिंगावर घेऊन याच मातीत लोळवणार. त्यामुळे नारायण राणेंच्या अटकेकडे मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्यांची अटक या नजरेतूनही आपल्याला पाहावे लागेल.
‘सिंघम’ चित्रपटातील अजय देवगणच्या तोंडी असलेला डायलॉग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आज तंतोतंत लागु पडतो. “तु हमारी औकात का अंदाजा क्या लगाएगा…! हम उस महाछत्रपती शिवाजी महाराज की औलाद हैं जिन्होंने मुघलोंको घुटने पे ला दिया था और अपने खुन सें हिंदुस्थान का इतिहास लिखा था…!”
काल बोलण्याच्या ओघात माजी आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणेंची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली. काय तर म्हणे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने संगमेश्वर मध्येच अटक केली होती आणि नारायण राणेंनाही ठाकरे सरकार संगमेश्वरलाच अटक करत असल्यामुळे औरंगजेबाप्रमाणेच महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचे पतन होईल.
पहिली गोष्ट म्हणजे औरंगजेब महाराष्ट्राच्या नव्हे तर दिल्लीच्या गादीवर बसला होता. त्यामुळे आज सुद्धा दिल्लीत असलेले सरकार हे औरंगजेबाचेच आहे का…? यावर प्रमोद जठारांनी स्पष्टीकरण द्यायला हवे. छत्रपती संभाजी महाराजांशी स्वकीयांनी गद्दारी केल्यामुळेच त्यांना संगमेश्वर येथे अटक झाली होती. याचा अर्थ नारायण राणेंच्या विरोधात भाजपमधीलच काही मोठी नेतेमंडळी आहेत, अस जठार साहेबांना म्हणायचे आहे का…?
मुळात छत्रपती संभाजी महाराज आणि नारायण राणे यांची तुलना म्हणजे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी…! छत्रपती संभाजी महाराजांना धर्म बदलण्यासाठी औरंगजेबाकडुन अनेक आमिषे दाखवण्यात आली. त्यानंतरही संभाजी महाराज धर्मांतर करण्यास तयार झाले नाहीत म्हणुन अतिशय अमानुषपणे त्यांची चामडी सोलण्यात आली, त्यावर मीठ शिंपडले गेले, डोळे काढण्यात आले आणि जीभही छाटली गेली. तरीही शेवटच्या श्वासापर्यंत शंभुराजे हिंदु धर्माशी एकनिष्ठ राहिले.
नारायण राणे त्यांनी स्वतः काढलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी तरी कधी एकनिष्ठ राहिले का…? ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपद दिले, त्या पक्षाशी गद्दारी केली. अशा माणसाची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत करणे म्हणजे महाराजांच्या बलिदानाचा अनादर करण्यासारखे आहे. छत्रपती संभाजी महाराज हे हिंदु अस्मितेचा मानबिंदु आहेत. शंभुराजे हिंदु धर्मासाठी कडवे होते. त्यांनी क्षुल्लक पदांच्या स्वार्थासाठी हिंदवी स्वराज्याशी गद्दारी करायची भडवेगिरी केली नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी असेही वक्तव्य केले की, “फक्त परवानगी द्या. दोन महिन्यात माझ्या पैशाने बाळासाहेब ठाकरेंचे दर्जेदार स्मारक बांधुन दाखवतो” त्यांना एवढच सांगावसं वाटत की जिकडे श्रद्धा असते तिकडे परवानगीची कधीच गरज लागत नाही. ज्यांना स्मारक बांधायचेच नसते तेच अशा प्रकारची परवानगी मागतात.
आज बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाल्यानंतर आठ-नऊ वर्षे उलटली. बाळासाहेब ठाकरे या एका व्यक्तीमुळे नारायण राणे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आठ महिन्यांसाठी का होईना बसु शकले. शिवसेना सोडल्यानंतर याच मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेखातर त्यांनी सगळ्या पक्षांच्या दारासमोर आपली भिकेची झोळी पसरली पण कुणीही त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद दिले नाही. त्या शिवसेनाप्रमुखांची आठवण मनात कायम ठेवुन नारायण राणेंनी महाराष्ट्रात अगदी कुठेही छोटेखानी स्वरूपात का असेना शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारले असते तर त्यांना हे वक्तव्य करण्याचा पुर्ण अधिकार होता. मात्र खाल्ल्या ताटात घाण करायची सवय असलेल्या नारायण राणेंनी बाळासाहेबांप्रती तेवढी सुद्धा क्रुतज्ञता आपल्या आयुष्यात कधी दाखवली नाही. आणि आज त्यांचे स्मारक बांधायच्या गोष्टी करून फुकाच्या तोंडाच्या वाफा दवडत आहेत.
ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या घणाघाती ठाकरी शैलीत लाखोंच्या सभा गाजवल्या, ते शिवतीर्थ हेच शिवसेनाप्रमुखांचे जीवंत स्मारक आहे. त्यांना दुसऱ्या कोणत्याही स्मारकाची गरज नाही. तसंही पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना स्मारक बांधायचा नैतिक अधिकारच उरत नसतो. नारायण राणेंनी घरी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी करण्याची गरज आहे.
शिवरायांच्या इतिहासात सुद्धा औरंगजेबाच्या दरबारात अफजल खानाने हिंदवी स्वराज्य संपुष्टात आणण्याचा पैजेचा विडा उचलला होता. लाखोंची फौज व सोबत रणगाडे, तोफा घेऊन अफझल्ल्या महाराजांच्या स्वराज्यावर चाल करून आला. त्याला वाटले होते की महाराजांचे स्वराज्य मी काही महिन्यात नाहीसे करीन. आज प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या अफझलखानाचे थडगे उभारलेले आहे. इतिहासातून बोध घ्यायचा की नाही हे नारायण राणेंनी ठरवायचे आहे.
आज मुंबईसह संपुर्ण कोकण प्रांतात व महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा मानाने फडकतोय. मोदी-शहांच्या दरबारात शिवसेनेचे साम्राज्य नाहीसे करण्याचा पैजेचा विडा नारायण राणेंनी उचललाय. त्याबदल्यात दिल्लीश्वरांनी त्यांना केंद्रीय मंत्रीपदाची सुभेदारी दिली आहे. सोबत ईडी, सीबीआय आणि एनआयएची भलीमोठी फौज आहे. मात्र शिवरायांकडे मावळे होते आणि शिवसेनेकडे शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने प्रेरित झालेले कडवट शिवसैनिक आहेत. दिल्लीच्या आदेशावरून महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांचे काय हाल होतात याचे अफझलखान हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
आजपर्यंत सगळ्यांचा माज व मस्ती या महाराष्ट्रच्या मातीने उतरवली आहे. प्रतापगडावर महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला हा इतिहास आहे आणि शिवसेनेच्या साम्राज्याला सुरुंग लावायचे नापाक मनसुबे रचणाऱ्या भाजपला कोकणच्या लाल मातीतच गाडले जातील हे भविष्य आहे.
त्यामुळे नारायण राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारायचे की नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. मात्र शिवसेना सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी भारतीय जनता पक्षाचे राजकीय थडगे उभारल्याशिवाय शांत बसणार नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.