Site icon InMarathi

मुंबईची जान असलेला मरीन ड्राईव्ह चक्क एका मराठी माणसाने बांधलाय!!

marine feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कंटाळा आलाय, फिरायला जायचंय पण जास्त लांब जायला नको पण समुद्र तर हवाय अशा वेळी मुंबईकर जातात त्यांच्या लाडक्या मरीन ड्राइव्हला! मालिका, चित्रपट यांत अनेकदा दिसलेल्या मरीन ड्राइव्हचे नॉन-मुंबईकरांना सुद्धा आकर्षण असतेच. त्यामुळे मुंबईला गेलो आणि मरीन ड्राइव्ह बघितले नाही असं होत नाही. आणि मुंबईकरांच्या चेहेऱ्यावर हसू आणण्यासाठी तर मरीन ड्राइव्ह गेल्या शंभरहून जास्त वर्षांपासून दिमाखात उभे आहे.

घरातल्या चिल्लर पार्टीला रात्री राणीच्या गळ्यातला हार उर्फ क्वीन्स नेकलेस दाखवायला नेले नाही किंवा मित्रमैत्रिणींबरोबर मरीन ड्राइव्हला मज्जा केली नाही किंवा आपापल्या ‘प्रेमाच्या व्यक्ती’बरोबर मरीन ड्राइव्हवर प्रेमाचे दोन क्षण घालवले नाही असा अस्सल मुंबईकर क्वचितच सापडेल! पावसाळ्यात समुद्राच्या मोठ्ठ्या लाटा धडकताना बघायला अनेक लोक मरीन ड्राइव्हला जातात.

 

 

भारताने क्रिकेटचा विश्वचषक दुसऱ्यांदा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जिंकला तेव्हा या मरीन ड्राइव्हला शेकडो मुंबईकरांनी आनंद साजरा केला होता.

ग्रेट ब्रिटनच्या थंड हवेची सवय असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या गोऱ्यांना मुंबईची गरम दमट हवा सहन होत नव्हती. मग ते आजारी पडू लागले. या ब्रिटिश अधिकाऱ्यांना मोकळी ताजी हवा खायला मिळावी म्हणून मरीन ड्राइव्ह बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यासाठी गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉईंटपर्यंतचा अरबी समुद्राचा भूभाग मागे हटवून पाथ-वे आणि कठडा बांधण्याचा प्रस्ताव तयार झाला.

हा प्रकल्प उभारण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे नरिमन पॉईंट ते अँटॉप हिलच्या पायथ्याशी असणाऱ्या बाबुलनाथ परिसराला रस्त्याने जोडणे.

 

News 18

 

१८ डिसेम्बर १९१५ रोजी मरीन ड्राइव्हच्या बांधकामास सुरुवात झाली. त्यावेळी त्या प्रकल्पाला केनेडी-सी फेस असे नाव देण्यात आले होते. अरबी समुद्रातील ४४० एकर भूभागावर भराव टाकून नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी दरम्यान पाथ-वे बांधण्यात आला. हे अंतर ३.६ किमीचे होते. हा प्रकल्प पूर्ण होण्यास पाच वर्षे लागली. १९२० साली पूर्ण बांधून झालेल्या याच रस्त्याला आपण मरिन ड्राइव्ह म्हणतो.

या  रस्त्याचे बांधकाम इतके मजबूत होते की पहिली ७२ वर्षे या रस्त्याला कुठल्याही डागडुजी-दुरुस्तीची गरज पडली नाही. या रस्त्याच्या कठड्यावर सतत अरबी समुद्राच्या लाटा धडकत असतात. लाटांचा वेग आणि मार सहन व्हावा म्हणून या संपूर्ण परिसरात साडेसहा हजारपेक्षा जास्त ट्रायपॉड्सचा वापर करण्यात आला आहे.

मरीन ड्राइव्हचा आकार इंग्रजी अक्षर ‘सी’ सारखा आहे. रात्री या रस्त्यालगतचे दिवे लागल्यानंतरचे दृश्य अत्यंत नयनरम्य असते. कित्येक लोक तर केवळ हा रात्रीचा नजारा बघण्यासाठी मरीन ड्राइव्हला भेट देतात. रात्री मरीन ड्राइव्ह लगतच्या दिव्यांची रांग ही एखाद्या गळ्यातल्या रत्नांच्या हाराप्रमाणे दिसते. म्हणूनच या रस्त्याला क्वीन्स नेकलेस असे नाव पडले.

 

The better india

 

१९३० च्या दशकापासून मरीन ड्राइव्हचा उल्लेख क्वीन्स नेकलेस असा होऊ लागला. या भागाचे आधीचे नाव सोनापूर होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या रस्त्याचे नामकरण ‘नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग’ असे करण्यात आले होते.परंतु सर्वसामान्य माणूस या रस्त्याला मरीन ड्राइव्ह म्हणूनच ओळखतो.

तर हे मरीन ड्राइव्ह साकारण्यात एका मराठमोळ्या इंजिनिअरचा मोठा वाटा आहे. ते इंजिनिअर म्हणजे एन व्ही मोडक उर्फ नानासाहेब मोडक. मुंबईचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर धरण बांधून जो तलाव बांधण्यात आला आहे त्या तलावाला म्हणजेच ‘मोडकसागर’ला त्यांचेच नाव देण्यात आले आहे.

नानासाहेब मोडक यांचा जन्म १८९० साली झाला होता. त्याकाळी त्यांनी मुंबई विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तेव्हाच्या बॉम्बे म्युनिसिपालिटीमध्ये अभियंता म्हणून काम सुरु केले.

सांडपाण्याची व्यवस्था, टाऊन प्लॅनिंग यात त्यांचा हात धरणारे कुणी नव्हते म्हणूनच इंग्रज अधिकारी देखील मुंबईच्या प्लॅनिंगमध्ये त्यांच्या सल्ल्याप्रमाणे निर्णय घेत असत. त्यांच्या या विशेष कौशल्यामुळेच त्यांची मुंबई महानगरपालिकेचे स्पेशल इंजिनिअर म्हणून नेमणूक झाली होती.

मुंबईतील भुयारी गटारे आणि सांडपाण्याचे योग्यप्रकारे नियोजन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. समुद्र हटवून भराव घालणे, झोपडपट्टी क्षेत्राचा विकास हे मोठमोठे प्रकल्प त्यांच्याच कल्पनेतून साकार होत होते. मरीन ड्राइव्हचा प्रकल्प देखील त्यांच्याच कल्पनेतून साकार झाला. या योजनेचे कॉन्ट्रॅक्ट शापूरजी पालोनजी व भागोजी कीर यांना दिले होते.

 

india.com

त्यांच्या ज्ञानामुळे मुंबई विद्यापीठात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डीनपदाची जबाबदारी देखील काही काळासाठी त्यांच्याकडे होती. १९३८ साली झालेल्या मुंबई इंजिनिअरिंग काँग्रेसच्या अध्यक्षपदी नानासाहेब मोडक होते. त्यांनी व मेयर अल्बर्ट यांनी मिळून तयार केलेला “आऊटलाईन ऑफ द मास्टर प्लॅन फॉर ग्रेटर बॉम्बे” हा रिपोर्ट आजही मुंबईच्या विकासात मानस्तंभ मानला जातो.

केवळ मुंबई शहराचा विकासच नव्हे तर दूरदृष्टीने मुंबईचा पाणीप्रश्न सोडवण्याचे श्रेय देखील नानासाहेब मोडक यांना जाते. त्यांच्याच काळात मुंबई महानगरपालिकेने भातसा, वैतरणा आणि तानसा ही धरणे बांधली.

भविष्यात मुंबईला पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून नानासाहेबांनी नाशिक, पुणे व ठाणे जिल्ह्यांची पाहणी केली. त्यांच्या पाहणीत त्यांना दिसले की इगतपुरीहून ठाणे जिल्ह्यातील खर्डीपर्यंत वाहणाऱ्या वैतरणा नदीला चांगला ओघ आहे. शनिवारी-रविवारी केवळ एक मदतनीस बरोबर घेऊन त्यांनी चालत हे सर्वेक्षण पूर्ण केले.

 

times of india

त्यांच्या प्रयत्नांतून १९५६ साली वैतरणा नदीवरचे धरण बांधून पूर्ण झाले आणि तिथे एक तलाव बांधण्यात आला. या तलावातून मुंबईकरांची तहान भागली जाऊ लागली. या प्रकल्पासाठी मेहनत घेणाऱ्या नानासाहेबांची आठवण म्हणून या तलावाला त्यांच्या पश्चात ‘मोडकसागर’ असे नाव देण्यात आले.

पडद्यामागे झटणाऱ्या एखाद्या इंजिनिअरचे एखाद्या धरणाला नाव दिले जाणे ही घटना शेकडो वर्षांतून एकदाच घडते नाहीतर प्रकल्पाला कुठल्या नेत्याचे नाव द्यावे यावरून समर्थकांची भांडणे होतात. आणि नानासाहेबांप्रमाणे पडद्यामागचे खरे राबणारे लोक मात्र दुर्लक्षितच राहतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version