Site icon InMarathi

देव कृपाळू खरा पण अपराध्यांची करूणा त्याला येत नसते : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १९

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १८

===

नारायणाची ही बिकट अवस्ऱ्था आलेल्या मंडळींच्या लक्षात आली नाही. त्यामुळे त्यांतील एकजण म्हणू लागला,

लई गडबड करून आलो. म्हनलं नारायणबुवांची भेट होते की नाही! पन आहेत. म्हंजी काम हुणार!

इतके बोलून त्याने आपला चेहेरा नारायणभटाकडे वळविला आणि पुढे म्हणू लागला,

काल तुम्ही म्हनला तवां कठीन वाटत हुतं पन गावाकडे गेल्याव लगेच बैठक झाली आन् ठरलं की काही जालं जरी आजच्याला बुवांचं कीर्तन गावाकडे व्हायाला हवंच. पैशाचंच भय हुतं म्हनून काल नाही ठरविता आलं. पन लोक म्हनले वर्गणी काढू आन् दोन सावकार बी काही देतो म्हनले. तर बुवा तुम्ही या आज. तुमचा मानपान व्यवस्थित करू. तुमचा गाडीवान, बैलं बी आम्हाला आता जड न्हाईत. छान कीर्तन होऊ द्या. आमच्या गावकऱ्यांना बी आसं कीर्तन एकदा ऐकाया मिळू द्या.

इतकं बोलून सर्वांकडे पाहात पुढे तो म्हणतो,

खरंच, कालचं कीर्तन लय आवडलं समद्यांना. बुवांचा आवाज गोड हाय आनं सांगतात बी सोपं करून…

हे सारे ऐकताना नारायणाचा चेहेरा कसानुसा होत गेला. काय बोलावे ते त्याला कळेना. तेव्हा तुकोबांनींच हाताने त्या माणसाला थांबण्याची खूण केली आणि आवाज जरा चढा करून बोलू लागले.

अहो, तुम्ही बोलताय काय? तुम्ही कीर्तन ठरवायला आलाय की संगीताची बारी? कीर्तनाला कधी देवघेव करीत असतात का?

हे ऐकून दुसरा आंसगांवकर म्हणतो,

तुकोबा, असं काय म्हनता बरं? आहो, व्यवहार आहे. त्यांचंबी पोट आहे त्यावर. इथं कसली कसली मानसं येतात आणि काही बी पैका घेऊन जात्यात. हे गातात चांगलं, बोलतात बी चांगलं. त्यांचा मान आम्ही कराया नको? चांगल्या कामाचं मोल चांगलं दियाला नको?

हे ऐकून तुकोबांनी आपला आवाज अजून चढा केला आणि ते म्हणू लागले,

त्यांचा मधुर गळा पाहून तुम्ही त्यांच्या प्रेमात पडलात आणि ते मागतील ते द्यायला कबूल झालात! कीर्तन ही काय करमणुकीची गोष्ट आहे? आणि लक्षात ठेवा, नारायणबुवांची काळजी करायला पांडुरंग समर्थ आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी त्यांना हेच समजावीत होतो. बरे झाले तुम्हीही आलात. नारायणा, बसा पुन्हा खाली आणि लिहा अजून –

 

 

कथा करोनिया मोल ज्यापें घेतीं । ते ही दोघे जाती नरकामध्ये ।।
ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा । अखंड स्मरा रामराम ।।
मधुरवाणीच्या नका पडों भरी । जाल यमपुरी भोगावया ।।
तुका ह्मणे करीं ब्रह्मांड ठेंगणें । हात पसरी जिणें धिग त्याचे ।।

 

बरं का मंडळी, आमच्या ह्या नारायणबुवांनी इतकी विद्या करावी की त्यांच्यापुढे ब्रह्मांड ठेंगणे वाटावे! जो विद्या करीत नाही तोच हात पसरीत असतो! तसल्या जिण्याचा मी धिक्कार करतो. जो विद्या करतो त्याला पुरून उरेल इतके मिळते! असे गोड वाणीचे कीर्तनकार दिसले तर तुम्हीही त्यांना भुलू नका. त्यांनी मोल मागणे हा जसा अपराध आहे तसा त्यांनी मागितलेले आपल्या हौसेखातर देणे हा ही अपराधच आहे! मोठा मानपान झाला की माणसाला उगीच मोठे झाल्यासारखे वाटते आणि त्याची विद्या करण्याची इच्छा कमी कमी होऊ लागते. त्याच्या त्या अपराधात तुम्ही सहभागी होऊ नका. जर सहभागी झालात तर तुम्हीही नरकात जाल हे मी पुन्हा निक्षून सांगतो.

 

 

कथा करोनिया द्रव्य देती घेती । तयां अधोगती नरकवास ।।
रवरव कुंभपाक भोगिती यातना । न ये नारायणा करूणा त्यांची ।।
असिखङ्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ।।
तुका ह्मणे तया नरक न चुकती । सांपडले हाती यमाचिया ।।

 

अहो, कथा करणे म्हणजे ब्रह्मचिंतन करणे! ते पूर्ण करा, त्यासाठी अखंड नामस्मरण करा. जर हे आज केले नाहीत आणि हरिकथेचे मोल करू लागलात तर जेव्हा तुम्हाला केलेल्या अपराधाची जाणीव होईल तेव्हा पूर्ण खचाल! अंगाला शस्त्रे टोचत असल्याची भावना होईल, एखाद्या तप्तभूमीवर आपण लोळवले जात आहोत असे वाटून अंग पोळल्यासारखे वाटेल. देव कृपाळू खरा पण अपराध्यांची करूणा त्याला येत नसते! आपल्या जीवनात असे घडू देऊ नका.

असे विस्तारून सांगत आता तुकोबांनी आपला स्वर सौम्य केला आणि पुढे समजावू लागले,

हा व्यवहाराचा भाग आयुष्यातून वगळा आणि पाहा किती आनंद मिळतो ते.

हे सारे ऐकून आलेल्यांपैकी एकाने धीर केला आणि म्हणाला,

इतका विचार नव्हता केला आम्ही. आपण आम्हाला शहाणे केलेत, आमच्यावर कृपा झाली, आम्हाला देवाचा प्रसादच मिळाला म्हणायचा.

तुकोबा म्हणाले,

पांडुरंगाची कृपा म्हणा आणि ऐका,

 

कृपेचे उत्तर देवाचा प्रसाद । आनंदीं आनंद वाढवावा ।।
बहुतांच्या भाग्ये लागले जाहाज । येथें आता काय लवलाहें ।।
अलभ्य ते आले दारावरी फुका । येथें आता चुकां न पाहिजे ।।
तुका ह्मणे जिव्हाश्रवणाच्या द्वारे । माप भरा वरें सिगेवरि ।।

 

अहो, आमचे नारायणबुवा बोलणारे आणि तुम्ही ऐकणारे! उभयतांनी आपल्या जिव्हाश्रवण इंद्रियांनी आनंदाचे माप शिगोशीग भरून घ्या. तुम्ही मनाशी म्हणा, आज हा अलभ्य लाभ फुकाचा दारी आला तो सोडण्याची चूक होता कामा नये. आपल्या अनेकांच्या भाग्याने आपल्या गावी हे कीर्तनाचे तारू आनंद घेऊन आलेले आहे, तर घाई कशाला? तो आनंद शांततेने लुटा. तो देवाचा प्रसाद समजा आणि आनंदाने आनंद वाढवा!

तुकोबांचे सांगणे संपले. इतका वेळ लिहायला बसलेला नारायण सोडला तर सारे उभेच होते. कान्होबांनी त्यांना बसावयास सांगितले, घरातून केळी आणली व सर्वांना देऊ लागले. आसगावच्या मंडळींकडे आता नारायणाने वर मान करून पाहिले व म्हणाला,

काल आपल्याशी मी मानधनाच्या ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. कीर्तनकार्याच्या पावित्र्याची बूज माझ्याकडूनच राखली गेली नाही. लोकांची दाद, प्रतिसाद आणि त्यातून रोज येणारी दूरदूरची आमंत्रणे यांत मी हरवून गेलो. माझी उपासना थांबली. यावेळेचे हे तुकोबांकडे येणे झाले नसते तर तसाच वाहवत गेलो असतो. पण तुकोबांनी माझे डोळे उघडले. मी आज तुमच्याकडे येईन. नेहमीप्रमाणे कीर्तन करीन. त्याचे काही मोल घेणार नाही. तुम्हीही मला कशाचा आग्रह करू नका. माझे जे होईल ते होईल. ते पाहण्यास तुकोबा समर्थ आहेत. ह्या साधनेचा आजचा माझा पहिला दिवस आहे. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही मला साहाय्य करा. मी काय मागितले होते ते विसरा आणि आज काही मागत नाही आहे हे ही विसरा. तुमच्या गावात कीर्तनाची संधी मला देऊन तुम्हीच माझ्यावर उपकार करीत आहात. माझे काम जमेल तितके चांगले करण्याचा मी प्रयत्न करीन.

नारायणाचे हे असे स्पष्ट आणि नम्र निवेदन ऐकून तुकोबांच्या चेहेऱ्यावर समाधान पसरले. आंसगांवच्या लोकांना ते म्हणाले,

तुम्ही आता व्हा पुढे. कीर्तनाची तयारी करा. बुवा मागून येतील. आजचे कीर्तन उत्तम होणार. अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ मिळू दे.

आसगांवची मंडळी उठली, तुकोबांच्या आणि रीतीप्रमाणे नारायणभटाच्याही पाया पडली आणि निघाली. तुकोबा नारायणाला म्हणाले,

नारायणा, तुम्ही यशस्वी व्हाल. काल रात्रीपासून काय सांगितले ते तुमच्या लगेच ध्यानी आले आणि तसा मनाचा निग्रहही तुम्ही लगेच केलात. आता हे टिकवून धरा. सारखे लक्षात ठेवा की,

 

नसावे ओशाळ । मग मानिती सकळ ।।
जाय तेथें पावे मान । चाले बोलिले वचन ।।
राहो नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ।।
होवा वाटे जना । तुका ह्मणे साठीं गुणां ।।

 

आपण कुणाचे ओशाळे नसलो म्हणजे सगळे आपल्याला आपोआप मानतात. आपण जाऊ तेथे आपल्याला मान मिळतो, आपला शब्द कुणी खाली पडू देत नाहीत. आपणही आपल्याजवळ कुणाची काही बाकी राहू देऊ नये. ज्याचे त्याला वेळच्या वेळी देऊन टाकावे. लोकांना आपल्या गुणांसाठी आपण हवेहवेसे व्हायला हवे.

नारायणाची गाडी बाहेर बांधून निघायला सज्ज झालेलीच होती. सामान आत चढले होते. आधीचा बेत सरळ रामेश्वरभटांकडे जायचा होता. आता आंसगांवला वळसा घालून जायची वेळ आली. अन्यथा ते ही अवघड नव्हते. पण आता तिकडे जाऊन जेवणखाण करण्याची, सेवा घेण्याची अडचण उभी राहिली. काय करावे हे नारायणाच्या लक्षात येई ना. भांबावल्यासारखा तो तसाच तेथे मुकाट उभा राहिला. मनात म्हणाला,

आता तुकोबा सांगतील तसे….

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

=

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version