वडिलांची इच्छा होती, मुलाने डॉक्टर व्हावं, पण तो बनला कव्वालीचा बादशाह!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
दमदार आवाजाचे नुसरत फतेह अली खान हे शहंशाह –ए- कव्वाली म्हणून जगभरात नावाजले गेले असले तरीही त्यांनी गाणं केवळ नाईलाज आणि घरण्याची रीत म्हणून शिकलं होतं आणि त्यात कधीच रूची न दाखवता ते चक्क सोडलंही होतं हे ऐकून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही.
नुसरत यांचं कुटुंब मुळचं भारतातलं, पंजाबच्या जालंधरमधलं मात्र फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानात जाणं पसंत केलं. फाळणीनंतर लगेचच नुसरत यांचा जन्म फैसलाबाद येथे झाला.
त्यांच्या कुटुंबात कव्वाली गायन थोडी थोडकी नाही तर तब्बल सहाशे वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. वडील फतेह अली खान आणि काका मुबारक अली खान कव्वाली गायक होते आणि तोच त्यांचा व्यवसायही होता.
लहानपणापासूनच घरात सतत कव्वालीचे सूर कानावर पडत होते. या कुटुंबाची एक परंपरा अशी होती की जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला गाण्याचं रीतसर शिक्षण दिलं जात असे. भलेही मोठेपणी तो गायक नाही झाला तरीही चालेल मात्र या कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येकाला गाणं शिकणं बंधनकारक होतं.
नुसरत आणि त्याचा भाऊ फरूख फतेह अली खान या दोघांनाही खरंतर मारून मुटकून गाणं शिकविण्यास सुरवात झाली. दोघांनाही यात काडीचा रस नसल्यानं त्यांना चॉकलेट, गोळ्यांचं अमिष दाखवून धोबीघाटावर नेलं जात असे आणि तिथे हार्मोनियम आणि रागदारीचं शिक्षण दिलं जात असे.
समोर असलेल्या गोळ्यांकडे बघून दोघे भाऊ जे शिकवतील ते शिकत होते. हे असंच अनेक वर्षं चाललं मात्र या दोघांपैकी एकालाही संगीतात गोडी निर्माण झाली नाही. शिकायचं म्हणून गाणं शिकून अखेर ते बंद केलं गेलं.
नुसरत यांचे वडील फतेह अली खान यांना आपल्या मुलानं डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं असं वाटत होतं मात्र घराण्याची परंपरा आणि शिस्त म्हणून त्यांनी मुलाला गाणंही शिकवलं.
१९६४ ला फतेह अली खान यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती बदलली.. त्यावेळेस नुसरत यांचे काका मुबारक अली खान, सलामत अली खान यांनाही वृध्दापकाळानं पूर्वीसारखं गाता येत नव्हतं. खानदानाचा शेकडो वर्षांचा कव्वालीचा वारसा संपुष्टात येईल असं चित्र निर्माण झालं.
–
हे ही वाचा – उचलेगिरी! ही सुपर हीट ७ गाणी म्हणजे निर्लज्जपणे चोरलेल्या, नुसरत फतेह अली खानांच्या गजल आहेत
–
मात्र या खानदानाच्या परंपरेनुसार मुख्य कव्वाल गेल्यानंतर पुढील वारसदाराचा दस्तारबंदी संस्कार करणं अनिवार्य होतं. नुसरत हे एकमेव नाव त्यावेळेस असल्यानं त्यांची दस्तारबंदी केली गेली.
यावेळेस या कव्वाल गटानं मागणी केली की परंपरेनुसार गायक नेता निवडताना त्यानं आधी गाऊन दाखवायला हवं मात्र नुसरत त्याकाळात गात नसल्यानं त्यांची दस्तारबंदी न गाताच केली गेली आणि मुखियाची मानाची पगडी त्यांच्या डोक्यावर चढविण्यात आली.
घरातलं चाळीस दिवसांचं सूतक संपल्यावर नुसरत यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली कव्वाली गायली. यानंतर त्यांनी धार्मिक स्थळांवर कव्वाली गायन सुरू केलं. काका मुबारक अली यांच्या मार्गदर्शनाखाली घरात स्वत:च गायनाचा अभ्यास आणि रियाज चालू केला.
हळुहळू त्यांनी छोटे जाहिर कार्यक्रम करायला सुरवात केली. मुबारक अली यांच्या मृत्यूनंतर मात्र या कव्वाल गटाची पूर्ण जबाबदारी नुसरत यांच्या खांद्यावर आली. आता त्यांना त्यांचा भाऊ फारुख याचीही साथ लाभली.
या भावांना परदेशातून आमंत्रणं येण्यास सुरवात झाली. १९८५ च्या इंग्लंड दौर्यानं सारं चित्र पालटलं आणि जगभरात खानबंधूंचा आवाज घुमला.
सगळीकडून त्यांना कार्यक्रमाची आमंत्रणं येऊ लागली आणि नुसरत फतेह अली खान हे नाव सर्वमुखी झालं. त्यांनी अनेक हॉलिवुड कंपोझरसोबतही काम केलं. भारतातूनही त्यांना चित्रपट संगीतासाठी विचारणा होऊ लागली.
द ग्रेट शोमन राज कपूर यांच्या आग्रहावरून ते भारतात आले मात्र त्यांनी एक अट ठेवली की चित्रपटातील एकतरी गाणं लता मंगेशकर यांच्या आवाजात असेल. अर्थातच ही अट मान्य केली गेली आणि ऊपर आसमान या गाण्यावर दोघांनी काम केलं.
त्यानंतर ते कधीही भारतात आले नाहीत मात्र काही चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. त्यांचं वजन अनियंत्रीत वाढत असल्यानं त्यांना तब्येतीचे त्रास सुरु झाले आणि उपचारांसाठी म्हणून ते लंडनला गेले जिथून ते कधीच परतले नाहीत.
१६ ऑगस्ट १९९७ रोजी त्यांचा तिकडेच मृत्यू झाला. आज या खानदानाची परंपरा पुढील पिढीतील राहत अली खान सांभाळत आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.