विदेशी भूमीवर ‘पहिल्यांदाच भारतीय झेंडा फडकावणाऱ्या’ भिकाजी कामा यांच्याविषयी…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक, भगतसिंग , लाला लजपत राय, दादाभाई नैरोजी या महान व्यक्तिमत्वांचा समावेश आपल्या इतिहासात करण्यात आलेला आहे. पण, यांच्याशिवाय अजूनही कित्येक लोक आहेत जे भारत स्वतंत्र व्हावा म्हणून चळवळ उभी करून आपलं योगदान देत होते.
आपलं स्वतःचं जगणं, आपल्या महत्वाकांक्षा, करिअर वगैरे सगळ्या गोष्टी विसरून हे लोक केवळ स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन जगत होते, म्हणून हे लोक ग्रेट आहेत.
‘भिकाजी कामा’ हे या यादीतील अजून एक नाव आहे ज्याचा उल्लेख आपल्या शालेय इतिहासात आपण फारसा कुठे वाचला नसेल. ‘भिकाजी कामा’ यांनी स्वातंत्र्याची मशाल ही भारतातच नाही तर जर्मनीत सुद्धा तेवत ठेवली होती आणि पूर्ण जगाला हे ठणकावून सांगितलं होतं ,की “इंग्रज हे भारतावर खूप मोठा अन्याय करत आहेत. स्वातंत्र्य हा आमचा अधिकार आहे. त्यापासून ते आम्हाला दूर ठेवू शकत नाहीत.”
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ४० वर्षांपूर्वी २१ ऑगस्ट १९०७ रोजीमध्ये स्ट्रुटगार्ट, जर्मनी येथे ‘भिकाजी कामा’ यांनी आपला हा स्वातंत्र्याचा अधिकार फक्त शब्दानेच सांगितला नव्हता, तर हजारो गोऱ्या लोकांसमोर भारताचा झेंडा सर्वप्रथम फडकावून आपली इच्छा व्यक्त केली होती. कोण होत्या ‘भिकाजी कामा’ ? काय होतं त्यांचं कार्य? हे आपण जाणून घ्यायलाच पाहिजे.
‘भिकाजी कामा’ यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ रोजी सोराबजी फ्रामजी पटेल यांच्या पारसी घराण्यात मुंबईत झाला होता. त्यांचे वडील हे व्यावसायिक होते. अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आणि इतर सामाजिक उपक्रमांसाठी ते नेहमीच योगदान करायचे. भिकाजी यांना लहानपणीच भारत स्वतंत्र होणं किती आवश्यक आहे हे घरातून कळलं होतं. आपल्या वडिलांसोबत भारतभर फिरून त्यांनी विविध भाषा शिकल्या.
१८८५ मध्ये ‘भिकाजी कामा’ यांचं रुस्तुमजी कामा या तत्कालीन लोकप्रिय वकीलासोबत लग्न झालं. रुस्तुमजी कामा हे नेहमी ब्रिटिशांच्या बाजूने केस लढवायचे. ब्रिटिश लोक, त्यांची कामाची पद्धत रुस्तुम कामा यांना खूप आवडायची. भिकाजी या पूर्णपणे देशप्रेमी असल्याने दोघांमध्ये नेहमीच मतभेद व्हायचे.
१८९६ मध्ये जगभरात प्लेगची साथ आली होती. प्लेगच्या साथी दरम्यान भारतीयांवर ब्रिटिशांकडून होणारे अत्याचार हे भिकाजी यांना बघवत नव्हते. सामाजिक संस्थांसोबत काम करतांना एक वेळ अशी आली, की भिकाजी यांनासुद्धा प्लेगची लागण झाली होती. भारतात उपलब्ध होणारे कोणतेही उपचार लागू पडत नसल्याने ‘भिकाजी कामा’ यांना १९०२ मध्ये लंडनला उपचारासाठी पाठवण्यात आलं.
स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश…
लंडनमध्ये वास्तव्यास असतांना ‘भिकाजी कामा’ यांनी दादाभाई नैरोजी यांची भेट घेतली. ब्रिटिश सरकारच्या कामकाजा विरुद्ध नेहमीच भाष्य करणारे दादाभाई आणि त्यांचे इतर सहकारी लाला हरदयाळ आणि श्यामजी कृष्णवर्मा यांनी भिकाजी यांना आपल्या संघात लगेच सहभागी करून घेतलं.
या सर्वांनी एकत्र येऊन लंडनच्या हाईड पार्क येथे स्वातंत्र्य संग्रामाची रणनीती आखली. इंग्रजांपर्यंत ही बातमी पोहोचली आणि त्यांनी ‘भिकाजी कामा’ यांच्यावर भारतात येण्यासाठी आजीवन बंदी घातली.
काही वर्ष लंडनमध्ये राहिल्यानंतर ‘भिकाजी कामा’ यांनी पॅरिसला जाणं पसंत केलं. सेवाभाई राणा आणि मुंचेरशाह बुरजोजी गोदरेज यांच्यासोबत भिकाजी यांनी ‘पॅरिस इंडियन सोसायटी’ची स्थापना केली.
बंदे मातरम’ आणि ‘मदन’स तलवार’ या दोन मोहीमांचं त्यांनी नेतृत्व केलं. ब्रिटिशांची वागणूक ही जगातील इतर देशांपर्यंत पोहोचवणे इतकाच या मोहिमांचा उद्देश होता. भारतीय क्रांतिकारी लोकांना आर्थिक मदत करणं, नियतकालिकं पाठवणं आणि इंग्रजांना त्रास देण्यासाठी नवनवीन संकल्पना सुचवणे अशी उपयोगी कामं ‘भिकाजी कामा’ यांनी पॅरिसमध्ये राहून केली.
===
हे ही वाचा – भारताचं समुद्री-साम्राज्य निर्माण करणारा अज्ञात स्वातंत्र्य सैनिक!
===
श्यामजी कृष्णा वर्मा आणि भिकाजी कामा यांनी एकत्र येऊन ‘वंदे मातरम्’ लिहिलेला भारताचा झेंडा तयार केला. या झेंड्यावर पहिल्या हिरव्या पट्ट्यात भारताच्या स्वातंत्र्याचं प्रतिनिधित्व करणारी ८ कमळं दाखवली जातील असं ठरवण्यात आलं. मधल्या केशरी पट्टीवर ‘वंदे मातरम्’ लिहिलेलं असेल आणि तिसऱ्या पट्टीवर अर्धचंद्र आणि सूर्य असा हिंदू मुस्लिम एकता दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
…आणि झेंडा फडकला
२२ ऑगस्ट १९०७ रोजी स्ट्रुटगार्ट, जर्मनी येथे मानवाधिकार समितीची जागतिक परिषद होणार होती. या परिषदेचं औचित्य साधून तिथे हा झेंडा सर्वप्रथम फडकवण्याचं ‘भिकाजी कामा’ यांनी ठरवलं.
तिथे पोहोचणं सोपं नव्हतं. पण, तरीही भिकाजी कामा यांनी या कार्यक्रमात पोहोचण्याचा पास मिळवला आणि पॅरिसवरून त्या हा झेंडा घेऊन त्या जर्मनीला गेल्या. भारताचा हा झेंडा त्यांनी या परिषदेत फडकवला आणि विदेशी भूमीवर भारतीय झेंडा फडकवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या.
हाच झेंडा काही वर्षांनी सामाजिक कार्यकर्ते इंदूलाल याग्निक भारतात घेऊन आले आणि तो झेंडा आजही पुण्याच्या ‘मराठा आणि केसरी वाचनालय’ या ठिकाणी लावण्यात आला आहे.
त्या देशोदेशी पोचल्या
भिकाजी कामा त्यांचा स्वातंत्र्य संग्राम पुढे अमेरिकेत घेऊन गेल्या. स्वातंत्र्य मिळवण्यात भारताला येणाऱ्या अडचणींसोबतच महिलांचे अधिकार याबद्दल सुद्धा त्यांनी लोकांना माहिती दिली. १९१० मध्ये इजिप्त येथे झालेल्या नॅशनल कॉंफ्रन्समध्ये सुद्धा त्यांनी भाषण करून आपली बाजू मांडली.
महिला सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी इजिप्तच्या लोकांना प्रवृत्त केलं. १९१४ च्या पहिल्या महायुद्धाच्या वेळी सुद्धा त्यांनी भारतीय सैनिकांना ब्रिटिशांची मदत करण्यापेक्षा त्यांना भारतातून हाकलून देण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं.
१९३५ मध्ये युरोपमध्ये असतांना भिकाजी कामा यांना अर्धांगवायूचा आजार झाला. भारतात परत जाता यावं यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे विनंती केली. भिकाजी कामा यांची शारिरीक व्याधी लक्षात घेऊन त्या आता स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊ शकणार नाहीत हा विश्वास मिळाल्याने ब्रिटिशांनी ३३ वर्षांनी भिकाजी कामा यांना भारतात येण्याची परवानगी दिली.
१३ ऑगस्ट १९३६ रोजी भिकाजी कामा यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. तत्पूर्वी त्यांनी आपली पूर्ण संपत्ती, मालमत्ता त्यांनी अनाथ मुलींच्या अनाथाश्रमाला दान दिली.
२६ जानेवारी १९६२ रोजी भारताच्या ११ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भिकाजी कामा यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय पोस्ट पोस्टाने त्यांच्या नावाचं पोस्ट तिकीट काढून त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.