घुंगरांचा आवाज, खजिन्याचा दरवाजा: बॉलिवूडला लाजवेल अशी खऱ्या किल्ल्याची गोष्ट
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भूत, अतृप्त आत्मा याबद्दल आपण खूप काही वाचलं, ऐकलं आहे. काही वर्षांपूर्वी पर्यंत बंद घर, किल्ला, एखादं चिंचेचं झाड अश्या काही निर्मनुष्य जागा होत्या ज्यांना सरसकट भुताटकी असलेली जागा असं नाव दिलं जायचं.
या गोष्टींचा कोणताही पुरावा नसला तरीही त्यांना प्रसिद्धी ही लगेच मिळायची. काळ बदलला, लोक प्रत्येक गोष्टीकडे विज्ञानाच्या दृष्टीने बघू लागले. लोकांमधील भीतीची जागा आता त्यांच्या जिज्ञासेने घेतली.
अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कित्येक संस्थांनी पुढाकार घेतला. पण, तरीही आजही सोशल मीडियावर आपण एखाद्या झाडामागे उभी असलेली आकृतीसारखे काही फोटो फॉरवर्ड होतांना आपण बघत असतो.
‘भुलभुलैय्या’, ‘स्त्री’ सारखे सिनेमे आपलं लक्ष आजही वेधून घेत असतात, खेड्यांमध्ये भूतबाधा होऊ नये याची काळजी घेतात, म्हणजे आपण स्मार्ट झालो आहोत, पण भूत ही संकल्पना (कोणता पुरावा नसून सुद्धा) हद्दपार झालेली आहे नाहीये हे मान्य करावं लागेल.
भुताचं अस्तित्व मान्य झालेल्या मध्यप्रदेश मधील ‘खंडेराव किल्ला’ या जागेबद्दल या लेखात माहिती देत आहोत. तुमचा विश्वास बसावा असा कोणताही आग्रह नाहीये.
भुलभुलैय्यामधील हवेलीमध्ये जसे घुंगरांचे आवाज यायचे तसं ‘खंडेराव किल्ला’ मध्ये घुंगरांचे आवाज येतात असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. मध्यप्रदेशातील शिवपुरी या गावात हा किल्ला आहे.
२१०० वर्ष जुना असलेला हा किल्ला बघण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात. वीर खंडेराव यांनी बांधलेला हा किल्ला जो कोणी आत बघायला गेला आहे तो परत बाहेर आलाच नाहीये अशी नोंद आहे.
–
हे ही वाचा – “या” कारणासाठी कुप्रसिद्ध आहेत, मुंबईतील ही १० ठिकाणे
–
प्रसारमाध्यमांनी या खंडेराव किल्ल्याची माहिती देईपर्यंत कित्येक स्थानिकांना आपला जीव गमवावा लागला होता. वीर खंडेराव आणि त्यांच्या कुटुंबियांचा झालेला गुढ मृत्यू हे या किल्ल्यात अतृप्त आत्मा भटकण्यामागचं कारण सांगितलं जातं.
खंडेराव हे एक लोककला प्रेमी राजे होते. आपल्या सोबत जनतेलासुद्धा दरबारात संगीताची मेजवानी देणे हे वीर खंडेराव यांचं आवडतं काम होतं. घुंगरूचा आवाज मेहफिल सुरु असल्याचा भास हे खंडेराव यांच्या संगीत प्रेमामुळेच होत असावं असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.
‘खंडेराव किल्ल्या’बद्दल संगितली जाणारी अजून एक गोष्ट म्हणजे इथे गुप्त खजिना आहे. भुतांचा राजा हा या खजिन्याचं संरक्षण करतो असं सांगितलं जातं. खजिन्याबद्दल कळल्यावर कित्येक लोकांनी या किल्ल्यात जाऊन तिथली जमीन खणून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता.
पण, ज्या लोकांनी हा प्रयत्न केला त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता हे समोर आलं आहे. या घटनेचा कोणताही डॉक्टरांचा दाखला नसला तरीही ही खबर शिवपुरी गावात वणव्यासारखी पसरली होती.
शिवपुरी गावातील काही स्थानिक लोकांनी ‘खंडेराव किल्ला’ उघडून तिथे शाळा सुरू करण्याचासुद्धा प्रयत्न केला होता. पण, शाळेत आलेल्या काही निरागस विद्यार्थ्यांचा या किल्ल्यात मृत्यू झाला आणि हा प्रस्ताव बारगळला.
ज्या किल्ल्याचं रक्षण स्वतः भूत करतात तिथे इतर कोणताही प्रकल्प होऊ शकत नाही हे बऱ्याच चौकशीनंतर मध्यप्रदेश सरकारला मान्य करावं लागलं होतं. रोज रात्री इथे आत्मे एकमेकांना भेटतात आणि सभा घेतात असंही काही लोक सांगत असतात.
मध्यप्रदेशच्या शिवपुरी गावातील पोहरी या अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या या भागात असलेला हा किल्ला त्यावेळी चर्चेत आला जेव्हा किल्ल्यासमोर पडलेली काही प्रेतं लोकांना दिसली आणि किल्ल्याचं रहस्य लोकांसमोर आलं.
‘पॅरानॉर्मल’ शक्तींचा प्रभाव या जागेवर आहे हे आता लोकांनी मान्य केलं आहे. काही स्थानिक लोकांनी इथे राहण्याचा प्रयत्न केला होता. पण, घरातील महिलांना भुताने झपाटल्याच्या बातम्या आल्या, ज्यानंतर काही तांत्रिकांनी त्या महिलांना पूर्व अवस्थेत आणलं असं स्थानिक लोक सांगत असतात.
यापैकी सर्व घटना या ऐकिवात आहेत. कोणत्याही घटनेची, गुन्ह्याची लिखित नोंद नाहीये. विज्ञानावर, पुरातन गड किल्ल्यांवर प्रेम असलेले कित्येक लोक शिवपुरी येथील या किल्ल्यात गुवाहाटी मार्गे जाऊन भेट देण्यासाठी येतात. पण, हे पर्यटक किल्ल्याच्या कथा ऐकून पुन्हा मागे फिरतात.
कथांमध्ये किती तथ्य आहे ते माहीत नाही. पण, लोकांमध्ये या किल्ल्याबद्दल भीती मात्र खूप आहे. अश्या सर्व वस्तूंची यादी करून त्यातील गुप्तधन (जर असेल तर) लोककल्याणासाठी वापरल्यास सर्वांनाच आवडेल हे नक्की.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.