Site icon InMarathi

वेषांतर करून अतिरेक्यांमध्ये राहिलेल्या आधुनिक ‘बहिर्जी नाईक’ची थरार कथा

major mohit sharma 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

डोके, खांद्यावरून पांघरलेला काळ्यापांढऱ्या चौकडीचा मुसलमानी रुमाल, मानेपर्यंत रुळणारे लांब केस, घनदाट दाढी, दिलखुलास हास्यामुळे आकर्षक ठरणारा चेहरा, गोरापान रंग, लांब बाह्या असलेला हिरव्याकरड्या रंगाचा पायघोळ ‘फेरन’ अंगरखा हे बघितल्यावर कुणालाही हा युवक काश्मिरी वाटणं सहाजिक आहे. अशीच फसगत दोघा अतिरेक्यांचीही झाली.

 

 

ही घटना आहे २००४ सालच्या मार्च महिन्यातील! दक्षिण काश्‍मीरमधील शोपियां भागामध्ये हिज्बुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचे अबू तोरारा आणि अबू सबझार हे दोन अतिरेकी छुप्याने वावरत होते. काश्‍मीरमधल्या युवकांची माथी भडकवून त्यांना दहशतवादाच्या रस्त्यावर वळविण्याचे काम ते करत होते.

एके दिवशी त्यांना एक तरुण भेटला. आपले नाव इफ्तेखार बट असून आपला भाऊ भारतीय सैन्यदलांच्या कारवाईत मारला गेला आहे, यामुळे आपल्याला भारतीय सैन्याचा सूड घ्यायचा आहे असे या तरुणाने त्यांना सांगितले. त्याच्यावर लगेच विश्वास न ठेवता त्या दोघांनी या तरुणाशी संपर्क वाढवला.

भारतीय सैनिकांच्या हालचालींचा व त्यांच्यावर करण्याच्या संभाव्य हल्ल्याचा नकाशाही इफ्तिखारने कागदावर त्यांना काढून दाखवला. अखेर अतिरेक्यांनी त्याला मदत करण्याचे कबूल केले व आवश्यक दारूगोळा, मदतीसाठी इतर अतिरेक्यांची व्यवस्थाही करायला सुरुवात केली.

अबू तोरारा याला या सर्व कटामध्ये काहीतरी संशय येत होता. त्याने या तरुणाला वारंवार तू कोण आहेस? अशी विचारणा करायला सुरुवात केली तेव्हा या तरुणाने आपल्या हातातली ए के ४७ रायफल जमिनीवर बेदरकारपणे टाकून तो अबू तोराराला म्हणाला, ‘‘जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर आपण ही कामगिरी करू शकणार नाही. तेव्हा आत्ता मला मारून टाकण्याशिवाय तुझ्यासमोर दुसरा पर्याय नाही.’’ त्याच्या या सडेतोड बोलण्यामुळे बुचकळ्यात पडून तोरारा व अबू सबझार यांचे लक्ष विचलित झाले आहे हे बघून या तरुणाने अंगरख्यातून आपले ९ एम.एम. पिस्तूल चपळाईने काढून क्षणार्धात त्या दोघांना गोळ्या घातल्या.

हा तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय सैन्यदलातील धडाडीचा तरुण अधिकारी मेजर मोहित शर्मा होता.

 

 

‘ऑपरेशन रक्षक’ या मोहिमेअंतर्गत वेष बदलून (अतिरेक्यांमध्ये) काही दिवस राहणं आणि त्यांची दिशाभूल करणं, डाव फसण्याची शक्यता निर्माण झाल्यावर प्रसंगावधान राखून त्यांना यमसदनास धाडणं हे अद्वितीय धाडसाचे कार्य करणाऱ्या या अधिकाऱ्याला सि.ओ.ए.एस. कमेंडेशन कार्ड आणि सेना मेडल देऊन गौरवण्यात आले.

१३ जानेवारी १९७८ रोजी हरियाणातील रोहतक येथे मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या मोहितने १२ वीनंतर महाराष्ट्रातील शेगावच्या संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. त्याचवेळी त्याने सैन्यात अधिकारी म्हणून सामील होण्यासाठी एस.एस.बी. प्रवेश परिक्षाही दिली. त्यात यशस्वी झाल्यामुळे त्याने खडकवासला येथे एन.डी.ए.मध्ये प्रवेश घेतला.

एन.डी.ए.च्या खडतर प्रशिक्षणामध्ये तावूनसुलाखून तयार होताना मोहितने पोहणे, घोडेस्वारी आणि बॉक्सिंगमध्ये विशेष चमक दाखवली.

आपल्या एन.डी.ए.तील मित्रांमध्ये ‘माईक’ या नावाने ओळखला जाणारा मोहित प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर डेहराडून येथे आय.एम.ए.मध्ये दाखल झाला. तेथेही त्याने उत्तम यश प्राप्त केले.

 

 

त्याची नेमणूक बटालिअन कॅडेट ॲड्ज्युटंट म्हणून करण्यात आली असताना भारताचे राष्ट्रपती आर. के. नारायणन यांची भेट घेण्याचा मान त्याला मिळाला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सैन्यदलातील ५ मद्रास या रेजिमेंटमध्ये त्याची नेमणूक लेफ्टनंट म्हणून झाली.

तीन वर्षांनंतर त्याची निवड अतिशय खडतर अशा ‘पॅरा कमांडो’ प्रशिक्षणासाठी झाली. जून २००३ मध्ये तो प्रशिक्षित पॅरा कमांडो झाला. त्याला कॅप्टनपदाची बढतीही मिळून त्याची नेमणूक काश्‍मीरमध्ये करण्यात आली.

आपल्या हुशारी व नेतृत्त्वगुणांमुळे त्याने काही काळातच मेजर हे पद प्राप्त केले. या पोस्टिंग दरम्यानच २००४ मध्ये त्यांनी सर्वोच्च रोमहर्षक कामगिरी करून दाखवली.

अतिरेक्याच्या गोटात शिरून राहणं ही कल्पना आजही अंगावर काटा आणणारी आहे. केवळ सिनेमांमध्ये अतिरेकी छावण्यातील दृश्य आपलं मन विचलित करतात. अशावेळी प्रत्यक्ष राहण्याचं शिवधनुष्य मेजर मोहित यांनी कसं पेललं असेल याचा विचारंही करणं कठीण!

या थरारासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. अनेक नव्या गोष्टी शिकल्या. त्यांच्या या प्रोजेेक्टबद्दल केवळ मोजक्या अधिका-यांखेरीज इतर कुणालाही कल्पना नव्हती.

अतिरेक्यांच्या टोळीतील दोघांचा विश्वास संपादन करत हा बहुरुपी अनेक दिवस त्यांच्यातलाच एक बनला. त्यांच्या अनेक कारवाया, त्याची तयारी यांंचे बारकावे टिपून घेताना, आपलं खरं रूप कळणार नाही यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं.

 

 

वेळप्रसंगी चतुराई, कधी नरमाई अशी विविध धोरणं आखत त्यांनी मेजर मोहित यांनी आपल लक्षं गाठलं. मात्र अखेर एक असा क्षण आला ज्याने निर्णायक वळण घेतलं.

अतिरेक्यांचा संशय बळावल्याने समोर मृत्यु दिसत असताना प्रसंगावधान राखून त्यांनी अतेरिक्यांना कंठस्नान घातले.

मेजर मोहित शर्मा यांची बदली नंतर बेळगाव येथे झाली. या ठिकाणी त्यांनी सैन्यदलातील कमांडोंना प्रशिक्षण देण्याचे काम दोन वर्षे केले. यानंतर त्यांना पुन्हा काश्‍मीरमध्ये पाठविण्यात आले.

२१ मार्च २००९ रोजी त्यांना काही अतिरेक्यांच्या घुसखोरीबद्दल माहिती मिळाली. त्यांना अटकाव करण्यासाठी त्यांनी आपल्या साथीदारांसह मोहिमेची आखणी केली. उत्तर काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हाफ्रुडा या घनदाट जंगलामध्ये मेजर शर्मा, त्यांचे साथीदार अतिरेक्यांवर कारवाईसाठी गेले.

 

 

मेजर शर्मा यांना एके ठिकाणी काही संशयास्पद हालचाल जाणवल्यावर त्यांनी आपल्या टेहाळ्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. पण अतिरेक्यांनी अचानक तीन बाजूंनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. आपल्या जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण यावेळी आपले चार जवान घायाळ झाल्याचे मेजर मोहित यांच्या लक्षात आले.

गोळ्यांच्या वर्षावामध्ये स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी रांगत जाऊन अतिरेक्यांवर हॅन्ड ग्रेनेडस्‌ टाकले, यात दोन अतिरेकी ठार झाले. मेजर मोहित यांनी आपल्या दोन साथीदारांना सुरक्षित ठिकाणी परत आणले. मात्र यावेळी त्यांना छातीमध्ये गोळी लागली. घायाळ झालेल्या अवस्थेतही त्यांनी आपल्या इतर साथीदारांना ओरडून प्रतिहल्ल्याच्या आज्ञा दिल्या.

अतिरेकी माघार घेत नसल्याचे बघून त्यांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. हातघाईच्या या लढाईत त्यांनी आणखी दोन अतिरेक्यांना ठार केले आणि आपले हौतात्म्य पत्करले.

 

 

या सर्वोच्च त्यागासाठी त्यांना शांतता कालात दिला जाणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘अशोकचक्र’ मरणोत्तर घोषित करण्यात आला. २६ जानेवारी २०१० रोजी मेजर मोहित शर्मा यांच्या पत्नी मेजर रिशिमा शर्मा यांनी भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

 

 

२०१९ मध्ये दिल्ली मेट्रो कार्पोरेशनने राजेंद्रनगर या रेल्वेस्थानकाचे नामांतर ‘मेजर मोहित शर्मा राजेंद्रनगर मेट्रो स्टेशन’ असे केले आहे.

२०१९ मध्येच शिव अरूर आणि राहुल सिंग या लेखकद्वयीने लिहिलेल्या ‘इंडिआज्‌ मोस्ट फिअरलेस टू’ या पुस्तकामध्ये मेजर मोहित शर्मा यांची ही प्रेरणादायी शौर्यगाथा लिहिली आहे.

मेजर शर्मा यांच्या अतिरेक्यांमध्ये वेषांतर करून राहण्याच्या कामगिरीवर ‘इफ्तेखार’ या नावाचा चित्रपट तयार करण्यात येत आहे. पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.

 

 

शिवाजी महाराजांच्या अनेक मोहिमांमध्ये बहिर्जी नाईक यांनी वेषांतर करून मोलाची कामगिरी बजावली होती. आजही आपल्या सैन्यदलातील तरुण धाडसी अधिकारी बहिर्जींचा वारसा चालवत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version