आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
‘तालिबानने अफगाणिस्तानवर केलेला कब्जा’ या घटनेला पाच दिवस उलटून गेले आहेत. पण, संपूर्ण जगाचं लक्ष हे अजूनही याच घटनेकडे लागून राहिलं आहे.
तालिबानबद्दल खूप माहिती मधल्या काळात इंटरनेटवर उपलब्ध झाली आहे. याच दरम्यान, आपल्या देशातसुद्धा बरंच काही घडत आहे हे सुद्धा मान्य आहे. पण, एका अतिरेकी संघटनेने एका देशातील एकेक करत चक्क १२ शहरं काबीज केली, लोकांना वेठीस धरलं. मरणाचीही भीती नसलेली ही तालिबानी संघटना पुढे काय करेल? याचा काही नेम नाहीये, म्हणून ही घडलेली घटना महत्वाची मानली जात आहे.
अमेरिकेने सैन्य माघारी बोलावल्यानंतर तालिबानची वाढलेली मुजोरी सध्या अफगाणिस्तानमधील लोक अनुभवत आहेत. तालिबानी लोकांचं ६०,००० लोकांचं अतिरेकी सैन्य हे अफगाणिस्तानच्या ३० लाख सैन्यावर कसं भारी पडलं? हा प्रश्नसुद्धा सर्वांनाच पडला आहे. त्या “७२ तासांत नेमकं काय घडलं ?” हे जाणून घेऊयात:
१३ ऑगस्ट २०२१ :
तालिबानी संघटनांनी सर्वप्रथम अफगाणिस्तानच्या सैन्याला लक्ष्य केलं आणि त्यांची हत्यारं हस्तगत केली. १३ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानी संघटनांनी कुंदुझ या अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील असलेल्या औद्योगिक क्षेत्र त्यांनी काबीज केलं. त्याच दिवशी तालिबानी संघटनांनी आपला मोर्चा दक्षिणेकडील कंदहार आणि पश्चिमेला असलेल्या लष्कर गाहकडे वळवलं.
१४ ऑगस्ट २०२१ :
कंदहार शहर काबीज करण्यासाठी तालिबानी संघटना या २४ तास तिथेच तळ ठोकून बसल्या होत्या.
कंदहार शहर हस्तगत केल्यानंतर तालिबानी लोकांनी देशाच्या राजधानीला आपलं लक्ष्य केलं.
१५ ऑगस्ट २०२१ :
भारतात ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असतांना अफगाणिस्तानच्या माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अश्रफ घनी यांच्यावर मिळेल त्या विमानाने पळून जायची नामुष्की ओढवली हा अफगाणिस्तानचा या लढाईतील सर्वात मोठा पराभव आहे.
देशाचं रक्षण करू शकत नाही ते सैन्य काय कामाचं? असा प्रश्न सध्या अफगाणिस्तान अचानकपणे सोडून निघून जावं लागणाऱ्या लोकांना नक्कीच पडत असेल.
भौगोलिकदृष्ट्या बघितलं, तर अफगाणिस्तान हा साडे सहा लाख स्क्वेअर किलोमीटर इतक्या क्षेत्रफळाचा देश आहे. महाराष्ट्रापेक्षा दुप्पट असलेलं हे क्षेत्रफळ ६०,००० सैन्याला काबीज करणं कसं शक्य झालं ? याची काही प्रमुख कारणं समोर आली आहेत.
१. अफगाणी सैन्यातील राष्ट्रीय भावनेचा अभाव
अमेरिकेने कित्येक वर्ष आपलं सैन्य अफगाणिस्तान मध्ये तैनात केल्याने अफगाणिस्तानचं मूळ सैन्य किती आहे? हा आकडा सरकारला शेवटपर्यंत कळलाच नाही. कित्येक सैनिक हे केवळ कागदावरच हजर होतं.
अमेरिकेकडून सैन्याच्या नावाने पगार दिला जायचा आणि तो सैनिकांपर्यंत न जाता मधले ऑफिसर हे त्या पैश्यावर मजा करायचे. उपलब्ध सैन्यात देशाप्रती कोणतीही भावना नसल्याने त्यांनी तालिबानी अतिरेक्यांची माहिती कळताच पळ काढायचं ठरवलं यावरूनच त्यांची अफगाणिस्तानबद्दलची भावना लक्षात येते.
देशाबद्दल भावना नसलेलं सैन्य हे काहीच उपयोगाचं नाहीये हे या उदाहरणावरून लक्षात येतं.
२. तालिबानचा अभ्यास
अफगाणिस्तानकडे युद्धासाठी योग्य विमानं होती. पण, तरीही त्यांचा वापर होऊ शकला नाही. कारण, तालिबानी सैन्याने या विमानांच्या पायलटची हत्या केली होती.
तालिबानी अतिरेक्यांनी असे काही ‘फायटर’ लोक तयार करून ठेवले होते ज्यांनी सोव्हिएतच्या सैन्याने ठेवलेले हत्यार हस्तगत केले होते आणि स्थानिकांचा पाठिंबा सुद्धा मिळवला.
स्थानिकांच्या मदतीने कोणत्याही ठिकाणी कमी वेळात पोहोचणं हे सुद्धा तालिबानी सैन्याला त्यामुळे सहज शक्य झालं आणि म्हणून त्यांना अफगाणिस्तान काबीज करण्यासाठी ७२ तास पुरेसे होते.
३. तालिबानी सैन्याने अफगाणिस्तानची केलेली आर्थिक कोंडी
‘ड्रग्ज’ची अफरातफर करून आपली तिजोरी भरणाऱ्या तालिबानी अतिरेक्यांनी एकेक करून अफगाणिस्तानच्या सर्व सीमारेषांवर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं. काबुलमध्ये बसलेल्या अफगाण सरकारचा त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला.
अमेरिकेवर अवलंबून असलेली अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था ही आधीच मोडकळीस आली होती. तालिबानी अतिरेक्यांच्या कारवायांमुळे अश्रफ घनी यांच्या सरकारची तिजोरीत खडखडाट झाला आणि त्यांच्यावर अशी हतबलतेची वेळ आली.
४. कमजोर सरकार आणि लढाऊ वृत्तीचा अभाव
सप्टेंबर २०१८ मध्ये अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने निवडणुका घडवून आणल्या. मोहम्मद अश्रफ घनी यांचा या निवडणुकात विजय झाला. पण, सत्तेवर आल्यावर या सरकारने तालिबानी लोकांना शांत करण्यासाठी त्यांच्यासोबत कोणताही संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही.
अफगाणिस्तानचे लोक हे विविध गटांमध्ये वाटले गेले आणि सरकारला कधी लोकांचा पाठिंबा मिळालाच नाही. कारण, सरकारने फक्त लोकांची मतं मिळवली होती, विश्वास नाही.
अफगाणिस्तानच्या ‘नॅशनल आर्मी’ची सुद्धा हीच अवस्था होती. तालिबानच्या अतिरेक्यांचा हल्ला होत असतांना त्याला प्रत्युत्तर द्यायचं, की तो हल्ला रोखायचा? हेच अफगाणिस्तानच्या जवानांना कोणी सांगत नव्हतं. कारण, त्यांच्या सुरक्षाप्रमुखाकडे सरकारकडून कोणताही निर्णय घेण्याची त्यांना स्पष्टता नव्हती. अशा परिस्थितीमुळेच अफगाणिस्तान सरकार हे एका पत्त्याच्या डावासारखं कोसळलं.
तालिबान पुढे काय करेल? हे येणारा काळच सांगेल. पण, आज त्यांनी अनेकांची झोप उडवली आहे हे नक्की.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.