आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
पुन्हा एकदा तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर आपली सत्ता मांडली असून, तिथे घनघोर युद्ध होऊन, रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे.
अनेकांनी आपले प्रियजन गमावले, रोज अनेक आया बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे निघतायत, कधी कोणती गोळी येऊन आपल्याला मारून जाईल किंवा कधी कोणता नवा फतवा काढून आपल्याला आणखीन बंदिस्त केले जाईल याची तिथल्या नागरिकांना सतत भीती असते.
बाहेर गेलेलं आपलं माणूस पुन्हा परतून घेरी येईल की नाही, आपण आपली मुलं उद्या बघू शकू की नाही, असं दडपण सतत तिथल्या नागरिकांच्या डोक्यावर लटकती तलवार बनून लटकतय.
काही वर्षांआधी सुद्धा अशीच परिस्थिती अफगाणिस्तान वर कोसळली होती. पण तेव्हा तालिबानचा पराभव झाला आणि परिस्थिती हळू हळू रुळावर येऊ लागली. आणि २००३ साली ओसामा या चित्रपटाला “सर्वोत्कृष्ट फॉरेन मुव्ही” या श्रेणीत गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.
तेव्हापासून परिस्थिती थोडीफार रुळावर येऊ लागली व हळू हळू सगळे व्यवसाय सुरळीत मार्गाने सुरु होत होते. पण तालिबानची अफगाणिस्तानवरील पकड पूर्णपणे सुटलेली नव्हती, ती फक्त सैल झाली होती.
त्याकाळी सुद्धा अनेक नियम, अटी तिथल्या नागरिकांना मान्य कराव्या लागत. तिथल्या परिस्थितीवर, युद्धानंतरच्या स्थितीवर डॉक्यूमेंट्री बनवण्यासाठी भारतातून, दिग्दर्शक कबीर खान तिथे पोहोचले.
तिथली सगळी परिस्थिती पाहून, मातीमोल झालेल्या इमारती, अनाथ झालेली मुलं, विधवा स्त्रियांच्या यातना, अशी सगळी उलथा पालथ झालेली स्थिती अनुभवून त्यांना ती जगासमोर मांडावी असं वाटलं.
डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी कबीर खान, १९९६ पासून कमीत कमी ६ वेळा अफगाणिस्तानला जाऊन परतले आहेत. त्यांनी डॉक्युमेंटरी बनवल्या सुद्धा पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी तिथल्या सगळ्या परिस्थितीवर एक डॉक्यूमेंटरी स्टाईल सिनेमा बनवण्याचं ठरवलं.
अफगाणिस्तानात चित्रीकरण झालेला शेवटचा बॉलीवूड चित्रपट होता, १९८८ साली बनलेला “खुदा गवाह” त्यानंतर तालिबानी कारवायांमुळे तिथून पुढे, बॉलिवूडने अफगाणिस्थानात चित्रीकरण करणंच थांबवलं.
२००६ साली अनेक वर्षांनी पुन्हा एकदा एका दिग्दर्शकाने अफगाणिस्थानात जाऊन, तिथल्या कलाकारांना घेऊन एक अख्खा सिनेमा बनवण्याचं धाडस करुन दाखवलं. तो दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणीही नसून, त्याचं नाव कबीर खान होतं. आणि त्यांनी बनवलेला भारताचा पहिला फॉरेन सिनेमा म्हणजे “काबुल एक्सस्प्रेस.”
कबीर खानच्या म्हणण्यानुसार, “बॉलिवूडला नव्या गोष्टी नव्या पद्धतीने सांगण्याची नितांत आवश्यकता आहे. बॉलिवूडचा प्रत्येक फॉरेन सिनेमा, हा पूर्णपणे फॉरेन नसतोच. लंडन, अमेरिका, पॅरिस अशा ठिकाणी जाऊन गोष्ट मात्र भारतीय नायक नायिकेचीच असते. त्यामुळे मला एक खरी कहाणी लोकांपार्यंत पोहचवायची होती.
” काबुल एक्स्प्रेस सिनेमाची गोष्ट त्यांची ही धडपड आपल्यापर्यंत नक्की पोहचवते. या सिनेमात २ भारतीय पत्रकार अफगाणिस्तान बद्दल बातमी कव्हर करायला तिथे गेलेले असतात. त्या दरम्यान ते आतंकवाद्यांचा तावडीत सापडले जातात, आणि पुढे अफगाणी लोक त्यांना मदत करून अफगाणिस्तानची खरी गोष्ट जगापर्यंत पोहचवायला मदत करतात.
या चित्रपटात मुख्य भूमिकेत, जॉन अब्राहम, अर्षद वारसी या व्यतिरिक्त या चित्रपटात अफगाणी, पाकिस्तानी आणि अमेरिकन कलाकारांचा समावेश होता. चित्रपटाचं शूटिंग ४५ दिवसात अफगाणिस्तानला जाऊन पूर्ण करण्यात आलं.
शूटिंग सुरु असताना, तालिबानला या चित्रपटाच्या शूटिंगची माहिती मिळाली होती. त्यांनी ते ताबडतोब बंद करा म्हणून सांगितलं होतं. पण अफगाण सरकारच्या मदतीमुळे ते शूटिंग त्यावेळी पूर्ण करण्यात आलं होतं. त्यांनी, समस्त स्टाफ व कलाकारांच्या सुरक्षेसाठी ६०, कमांडो नियुक्त केले होते. त्या कमांडोजजवळ अत्याधुनिक हत्यारं देण्यात आली होती. संपूर्ण टीमला ३५ SUV कार्स देण्यात आल्या होत्या. ज्या बुलेट प्रूफ होत्या.
शूटिंगच्या दरम्यान अनेक जीवेमारण्याच्या धमक्या तालिबान कडून येतच होत्या. तिकडच्या गुप्तचर संघटनेकडून एकदा तर एक असा संदेश आला की तालिबान कडून५ जणांची “death squad” रवाना झाली आहे. जी लवकरच शूटिंगच्या ठिकाणी येऊन मृत्य तांडव घालेल, व शूटिंग कायमचं बंद करेल. पण सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे असं काहीच झालं नाही. आणि शूटिंग पार पडलं.
अफगाणी कलाकार, हानिफ हम घुम ज्यांनी काबुल एक्सप्रेस मध्ये गाईडची भूमिका साकारली होती, यांच्या म्हणण्यानुसार, अफगाणी लोकांना, हिंदी सिनेमेप्रचंड आवडतात. तिथले लोक बॉलिवूडचे प्रचंड दिवाने आहेत. हिंदी सिनेमाचा बादशाह, शाहरुख खान तर तिथल्या लोकांचा सुद्धा आवडता कलाकार आहे.
–
हे ही वाचा –सुपरफ्लॉप चित्रपट ज्यांनी निर्मात्यांना दिवाळखोर बनवून टाकले…
–
आंतरराष्ट्रीय सिनेमा समीक्षकांकडून या सिनेमा प्रति मिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या होत्या. काहींनी या सिनेमाला, स्टोरीटेलिंग बदलून टाकणारा सिनेमा म्हटलं होत, तर काहींनी अफगाणिस्तानच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करणारा सिनेमा म्हणून संबोधित केलं होतं.
कबीर खान हे या सिनेमाद्वारे, जगासमोर अफगाणिस्तानची सत्य परिस्थिती आणण्याचा प्रयत्न करत होते व ते त्यांना उत्तमरित्या जमलं सुद्धा.
आज पुन्हा एकदा अफगाणिस्थान त्याच परिस्थितीचा सामना करतं आहे. खालेद होसेनीच्या “A thousand splendid Suns” या पुस्तकातुन सुद्धा अफगाणिस्तानची बिकट परिस्थिती दाखवण्यात जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केल्या गेला होता. तो बऱ्यापैकी यशस्वी झाला ही पण त्याच तोडीच्या काबुल एक्सप्रेस ह्या सिनेमाने तिथले प्रसंग अक्षरशः प्रेक्षकांसमोर उभे केले.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.