Site icon InMarathi

खरंच सैनिकांच्या बलिदानाची आपल्याला चाड आहे का हो?

indian-soldier-maratthipizza00

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

न रहावून मी विचारलं,

तुम्ही पहारा देत असताना भूकंप झाला, अथवा शत्रुसैन्याचं आक्रमण झालं. समोर हजारोंच्या संख्येनं शत्रू आणि त्यांच्यासमोर मात्र तुम्ही एकटेच आहात, मदतीला आसपास कुणीच नाही. काय कराल..??

कागल तालुक्यातले माझे मित्र म्हणाले,

काही नाही सर, माघार घेणं शिकवलंच नाही कुणी आजवर! शेवटच्या श्वासापर्यंत लढणार..!! जीव देणार..!! पण दिलेली जबाबदारी पार पाडणार..!!

ईथे आम्ही रात्री जागून IPL बघत असताना, पहिला बाहुबली चांगला होता की दुसरा यावर चर्चा करत असताना, अफजल गुरूची फाशी योग्य अथवा अयोग्य यावर वाद घालत असताना, आमचं हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कुणीतरी आपल्या घरापासून, बायका पोरांपासून, दूर तिकडे सीमेवर डोळ्यात तेल घालून आमचं रक्षण करत असतो आणि आम्हाला याची खरंच चाड नसते. कारण आम्ही निर्लज्ज, गेंड्याच्या कातडीचे झालो आहोत. हे स्वातंत्र्य आम्ही आमचा जन्मजात अधिकार म्हणून मिरवतो, पण त्याचा मोबदला मात्र देण्यास आम्ही तयार नसतो, कारण आमचं देशप्रेम १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला जिलेबी खाण्यापुरतंच मर्यादित असतं. वर्षातून दोन दिवस भारत माता की जय म्हणायचं. पाच वर्षातून एकदा मतदान करायचं की झालो मोकळे भाषास्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य मिरवायला….!

परवा ऐका जवानाचा video बघितला. रात्रंदिवस जागून आपलं कर्तव्य बजावणार्‍या या आपल्या जवानांना जेवणाच्या नावाखाली काय दिलं जातं याचा भांडाफोड केलेला त्याने…नंतर सगळी सारवासारव….जवानाला मानसिक रूग्ण वगैरे ठरवून सैन्यातून कमी केलं वगैरे असं ऐकलं. सुट्टीसाठी घरी जाणार्‍या आमच्या जवानाला आम्ही रेल्वेत बसण्यासाठी जागा देऊ शकत नाही, ईतके निर्ढावलोय आम्ही आणि ही सगळी जवान मंडळी, काही मोजके अपवाद वगळता, छोट्या गावांमधून,सरकारी शाळांमधून ईथवर पोचलेले असतात. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आमच्या सरकारी शाळा जर असे शूरवीर, देशासाठी लढणारे लढवय्ये जवान तयार करणार असतील, तर मग मुंबई, दिल्लीतल्या ऊंच ईमारती, युनिवर्सिटीमधून मात्र काश्मीरच्या स्वायत्ततेची चाड असणारे, भाषास्वातंत्र्याच्या नावाखाली देशाच्या अखंडतेला तडा पोचवणारे विचारवंत कसे तयार होतात..??

khaskhabar.com

मग रोज कुठून ना कुठून बातम्या येत राहतात….काश्मीर, सुकुमामधे आमचे जवान धारातिर्थी पडतात….क्षणभर आमचे डोळे पाणावतात….गावात अंत्यदर्शनाला आम्ही झुंडीने ऊपस्थित राहतो….देशभक्तीपर गाणी लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात लावून आम्ही स्वतःच बधीर होऊन जातो. ही झिंग ऐक-दोन आठवडे टिकते देखील, पण त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या…!

निवृत्त जवानांना याच देशात आपल्या हक्कांसाठी आंदोलनं करावी लागतात. शहीदांच्या कुटुंबीयांना दिलेल्या आश्वासनांच्या, हक्कांच्या पूर्ततेसाठी वर्षानुवर्षे सरकारदरबारी खेटे मारावे लागतात. ऐन ऊमेदीची, तारूण्याची ती २५-३० वर्षे देशासाठी खर्च करून परत गावी आल्यावर मात्र याच जवानांना कधी नव्हे ईतका भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो. याच लोकांसाठी, याच देशासाठी जीव धोक्यात घालत होतो का..?? असं तर वाटंत नसेल ना त्यांना..??

स्वप्न फक्त तुमची आमचीच असतात का…?? स्वतःच्या पोराला पायावर ऊभं राहताना बघायचं नसतं का त्यांना..?? आईच्या हातचं चांगलं खाणं, चांगले चित्रपट पाहणं, मित्रांसोबत वेळ घालवणं आवडंत असेल ना त्यांनासुद्धा..?? पण तरीही या सर्व प्रलोभनांपासून दूर कुठेतरी सीमेवर लेकरांची चिंता न करता, देशासाठी झोकून देणारी ही तरणीबांड पोरं बघितली, की वाटतं…हे खरं प्रेम…कशाचीही अपेक्षा न ठेवणारं, कसलीही तमा न बाळगणारं, कोणत्याही क्षणिक सुखांना बळी न पडणारं निर्व्याज परमोच्च प्रेम…!

मूठभर लोकांनी देशासाठी जीवावर ऊदार होऊन झटायचं आणि ईतरांनी मात्र भ्रष्टाचार करून स्वतःच्या तुंबड्या भरायच्या, देशाच्या अखंडतेला धक्का पोचेल असं वागायचं. हे कुठवर असं चालणार…?? जोवर या देशातला प्रत्येक माणूस स्वतः आगोदर देशाचा विचार करत नाही, स्वतःची संपूर्ण ताकद देशामागे ऊभी करत नाहीत, तोवर काही या देशाची ऊन्नती होणार नाही…ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ..!! ”

तळटीप –

सुकुमा मधल्या घटनेनंतर,अचानक या मित्राचा मेसेज आला की, सर आम्ही किड्या मुंग्यांसारखे मरतो. कुणीच दखल घेत नाही. दोन तीन दिवसांवर कुणाच्याच लक्षात राहत नाही आम्ही….तुम्ही लिहा काहीतरी यावर…खरंतर मी व्यक्तिचित्रण लिहिणार होतो, पण मग सैन्यामधे असेपर्यंत अशी ओळखदेखील दाखवू शकत नाही जाहिररीत्या. मित्रा तुझ्यासाठी माझे शब्दंच काय, मी स्वतःला गहाण ठेवायला तयार आहे. तुम्ही सगळेजण आहात म्हणून आम्ही आहोत,भारत आहे. ईतरांना मला एवढंच सांगायचंय, पडद्यावर दहा गुंडांना खोटंनाटं लोळवणारा आपला हिरो असू शकतो, करोडो रूपयांसाठी खेळणारा खेळाडू आपला हिरो असू शकतो, तर आपल्या देशासाठी आपल्या सगळ्यांसाठी, स्वतःच्या ऊमेदीची ऐशी तैशी करणारे आपले जवान आपले हिरो का असू शकत नाहीत..?? त्यांच्यावर आपण आपला जीव का ऊधळू शकत नाही…?? विचार करण्यासारखी गोष्ट आहे..नाही का ..??

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version