तुमच्या मनातील भावना सहजपणे मांडणाऱ्या गुलज़ारजींच्या वाढदिवसानिमित्त…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखिका – संपदा जोशी
===
गुलज़ार साहब, शायरी और सूकून।
अनेकांना प्रश्नं पडतो की हे शायर आपल्याशी मिळतं जुळतं कसं कसं काय लिहितात? पण माणसं बदलली तरी भावना सारख्याच असतात, असं मला वाटतं. शायरी, कविता सुचायला दुःखाचा एक तरी काटा बोचायला हवा, या मताची आहे मी…
आज गुलज़ार साहेबांचा वाढदिवस. अनेक गाणी, अनेक शायरी यांनी तमाम लोकांना वेडं केलं, दुःखी माणसांना सावरलं, जे दुरावलेत त्यांना जोडलं आणि स्वतःवर, आपल्या माणसावर नव्याने प्रेम करायला शिकवलं.
‘ए ज़िन्दगी, कुछ् कहाँ मैंने, शायद तूने सूना नहीं
तू छिन सकतीं हैं बचपन मेरा पर बचपना नहीं।’
असं जेव्हा गुलज़ार लिहितात तेव्हा माझ्यासारख्या अनेकांना वेडेपणा करण्याची जणू काही मुभाच मिळते. बालपण जगणं, ते टिकवणं हे आपल्या हातात असतं.
छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शोधतांनाही जर लोक काय म्हणतील किंवा लहान आहोत का आपण असा विचार केला तर आयुष्यातले अनेक सुंदर क्षण निसटून जातील. गुलज़ार असंही म्हणतात की, ‘वो जो उठातें हैं क़िरदार पर उंगलियां, तोहफे में उनको आप आईने दीजिए।’
जेव्हापासून शायरींचे अर्थ समजायला लागले, तेव्हापासून गुलज़ारांशी एक वेगळं नातं तयार झालं. एखादी गोष्टं मनाला लागल्यावर, कोणाची आठवण आल्यावर किती सहज आपल्याला गुलज़ार आठवतात आणि त्यांचे शब्दं आपल्या अव्यक्त भावना बोलून जातात.
‘थम कें रह जातीं हैं ज़िन्दगी जब जम के बरसती हैं पूरानी यादें।’ असं ते म्हणतात आणि डोळ्यातल्या पाण्याचा पाऊस सुरू होतो. आणि मग आपण स्वतःलाच समजवू लागतो, डोळे बंद करून आपल्या माणसाला सांगू लागतो की,
‘बहुत मुश्किल सें करता हूँ, तेरी यादों का कारोबार, मुनाफ़ा कम हैं, पर गुज़ारा हो ही जाती हैं।’
आयुष्यात जेव्हा अनेक संकटं असतात पण चेहऱ्यावर सतत एक हसू ठेवून वावरावं लागतं, तेव्हा तर गुलज़ारांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. किती अचूक ओळखलंय त्यांनी आयुष्याला!
‘जीने के लिए सोचा ही नहीं दर्द संभालने होंगे, मुस्कुराये तो मुस्कुराने के क़र्ज़ उतारने होंगे,
मुस्कुराऊं कभी तो लगता है जैसे होंठों पे क़र्ज़ रखा है, तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी हैरान हूँ मैं।’
===
हे ही वाचा – ‘सम्पूर्ण सिंह कालरा’ ते ‘गुलज़ार’ वाचा या अवलियाचा प्रवास!
===
हे असं ऐकल्यावर आयुष्यं कितीही खडतर असूदे पण त्याच्यावर नाराज होण्याची इच्छा कशी काय होईल? जसजसे प्रसंग येतात, आयुष्यात येणारी माणसं आपल्याला धडे देतात तसतसं, अनेक माणसांच्या गर्दीतली आपली शांतता आपल्याला जास्तं प्रिय वाटू लागते. कारण तिच्याशी आपण सगळं काही अगदी खरं बोलू शकत असतो आणि म्हणूनच कदाचित गुलज़ार लिहितात,
‘तन्हाई अच्छी लगती हैं, सवाल तो बहुत करतीं हैं,
पर जवाब के लिए जिद़ नहीं करतीं।’

माणूस म्हणून घडण्याच्या प्रवासात बाकी काही कामाला येवो अथवा न येवो, पण गुलज़ार आणि त्यांचे शब्दं परकोटीचं समाधान देतात. जे गरजेचं असतं. अनेकदा खूप बोलायचं असतं. पण कधी ऐकून घेणारं सापडत नाही, कधी व्यक्त होण्यासाठी शब्द मिळत नाही तर कधी का आणि कशाला दुसऱ्यांना त्रास ही भावना आड येते आणि मग गुलज़ार सावरून घेतात.
खूप लिहावंस वाटतंय पण गुलज़ार म्हणतात तसं, ‘वक्तं भी हार जाते हैं कईं बार जज़्बातों से, कितना भी लिखो, कुछ ना कुछ बाकि रह जाता हैं।’
जाता जाता एकच की गुलज़ारांच्या शायरी आपल्याला बरंच काही शिकवतात. प्रेम, दुःख, विरह, त्रास या भावनांचे अर्थ इथे आपल्याला खऱ्या अर्थाने समजतात. म्हणूनच आयुष्य जगतांना स्वतःमधला, नात्यांमधला कडवटपणा दूर केला तर ‘ज़िन्दगी गुलज़ार हैं’ कारण गुलज़ार म्हणतात, ‘थोड़ा सा रफू करके देखिये ना, फिर से नयी सी लगेंगी, ज़िन्दगी ही तो हैं’।
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.