आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भारतीय स्वातंत्र्य युद्धात ज्या नररत्नांनी आपले संपूर्ण जीवन देशाच्या नावे केले, आपले तन ,मन ,धन देशासाठी वाहिले त्यांच्यापैकीच एक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस होते. नेताजी म्हणजे एक असामान्य व्यक्तिमत्व होते.
सुरवातीला जरी ते गांधीजींबरोबर होते ,तरीही नंतर त्यांना विश्वास होता की केवळ अहिंसात्मक लढा देत राहिल्यास देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही. इंग्रजांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्याशिवाय ते आपला देश सोडून जाणार नाहीत. “तुम मुझे खून दो , मैं तुम्हे आझादी दूंगा” असे वक्तव्य त्यांनी केले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक राष्ट्रव्यापी चळवळ उभी राहिली पाहिजे असे त्यांचे मत होते. व्यक्तीपेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे आणि निस्सीम राष्ट्रवाद ही काळाची गरज असल्याचे ते म्हणत असत. जरीही ते काही काळ जर्मनीस गेले होते, हिटलरशी त्यांची भेट व चर्चा झाली होती तरीही नाझी आक्रमकता आणि वंशवाद या दोन्ही गोष्टींना त्यांचा सक्त विरोध होता.
ब्रिटिशांना भारतावर त्यांची सत्ता कायम राहावी यात नेताजी यांचा अडथळा वाटत होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे ११ वेळा नेताजींना अटक झाली होती. तरीही ब्रिटिश नेताजींना थांबवू शकले नाहीत.
ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका करून घेऊन ते आधी काबुल मग मॉस्को नंतर इटली, जर्मनी असा प्रवास करीत नंतर जपानला गेले. ह्या दरम्यान त्यांनी स्वतःची ओळख गुप्त ठेवली. त्यांनी हिटलर व मुसोलिनीची भेट घेतली. ओळख गुप्त ठेवण्यासाठी ते Oralndo Mazzota हे नाव लावत असत.
जर्मनीत त्यांनी फ्री इंडिया रेडिओ आणि फ्री इंडिया सेंटर सुरु केले. तिथेच नेताजींना ‘Führer’ किंवा “नेताजी” ही उपाधी देण्यात आली. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि भारतीयांना लष्करी शिक्षण दिले. नेताजींनी स्वतः देखील लष्करी ट्रेनिंग घेतले.
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीला रशियाने कडवा प्रतिकार केला. त्यामुळे नेताजींनी जपानला जाण्याचा निर्णय घेतला. १९४३ साली ते पाणबुडीने जपानला गेले.
नेताजी जपानला जाण्याआधी रासबिहारी बोस ह्यांनी जपानमध्ये भारतीयांचे सैन्य तयार केले होते. नेताजी जपानला गेल्यानंतर त्या सैन्याच्या प्रमुखपदाची जबाबदारी नेताजींकडे देण्यात आली. जपानचे प्रधानमंत्री टोजो यांनी देखील नेताजी व भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दर्शवला होता. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा देण्यासाठी नेताजींनी अल्पावधीतच तब्बल ४५,००० भारतीयांचे सैन्य उभे केले. तर अश्या या नेताजींना केवळ भारतातले नव्हे तर परदेशातील लोक देखील असामान्य मानत होते.
दुर्दैवाने १८ ऑगस्ट १९४५ साली एका विमान अपघातात नेताजी ह्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितल्या जाते. परंतु त्याविषयी अनेक वंदता आहेत. काही लोक अजूनही हे म्हणतात की त्या अपघातात नेताजींचे निधन झाले नाही. ते त्यानंतर देखील बराच काळ भारतात येऊन राहिले होते परंतु वेष व नाव बदलून ते भारतात वास्तव्यास होते.
असे म्हणतात की जपानच्या रेंको जी मंदिरात नेताजींच्या अस्थी ठेवल्या आहेत. हे मंदिर जपानची राजधानी टोकियो येथे आहे.
टोकियो मधील रेंको जी मंदिर हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जपानला गेल्यावर अनेक लोक या मंदिरास भेट देतात. दर वर्षी १४ ऑगस्टला हे मंदिर सामान्य नागरिकांसाठी खुले केले जाते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी देखील या मंदिरास ९ डिसेम्बर २००१ रोजी भेट देऊन आले होते. त्याठिकाणी गेल्यावर अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की, “मला या मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न वाटले. कारण या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पावन स्मृती सुरक्षितपणे जतन केल्या आहेत.”
यावरूनच आपल्याला लक्षात येते की या स्थानाचे महत्व भारतीयांसाठी अनन्यसाधारण आहे. या मंदिरात नेताजींचा मोठा पुतळा देखील उभारलेला आहे.
खरंच या मंदिरात नेताजींच्या अस्थी आहेत का या मुद्द्यावर अनेक मतमतांतरे आहेत. नेताजींचा मृत्यू त्या अपघातात खरंच झाला का? तो अपघात होता की घातपात? नेताजी जर त्या अपघातातून वाचले असतील तर नंतर ते कुठे गेले, त्यांच्याबाबतीत खरे काय घडले? असे अनेक विवाद आहेत.
यांची खरी उत्तरे मिळावी यासाठी १९९९ साली अटलबिहारी वाजपेयी यांनी सत्तेत आल्यावर मुखर्जी आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाचे अध्यक्ष जस्टीस मनोज कुमार मुखर्जी हे होते. त्यांनी रेंको जी मंदिराला भेट दिली होती. त्या मंदिरातील ज्या लाकडी बॉक्समध्ये नेताजींच्या अस्थी असल्याचे सांगितले जाते, तेव्हा तो बॉक्स उघडला गेला नव्हता.
त्यामुळे मुखर्जींना त्या अस्थींचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकले नाही. पण नंतर भारतीय राजदूतांनी तो बॉक्स उघडून त्यातील अस्थी बघितल्या व सांगितले होते की बॉक्समध्ये भुऱ्या रंगाच्या अस्थींचे तुकडे आणि जबड्याच्या हाडांचा एक सेट ठेवला आहे.
नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारी निप्पोन आर्मीच्या मेजर नागातोमे यांच्याकडे होती. त्यांनी शाह नवाज कमिटीला सांगितले होते की,”बौद्ध परंपरेनुसार मी आधी गळ्याची एक अस्थी चॉपस्टिकने उचलून बॉक्समध्ये ठेवली. नंतर शरीराच्या प्रत्येक भागाची एक एक अस्थी उचलून बॉक्समध्ये ठेवली होती. १९५६ साली काँग्रेस सरकारने नेताजींच्या मृत्यूबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी शाह नवाज कमिटी स्थापन केली होती. या कमिटीमध्ये तीन व्यक्ती होत्या व कमिटीप्रमुख शाह नवाज खान हे होते.
तरीही याबद्दल भारतीय जनतेच्या मनात अजूनही शंका आहेत. म्हणूनच २००७ साली एक आरटीआय दाखल करण्यात आले होते. त्या आरटीआयचे उत्तर म्हणून विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अजय चौधरी यांनी सांगितले होते की रेंको जी मंदिरात एक कपाट आहे. त्या कपाटात दोन मेणबत्त्यांच्या मध्ये एक लाकडी बॉक्स आहे त्यात नेताजींच्या अस्थी सांभाळून ठेवल्या आहेत.
त्यांनी पुढे माहिती दिली की रेंको जी मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांनी २३ नोव्हेम्बर १९५३ साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना एक पत्र लिहून कळवले होते की त्यांनी १८ सप्टेंबर १९४५ साली नेताजींच्या अस्थी सांभाळून ठेवल्या आहेत.
यातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी नेताजींचे पणतू चंद्र बोस यांनी अनेकदा डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली आहे. जर ही डीएनए टेस्ट झाली आणि त्या अस्थींच्या डीएनएशी नेताजींच्या वंशजांचा डीएनए जुळला तर अनेक प्रश्नांची खरी व खात्रीलायक उत्तरे मिळू शकतील. परंतु अग्निसंस्कार झालेल्या अवशेषांची डीएनए टेस्ट होणे कठीण आहे असे सांगितले जाते. त्यामुळे हे रहस्य कधी उलगडेल याचे उत्तर येणारा काळच देईल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.