Site icon InMarathi

तालिबान्यांच्या खुनशी प्रवृत्तीला चीन घालतंय खतपाणी, थरकाप उडवणारं वास्तव!

taliban china featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

अफगाणिस्तान या देशातील घडामोडींनी सध्या सर्व जगभरातील वृत्तमाध्यमांच्या आणि राजकीयदृष्ट्या सजग नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मध्य आशिया आणि दक्षिण आशिया या दरम्यान असलेला, पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, कजाकिस्तान, उझबेकिस्तान, चीन आणि भारत या देशांशी सीमा भिडलेला, सुमारे साडे सहा लाख चौरस किलोमीटर आकारमानाचा हा देश पूर्वापार अशांतता आणि लढायांसाठी प्रसिद्ध आहे.

 

 

या देशाने जगातील दोन महासत्तांना धूळ चारली आहे. रशियाने या देशात ऐंशीच्या दशकात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. प्रचंड पैसा, सैन्य आणि शस्त्रास्त्रे यांचा वापर करूनही अफगाणीस्तानवर कायमचे वर्चस्व मिळवणे रशियाला शक्य झाले नाही.

अखेर हजारो सैनिकांचा मृत्यू स्वीकारून रशियाने अफगाणिस्तानातून माघार घेतली. यानंतर अफगाणिस्तानात स्थानिक सरकारद्वारा शासनाचा प्रयत्न झाला पण सततच्या यादवीमुळे हा देश अस्थिरच राहिला.

येथील कट्टरवाद्यांच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिकेने या देशात ससैन्य हस्तक्षेप केला. पण अफगाणी हे लढाऊ आणि स्वतंत्र बाण्याचे लोक आहेत. त्यांना कोणाच्याही वर्चस्वाखाली राहणे कदापी सहन होत नाही. त्यांनी अमेरिकेसारख्या महासत्तेलाही व्हिएतनामनंतर लाजिरवाण्या पद्धतीने माघार घ्यायला लावली.

या सर्वांमध्ये आता नव्याने महासत्ता म्हणून उभा राहिलेला चीन वेगळ्या हिमतीने स्वतःचे स्थान अफगाणिस्तानमध्ये बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. चीन आणि अफगाणिस्तानचे संबंध आतापर्यंत संमिश्र असे राहिले आहेत.

 

 

रशियन सैन्याशी लढण्यासाठी चीनद्वारा अफगाणी बंडखोरांना शस्त्रे, दारूगोळा आणि प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु जेव्हा तालिबानने गेल्यावेळी अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली होती त्यावेळी चीनने त्यांना पाठिंबा दिला नव्हता. या निर्णयामागे चीनच्या शिंगज्यांग प्रांतामधील वुईगर या मुस्लिम धर्मीय नागरिकांच्या बंडखोरीची पार्श्वभूमी होती.

चीनच्या पोलादी भिंतीमागे कम्युनिझम हा एकच विचार धर्माप्रमाणे सर्वांसाठी सक्तीचा आहे. अन्य कोणत्याही धर्माला येथे प्रोत्साहन मिळत नाही.

वुईगर मुस्लिमांवर चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर दडपशाही केली जाते. त्याला विरोध करणाऱ्या बंडखोरांना इस्लामी मूलतत्त्ववादी आणि तालिबान्यांचा पाठिंबा असल्याच्या संशयामुळे चीनने पूर्वी तालिबान राजवटीला पाठिंबा दिला नव्हता.

मात्र नंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात ससैन्य शिरकाव केल्यावर आणि अमेरिका व चीनमधील संबंध अनेक स्तरांवर ताणले गेल्यावर चीनद्वारा आपल्या धोरणात बदल करण्यात आला आहे.

रशिया व अमेरिकेप्रमाणे प्रत्यक्ष सैन्य न घुसवता आर्थिक व राजकीय पाठिंब्याच्या आधारे चीन अफगाणिस्तानात आपले पाय रोवू इच्छितो. चीनने अमेरिकेला व तिच्या युरोप-ऑस्ट्रेलिआ सारख्या पाठिराख्यांना आव्हान देण्याचे आक्रमक धोरण स्वीकारले आहे.

आशिया व आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये चीनने प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. पाकिस्तान व श्रीलंकेसारख्या आपल्या शेजारी देशांचा यात समावेश आहे.

 

 

वॉशिंग्टन येथील स्टिमसन सेंटर या संस्थेच्या चीन अभ्यासगटाच्या संचालक युन सन यांच्या मते वीस वर्षांपूर्वी चीन हा जागतिक महासत्ता नव्हता आणि त्यामुळे अफगाणीस्तानमधील घडामोडींशी त्याला सोयरसुतक नव्हते. पण आता चीनने स्वतःला महासत्ता म्हणून प्रस्थापित करणे, जगात सर्वत्र आपले आर्थिक हितसंबंध निर्माण करणे आणि वुईगर मुस्लिमांचा प्रश्न इ. मुळे चीनने कुंपणावर न राहण्याची भूमिका घेतली आहे.

चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सोमवारी बीजिंग येथे वार्ताहरांना सांगितले की चीनला आशा आहे की तालिबान अफगाणिस्तानातील इतर राजकीय पक्षांना आणि विविध टोळ्यांना एकत्र आणून एक राजकीय व्यवस्थेची सर्वसमावेशक चौकट निर्माण करेल व त्याद्वारे अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होईल.

तालिबान्यांनी काबूलमध्ये केलेल्या प्रवेशाची तुलना चीनमधील सरकार नियंत्रित समाजमाध्यमांवर माओच्या कम्युनिस्ट सेनेने १९४९साली बीजिंगमध्ये केलेल्या प्रवेशाशी केली जात आहे.

चीनच्या या धोरणामागे त्यांच्या संभाव्य आर्थिक फायद्यांचाही मोठा वाटा आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सुमारे ८४,००० कोटी डॉलर्स किमतीची गुंतवणूक केली होती. गेल्या महिन्याभरात सुमारे २०० अमेरिकन कर्मचाऱ्यांनी अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला आहे.

 

 

या सर्वांच्या जाण्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत चीनला शिरकाव करण्यास मोठा वाव आहे. तसेच शेजारील पाकिस्तानमधे सुरू असलेल्या ५००० कोटी डॉलर्स मूल्य असलेल्या चीनच्या रस्तेबांधणी प्रकल्पाच्या सुरक्षेसाठीही अफगाणिस्तानमध्ये वातावरण शांत असणे चीनला आवश्यक वाटते.

यामुळेच चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यांनी मुल्ला अब्दुल घनी बरादर या तालिबानी पदाधिकाऱ्याशी २८ जुलै रोजी झालेल्या चर्चेमध्ये त्यांना पूर्व तुर्केस्तान इस्लामिक चळवळीशी नाते तोडण्याचा इशारा दिला.

मुल्ला बरादर यानेही अफगाण भूमीवरून चीनच्या शत्रूंना मदत न मिळण्याचे आश्वासन दिले. या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणून चीनने तालिबानच्या काबूलमधील प्रवेशाला आणि अफगाणिस्तानातील सत्ता काबीज करण्याला आता उघड पाठिंबा द्यायचे ठरवले आहे.

हिमबिबट्या हा अफगाणिस्तानचा राष्ट्रीय प्राणी आहे. तो एकांडा क्रूर शिकारी आहे. तालिबानीसुद्धा आपल्या क्रूरतेमुळे जगात कुप्रसिद्ध आहेत. आता त्यांना चीनच्या सामर्थ्यवान ड्रॅगनचे पाठबळ मिळणार आहे या विचाराने जगभरातील विवेकी विचारवंतांच्या पोटात गोळा आला आहे.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version