Site icon InMarathi

पोट फुटेस्तोवर खाल्ल्यामुळे जीव गेलेल्या एका राजाची खरी-खुरी गोष्ट!

overating IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

माणूस सगळ्यात जास्त अस्वस्थ कधी होतो, तर जेव्हा त्याच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहतो तेव्हाच! एरवी माणूस इतर कशातूनही मार्ग काढत पुढे जातो. असं म्हणतात माणूस जे काही करतो ते पोटासाठीच! एखादा रस्त्यावर भीक मागून जगणारा भिकारी असू दे, की एखाद्या अब्जावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा मालक, दोघेही पोटासाठीच काम करत असतात.

 

 

भूक मोठी वाईट असते, ती माणसाला काहीही करायला भाग पाडते. म्हणूनच जिभेवर आणि भूकेवर ताबा मिळवण्यासाठी जगात जवळजवळ सगळ्याच संस्कृतींमध्ये उपवासाला महत्व दिलेले आहे.

आपले पूर्वज हुशार होते. त्यांना मानवी स्वभावाची चांगलीच कल्पना होती. म्हणूनच त्यांनी उपवास आणि श्रद्धेची सांगड घातली, जेणेकरून लोकांचा आपोआपच जिभेवर आणि भूकेवर ताबा राहील. त्यातूनही काही हौशी खवय्ये “एकादशी आणि दुप्पट खाशी” असा प्रकार करतात. पण बहुसंख्य लोक उपवास अगदी श्रद्धेने पाळतात.

 

 

काही असेही लोक असतात ज्यांना भूक अजिबात सहन होत नाही. उद्याचा एक दिवस आपल्याला जेवायला मिळणार नाही या कल्पनेनेच काही लोकांची रात्रीची झोप उडते आणि ते आदल्या दिवशी पुढच्या दोन दिवसांचं जेवून घेतात.

उपासमार होऊन जीव जाणे या दुर्दैवी प्रकाराबद्दल आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. पण पोट फुटेस्तोवर खाल्ल्यामुळे जीव जाण्याची घटना क्वचितच घडते.

अशीच घटना पूर्वी स्वीडनमध्ये घडली आहे. स्वीडनचा राजा एडॉल्फ फ्रेडरिक म्हणे एक दिवस इतका जेवला की त्यातच त्याचा मृत्यू झाला. आता राजाचे जेवण म्हणजे अत्यंत शाही असणार यात काहीच शंका नाही. त्यात तो राजा अॅडॉल्फ सारखा खवय्या असेल तर त्याच्यासाठी त्याचा शाही खानसामा त्याचा संपूर्ण जीव ओतून स्वयंपाक करत असणार हे नक्की!

 

===

हे ही वाचा – एक असा तत्ववेत्ता जो स्वतःच्याच विनोदावर हसून मृत्युमुखी पडला, वाचा त्याची कहाणी!

===

राजाचं झालं तरी काय?

१२ फेब्रुवारी १७७१ रोजी राजा अॅडॉल्फ फ्रेडरिक जेवायला बसला ते शेवटचेच! फेब्रुवारी महिन्यात ख्रिश्चन लोकांचा लेन्ट सिझन असतो. लेन्ट म्हणजे ईस्टर पूर्वीचे ४० दिवस उपवास करणे किंवा व्रत पाळणे. या ४० दिवसांत ख्रिश्चन लोक मर्यादित आहार घेतात आणि अनेक गोष्टी आहारात वर्ज्य करतात.

येशू ख्रिस्त वाळवंटात ४० दिवस होते त्यांच्या या त्यागाची आठवण म्हणून ख्रिश्चन लोक ईस्टरपूर्वी हे व्रत पाळतात. यात श्रोव्ह ट्यूसडेला खूप महत्त्व आहे. श्रोव्ह ट्यूसडे म्हणजे ऍश वेन्सडे (लेन्टचा पहिला दिवस) च्या आधीच दिवस होय. दुसऱ्या दिवसापासून उपवास असल्याने या दिवशी ते खास जेवण करतात. त्या जेवणात विविध प्रकारचे तिखट आणि गोड पदार्थ असतात.

 

 

१२ फेब्रुवारी १७७१ हा श्रोव ट्यूसडेचा दिवस होता. त्यानंतर लेन्ट सिझन सुरु होणार, म्हणून त्या दिवशी प्रथेप्रमाणे एकदम खास जेवण होते. राजाच्या जेवणात लॉबस्टर, कॅव्हिअर, विविध प्रकारचे मांस, भाज्या आणि शॅम्पेन असे विविध शाही पदार्थ होते.

सामान्य माणूस इतके सगळे पदार्थ खाल्ल्यावर समाधानाने जेवण थांबवतो. पण एडॉल्फ राजेसाहेबांची तर गोष्टच वेगळी होती. एक संपूर्ण कुटुंब आठवडाभर आरामात पोटभर जेवू शकेल इतके त्याने एकट्याने त्यादिवशी खाल्ले, तरीही त्याचे समाधान झाले नाही. त्याला अजूनही इतक्या जेवणानंतर डेझर्ट खाण्याची इच्छा आणि भूक होती.

त्यादिवशी डेझर्ट म्हणून त्याच्या खानसाम्याने ‘सेमला’ नावाची एक खास स्वीडिश पेस्ट्री बनवली होती. राजा खाणार म्हणजे तो पदार्थ शाहीच असायला हवा म्हणून त्याच्या त्या पेस्ट्रीमध्ये बदामाची पेस्ट, विविध प्रकारचा सुकामेवा घातला होता आणि त्यावर भरपूर क्रीम घालून राजाला ती पेस्ट्री खायला दिली होती.

 

 

तुमच्या-आमच्यासारखी सामान्य माणसे पचायला जड असलेली ही पेस्ट्री एक किंवा फार तर दोन खाऊ शकतील. पण अॅडॉल्फ राजाने हावरटपणाचा कळस गाठत चक्क चौदा पेस्ट्रीज एकाच वेळेला खाल्ल्या आणि मग ते त्याचे शेवटचे जेवण ठरले.

इतकं खाल्ल्यावर पोट सहन करू शकलं तरच नवल. त्यादिवशी राजाने आपल्या पोटावर अत्याचार केला आणि पचनात भयंकर दोष निर्माण झाल्यामुळे राजा अॅडॉल्फ फ्रेडरिकचा मृत्यू झाला.

राजा हावरट जरी असला तरी त्याच्या राज्यात स्वीडिश जनता सुखी होती. त्यांना स्वातंत्र्य होते. त्याच्या राज्यात पहिल्यांदाच लोकसभेत ‘फ्रिडम ऑफ प्रेस आणि फ्रिडम ऑफ इनफॉर्मेशन’चे कायदे पास झाले होते. जनतेचे नागरी हक्क अबाधित होते. त्यामुळे हा राजा लोकांचा लाडका होता.

 

 

राजाचा अकाली मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा गुस्ताव सत्तेवर आला. तो हुकूमशहा असल्याने जनतेच्या नागरी हक्कांवर गदा आली.

पत्रकारितेचे स्वातंत्र्य देखील काढून घेतले गेले. त्यानेच रशियाशी विनाकारण युद्धाला सुरुवात केली. या युद्धामुळे स्वीडनचे खूप मोठे नुकसान झाले. त्याच्या हुकूमशाहीला कंटाळून एका मारेकऱ्याने त्याच्यावर गोळीबार करून त्याला ठार केलेआणि वडिलांप्रमाणेच या गुस्तावचा देखील अकाली मृत्यू झाला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version