इराकी हुकुमशहाचे आमंत्रण धुडकावणारे देशभक्त अणुवैज्ञानिक : डॉ. राजा रामण्णा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
सारं जग ज्याला क्रूरकर्मा म्हणून ओळखत होतं आणि त्याचा बीमोड करण्यासाठी जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला दोन वेळा त्याच्याबरोबर युद्ध करावं लागलं अशा इराकच्या सर्वसत्ताधीश असलेल्या हुकूमशहा सद्दाम हुसेन याला भारतासारख्या विकसनशील देशाने अणुचाचण्या यशस्वी कराव्यात यामुळे असूया वाटू लागली.
पोखरण येथे १९७४ सालातील मे महिन्यात घडवण्यात आलेल्या अणुचाचणीचे सूत्रधार शास्त्रज्ञ डॉ. राजा रामण्णा होते. यामुळे त्यांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली.
१९७८ साली सद्दाम हुसेन याने डॉ. रामण्णा यांना विशेष व्यक्तिगत पाहुणे म्हणून इराकमध्ये आमंत्रित केले. त्यांना बगदाद या इराकच्या राजधानीची आणि अल तुवैथा येथे असलेल्या इराकच्या मुख्य अणुसंशोधन केंद्राची सफर घडवून आणण्यात आली.
यानंतर त्यांना सद्दाम हुसेनच्या भेटीला नेण्यात आले. यावेळी सद्दामने कोणतीही भीड न बाळगता डॉ. रामण्णा यांना थेट प्रस्ताव दिला, की त्यांनी इराकच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची सूत्रे स्वीकारावीत. तो म्हणाला होता, ‘‘तुम्ही तुमच्या देशासाठी पुरेसं काम केलं आहे. आता परत जाऊच नका. इथेच रहा आणि आमच्या अणुसंशोधन कार्यक्रमाचे प्रमुख व्हा. तुम्हाला जितके हवे असतील तितके पैसे मी देतो.’’ अचानक आलेला हा प्रस्ताव ऐकून डॉ. रामण्णा यांना धक्का बसला.
आपल्याला हा हुकूमशहा आता भारतात परतू देईल की नाही, अशी भीती त्यांना वाटू लागली आणि त्यांची झोपच उडाली. त्यांनी तातडीने मिळेल त्या विमानाने इराक देश सोडला व ते भारतात परतले. अर्थातच यानंतर त्यांनी इराकला पाऊलही टाकले नाही.
पुढे जेव्हा इस्रायली गुप्तहेरांना इराकच्या अणुबॉम्ब कार्यक्रमाविषयी कळले तेव्हा त्यांनी त्यासाठी काम करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांचे युरोप आणि आशियातील विविध ठिकाणी खून करवले.
आपल्या पुढील कारकिर्दीत डॉ. राजा रामण्णा यांनी अण्वस्त्र संशोधन प्रसारावर बंधने घालण्याच्या धोरणांचा पुरस्कार केला. ८० आणि ९० च्या दशकामध्ये त्यांनी भारताच्या संरक्षणविषयक संशोधन करणाऱ्या विभागाचे (डि.आर.डि.ओ.) महासंचालक (डायरेक्टर जनरल) म्हणून जबाबदारी सांभाळली.
इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सदस्य होते व या संस्थेच्या ३० व्या जनरल कॉन्फरन्सचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. १९९०मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी संरक्षणखात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले.
१९९७ ते २००३ या काळात ते राज्यसभेचे नियुक्त सभासद होते. २०००मध्ये त्यांनी भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे सल्लागारपदही भूषविले होते. भारतातील प्रतिष्ठेचा असलेला शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, तसेच भारतीय शासनाचे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
डॉ. रामण्णा यांनी आपली शास्त्र या विषयातील कारकीर्द आणि संगीत विषयाचा अभ्यास या दोन्ही गोष्टी कायम एकत्र जोपासल्या. त्यांनी १९४७साली बंगलोरमधून भौतिकशास्त्र विषय घेऊन बी.एस.सी. आणि संगीत विषयातील एम.ए. अशा दोन्ही पदव्या मिळवल्या.
त्यानंतर भौतिकशास्त्र विषयातील एम.एस.सी. आणि संगीत विषय घेऊन एम.ए. असे उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. १९५२साली त्यांना कॉमनवेल्थ स्कॉलरशीप मिळून ते इंग्लंडमध्ये डॉक्टरेट करण्यासाठी गेले.
१९५४मध्ये त्यांनी अणू भौतिकशास्त्रामध्ये पी.एच.डी. आणि एल.आर.एस.एम. ही संगीत विषयातील पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते भारतात परतले व त्यांनी ए.इ.इ.टी. या भारत सरकारच्या अणू संशोधन संस्थेत भारतीय अणू कार्यक्रमाचे जनक असलेल्या डॉ. होमी भाभा यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली.
डॉ. भाभा यांच्या अपघाती निधनानंतर याच संस्थेला डॉ. भाभा अणू संशोधन केंद्र (बी.ए.आर.सी.) हे नाव देण्यात आले. भाभा यांच्या नंतर डॉ. राजा रामण्णा यांनी भारताचा अणू संशोधन कार्यक्रम समर्थपणे पुढे नेला. पोखरण येथे झालेल्या अणुचाचणीचे ते प्रमुख सूत्रधार होते.
–
हे ही वाचा – हायड्रोजन बॉम्ब आणि ऍटम बॉम्बमध्ये फरक काय? जास्त विनाशकारी कोण? वाचा
–
डॉ. रामण्णा यांचा भारतीय तसेच पाश्चात्त्य संगीताचा सखोल अभ्यास होता. ते उत्तम पियानोवादन करत असत. त्यांनी सादरीकरणाप्रमाणेच संगीत या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्यानेही दिली होती. त्यांनी आत्मचरित्र आणि भारतीय तसेच पाश्चात्त्य संगीतावर एक पुस्तकही लिहिले आहे. २४ सप्टेंबर २००४ रोजी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.