' ‘भाला फेक’मधील भारताने जिंकलेली ही २ सुवर्ण पदकं आपण विसरलो तर नाही ना? – InMarathi

‘भाला फेक’मधील भारताने जिंकलेली ही २ सुवर्ण पदकं आपण विसरलो तर नाही ना?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

अभिनव बिंद्राने मिळवलेल्या सुवर्णपदकानंतर, अखेर यंदा प्रतीक्षा संपली. नीरज चोप्राने वैयक्तिक खेळात गोल्ड मेडलची कमाई करत, पुन्हा एकदा भारतीयांना मोठ्या सेलिब्रेशनची संधी दिली. मग कुणी त्याचं तोंडभरून कौतुक केलं. कुणी अभिनव बिंद्राची आठवण काढली, तर कुणी ‘फेकण्याचा स्पर्धेत’ सुवर्ण पदक मिळालं हा मुद्दा लावून धरत पंतप्रधान मोदींना निशाणा साधून त्यांचं ट्रोलिंग सुरु केलं.

 

abhinav bindra inmarathi

 

या सगळ्या वातावरणात नीरजच्या यशाचं खूप कौतुक झालं. कधीकाळी त्याच्या वजनामुळे त्याला हिणवलं गेलं होतं, तिथपासून ते ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकावर त्याने नाव कसं कोरलं इथपर्यंत सगळ्या गोष्टींवर लोक मनापासून व्यक्त झाले. त्याचं यश चर्चिलं जाऊ लागलं. भारतात परतल्यावर त्याचा सन्मानपूर्वक आदर सत्कार करण्यात आला.

 

neeraj chopra inmarathi
indiatoday.in

 

हे सेलिब्रेशन होत असतानाच, आणखी एका नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु होती, आणि ते नाव म्हणजे देवेंद्र झझारिया!

हा देवेंद्र झझारिया नेमका आहे कोण? आणि त्याने नेमकं काय यश मिळवलं होतं याची सुद्धा चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसतेय. त्याने मिळवलेल्या सुवर्णपदकांचा विसर तर पडलेला नाही ना, असा प्रश्न मंडळी एकमेकांना विचारताना दिसत आहेत. कोण आहे हा देवेंद्र, आणि कसा होता त्याचा सुवर्णपदकांपर्यंतचा प्रवास, ते जाणून घेऊया.

पॅरालम्पिक स्पर्धांमध्ये मोठं यश

देवेंद्र झझारिया म्हणजे पॅरालम्पिक स्पर्धेत भारताला भालाफेकमध्ये १ नव्हे तर चक्क २ सुवर्ण पदकं मिळवून देणारा वीर आहे. २००४ आणि २०१६ साली त्याने ही सोनेरी कामगिरी करण्यात यश मिळवलं आहे.

 

devendra jhajharia inmarathi
thebetterindia.com

 

पॅरालम्पिक स्पर्धांमध्ये स्वतःची आगळी छाप पाडणाऱ्या देवेंद्रच्या नावे दोन अनोखे विक्रम सुद्धा आहेत. ६२.१५ मीटर लांब भाला फेकत त्याने पॅराऍथलिट जगातील विश्वविक्रम त्याच्या नावे केला होता. भारत सरकारने त्याला पद्मश्री देऊन सन्मानित केलं आहे. या पुरस्काराचा मानकरी ठरलेला तो पहिलाच पॅराऍथलिट आहे.

एवढंच नाही, तर त्याच्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल त्याला क्रीडा विभागातील अर्जुन पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे.

लहानपणीच दुर्दैवाचा फेरा…

राजस्थानमधील चुरु नावाच्या छोट्याशा गावात देवेंद्रचा जन्म झाला. तोदेखील एका सामान्य शेतकरी कुटुंबात! लहानपणी खेळाचा आणि त्याचा संबंध आला तो इतर मुलांप्रमाणेच, निवाला विरंगुळा म्हणून. लहानपणी मित्रांसोबत खेळताना होणारी मजा-मस्ती, आयुष्याचा कायमचा खेळ करून गेली, हे मात्र त्याच्यासाठी दुर्दैवी ठरलं.

वयाच्या आठव्या वर्षीच खेळत असताना, तो एका झाडावर चढत होता. त्यावेळी नजरचुकीने त्याने एका हातात चक्क लाईव्ह वायर धरली. इथेच मोठा घात झाला. ११००० व्होल्टच्या झटक्यातून हा मुलगा सावरणं अशक्य आहे असंच अनेकांना वाटत होतं. त्यातून तो वाचला खरा, मात्र त्याला डावा हात गमवावा लागला.

 

devendra jhajharia inmarathi
newsable.asianetnews.com

 

तो खचून गेला नाही

हा अपघात त्याच्या आयुष्यातील मोठा धक्का ठरला, हे वेगळं सांगायला नको. वयाच्या आठव्या वर्षी एक हात गमावणं हा आघात शारीरिक तर आहेच, पण त्या कोवळ्या मनावर झालेला मानसिक आघात किती गहिरा असेल, याचा आपण विचारही करू शकत नाही. त्याच्या जागी कुणी दुसरं असतं, तर ती व्यक्ती नक्कीच खचून गेली असती. देवेंद्र मात्र खचून गेला नाही.

देवेंद्रने शाळेतील विद्यार्थी खेळत असलेल्या प्रत्येक खेळाचं बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात केली. यामागे त्याचा उद्देश एकच होता; तो म्हणजे एका हाताने खेळता येईल असा, आपल्याला साजेसा खेळ शोधून काढणं. लोकांच्या सहानुभूतीपूर्ण नजरा असणाऱ्या वातावरणात त्याला अडकून पडायचं नव्हतं. यासाठी त्याच्या पालकांनी सुद्धा त्याला आधार दिला.

स्वतःला सुद्धा करण्यासाठीच तो खेळाकडे वळला आणि त्यात प्रगती करत यशाकडे पावलं टाकायला सुरुवात केली. दहावीत असतानाच, वयाच्या १५-१६ व्या वर्षीच त्याने डिस्ट्रिक्ट चॅम्पियन म्हणून नाव कमावलं आणि तिथून कधीही मागे वळून पाहिलं नाही.

 

devendra jhajharia gold inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

त्यामुळेच आज भालाफेक या क्रीडा प्रकारात पॅरालम्पिक स्पर्धांमध्ये २ सुवर्ण पदकं जिंकण्याची कामगिरी तो करू शकला. हे यश सुद्धा एका भारतीयाने मिळवलेलं यश आहे, हे विसरून चालणार नाही. या यशाचा भारतीयांना विसर पडू नये, यासाठी ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणं, हे सोपं काम आपण नक्कीच करू शकतो. काय मग मंडळी, हा लेख शेअर करणार ना मित्रमंडळींसोबत सुद्धा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?