५ रुपयात लग्न, ४०० रुपये महिना खर्च – डॉक्टर जोडप्याने कुपोषणाविरुद्ध छेडलं युद्ध!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
१९८५ साली जेव्हा देवराव कोल्हे भारतीय रेल्वे साठी काम करत होते, तेव्हा त्यांचे पुत्र रवींद्र हे नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होते.
त्यांचे शिक्षण पूर्ण होऊन ते डॉक्टर होण्याची त्यांच्या घरातील व गावातील अनेक लोक आतुरतेने वाट बघत होते, कारण ते त्यांच्या घरातील पहिले डॉक्टर होणार होते.
शेगावातील त्यांच्या घरी अतिशय उत्साहाचे वातावरण होते. कारण रवींद्र ह्यांची आता एक प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्ती होण्याकडे वाटचाल सुरु होणार होती.
परंतु डॉ. रवींद्र कोल्हे ह्यांच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. त्यांना फक्त पैसा कमावण्यासाठी काम करायचे नव्हते, तर त्यांना त्यांच्या शिक्षणाचा उपयोग लोकांसाठी काहीतरी उपयोगी कार्य करून करायचा होता.
डॉ. कोल्हे ह्यांनी महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे ह्यांची अनेक पुस्तके वाचली होती व त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर झाला होता. म्हणूनच त्यांनी भरभराट करून देणारी मेडिकल प्रॅक्टिस न करता गरजू लोकांची मदत करता येईल असे काहीतरी करण्याचे ठरवले. पण नेमके कुठे जावे आणि काय कार्य करावे हे दोन प्रश्न त्यांच्यापुढे होते.
सुरुवात कशापासून करावी हे त्यांच्या लक्षात येत नव्हते.
त्यांचा हा प्रश्न David Werner ह्यांनी लिहिलेल्या Where There is No Doctor ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाने सोडवला. ह्या मुखपृष्ठावर असे चित्र होते की चार माणसे एका रुग्णाला कुठेतरी घेऊन जात होते व त्यावर असे लिहिलेले होते –
“हॉस्पिटल ३० मैल लांब”
हे बघून डॉक्टरांना असे जाणवले की आपण ह्याच ठिकाणी कामाची सुरुवात केली पाहिजे जिथे कुठल्याच वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत.
म्हणून त्यांनी बैरागड ह्या गावाची निवड केली.
हे गाव मेळघाट जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. ह्या गावाला जाण्यासाठी अमरावतीहून पुढे प्रवास करावा लागतो, पण हरिसालहून पुढे जायला कुठलेच वाहन उपलब्ध नाही. ह्या ठिकाणाहून बैरागडला जाण्यासाठी ४० किमी इतके अंतर पायी चालत जावे लागते.
डॉक्टर कोल्हे ह्यांचे प्रोफेसर डॉक्टर जाजू म्हणतात की ह्या अशा लांबच्या ठिकाणी काही सोयी नसलेल्या ठिकाणी काम करायचे झाल्यास एका डॉक्टरला तीन गोष्टी जमल्या पाहिजेत.
पहिली म्हणजे सोनोग्राफी शिवाय किंवा रक्त देण्याच्या सोयीशिवाय गरोदर बाईची डिलिव्हरी करणे, दुसरी म्हणजे एक्स-रे शिवाय न्युमोनियाचे निदान करणे आणि तिसरे म्हणजे डायरियाचा इलाज करणे.
डॉक्टर कोल्हे ह्या सर्व गोष्टी शिकण्यासाठी म्हणून ६ महिने मुंबईला राहिले आणि नंतर ते बैरागडला गेले. पण तिकडे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ह्या ठिकाणी वैद्यकीय सेवा नसताना आलेल्या अनेक प्रश्नांशी लढा द्यायला फक्त एमबीबीएसची डिग्री असून उपयोगाचे नाही.
डॉक्टर कोल्हे सांगतात की,
त्यांच्याकडे एकदा एक माणूस स्फोटात हात गमावल्या नंतर १३ दिवसांनी आला. परंतु त्यांनी सर्जरीचे शिक्षण घेतले नसल्यामुळे ते त्याची मदत करू शकत नव्हते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अजून ज्ञान संपादन केले पाहिजे.
ते १९८७ साली एमडी करण्यासाठी बैरागड येथून बाहेर पडले. त्यांनी त्यांचा थेसिस मेळघाट येथील कुपोषण ह्या विषयावर सादर केला. त्यांच्या थेसिसमुळे ह्या प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधले गेले.
बीबीसी रेडियोने मेळघाट वर एक कार्यक्रम प्रसारित केला आणि ह्या ठिकाणच्या समस्या सर्व जगापुढे मांडल्या गेल्या.
त्यानंतर डॉक्टरांना मेळघाट येथे परत जायचे होते. पण त्यांना तिथे एकट्याने जायचे नव्हते. त्यासाठी त्यांना एका साथीदाराची गरज होती जी खांद्याला खांदा लावून त्यांच्यासह ह्या भागात लोकांसाठी काम करेल. त्यांनी स्वतःसाठी जीवनसाथी शोधणे सुरु केले.
ह्यासाठी त्यांच्या चार अटी होत्या.
पहिली म्हणजे ती बैरागड येथे जाण्यासाठी ४० किमी पायी चालू शकली पाहिजे.
दुसरी अट म्हणजे तिने फक्त ५ रुपयात लग्न केले पाहिजे (त्या काळी कोर्ट मॅरेजसाठी ५ रुपये इतका खर्च होता).
तिसरी अट म्हणजे केवळ ४०० रुपये दर महिना इतक्या पैश्यात संसार करायची तयारी असायला हवी. (ते प्रत्येक पेशंट कडून फक्त १ रुपया इतकीच फी घेत असत आणि महिन्याला त्यांच्याकडे अंदाजे ४०० पेशंट येत असत)
आणि चौथी अट म्हणजे तिने प्रसंगी लोकांच्या कल्याणासाठी दुसऱ्याकडे हात पसरावे लागले तरीही त्यासाठी मागेपुढे पाहू नये.
त्यांनी सुमारे १०० मुलींचे प्रस्ताव नाकारले. शेवटी त्यांना डॉक्टर स्मिता भेटल्या. त्यांची नागपूर येथे चांगली प्रॅक्टिस सुरु होती. त्यांनी डॉक्टर रवींद्र ह्यांचा प्रस्ताव स्वीकारला व त्यांच्या सर्व अटींसह मेळघाटातील बैरागड येथे जाण्याची तयारी दर्शवली आणि अखेर १९८९ साली मेळघाट गावाला त्यांचा दुसरा डॉक्टर मिळाला.
तेथे गेल्यानंतर ह्या डॉक्टर दाम्पत्याला आणखी काही प्रश्नांना सामोरे जावे लागले.
गावच्या लोकांनी डॉक्टर रवींद्र ह्यांना तर स्वीकारले होते. परंतु डॉक्टर स्मिता ह्या स्त्री सबलीकरणासाठी अनेक प्रयत्न करीत होत्या, त्यांना मात्र गावच्या लोकांनी अजून पर्यंत स्वीकारले नव्हते.
जेव्हा डॉक्टर स्मिता त्यांच्या पहिल्या अपत्याच्या वेळी गरोदर होत्या, त्यावेळी त्यांची डिलिव्हरी डॉक्टर रवींद्र ह्यांनी स्वत: करण्याचे ठरवले जसे ते गावातल्या स्त्रियांची डिलिव्हरी करीत असत.
पण काही गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाल्याने डिलिव्हरी नंतर बाळाला meningitis, pneumonia आणि septicemia चे इन्फेक्शन झाले. तेव्हा लोकांनी त्यांना व बाळाला अकोला येथील मोठ्या दवाखान्यात हलवण्याचा सल्ला दिला.
तेव्हा डॉक्टर स्मिता ह्यांनी मात्र गावातच थांबून इतर बाळांप्रमाणेच आपल्याही बाळाची गावातच ट्रीटमेंट व्हावी असा निर्णय घेतला. त्यांच्या ह्या निर्णयामुळे गावातले लोक त्यांचा आदर करू लागले.
डॉक्टर कोल्हे सांगतात की,
“सर्वांना माहित होते की मेळघाट मध्ये लहान मुले कुपोषणाने मरत आहेत. लोक न्यूमोनियाने, सर्पदंशाने ,मलेरियाने मरत आहेत. अनेक लोकांनी ह्यावर संशोधन केले. पण कोणीही ह्यावर विचार केला नाही की लोकांना न्युमोनिया का होतोय? मुलांचे कुपोषण का होतेय? ह्याचे कारण आहे गरिबी!
“येथे लोक गरीब असल्याने त्यांच्या अंगावर पुरेसे कपडे नाहीत. म्हणून थंडीचा त्रास होऊन त्यांना न्युमोनिया होतो. गरिबीमुळे मुलांना पोटभर सकस अन्न मिळत नाही म्हणून ते कुपोषणाला बळी पडतात. त्यांच्याकडे गरिबी आहे, कारण शेतीचे काम संपल्यावर त्यांच्याकडे उत्पन्नाचा दुसरा सोर्सच नाही.
“आम्हाला ह्या मूळ समस्यांचे निराकरण करायचे होते.”
बैरागड येथील लहान मुलांचे आरोग्य सुधारल्या नंतर तेथील स्थानिकांनी कोल्हे दाम्पत्याला शेती व पशुपालनाविषयी सुद्धा मदत करण्याविषयी विनंती केली.
त्यांच्या मते डॉक्टरांकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. त्याठिकाणी पशु वैद्यक सुद्धा नसल्याने त्यांच्या एका पशुवैद्यक मित्राकडून डॉक्टर रवींद्र ह्यांनी पशुवैद्यकीचे शिक्षण घेतले. शिवाय अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठातून शेतीविषयी सुद्धा ज्ञान मिळवले.
त्यानंतर त्यांनी फंगस रेझीस्टन्ट बियाणे तयार केले, परंतु पहिल्यांदा ह्या बियाणांचा प्रयोग आपल्या शेतात करायला कोणीही तयार झाले नाही. तेव्हा डॉक्टर कोल्हे ह्यांनी व त्यांच्या पत्नीने स्वत: शेतात हे बियाणे पेरून शेती करणे सुरु केले.
त्यानंतर त्यांनी तरुणांसाठी शेतीतील नवनवीन पद्धती, निसर्गाचे संवर्धन आणि विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्यासाठी शिबिरे आयोजित केली.
त्यांनी तरुणांना संदेश दिला की,
प्रगती करण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तरुणांनी शेतीकडे वळलेच पाहिजे.
ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून डॉक्टर कोल्हे ह्यांच्या ज्येष्ठ पुत्राने म्हणजेच रोहित ह्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.
रोहित कोल्हे सांगतात की,
आम्ही फायद्यासाठी शेती करणे सुरु केले. आपल्याकडे महाराष्ट्रात सोयाबीनचे पिक फारसे घेतले जात नाही. आम्ही मेळघाटात सोयाबीनची शेती करणे सुरु केले.
तसेच आम्ही शेतकऱ्यांना मिश्र शेती करण्याविषयी सुचवले आणि असेही सांगितले की तुमच्या मुलभूत गरजांसाठी ज्या पिकांची आवश्यकता भासते, तुम्ही त्याचे पिक घ्या. आज मी एखादा आयआयटीयन जितके कमवू शकेल तितके उत्पन्न माझ्या शेतातून मिळवतो.
कोल्हे दाम्पत्यांने वन संवर्धन सुद्धा मनावर घेऊन त्यावर कार्य केले आहे. त्यांनी पर्यावरण चक्राचा अभ्यास केला. त्यावरून ते दुष्काळाची कल्पना शेतकऱ्यांना आधीच देऊन त्यासाठी तयार राहायला सांगतात.
त्यांनी Public Distribution System सुरु करून ह्याची काळजी घेतली की पावसाळ्यात सुद्धा सर्वांना पुरेसे अन्न मिळेल. ह्यामुळे मेळघाट हा शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा झाला. एकदा सरकारचे Public Works Department चे मंत्री कोल्हे ह्यांना भेटायला गेले असता त्यांना तिथली परिस्थिती बघून आश्चर्य वाटले.
त्यांनी कोल्हे ह्यांना व्यवस्थित घर बांधून देण्या विषयी विचारणा केली असता, स्मिता कोल्हे ह्यांनी घर बांधण्यापेक्षा चांगले रस्ते बांधण्याची विनंती केली.
तेव्हा त्या मंत्र्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन तिथे चांगले रस्ते बांधण्याची व्यवस्था केली. आज तेथील ७० % गावे चांगल्या रस्त्यांनी जोडली गेली आहेत.
कोल्हे दाम्पत्याच्या अगणित कष्टांचे फळ म्हणून आज मेळघाटात चांगले रस्ते, वीज, १२ प्राथमिक उपचार केंद्रे आहेत.
आज डॉक्टर कोल्हे त्यांच्या रुग्णांकडून फी घेत नाहीत. उलट ते त्यांना सरकारी दवाखान्यात नेतात जिकडे त्यांना चांगली वैद्यकीय सेवा मिळू शकेल.
म्हणूनच डॉक्टर कोल्हे ह्यांचा लहान पुत्र राम, जो अकोल्याच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस करतो आहे, त्याची सर्जन होऊन वडिलांच्या पावलावर पाउल टाकून मेळघाटात कार्य करण्याची इच्छा आहे.
कोल्हे कुटुंबाच्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कोल्हे दाम्पत्याला २०१९ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या ह्या कार्याला सलाम!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.